आधुनिक आणि पारंपरिक
By Admin | Published: February 15, 2015 03:00 AM2015-02-15T03:00:39+5:302015-02-15T03:00:39+5:30
‘ख्रिश्चन’ म्हणजे आधुनिक, हिंदू म्हणजे जन्मत:च सहिष्णू आणि मुस्लीम म्हणजे जन्मत:च अतिरेकी वा हिंसक, असे मानण्याच्या प्रघातामध्ये गुंतलेले काही प्रश्न!
>‘ख्रिश्चन’ म्हणजे आधुनिक, हिंदू म्हणजे जन्मत:च सहिष्णू आणि मुस्लीम म्हणजे जन्मत:च अतिरेकी वा हिंसक, असे मानण्याच्या प्रघातामध्ये गुंतलेले काही प्रश्न!
गेल्या आठवडय़ात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या भारतभेटीनंतरचे एक प्रकट चिंतन केले. त्यात त्यांनी म्हटले की, भारतात जो धार्मिक उग्रवाद वाढतो आहे तो चिंताजनक आहे. त्यांनी जरी कोणत्याही विशिष्ट धर्माच्या उग्रवाद्यांचा स्पष्ट उल्लेख केला नाही, तरी त्यांना अभिप्रेत होता तो वाढता आक्र मक हिंदुत्ववाद. ओबामांचा देश, इतर अनेक देशांच्या सहकार्याने ‘आयएसआयएस’, ‘अलकायदा’ व ‘तालिबान’ यांच्या हिंस्र धर्मवादाच्या विरोधात आघाडी उघडून आहे.
भारतात या संस्थांचे काही इस्लाम उग्रपंथी आहेत, पण त्यांचा प्रसार सर्वसामान्य मुस्लीम समाजात झालेला नाही. किंबहुना जवळजवळ सर्व इस्लामी संघटनांनी इस्लामच्या नावाखाली चाललेल्या हिंस्र कारवायांचा निषेधच केला आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच अमेरिकेत व अन्यत्र म्हटले आहे की, भारतातील मुस्लीम समाज शंभर टक्के ‘भारतीय’ आणि सर्वधर्मसमभाव व शांततावाद मानणारा आहे. ओबामांनीही त्याला दुजोरा दिला आहे. तरीही त्यांनी भारतातील वाढत्या धार्मिक उग्रतेबद्दल चिंता व्यक्त केली. याचा अर्थ त्यांना विश्व हिंदू परिषद, हिंदू जागृती मंच, श्रीरामसेना या संघटनांचा धर्मवाद हा चिंतेचा विषय वाटला, हे उघड आहे.
जरी त्यांनी संदर्भ दिला नसला तरी बाबरी मशिदीचा आक्रमक हिंदू स्वयंसेवकांकडून झालेला विध्वंस, मुंबईतील 1993चे हिंसाकांड आणि गुजरातमधील 2क्क्2चे तांडव यांकडेच त्यांना निर्देश करायचा असणार. मुंबईवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यासंबंधात पाकिस्तानने जबाबदारी पत्करून, त्या हल्ल्याच्या संयोजकांवर कठोर कारवाई करण्याचा स्पष्ट सल्लाही ओबामांनी दिला आहेच. म्हणजेच ते हिंदू संघटनांवर शरसंधान करून पाकिस्तानला वा इस्लामच्या नावावर चालणा:या हिंसाचाराला लक्ष्य करीत नव्हते, असेही म्हणता येणार नाही. साक्षी महाराज, प्रवीण तोगाडिया आणि त्यांचे अतिरेकी सहकारी सध्या जो देशव्यापी धिंगाणा घालीत आहेत, ‘घरवापसी’ आणि नथुरामचे पुतळे उभारण्याचे उपक्रम करून देशात हिंदू-मुस्लीम दंगे घडवून आणू पाहात आहेत; त्यामुळे भारतात हिंसेचा डोंब उसळू शकतो, हे लक्षात घेऊन ओबामांनी म्हटले की, महात्मा गांधींना हे विलक्षण क्लेशकारक ठरले असते. ओबामांनी गांधीजींचा संदर्भ वैश्विक सर्वधर्मसमभाव व शांततावाद या विचारांच्या दृष्टिकोनातून दिला. आपल्या देशात गांधीजींना फक्त ‘स्वच्छता अभियान’चे ब्रँड अॅम्बॅसॅडर करून त्यांच्या तत्त्वज्ञानाला पाने पुसण्याचे जे उद्योग चालू आहेत ते ओबामांच्या लक्षात आले आहेत, हे उघड आहे. भारतीय विज्ञान परिषदेत ज्या भेदक पद्धतीने तथाकथित प्राचीन विज्ञान-तंत्रज्ञानात भारत विमाने बनवत होता, अण्वस्त्रे बनवत होता आणि प्लॅस्टिक सर्जरीही करत होता, हे सांगितले गेले; त्याचेही अहवाल ओबामांपर्यंत पोहोचले असणार. ते दावे आणि त्या अनुषंगाने केल्या जाणा:या वल्गना हे सर्व त्याच आक्र मक हिंदुत्वाचा भाग होते.
