‘मोताइनी’
By admin | Published: July 15, 2016 04:39 PM2016-07-15T16:39:11+5:302016-07-15T16:39:11+5:30
पाठको-या कागदांच्या वह्या, उरलेल्या पोळ्यांचे लाडू, जुन्या साडय़ांच्या गोधडय़ा. असं जुन्याचं नवं आपली आई, आजी करायची. आपल्यासारखाच जपान हा देश आहे ‘काटकसर’ संस्कृती जपणारा.
Next
>शर्मिला फडके
(लेखिका ख्यातनाम कलासमीक्षक आहेत)
काहीही वाया न घालवण्याचा जपानी संस्कार
पाठको-या कागदांच्या वह्या, उरलेल्या पोळ्यांचे लाडू, जुन्या साडय़ांच्या गोधडय़ा. असं जुन्याचं नवं
आपली आई, आजी करायची. आपल्यासारखाच जपान हा देश आहे
‘काटकसर’ संस्कृती जपणारा. नव्या पिढीर्पयत ती जाणीवपूर्वक पोचवणारा.
मानवनिर्मित, निसर्गनिर्मित संकटे
वारंवार झेललेल्या जपानी नागरिकांवर काहीही वाया न घालवण्याचे संस्कारजन्मापासूनच केले जातात.
मध्यमवर्गीय भारतीय घरांमधे किमान एक कोणीतरी असतोच ज्याला काटकसर आवडत असते. कधी ते आजोबा असतात, जे नातवंडांना पाठको-या कागदांच्या वह्या हाताने शिवून देतात किंवा आजी असते, जी उरलेल्या पोळ्यांचे लाडू करते किंवा जुन्या साडय़ांच्या पिशव्या, गोधडय़ा शिवते. कधी आई असते, जी गिफ्ट रॅपर्स नीट सांभाळून ठेवते, नळातून वाहून जाणारं पाणी वाचवण्याकरता काम करणा:या बाईला समजावून सांगते. किंवा बाबा, जे मुलांवर ओरडतात, गरज नसताना पंखे-दिवे, कम्प्युटर चालू ठेवला तर. यात हेतू वेगवेगळे असतात. कधी तो काटकसर करून पैसे वाचवणो असतो, कधी पर्यावरणाची काळजी घेण्याचे संस्कार मुलांवर करायचे असतात किंवा घराची ती पारंपरिक शिस्तही असू शकते.
काटकसर किंवा वस्तूंचा पुनर्वापर ही संकल्पना जगभरातल्या जवळपास सर्वच देशांमधल्या समाज-संस्कृतीमधे पारंपरिकरीत्या आढळून येते. त्याचे स्वरूप, त्यामागची कारणो फक्त वेगवेगळी. एकंदरीतच यांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगती फार झालेली नव्हती त्या काळात नैसर्गिक साधनसंपत्ती मर्यादित प्रमाणात वापरणो आणि जे वापरले त्याची जमेल तितकी परतफेड करण्याची वृत्ती किंवा जाणीव जास्त होती. युरोप-अमेरिकेत यांत्रिक आणि वैज्ञानिक प्रगतीचा वेग वाढल्यावर वस्तू विकत घेण्याचे, त्या टाकून देण्याचे, नैसर्गिक स्रोतांचा अतिवापर करण्याचे प्रमाण वाढत गेले. भारतातही आता तरुण पिढीमध्ये काटकसर, पुनर्वापर संस्कृतीचा झपाटय़ाने :हास झाल्याचे दिसते.
मात्र अजूनही एक देश असा आहे जो ही ‘काटकसर’ संस्कृती जपण्याचा, नव्या पिढीर्पयतही ती जाणीवपूर्वक पोचवण्याचा प्रयत्न सातत्याने करत राहिली. अर्थातच तो देश म्हणजे जपान. अनेक मानवनिर्मित, निसर्गनिर्मित संकटे वारंवार ङोललेल्या जपानी नागरिकांनी वस्तूंचा पुनर्वापर करण्याचे, काहीही फुकट न घालवण्याचे संस्कार; ज्याला जपानमधे ‘मोताइनी’ या नावाने ओळखले जाते, तो आपल्या संस्कृतीमधून जराही लोप पावू दिला नाही. उलट नव्या, आधुनिक स्वरूपात तो पुनरुज्जीवित केला आणि जगभर पोचवला.
