पैशाची भाषा

By admin | Published: January 31, 2015 06:32 PM2015-01-31T18:32:36+5:302015-01-31T18:32:36+5:30

रुपयांत कमावणारा माणूस डॉलरमध्ये खर्च करू लागला तर तो नुकसानीत जातो. ‘डिंक’, ‘कोंबडी’, ‘भात’. यासारख्या चलनात कमावणार्‍या माणसांचे असेच काहीसे झाले आहे. त्यांच्या जगात ते श्रीमंत, पण पैशांच्या जगात आले तर शोषित!

Money language | पैशाची भाषा

पैशाची भाषा

Next
>मिलिंद थत्ते
 
बाळ, खूप शिक, मोठा हो’ असा एक आशीर्वाद दिला जातो. यात असे गृहीत असते की, खूप शिकल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. त्यातही शिकणे म्हणजे बुकं शिकणे असेच गृहीत असते. खूप पुस्तकी विद्या मिळवलेला माणूस मोठा असतो, असे नकळत मनावर बिंबत असते. अशी अनेक गृहीतके संस्कृतीसोबत येत असतात. यातच खूप पैसा मिळवलेला किंवा मिळवू शकणारा माणूस म्हणजे सुखी-समृद्ध माणूस असेही एक गृहीतक आहे. पैशाने समृद्धी येते यात खोटे काहीच नाही, पण हेच एक सत्य आहे असे मानणे मात्र फसवे आहे. 
काळानुरूप समृद्धीचे स्रोत आणि कल्पनाही बदलत असतात. मौर्य काळात राजाही गायी पाळत असे, त्या चारण्यासाठी जंगलाचा एक तुकडाही राखून ठेवलेला असे. महाभारतातली एक लढाई विराट राजाच्या गायी शत्रूने पळवण्यावरून झाली होती. ‘गोधन’ फार महत्त्वाचे मानले जात होते. जव्हार संस्थानच्या राजाच्या गायी हातेरी गावच्या सात विहिरींवर पाणी पिण्यासाठी यायच्या, असे हातेरीतल्या म्हातार्‍यांच्या आताही आठवणीत आहे. इतका काळ गोधन टिकले. जमीन हेही कृषी संस्कृतीच्या काळात मोठेच धन होते. राजांनी वेतन देण्याऐवजी इनाम जमिनी देणे हे मुघलांपासून ते आदिवासी राजांपर्यंत सर्वांच्या राजवटीत दिसते. आताही जमीन हे धन आहेच, पण ते एनए (अकृषी) झाल्यानंतर! सोने, चांदी आणि रत्ने यांचा धन आणि माध्यम या दोन्ही प्रकारे वापर झाला. सोन्या-चांदीला स्वत:चे मूल्य होते, पण त्यानंतर चलनाची कल्पना आली. नोटा आल्या, हलकी नाणी आली. नोटेच्या कागदाची किंमत त्यावर छापलेल्या रुपयांपेक्षा खूपच कमी असते. नोटेला किंमत असते ती त्यावर छापलेल्या वचनामुळे - ‘‘मैं धारक को सौ रुपये का मूल्य अदा करने का वचन देता हूँ.’’ सरकारने त्या मूल्याचे सोने ठेवून हे वचन छापलेले असते. हे वचन म्हणजेच आता धन मानले जाते. 
याही काळात काही लोक या वचनाच्या भानगडीत पूर्ण अडकलेले नाहीत. आमच्या गावातली एक म्हातारी आहे. तिने पाळलेल्या कोंबड्या ही तिची गुंतवणूक आहे. ती गुंतवणूक कशी वाढवायची हे तिला चांगले माहीत आहे. जेव्हा-जेव्हा तिला पैशांची गरज असते, ती एखादी कोंबडी विकते. पैसे तिला पाहिजे तसे ती खर्च करते, मौज करते. एक शेतकरी आहे, त्याने मागच्या दोन वर्षांपासून आलेला सगळा भात साठवून ठेवला आहे. तीन कणग्या भरलेल्या आहेत. औंदा सुरणही भरपूर लावून ठेवला आहे. पुढच्या वर्षी