म्हणूनच काही वैचारिक प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? सनातनी प्रवृत्ती म्हणजे काय? आधुनिकता आणि पारंपरिकता म्हणजे काय? हिंदू धर्मालाही काही जण ‘सनातनी धर्म’ वा ‘वैदिक धर्म’ असे म्हणतात! काहींना वाटते, ‘ािश्चन’ म्हणजे आधुनिक आणि ‘मुस्लीम’ म्हणजे प्रतिगामी वा मागासलेले! हिंदू म्हणजे जन्मत:च सहिष्णू आणि मुस्लीम म्हणजे जन्मत:च अतिरेकी, असेही मानण्याचा प्रघात आहे. म्हणूनच आपण यातील किमान ‘आधुनिकता’ या संज्ञा-संकल्पनेचा विचार करू या.
ओबामांना अभिप्रेत आहे तो आधुनिक, प्रगत, प्रगल्भ, विज्ञानवादी भारत-सनातनी, धर्मवादी भारत नव्हे!
‘आधुनिकता’ म्हणजे काय, याबद्दल अजूनही भल्याभल्यांना पुरेशी जाण आलेली नाही. त्यामुळेच ‘परंपरा’ ही संकल्पनाही अस्पष्ट आहे. ‘आधुनिक’ कशाला म्हणायचे आणि ‘पारंपरिक’ कशाला संबोधायचे, याबद्दलच्या वादांमुळे अनेकदा सरकारच्या धोरणांमध्येही गोंधळ असतो. तसाच तो व्यक्तिगत वा सामाजिक वर्तनातही असतो.
परंपरांना ‘इतिहासा’चा आधार दिला आहे. इतिहास आणि परंपरा गौरवशालीच असतात, असे गृहीत धरून आजच्या व्यवहारासाठी त्यांची साक्ष काढली जाते. इतिहास जितका प्राचीन तितका अधिक अभिमानास्पद, असेही मानण्याची प्रथा आहे.
ज्यू असे मानतात की, त्यांचा इतिहास सर्वांत प्राचीन आणि म्हणून त्यांच्या परंपरा अतिशय उज्ज्वल! (परंतु असाच दावा हिंदुत्ववादी, चिनी, अरबही करतात.) मुद्दा हा की, परंपरा जर इतक्या उज्ज्वल असतील तर ‘आधुनिक’ व्हायची काय गरज?
आधुनिकतेचा भारतातही अर्थ घेतला जातो तो मुख्यत: वेषभूषा, जीवनशैली, टेक्नॉलॉजी, इंग्रजी भाषेचे ज्ञान याच संदर्भात. ‘आधुनिकीकरण’ म्हणजे ‘युरोपियनीकरण’ किंवा ‘पाश्चिमात्यीकरण’ असेच मानण्याची पद्धत जगभर आहे; त्यातही मुख्य संस्कार आहे पश्चिम आणि उत्तर युरोपचा. पोर्तुगाल, स्पेन किंवा अल्बानिया, बल्गेरिया व रुमानिया वा आर्मेनिया यांच्या संस्कारांचा कुणी उल्लेखही करीत नाही.
हिंदुस्थानच्या शोधात निघालेल्या कोलंबसला 1492मध्ये ‘शोध’ लागला अमेरिकेचा. कोलंबस स्पेनचा. वास्को-द-गामा पोर्तुगालचा. म्हणजे हिंदुस्थानात यायचा सागरी मार्ग शोधून काढला तो पोर्तुगीज व्यापा:यांच्या आर्थिक मदतीवर निघालेल्या वास्को-द-गामाने; परंतु पुढे वसाहती स्थापल्या त्या इंग्रजांनी, डचांनी वा फ्रेंचांनी. पोर्तुगाल आणि स्पेन मागे पडत गेले. कोलंबस वा वास्को-द-गामा यांनी ‘आधुनिकता’ आणली, असे कुणी म्हणत नाही. त्यांनी ‘धर्मप्रसार’ आणि ‘धर्मविस्तार’ केला! पण इंग्रज, फ्रेंच, डचांनी मात्र काबीज केल्या बाजारपेठा. वसाहती स्थापून साम्राज्यविस्तार केला. त्या विस्ताराबरोबर ‘आधुनिकते’ची त्यांची संकल्पना जगभर पसरू लागली. कधी त्यांनी त्या साम्राज्यविस्ताराला आधुनिक म्हटले, तर खिश्चन धर्मप्रसार म्हणजे आधुनिकता, असे मानले. कधी गौरवर्णीय म्हणजे ‘मॉडर्न’ आणि कृष्णवर्णीय म्हणजे ‘बॅकवर्ड’, असा अर्थ रूढ होऊ लागला.