मोताइनी - याचा शब्दश: अर्थ गाभा. प्राचीन जपानी शिंतो तत्त्वज्ञानामध्ये तो ‘आत्मा’ या अर्थाने वापरला गेला. आपल्या भवतालातल्या वस्तूंमध्ये निवास करणा:या आपल्या पूर्वजांच्या आत्म्याचा आदर करणो म्हणजे ‘मोताइनी’. आदर करणो म्हणजेच ती वस्तू वाया न घालवणो, नष्ट होऊ न देणो किंवा तिचा बेजबाबदार वापर न करणो. त्या वस्तूबद्दल मनात कृतज्ञता, आदर बाळगणो. घरातली, परिसरातली अडगळ काढून टाकून मोकळा अवकाश तयार करण्याबद्दल बोलत असताना आधुनिक पर्यावरणीय त्रिसूत्री- रिडय़ूस, रियूज आणि रिसायकल म्हणजेच वस्तूंचा ‘जपून वापर करणो’, ‘पुनर्वापर करणो’ आणि ‘पुनर्निर्माण करणो’ याबद्दल सविस्तर विचार करणो महत्त्वाचे ठरते. यामध्ये अजून एक शब्द ‘रिस्पेक्ट’ म्हणजेच ‘वस्तूंचा आदर करणो’ जोडला की या ’मोताइनी’ संकल्पनेचा अर्थ स्पष्ट होतो.
‘मोताइनी कल्चर’ म्हणजेच ‘वेस्ट नथिंग’चे पुनरुज्जीवन झाल्यावर जपानी लोकांनी पुनर्निर्माणाच्या नवनव्या पद्धती शोधून काढण्यात आपली कल्पनाशक्ती, क्रिएटिव्हिटी, बौद्धिक आणि शारीरिक श्रम पणाला लावले. घरोघरी, शाळेत मुलांना ‘मोताइनी’ मंत्रचे धडे दिवसरात्र दिले गेले. तांदळाचा एकही दाणा, कागदाचा एकही कपटा, कापडाची बारीकशीही चिंधी वाया जाता कामा नये. ‘मोताइनी’ शब्द भिंतींवर ठळकपणो दिसेल असा सर्वत्र लावला गेला. ‘मोताइनी’ जपानी संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनला. या सर्व प्रयत्नांचे थक्क करणारे सकारात्मक परिणाम पुढच्या काही दशकांमध्ये जगाने पाहिले.
मारिको शिन्जू या जपानी लेखिकेने आपल्या ‘मोताइनी ग्रॅण्डमा’ नावाच्या पुस्तकात जपानी समाजात मोताइनी संस्कृतीचे जाणीवपूर्वक पुनरुज्जीवन करण्यासाठी सर्व थरांमधूनच जे प्रयत्न झाले त्याबद्दल सविस्तर लिहिले आहे.
वस्तूंचा पुनर्वापर कसा करायचा, नव्या वस्तू ज्या सुंदरही असतील आणि उपयोगीही कशा बनवता येतील, याचे प्रशिक्षण हा घरगुती संस्कारांचा आणि शालेय शिक्षणाचा भाग असतो.
जपानमध्ये जुन्या किमोनोच्या कापडापासून रोजच्या वापरातले कपडे, बॅगा, पर्सेस, अगदी कापडी पादत्रणोही बनवली जातात. त्यानंतर त्यापासून स्वयंपाकघरातील चॉपस्टीक होल्डर्स, ग्लास होल्डर्स, वारा घ्यायचे पंखे बनवले जातात.
आपल्याकडे शाळेच्या वह्यांमध्ये शिल्लक राहिलेले कोरे कागद वर्षाच्या शेवटी वेगळे काढून त्यापासून पुन्हा घरच्या अभ्यासाकरता वह्या बनवणो, मोठय़ा मुलांची पुस्तके लहान भावंडांनी वापरणो किंवा दुकानात पुन्हा नेऊन विकणो, घरातल्या जुन्या पण चांगल्या स्थितीतल्या कपडय़ांचा पुनर्वापर अशा अनेक गोष्टी आधीच्या पिढीर्पयत मध्यमवर्गीय घरांमध्ये सहज केला जात. काटकसर, पुनर्वापर या गोष्टींना कमी लेखले जात नव्हते. आता जपानच्या ‘मोताइनी कल्चर’ किंवा ‘वेस्ट नथिंग’चे मॉडेल भारतातही राबवायचे असेल तर शाळा आणि घरांमधून आपल्याकडच्या या पारंपरिक काटकसरी वृत्तीचे आजच्या जगाला साजेसे पुनरु ज्जीवन होण्याची गरज आहे.
