रम्य ती गिरीशिखरे... शिस्त आणि टीम बाँडिंग शिकवणारं, निसर्गाच्या जवळ नेणारं गिर्यारोहण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 05:01 PM2021-05-29T17:01:25+5:302021-05-29T17:02:32+5:30
प्रयत्नांची पराकाष्ठा करायची पण शिखरावर काहीही करून पोचलेच पाहिजे असा हट्ट न धरता आपल्या क्षमतेचा मान राखून केव्हा मागे फिरायचे हे पण आम्हाला निसर्गच शिकवतो.
- सागर ओक
29 मे हा गिर्यारोहणाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवलेला दिवस आहे. आजच्याच दिवशी, म्हणजे 29 मे 1953 ला भारताचा शेर्पा तेंझिंग नोर्गे आणि न्यूझीलंडचा एडमंड हिलरी हे दोघे जगातील सर्वोच्च सागरमाथा उर्फ एव्हरेस्ट शिखरावर पोचले. तिथे पोचण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न होता. म्हणून या दिवसाचे माझ्यासारख्या गिर्यारोहकांना जास्त अप्रूप वाटतं. मी स्वतः एक हौशी गिर्यारोहक. गेली सुमारे एकोणपन्नास वर्षे माझी डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती सुरू आहे. मला गिर्यारोहणाचे व्यसनच जडले म्हणा ना.
मुळात हा एक "Pure Sport" आहे. म्हणजे यात कोणतीही स्पर्धा नसते. स्वांतसुखाय भटकणे, उंच डोंगरावर जाणे, शिखरांवर पोचणे आणि जाता येता आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेणे हाच उद्देश असतो. थोर गिर्यारोहक जॉर्ज मेलरी याला एकदा विचारले की "Why do you climb a mountain" आणि त्याने त्याला इतके साधे उत्तर दिले की "Because it is there." वर वर साधं वाटलं तरी या एका वाक्यात तो खूप काही सांगून गेलाय. इथे आम्ही शिखर काबीज किंवा पादाक्रांत करायला जात नाही. आम्ही त्यावर पोचायचा प्रयत्न करतो. तो डोंगर तिथेच असतो, आमच्या त्यावर जाण्याने किंवा न जाण्याने त्याला काहीच फरक पडत नसतो. इथे समाधान आम्हाला मिळते की त्याने, त्या निसर्गाने, आम्हाला मित्र समजून त्याच्या अंगा-खांद्यावर खेळू दिले. "We don't Climb the Mountain with the intention to show to the World, we Climb to see the World" अशी आमची धारणा असते.
जेव्हा आम्ही सह्याद्रीतील डोंगरात किंवा गड किल्ल्यावर जातो तेव्हा वर पोचण्यापर्यंत असंख्य गोष्टी पाहायला, अनुभवायला मिळतात. तो आनंद घेत घेत आम्ही वर जातो. मग मधे एखादा झरा वाहत असेल तर त्याचे पाणी पितो, एखाद्या झाडाच्या बुंध्यातून उगवलेल्या बांडगुळचे निरीक्षण करतो, गंमतशीर आकाराचा दगड उचलून घेतो, पायवाट ओलांडून जाणारी मुंग्यांची रांग बघत बसतो, आणि अश्याच प्रसंगातून आनंद घेता घेता शरीराला जरुरी असणारा आराम पण तेव्हाच घेतो. स्पर्धा असल्या प्रमाणे जर प्रथम वर पोचायचं ध्येय ठेवलं तर या सगळ्या आनंदाला मुकावं लागतं म्हणून इथे स्पर्धा नसते. स्पर्धा असलीच तर ती स्वतःशीच असते. आपल्या इच्छाशक्तीशी स्पर्धा असते. "बास, आता माझ्यातील सगळी शक्ती संपली, मी आता यापुढे जाऊ शकत नाही" अशी वेळ जेव्हा येते तेव्हा आपले मनच आपल्याला समजावत असते की "अरे तुझी फक्त पन्नास टक्के शक्तीच तू वापरली आहेस, तेव्हा थोडा आराम कर आणि उठून चालू लाग." आणि आम्ही पुन्हा चढू लागतो आणि वर पोचतो. काही वेळेस जंगलात किंवा कड्यावर पुढचा रस्ता कुठे आहे ते कळत नाही. अश्या वेळेस आम्ही शांत डोक्याने नीट निरीक्षण करून, आजूबाजूच्या परिस्थितीचा आढावा घेऊन मार्ग अभ्यासून यशस्वीपणे पुढे जातो. हीच शिकवण किंवा सवय रोजच्या जीवनात पण उपयोगी पडते.