परंतु जगातील सर्व अभिजन वर्गात ‘आधुनिक’ म्हणून रुजलेली शैली ही प्रथम पश्चिम युरोपातून आणि नंतर अमेरिकेतून येत राहिली. गेल्या तीस-पस्तीस वर्षांत कोरिया, मलेशिया, सिंगापूर इत्यादी देश समृद्ध झाले. फोर्ड, मर्सिडीज मोटारी वापरू लागले, अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स घरोघरी दिसू लागली, मोबाइल फोन आणि कॉम्प्युटर-इंटरनेट आले. लोक म्हणू लागले, आता हेही देश ‘आधुनिक’ झाले. कारण ‘आधुनिकते’शी समृद्धीचे आणि तंत्रज्ञानाचे नाते जोडले गेले होते. त्यामुळे ‘आधुनिकते’च्या व्याख्येबाबत समाजशास्त्रज्ञांमध्ये गडबड होऊ लागली.
जर अत्याधुनिक स्टेनगन खांद्याला लावली, जबरदस्त ताकदीचा अद्ययावत रणगाडा लष्करात आणला, कार्यक्षम असा उपग्रह आणि त्याच्या मदतीने चालणारा टीव्ही ट्रान्समिटर देशाने बनवला, क्षेपणास्त्रेही बनवली व हे सर्व एखाद्या ‘प्राचीन’ धर्माच्या प्रसारासाठी वापरले जाऊ लागले, तर तो देश वा समाज आधुनिक म्हणता येऊ शकेल काय? परंतु इस्लाम धर्म आधुनिक असूच शकत नाही, असा एक विचारप्रवाह सध्या सर्वत्र रूढ होऊ पाहात आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेला अतिरेकी मूलतत्त्ववाद्यांना, ज्यूंच्या ङिायोनिस्ट राष्ट्रवाद्यांना आणि अमेरिकेतील चर्चवादी समर्थकांना एक समान शत्रू मिळाला आहे.
विशेष म्हणजे, ‘आधुनिकते’च्या निकषावर ही नवी वैचारिक आघाडी उभी केली जात आहे! जगातील यापुढचा घमासान सांस्कृतिक संघर्ष हा ‘मागास’ इस्लाम विरु द्ध इतर ‘प्रगत’ धर्म असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, सॅम्युएल हन्टिंग्टन यांनी प्रतिपादन केलेला हा ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायङोशन्स’ उर्फ जागतिक सांस्कृतिक संघर्ष ‘सिद्धांत’ पाश्चिमात्य संस्कृती पूर्वीपासूनच प्रगत आहे असे गृहीत धरणारा आणि म्हणूनच दिशाभूल करणारा आहे.
आधुनिकता आणि परंपरा या दोन्ही संकल्पना एकाच वेळेस, सोयीस्करपणो वापरल्यामुळे हाहाकार माजू शकतो! आधुनिक माध्यम तंत्रज्ञानच आज अतिशय मागासलेल्या, प्रतिगामी, समाजविघातक विचारांना बळकटी देताना आपण पाहतो. म्हणूनच हातात ‘लेटेस्ट’ मोबाइल, ‘लेटेस्ट’ कार आणि अत्याधुनिक गॅजेट्स येऊन माणूस आधुनिक होत नाही. आधुनिकता येते ती विचार, प्रगल्भता, सुसंस्कृततेतून. अब्राहम लिंकनचा खुनी हा गुलामगिरीच्या बाजूचा होता. गांधीजींचा खुनी हा आक्रमक हिंदुत्वाचा पुरस्कर्ता होता आणि ज्ञानेश्वरांना वाळीत टाकणारे सनातनी ब्राrाण होते!
-ओबामांनी दिलेल्या अनाहूत सल्ल्याला खरे तर इतके व्यापक परिमाण आहे!
(लेखक ज्येष्ठ पत्रकार-संपादक आणि जागतिक घडामोडींचे भाष्यकार आहेत.)