शहाणपणाच्या खजिन्याची पेटी (‘मन्क इन अ मर्स’- डॉ. अशोक पनगढ़िया यांचे वाचनीय पुस्तक)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 06:00 AM2021-07-25T06:00:00+5:302021-07-25T06:00:02+5:30
सुख, मन:शांती मिळेल का? आपला मेंदू कसा काम करतो? अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण देता येईल का? हे माहीत करून घ्यायचे आहे? मग वाचायलाच हवे..
- मेहा शर्मा (लोकमत टाइम्स)
‘मन्क इन अ मर्स’ हे मेंदूविकारतज्ज्ञ पद्मश्री डॉ. अशोक पनगढ़ियांचे पुस्तक अलीकडेच त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाले. डॉ. पनगढ़िया यांनी या पुस्तकात खऱ्याखुऱ्या शहाणपणाचा आणि मधुर स्मृतींचा खजिनाच खुला केला आहे. जीवनाशी निगडित प्रश्न हाताळताना भारतीय तत्त्वज्ञान, आधुनिक विज्ञान आणि व्यक्तिगत जीवनातील अनुभव यांचे बेमालूम मिश्रण डॉ. पनगढ़ियांनी वाचकांसमोर ठेवले आहे. मेंदूचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक कोणीही हस्तगत करू शकेल, अशी साधनेही त्यांनी पुरवली आहेत. डॉ. पनगढ़िया मानवी मनात खोल डोकावतात. माणसाचा मेंदू असाधारण का? आपल्या जीवनावर प्रभुत्व गाजवण्याची आंतरिक शक्ती त्याच्यात कशी आहे हे दाखवतात. जीवनाला आकार देण्यात नशीब, संधी यांचे महत्त्व काय हे उलगडताना त्यांनी याचाच आविष्कार घडवला आहे. आपली ऐहिक उद्दिष्टे साध्य झाल्याशिवाय सुख, मन:शांती मिळेल का? आपण जसे वागतो, कृती करतो ती तशी का करतो हे तो समजून घेईल का? रोज आपण जे अनेक निर्णय घेतो त्यामागे आपला मेंदू कसा काम करतो? केवळ आपल्यासाठी नव्हे तर समाजासाठी अधिक अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी मेंदूला प्रशिक्षण देता येईल का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात आहेत.
व्यावसायिक यश, ऐहिक संपत्ती यासह जीवनाचा आनंद घेऊनही एखाद्याला अंतिम सुख, शांती मिळेल का? यावर पुस्तक मार्मिक प्रकाश टाकते. आध्यात्मिक सुखाच्या शोधासाठी ऐहिक गोष्टींचा त्याग करावा लागतो, साधू बैरागी व्हावे लागते या जुन्या समजुतींचा लेखकाने समाचार घेतला आहे.
डॉ. अशोक हे अरविंद पनगढ़िया यांचे मोठे बंधू. डॉ. अशोक यांचे प्रदीर्घ आजारातच कोरोना होऊन निधन झाले. आपल्या व्यावसायिक कार्यकाळात त्यांनी असंख्य रुग्णांवर उपचार केले. त्यांचा मुलगा अरिहंत लंडनस्थित शेअर गुंतवणूकदार आहे. त्यांच्या उदारमनस्कतेचा परिचय गेली काही वर्षे ते लिहीत असलेल्या या पुस्तकातून होतो. लेखन पूर्ण होऊन पुस्तक प्रकाशनाला गेले असताना त्यांचे निधन झाले.
‘मन्क इन अ मर्स’ :
पद्मश्री डॉ. अशोक पनगढ़िया
प्रकाशक : ब्लूम्सबरी इंडिया