संयत व प्रभावी
By admin | Published: November 1, 2014 06:17 PM2014-11-01T18:17:24+5:302014-11-01T18:17:24+5:30
उपकथानकांची जोड देत, लांबलांबचे वळसे घेत मुख्य कथा सांगण्याची शैली चित्रपटसृष्टीत एके काळी बरीच प्रसिद्ध होती. जगभरातील नव्या पिढीतील दिग्दर्शक मात्र आता या शैलीच्या नेमक्या विरुद्ध शैलीचे चित्रपट तयार करीत आहेत. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील दोन चित्रपटांमधून नव्या पिढीचा हा संयत व बहुधा त्यामुळेच अत्यंत प्रभावी असा आविष्कार प्रकर्षानं जाणवला.
Next
- अशोक राणे
' या पोरांना अजिबात घरात राहायला नको. सारखं बाहेर.. पाहावं तेव्हा दोस्तांच्या कळपात..’’
हे सर्वत्र सर्रास म्हटलं जातं. त्यात काही नाकारण्यासारखं आहे असंही नाही. एक बदल मात्र लक्षात येण्याजोगा झालाय. घराबाहेर राहणार्या या पोरांचं वय थोडं अलीकडे सरकत चाललंय. आता पौगंडावस्थेतली किंवा त्याच्याही आधीच्या वयातली पोरं अशी सैरभैर झालेली दिसतात. आणखी एक बदल म्हणजे आता त्यात मुलीही आहेत. घरात होणार्या या पोरांच्या घुसमटीचं आजचं प्रमुख कारण आहे, आई-वडिलांचे विस्कटलेले संसार..! मात्र, हे आताच होतय असंही नाही. जागतिक चित्रपटात फ्रेंच न्यू वेव्ह हा दणकट आणि सखोल प्रवाह आणणारा आणि रुजवणारा फ्रान्स्वा त्रुफो यांचा ‘फोर हंड्रेड ब्लोज’ हे वास्तव १९५६मध्येच दाखवून गेलाय. यंदाच्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाहिलेला ‘१३’ हा चित्रपट म्हणजे ‘फोर हंड्रेड ब्लोज’चा आधुनिक अवतार आहे. तो फ्रेंच होता हा इराणी आहे. तिथला अँन्तोन आणि इथला बेमानी या दोघांचं व्यक्तिमत्त्व खूपच वेगळं आहे. मात्र, त्यांच्या घराबाहेर राहण्याचं कारण एकच आहे.. आई-वडिलांमधला टोकाचा बेबनाव.. ताणलेला नातेसंबंध!
बेमानी अवघ्या १३ वर्षांचा आहे आणि हेच आणि एवढंच चित्रपटाचं शीर्षक आहे. अर्थातच अर्थपूर्ण! या समस्येतलं गांभीर्य नेमकं तोलणारं! बेमानीच्या घरचं वातावरण पार बिघडलेलं आहे. त्यात किंचितही कसली शांतता नाही. आई-वडिलांचं सतत वरच्या सुरात भांडणं, आदळआपट आणि हाणामारी. त्याचा बाप तापटच नाही, तर हिंस्र आहे. बायकोला तर वाट्टेल तसं झोडपतोच; परंतु कोवळ्या पोरालाही सोडत नाही. बायको घर सोडून जाते तेव्हा तिला पोराला सोबत नेऊ देत नाही आणि एकट्या पडलेल्या पोरालाही तो मारायला कमी करत नाही. परिणामी, बेमानी आपल्या पद्धतीनं या परिस्थितीला भिडतो. बंड करतो. अभ्यास नीट करीत नाही. शाळेला दांड्या मारून कुठं कुठं एकटाच भटकत राहतो. शाळेतही त्याचं मन न रमायला एक कारण आहे. त्याचा एक शाळासोबती त्याला हवा तसा बुकलून काढतो. त्यामुळे घर आणि शाळा अशा दोन्ही ठिकाणी थारा नसलेला हा पोरगा नाक्यावरच्या टोळक्यात आपसूक सामील होतो. त्या टोळक्याची प्रमुख असते एक षोडशवर्षीय तरुणी! तिच्या डोळ्यांत सतत अंगार पेटलेला! अतिशय आक्रमक! बिनधास्त! या टोळक्याच्या गुंडगिरीत बेमानीचा प्रत्यक्ष सहभाग कधीच नसतो. तो फक्त त्यांच्या आसपासच वावरत राहतो; परंतु अनपेक्षित अशा संकटात सापडायला तेवढंही पुरेसं पडतं. या टोळीच्या हातून एक निर्घृण खून होतो आणि टोळीतलाच म्हणून निर्दोष बेमानीही पकडला जातो. खरं तर बेमानीइतकीच ती इतर सारी मुलंही निर्दोष असतात. खरी दोषी असते, त्यांना असं आयुष्य जगायला रस्त्यावर आणून सोडणारी सामाजिक परिस्थिती! लेखक-दिग्दर्शक आपलं सारं लक्ष याच मुद्दय़ावर सतत केंद्रित करतो. कारण, तोच या चित्रपटाच्या कथेचा गाभा आहे.