शिस्त आणि संघभावना हा आणखी एक गुण गिरीभ्रमणामुळे अंगात भिनतो. जशी आपली पाच बोटे एकसारखी नसतात तसच ग्रुपमध्ये सगळे मेंबर्स सारख्या क्षमतेचे नसतात. चालायला लागल्यावर कोणी जास्त पुढे जातात तर कोणी मागे पडतात. अश्या वेळी सगळ्या टीमवर सगळ्यांनी एकत्र जाण्याची एक नैतिक जबाबदारी असते. ट्रेकिंग मधून काय शिकतो विचारलं तर जे भरपूर काही शिकतो त्यातलेच हे.
एखाद्या किल्ल्यावर किंवा डोंगरावर संध्याकाळी मुक्कामाला पोचलो आणि कॅम्प ठोकला की नंतरचा वेळ तर अविस्मरणीय असतो. पटकन तीन दगड रचून चूल मांडली की रात्रीच्या जेवणाची सोय करायची. कमीतकमी साधनात ते कसं जमवायचं याची शिकवण तिथे मिळते. एका पातेल्यात डाळ तांदुळाची खिचडी बनवून अंधार होण्यापूर्वी खायची. नंतर पथाऱ्या पसरून गप्पा टप्पा, गाणी, गोष्टी यांची मैफिल जमवायची. त्याच पातेल्यात पाणी, दूध पावडर घालून कॉफी करायची आणि आकाश पाहत प्यायची. रात्रीचे आकाश पण किती वेगवेगळं असतं... पौर्णिमेचा चंद्र आला की आकाशात त्याची दादागिरी सुरू होते. चांदण्या बिचाऱ्या चिडीचूप होऊन जातात पण त्याच चांदण्या अमावस्येला लखलखीत होऊन आकाशात स्वैर नृत्य करतात असं वाटतं. मध्येच एखादा तारा निखळला की सेकंदभर त्याला बघण्याची संधी मिळते. अशी मजा शहरातील बिल्डिंगच्या गच्चीवरून पाहायला मिळत नाही. क्वचित एखाद्या जंगली जनावराचा आवाज ऐकू येतो पण कोणतेही श्र्वापद माणसावर स्वतःहून कधीच हल्ला करत नाही हे माहीत असल्यामुळे आपण निर्धास्त असतो. अश्या निवांत वातावरणात मला देवाशी गप्पा मारतोय असं वाटतं. त्याचा सहवास आहे असाच भास होतो. शहरातील नामांकित मंदिरात कधीही न जाणारा मी एखाद्या गडावरील भग्न देवळात तासंतास निवांत रमतो. गड किल्ल्यांची इतिहासकालीन वास्तुरचना पाहून आपल्या पूर्वजांचा सार्थ अभिमान वाटतो.
तसा पंचवीस तीस वर्षापूर्वी पर्यंतचे व आत्ताचे गिरीभ्रमण यात खूप बदल झालेत. आता गडांच्या खालच्या गावांपर्यंत चांगले रस्ते व बस सेवा उपलब्ध आहेत. मोबाईल फोन ची सेवा सुरू असते ज्यामुळे तुम्ही gps चा उपयोग करू शकता. डिजिटल कॅमेरे सहज वापरले जातात. पूर्वी हे काही नव्हतं. एखाद्याकडे कॅमेरा असला की ती चैन समजली जायची. ब्लॅक अँड व्हाईट फोटोसाठी रोल वापरावे लागत. हंटर बूट, पाठीवर सैनिकांची असते तशी हॅवर सॅक, आणि सतरंजी घोंगडी असं साहित्य असायचं. कॉटनचे जड रोप असायचे. अर्थात त्यात पण मजाच होती. आम्ही तेव्हाही भटकलो आणि आत्ता पण फिरतो.