आफ्रिकेतील ग्रीन बेल्ट चळवळीचे जनक, नोबेल विजेते वान्गारी माथाई यांनी या मोताइनी जीवनशैलीचा वापर आपल्या पर्यावरणीय कार्याच्या सबलीकरणाकरता केला.
‘वेस्ट नथिंग’ कल्चरचे अजून एक उदाहरण म्हणजे आर्कान्सस येथे जेसिका मॅक्लार्ड यांनी सुरू केलेला फ्री पॅण्ट्री प्रोजेक्ट. सार्वजनिक जागी उभारलेल्या एका मोफत स्वयंपाकघरामध्ये लोकांनी आपापल्या घरामधील जास्तीचे अन्नपदार्थ किंवा वस्तू आणून ठेवाव्या आणि ज्यांना गरज आहे त्यांनी त्या वापराव्या असे या योजनेचे स्वरूप. वस्तू वापरून झाल्यावर जर गरज नसेल तर पुन्हा त्याच जागी, इतर कोणा गरजूच्या वापराकरता नेऊन ठेवावी. या प्रयोगाला अमाप प्रतिसाद अगदी लगेचच मिळाला.
यूरोप, अमेरिकेमध्ये अनेक शहरांमध्ये सुरू असलेल्या आणि लोकांचा उत्तम प्रतिसाद लाभलेल्या फ्री लायब्ररी संकल्पनेवरून तिला ही कल्पना सुचली. आपापल्या घरातली वाचून झालेली पुस्तके घरात साठवून न ठेवता एका सार्वजनिक ठिकाणी ठेवलेल्या कपाटामधे नेऊन ठेवायची, मग ज्यांना हवं आहे ते वाचतील, वाचून झाल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी आणून ठेवतील अशी ही संकल्पना.
ज्यांना काही विशिष्ट वस्तूंची गरज आहे ते तिथल्या फळीवर त्यांची नावे लिहून ठेवतात. एक- दोन दिवसात पॅण्ट्रीमध्ये ती वस्तू कोणीतरी आणून ठेवते. अनेक लोकं मुद्दाम जास्त वस्तू खरेदी करून त्या फ्री पॅण्ट्रीमध्ये ठेवतात. अनेक जण जास्तीचे, गरज नसलेले कपडे, इतर वस्तूही ठेवतात. ज्या वस्तूंची गरज नाही त्या घराबाहेर नुसत्याच फेकून न देता दुस:या कुणाच्या तरी वापरात यायला हव्या, ज्यांना त्याची गरज आहे या भावनेतून.
प्रत्येक शहरात, शहरातल्या प्रत्येक वस्तीत अशा फ्री पॅण्ट्रीज जगभर असाव्या हे जेसिका मॅक्लार्डचे स्वप्न आहे. अधिक मोठय़ा प्रमाणावर ही योजना विस्तारली जाईल आणि राज्यांच्या, देशांच्या सीमा पार करून लोकं एकमेकांच्या गरजा आपापसात अशा मदतीद्वारे, शेअरिंगद्वारे मिटवतील असा विश्वासही तिला वाटतो.
पुनर्वापर केलेल्या वस्तूंना एक कहाणी असते आणि लोकांना अशा वस्तू वापरायला आवडतात. आपल्या पणजीच्या जीर्ण झालेल्या शालूपासून बनवलेल्या स्टोलला जशा अनेक जुन्या कहाण्यांचे अस्तर असते
जपानमधे जी घरे मोताइनी जीवनशैली (नो वेस्टेज) चा वापर करतात त्यांना समाजात विशेष आदर आणि मान दिला जातो. स्वयंपाकघरातल्या भांडी धुण्याच्या सिन्कमधले किंवा वॉशिंग मशीनमधले पाणी टॉयलेटकरता वापरणे, टॉयलेटमधे गरजेनुसार वेगवेगळी फ्लश हॅण्डल्स बसवणो, बाटलीबंद पाणी विकत न घेता घरातील अथवा सार्वजनिक नळावरील पाणी एकाच बाटलीमधे भरून घेऊन प्रवासात वापरणो, जुन्या टॉवेल्सचा वापर धूळ, काचेची भांडी पुसायच्या फडक्यांकरता करणो. असे सारे जाणीवपूर्वक केले जाते. दुकानदार एक्सापयरी डेट जवळ आलेल्या वस्तू कमी किमतीमधे विकतात, जेणोकरून त्या सर्व वापरून संपतील आणि वाया जाणार नाहीत. भेटवस्तूंना गुंडाळलेला चमकदार कागदही तिथे नीट जपून ठेवून पुन्हा वापरला जातो.