डोंगर संस्कृती

By admin | Published: June 25, 2016 02:31 PM2016-06-25T14:31:17+5:302016-06-25T14:31:17+5:30

खराखुरा निसर्ग आणि त्याला ‘आव्हान’ देणारे खरेखुरे आव्हानवीर.. कोणी घनदाट जंगलातून जीव तोडून सायकल चालवतंय, कोणी डोंगराच्या बेलाग कड्यावरून जमिनीकडे झेपावतोय, तर कोणी लाटांनाही मागे सारत जिद्दीनं पुढे सरकतोय.. ही सारीच दृश्यं चित्रपटांतली, तरीही अगदी खरीखुरी ! पण कशासाठी हे सारं?..

Mountain culture | डोंगर संस्कृती

डोंगर संस्कृती

Next
- प्रशांत परदेशी

उंचच उंच डोंगररांगा, आकाशाला भिडलेले कडे आणि तेथून जमिनीकडे झेप घेणारे साहसवीर, घनदाट जंगलातून आपल्या पूर्ण ताकदीनिशी सायकल चालवणारे सायकलपटू, अंगावर रोरावत येणाऱ्या पाण्याच्या लाटांना निडरपणे तोंड देत पुढे निघालेले जिद्दी आव्हानवीर..
कॅनडातील अल्बर्टा येथील बांफ नॅशनल पार्क येथे जगभरातले साहसवीर आपण केलेल्या धाडसाचं दृश्यरूप चित्रपटांच्या माध्यमातून जगासमोर ठेवतात. त्यातलं एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे पाहणाऱ्यांच्या अंगावर क्षणाक्षणाला रोमांच उभ्या करणाऱ्या या क्षणांचा एकही रिटेक घेतलेला नसतो! 
‘बांफ चित्रपट महोत्सव’ त्यामुळेच इतर चित्रपट महोत्सवांपेक्षा हटके आणि विलक्षण अनुभूती देणारा. चित्रपटांच्या नुसत्या विषयांमुळेच नाही, तर त्यातल्या ‘वास्तवा’मुळेही हे चित्रपट एक न विसरता येणारा थरार आणि रोमांचक अनुभव दर्शकांसमोर ठेवतात. मुंबईत गेल्या अनेक वर्षांपासून हा महोत्सव भरवला जात आहे. मागच्या वर्षी या महोत्सवाने मुंबईच्या सीमा ओलांडून भारतातल्या दहा शहरांतल्या जनतेच्या मनावर गारुड केलं. यंदाही मुंबई, सुरत, नाशिक, कोलकाता, पुणे, अहमदाबाद, बडोदा, चंदिगड, दिल्ली, लेह, मसुरी असा ‘बांफ’चा दुसरा ‘इंडिया टूर’ रंगतो आहे.
‘बांफ’चा ‘वर्ल्ड टूर’ प्रसिद्ध होता, आता बांफचा ‘इंडिया टूर’ प्रसिद्ध होऊ पाहत आहे. अवघ्या चार तासात नऊ-दहा लघु ते मध्यम लांबीचे चित्रपट दाखविणाऱ्या ‘बांफ’ महोत्सवाची लोक वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात ते यामुळेच. हा चित्रपट महोत्सव ‘माउण्टन फिल्म फेस्टिव्हल’ म्हणून संबोधला जातो. तो भरवला जातो तो मुळातच माउण्टन बुक फेस्टिव्हलच्या सोबतीने. 
बांफ चित्रपट महोत्सव हा खरं म्हटलं तर चित्रपटांपेक्षाही तिथल्या पर्यावरण संस्कृतीचीही एक ओळख आहे. लोकांच्या साहसी वृत्तीला खतपाणी घालून साधलेल्या पर्यावरण संतुलनाचा त्याचा इतिहासही मोठा रंजक आणि लक्षवेधी आहे. कॅनडाच्या अल्बर्ट प्रांतात १८८५ साली पहिले राष्ट्रीय उद्यान निर्माण करण्यात आले. साधारणपणे साडेसहा हजार वर्ग किलोमीटरच्या विस्तृत भागात पसरलेल्या बांफ राष्ट्रीय उद्यानात अनेक हिमनद्या, हिमपठारे व कोनिफेरस प्रजातीची जंगले आहेत. सुटीवर जाणे, पर्यटन करणे, भरपूर मौजमजा करणे, साहसी खेळ खेळणे हा प्रकार पाश्चात्त्य देशांत पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. अशांसाठी ‘बांफ’ हे नंदनवन ठरले नसते तरच नवल. 
कॅनेडियन पॅसिफिक रेल्वे प्रकल्पामुळे बांफची वेगवान कनेक्टिव्हिटी वाढली. पाठोपाठ उत्तम रस्ते, इमारती निर्माण करण्यात आल्या. अवघ्या बांफ शहराला एक प्रकारे रिसोटर्चे स्वरूप दिले गेले व संपूर्ण बांफ हे रिसोर्ट शहर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यामुळे व्हायचे तेच झाले. बांफवर पर्यटकांचा कमालीचा ताण पडू लागला. जो तो ऊठसूट बांफमध्ये सुटी घालविण्यासाठी जाऊ लागला. एका वर्षी तर तब्बल तीस लाख लोकांनी बांफला भेटी दिल्या. तिथल्या पर्यावरण समतोलाचे पार बारा वाजले.