लेखक-दिग्दर्शक हुमान सयैदी एका समकालीन प्रखर सामाजिक वास्तवाचं प्रत्ययकारक चित्रण करीत असला, तरी त्याच्या चित्रपटाची सुरुवात एखाद्या अमेरिकन अँक्शनपटासारखी होते. वास्तववादी चित्रपटाची मांडणी कायम वास्तववादाचं ओझं वाहत केली पाहिजे, असं नाही. प्रखर वास्तव मांडणारा ‘१३’सारखा चित्रपट आशयाशी अतिशय भिन्न अशी शैली घेऊन कथनाला आरंभ करतो. कोवळ्या वयाची ही मुलं आणि त्यांच्या वाट्याला आलेलं हे एक प्रकारचं बेवारस जगणं हा फोकस तर ठेवायचाच आहे; परंतु त्यांच्या जगण्यातली सारी अँक्शन अशी पुरोभागी ठेवल्यामुळे चित्रपटाला गतिमानता येते. प्रेक्षक ‘आत’ येतो आणि मग त्याला पुढच्या घटितामधून यायचं ते सामाजिक भान येतं. चित्रपट म्हणजे निबंध नव्हे, याची नेमकी जाण अशा प्रकारचे घनघोर सामाजिक विषय हाताळणार्या आजच्या पिढीला आहे. हुमान सयैदीनं दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच चित्रपटात या प्रकारची कौतुकास्पद प्रगल्भता दाखविली आहे.
पटकथेपासूनच त्याची चित्रपट माध्यमाची समज दिसून येते. आपापला भोवताल अंतर्बाह्य अंगावर वागवणार्या ठोस व्यक्तिरेखा आणि बेमानीपासून सुरू करून इतर मुलांशी आणि एकूणच व्यापक सामाजिक वास्तवाशी नेऊन ठेवणारं प्रवाही कथन हे या पटकथेचं यशस्वी गमक! हायवेवरून सुसाट येत उलटीपालटी झालेली गाडी या सुरुवातीच्या दृश्याचा आणि लगेच सुरू होणार्या बेमानीच्या कथेचा थेट संबंध काय, हा तिढा प्रेक्षकांच्या मनाशी कायम ठेवण्याची आणि शेवटाला तो तितक्याच नाट्यपूर्णरीत्या सोडविण्याची लेखक-दिग्दर्शकाची योजना दाद द्यावी अशीच आहे. फ्रेंच चित्रपटानं जागतिक चित्रपटात रुजविलेल्या ‘ट्र२ी-एल्ल-रूील्ली’ या संकल्पनेचा अनुभव ‘१३’ पाहताना येतो. चित्रचौकटीत असलेल्या प्रत्येक घटकाची, दृश्याची चित्रपटाच्या सौंदर्यशास्त्रानुसार केलेली कलात्मक मांडणी, असा या संकल्पनेचा सोपा अर्थ. बेमानीची भूमिका करणारा तसेच इतर मुलांच्या भूमिका करणारी मुलं, विशेषत: टोळीप्रमुख झालेली ती मुलगी, या सर्वांचीच अभिनयाची जाण अप्रतिम म्हणावी अशीच!