हिमालयातील भ्रमंती व मोहिमांची गंमत आणखीनच वेगळी असते. तिथे इथल्यासारखे दोन तीन दिवस नाही तर दोन तीन आठवडे पर्वतांच्या सांनिध्यात रहायचं असतं. हिमालयाचा कॅनव्हास जास्त भव्य असतो. तिथे जाण्यासाठी तयारी पण तशीच जास्त करावी लागते, पण त्या भव्यतेची मजा काही वेगळीच... आपण या विश्वात किती सूक्ष्म आहोत याची जाणीव तिथे होते. सगळं "मी, माझा, अहंगंड" गळून पडतो. हे जग चालवणारा माणूस नसून तो अचाट शक्तीचा विश्वकर्मा आहे आणि माणूस फक्त निमित्त आहे हे पटतं. (सध्या कोरोना साथीच्या काळात हे सर्वांनच पटलं आहे).
ट्रेकिंगला जाताना नेहमी मला लोक विचारतात की इतकं रिस्क तुम्ही का घेता? मी त्या सगळ्यांना हेच सांगतो की यात तुम्हाला वाटतं तसं रिस्क नसतं. या सगळ्या गिर्यारोहणाचे पद्धतशीर शिक्षण असतं आणि शिवाय निसर्ग सुद्धा तुम्हाला वेळोवेळी शिकवत असतोच. तुम्ही फक्त तुमचा आगाऊपणा आणि माज सोडून जायचं असतं. मग दुर्घटना होण्याची शक्यता अगदीच नगण्य असते. तरीही जर एखादा अपघात झालाच तर तो निसर्गाचा प्रकोपच.
मी स्वतः माझ्या ट्रेकिंगच्या सुरुवातीच्या काळात एक एक आठवड्याचे रॉक क्लाइंबिंग चे दोन कोर्स मुंबईजवळ मुंब्रा येथील कड्यांवर केले आहेत ज्याला नामवंत शेर्पा प्रशिक्षक होते आणि नंतर हिमालयातील गिर्यारोहण प्रशिक्षण संस्थेत एक महिन्याचा निवासी बेसिक कोर्स केला आहे. या सर्व कोर्समधे चढाई करण्यापासून ते कँपची जागा ठरवणे, दोरखंड व इतर साहित्याचा शास्त्रीय वापर करणे, अडचणीच्या प्रसंगात कसा बचाव करायचा, इत्यादी प्रात्यक्षिकासह शिकवले जाते. त्यामुळे रिस्क अगदीच कमी असते. माझ्या गेल्या एकोणपन्नास वर्षांच्या भटकंतीत माझ्या ग्रुपला अजून एकही जीवघेणा अपघात झाला नाही हे मी माझं भाग्य समजतो. कदाचित "सर सलामत तो पगडी पचास" या म्हणीप्रमाणे मी कधी "हाराकिरी" करत नाही म्हणून असं असेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करायची पण शिखरावर काहीही करून पोचलेच पाहिजे असा हट्ट न धरता आपल्या क्षमतेचा मान राखून केव्हा मागे फिरायचे हे पण आम्हाला निसर्गच शिकवतो.
म्हणून तुम्हाला हे सांगायला मी अजून समर्थ आहे. एव्हरेस्ट शिखरावर मनुष्य प्रथम पोचला त्याचा आज 67वा वर्धापनदिन म्हणून माझ्या भटकंतीच्या आठवणींना उजाळा मिळाला. आता हा सध्याचा कोरोनाचा उद्रेक संपला की माझ्यासारख्या असंख्य "डोंगरी" मंडळींचे पाय पुन्हा पर्वतांकडे वळतील.