त्यात भरीस भर म्हणजे पहिल्या विश्वयुद्धाच्या पश्चात बांफमध्ये नवीन रस्ते निर्माण करण्यात आले. जागोजागी बांधकामे झाली. पूर्वी केवळ हंगामातच खुले असणारे बांफ आता पर्यटकांसाठी वर्षभर खुले ठेवले जाऊ लागले. 
१९९० या एकाच वर्षात पन्नास लाख पर्यटकांनी बांफला भेट दिली. पर्यावरण समतोलाकरिता पर्यटकांची अफाट उपस्थिती एक मोठे आव्हान ठरू लागले. मॉण्टेन, अल्पाइन व सब अल्पाइन अशी तीन प्रकारची जंगले, आर्टिकसारखे हवामान, रॉकीसारखी अवाढव्य पर्वतमाला, तीन प्रमुख नद्यांची खोरी अशा बेजोड निसर्गसंपदेच्या पार्श्वभूमीवर बांफमध्ये पर्यटन विकसित करण्यात आले. लोकांचाही प्रचंड ओढा वाढला, परंतु त्याने पर्यावरणाचा समतोल बिघडू लागल्याचं लक्षात आलं तेव्हा कॅनेडियन सरकारने नवीन पर्यटन नीती तयार केली. त्याचीच फलनिष्पत्ती म्हणजे त्याठिकाणी केलेली डोंगरसंस्कृतीची रुजुवात.
अगोदर पर्यटनासंबंधीचे नियम कडक करण्यात आले. तिथल्या वने, प्राणी, पक्षी, कीटक व डोंगरांचे संवर्धन लोकांच्या मनात रुजविण्याकरिता डोंगरपुस्तक मेळे भरविले जाऊ लागले. डोंगरसाहित्यावर जागतिक पातळीवर रोख स्वरूपात आकर्षक पुरस्कार दिले जाऊ लागले. पुस्तक साहित्य मेळ्यासोबतच १९७६ पासून माउण्टन फिल्म फेस्टिव्हल सुरू करण्यात आला. त्याला मग डोंगर पोस्टर स्पर्धा, छायाचित्र स्पर्धा अशा विविध स्पर्धांची जोड दिली गेली तसा बांफचा हा मेळा अधिकच मोलाचा ठरू लागला.
बांफचा असा हा छोटेखानी प्रवास पृथ्वीच्या पर्यवरण रक्षणाच्या दिशेने मैलाचा दगड ठरू पाहत आहे. खरे तर हिमालयात बांफपेक्षा मोठी, भव्य नि साहसवीरांना कायम आव्हान देणारी निसर्गसंपदा आहे, परंतु दुर्दैवाने बांफसारखी डोंगर संस्कृती अद्याप तिथे रुजली नाही. कॅनेडियन सरकारने झटपट निर्णय घेऊन पर्यटन नीती बनवली व त्याची अंमलबजावणी करताना लोकांच्या साहसीवृत्तीला कुठेही लगाम घातला नाही, उलट साहसाला प्रोत्साहन दिले, डोंगर साहित्याला भरभरून आर्थिक साहाय्य केले. चित्रकार, छायाचित्रकार, चित्रपट उद्योग अशा कितीतरी पातळ्यांवर जागतिक दर्जाचे वातावरण तिथे निर्माण केले. 
उत्तुंग हिमालयीन पर्वतरांगा आणि उभा-आडवा पसरलेला सह्याद्री.. निसर्गसंपदा आणि साहसवीरांची खाण असलेल्या या परिसरातही अशीच काही उपाययोजना केली तर नुसतं पर्यावरणाचं संरक्षणच नाही, तर अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील. 

सह्याद्रीत आव्हाने कमी आहेत का? सह्याद्रीतल्या डोंगरांचा रौद्रपणा, जंगलांचे सौंदर्य, पक्षी, प्राणी, कीटक, वृक्षवेलींच्या प्रजाती.. सह्याद्रीत निवास करणारे साहसाला कुठे कमी पडताहेत का? तरीपण सह्याद्रीचे पर्यावरण दिवसेंदिवस खालावत चालले आहे. 
गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या प्रमुख राज्यांतल्या पर्जन्यमानात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सह्याद्रीच्या संवर्धनासाठी बांफसारखी डोंगर संस्कृती निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.

(लेखक गिर्यारोहक आणि मुक्त पत्रकार आहेत.)
 

nasikmail@gmail.com

Web Title: Mountain culture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.