लीझिओफेंग या चिनी तरुणाचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘नाता’देखील आई-वडिलांच्या तुटलेल्या नातेसंबंधांच्या पार्श्वभूमीवरचा आहे. शाळेत नव्यानं आलेल्या लीझियालुची वर्गाची मॉनिटर असलेल्या वांगझिओबिंगशी पहिल्या भेटीपासूनच दाट मैत्री होते. खरं तर दोघींचे स्वभाव अतिशय आक्रमक आणि आग्रही आहेत, तरीही दोघीत छान मैत्र जुळतं. दोघी सतत एकमेकींच्या सहवासातच वावरत राहतात. कुणाकुणाच्या खोड्या काढ, शिक्षकांच्या डब्यातील अन्न चोरून खा असा त्यांच्या वयाला साजेसा व्रात्यपणा करताकरताच चांगली पुस्तकं वाचणं, त्याविषयी एकमेकींशी बोलणं असंही त्याचं चाललेलं असतं. वर्षभरातच दोघी वेगवेगळ्या शाळांत जातात आणि त्यांच्यात शाळेच्या अंतराबरोबरच मैत्रीतही अंतर पडत जातं. तशातच वांगच्या घरची परिस्थिती टोकाला जाते. तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट होतो. वांगचं अवघं जगणंच सैरभैर होऊन जातं. हुशार, कर्तबगार, अतिशय संवेदनशील अशी ही पोरगी कशीबशी होऊन जाते. त्यातच तिला जिचा या परिस्थितीत आधार झाला असता, ती जिवाभावाची मैत्रीण केवळ दूरच नाही तर दुरावलेली. वांग एकाकी होऊन जाते. विद्यापिठीय शिक्षणाच्या निमित्तानं दोघींच्या वाटा आणखीनच वेगळ्या होतात.. परंतु एक दिवस न राहवून ली झियालू मैत्रिणीला भेटायला येते. ती घरी नसतेच; परंतु तिचा ठावठिकाणा तिच्या आईलाही माहीत नसतो. आईदेखील अकाली वृद्धत्व आल्यासारखी दिसते. ती हादरून जाते.
चित्रपटाचं शिर्षक ठी९ँं असं आहे. त्याचा चिनी भाषेत उच्चार ‘नाता’ असा होतो. चिनी लोककथांमधला हा एक देव आहे. सर्व अरिष्टांपासून संरक्षण करणारा देव, असं तिथं मानलं जातं आणि गंमतीचा भाग म्हणजे बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबर हा देव भारतातूून चीनमध्ये गेला, अशी कथा आहे. या दोघी मैत्रिणी एकमेकींसाठी एक प्रकारे हा देवच आहेत आणि तरीही त्या एका र्मयादेनंतर एकमेकींना सांभाळू शकलेल्या नाहीत. त्यांचं भागधेय त्यांचं त्यांना सोसावंच लागतं.
भंगलेलं भावविश्व आणि त्यातून पदरी आलेलं दिशाहीन, सैरभैर जगणं अशा चक्रात सापडलेली कोवळी तरुण पिढी आणि त्याच्या मुळाशी असलेलं घरचं वातावरण याचं अतिशय थेट, प्रत्ययकारक आणि तेवढंच अस्वस्थ करणारं चित्रण ‘नाता’मध्ये आहे. गेल्या रविवारच्या ‘मंथन’ पुरवणीच्या लेखात म्हटल्याप्रमाणे ‘१३’ आणि या ‘नाता’मध्येही मेलोड्रामाचा अतिशय संयत असा विचार केला आहे. या कोवळ्या पोरांच्या वाट्याला जे काही आलंय त्यानं प्रेक्षक हेलावतो; परंतु लगेचच एका अलिप्तपणे त्यांच्या भोवतालाकडे पाहू लागतो आणि आपापल्या निष्कर्षाप्रत येतो. हल्लीच्या या तरुण पिढीलाही आपल्याकडे कुणी बिच्चारे किंवा बिच्चारी म्हणून सहानुभूतीनं पाहिलेलं आवडत नाही. बघता आलं तर थेट पाहा; विचारबिचार काय करायचा तो तुमचा तुम्ही करा, असा त्यांचा पवित्रा असतो. या दोन्ही चित्रपटांतील व्यक्तिरेखांमध्ये आणि त्यांच्या लेखक-दिग्दर्शकांमध्ये हाच पवित्रा आहे. त्यामुळे जे काही समोर येतं, ते एका विलक्षण रोखठोकपणातूनच येतं आणि म्हणूनच ते भावतं आणि भिडतंही.
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.)