पोराचे लगीन करायचे आहे. सुरण आणि एक कणगी भात लग्नातल्या गावजेवणासाठी आहे. एक कणगी मुलीच्या बापाला देज म्हणून देण्यासाठी आहे. आणि एक कणगी विकून इतर खर्च भागवायचा आहे. माणसाला ज्या-ज्या गुंतवणुकीत गती असते, तिथेच तो गुंतवणूक करतो. या लोकांचा बँक आणि त्यात आपोआप वाढणारा पैसा यावर विश्‍वास नाही. भात आणि कोंबडी ही त्यांना पिढय़ान्पिढय़ा माहीत असणारी संपत्ती आहे. ती कशी सांभाळावी, वाढवावी हेही त्यांना चांगले कळते. एखाद्या बाईला कांदे हवे असतात. पैसा कमावण्याचे साधन तिच्याकडे नसते. मग ती जंगलात जाते. कहांडोळीचा किंवा धामोडीचा डिंक काढते. हा डिंक पळसाच्या पानात गुंडाळून आठवडी बाजारात जाते. तिथे या डिंकाच्या चारपट वजनाचे कांदे तिला डिंकाच्या बदल्यात मिळतात. एखादा शिकलेला माणूस तिला वेड्यात काढतो. म्हणतो चार किलो कांदे म्हणजे साठ-सत्तर रुपये आणि एक किलो डिंक म्हणजे किमान तीनशे रुपये. बाईला सौदा कळला नाही. बाई म्हणते मला कुठे रुपये पाहिजे होते, मला कांदे पाहिजे होते ते मिळाले ! अशाच प्रकारे तिला डाळ आणि मीठसुद्धा मिळते. पैशाच्या भाषेत भाषांतर केले तर हे शोषण आहे. रुपयामधला पगार डॉलरात बदलला की कमी वाटतो तसेच आहे हे. रुपयांत कमावणारा माणूस डॉलरमध्ये खर्च करू लागला तर तो नुकसानीत जातो. तसेच काहीसे डिंक, कोंबडी, भात या चलनात कमावणार्‍या माणसांचे झाले आहे. त्यांच्याच जगात ते राहिले तर ते श्रीमंत आहेत, आणि पैशाच्या जगात आले तर शोषित. पण पैशाचे जग त्यांना बाहेर राहू द्यायला तयार नाही. त्यांचा समावेश आमच्या अर्थचक्रात व्हायलाच हवा असा ‘प्रगत’ जगाचा अट्टहास आहे. त्याला ‘फायनान्शिअल इन्क्लूजन’ (वित्तीय समावेश) असे छान नाव आहे. पंतप्रधानांनी त्याला ‘जन-धन योजना’ असे यमकी नाव दिले आहे. आम्ही ज्या पैसा भाषेत बोलतो, त्याच भाषेत सर्वांनी बोलले पाहिजे असे प्रगत जगाने ठरवले आहे. वसाहतवादाच्या काळात ‘व्हाइट मॅन्स बर्डन’ (गोर्‍या माणसावरचे ओझे) असा एक सिद्धांत प्रचिलत होता. या सिद्धांतानुसार सार्‍या जगाचा उद्धार करायचे ओझे गोर्‍या माणसावर आहे असे गोर्‍या माणसांनीच ठरवून घेतले होते. सर्वांनी युरोपिय पद्धतीचे कपडे घालणे, युरोपिय भाषा बोलणे, युरोपिय व्यसने करणे - अशा अनेक गोष्टींचा अंमल त्यातूनच जगावर लादला गेला. असेच आता जन-धनाचे आहे.
पैशाच्या जगात लोकांना ओढून ताणून आणण्यामागचा उद्देश चांगला असेल, पण पळत्या घोड्यावर बांधून घातलेल्या अनुभवी माणसाचे काय होईल? त्याला या जगात टिकता यावे, ‘स्वस्थ’ राहता यावे याची काळजी घेणार्‍या रचनाही पैशांच्या जगाने पुरवल्या पाहिजेत. 
 
 
(लेखक समावेशक विकासासाठी काम करणार्‍या 
‘वयम्’ चळवळीचे कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Money language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.