मिस्टर इंडिया

By Admin | Published: July 10, 2016 09:53 AM2016-07-10T09:53:56+5:302016-07-10T09:53:56+5:30

शिस्त, व्यवस्थितपणा, टापटीप.. स्वत:चेच नियम आड येतात. ‘सोय’ गैरसोय होऊ लागली आहे. आपल्याच शहरात हॉटेलमध्ये जाऊन राहायचा प्लॅन आकार घेतो आहे. पावसाळ्यात कात टाकावी वाटते. प्रेमाचे तेच ते माणूस नको असते. प्रेमाशिवायची सोबतही चालणार असते. चुलीवरचे काही लागते. पहिल्या पावसात नव्या मनाला भेटणे, सतत स्वत:ला दिसत न राहता ‘गुप्त’ होणे, आपल्याच वातावरणात विरघळून जाणे केव्हाही चांगले. नाहीतर आयुष्य रटाळ, तेच ते बनते.

Mr. India | मिस्टर इंडिया

मिस्टर इंडिया

googlenewsNext
style="text-align: justify;">सचिन कुंडलकर
 
स्वत:च्या घरातून उठून आपल्याच शहरामध्ये एखाद्या सुंदर हॉटेलमध्ये जाऊन राहायचा प्लॅन डोक्यात आकार घेऊ लागला आहे. अंधारून आले आहे. पाऊस पडतोय आणि जे घर आवडीने आवरून सजवून जागते ठेवतो, त्या घरामध्ये मनाच्या येरझाऱ्या घालायला जागा पुरत नाहीये. 
शिस्त आड येते आहे. व्यवस्थित वागण्याची, टापटीप ठेवण्याची सवय आड येते आहे. स्वयंपाक करता येतो ही गोष्ट सोय नसून गैरसोय होऊ लागली आहे. उशिरा उठायचे ठरवले तरी उशिरा उठू शकत नाही मी. साडेसात वाजता कचऱ्याची पिशवी न्यायला बाई येते. साडेआठ वाजता स्वयंपाकाची बाई आणि मग नाश्ता करून नऊ वाजता लिहायला बसावेच लागते. साडेबारानंतर सगळ्या जगाला कामाचे फोन्स. एकनंतर बाहेरच्या भेटीगाठी. गाडीत बसून मनात चालू असलेले विचार. कामाचे, सिनेमाचे, आठवणीतल्या माणसांचे. आणि रात्री घरी परतल्यावर एखाद्या अतिशय लहान मुलासारखे गुपचूप वाट पाहणारे घर. दुपारी एक बाई येऊन ते आवरून पुसून जातात त्यामुळे अंघोळ घालून भांग पाडून नवा शर्ट घालून ठेवलेल्या लहान मुलासारखे दिसणारे माझे घर. रात्री घरी येऊन दार लावले की धावत आपल्यापाशी येणारे. या शहरात इतकी माणसे आहेत की एकांत मिळण्यासारखे दुसरे सुख नाही. त्या आपल्याच घराचा पावसाळ्यात कंटाळा येऊ लागतो. मी समुद्रापासून अर्धा पाऊण तास लांब राहतो. समुद्राची आठवण येत राहते. एरवी या शहरातल्या वेगाच्या आयुष्यात हे लक्षातसुद्धा येत नाही की आपण समुद्राच्या इतक्या जवळ असूनही त्याला भेटलेलो नाही, पाहिलेले नाही.
असे वाटते की, लहानपणी मावशीकडे राहायला जायचो आणि ती लाड करायची तसे कुणी आपल्याला उरलेले नाही. मावशी गेल्यापासून ती एक प्रेमळ जागा संपून जाते आणि परत तसे कुणीही उरत नाही. इतर नातेवाइकांकडे गेलो की त्यांच्या लहान बेशिस्त कर्कश मुलांचा आरडाओरडा सहन करावा लागतो. कुणाशीही कधीही शांत गप्पा मारता येत नाहीत कारण जाऊ तिथे सगळ्यांना असली आगाऊ मुलेमुली असतातच. ज्यांना मुले नसतात त्यांच्या बहुतेकांच्या बायका नवऱ्याला एक मिनिट मोकळा सोडत नाहीत. कारण तो नवरा हेच त्या बायकांचे एक मूल बनलेले असते. त्यामुळे आपली म्हणून जी प्रेमाची खासगी माणसे असतात ती म्हणत जरी असली की ये की आमच्यात, जरा गप्पाबिप्पा मारू ! जरी त्यांच्याकडे गेले तरी त्या आपल्या माणसांशी आता शांत गप्पा होणार नाहीत हे गेल्या काही वर्षांत लक्षात आलेले असते. त्यांचे लहानपण संपून त्यांच्या मुलांचे सुरू झालेले असते. आपले अजून संपलेले नसते. आपल्यासारखी लहान मुलांच्या मनाची माणसे त्यांनाही नको झालेली असतात. कौटुंबिक लोकांच्या जाणिवेचा एक समूह असतो. ती एक वेगळी जगण्याची पद्धत असते आणि जी माझ्यासारखी माणसे कुटुंबाच्या गर्दीशिवाय आयुष्य रचतात त्यांना अशा ठिकाणी गोंधळून संकोचून जाऊन अतिशय परके वाटत राहते. एकास एक अशा संवादाची सवय झालेल्या माणसाला फार तर फार दोन माणसांशी व्यवहार करता येतो. तीन, नऊ किंवा सतरा नाही. त्यामुळे माणसांचा घोळका दिसला की मी संकोचून आकसून बसतो. सतत कुटुंबात राहिलेल्या माणसांना आपले मन कळू शकत नाही. आपल्याला त्यांचे कळू शकत नाही. आणि अशातून कितीतरी महत्त्वाच्या नात्यांवर शांततेचे पांढरे मुलायम कापड पसरले जाते.
आपल्या माणसासोबत गप्पा मारणे, फिरायला जाणे, मद्यपान करणे, संगीत ऐकणे, एकत्र स्वयंपाक करणे हे शांत आश्वासक सुख. ते काही कारणाने तत्काळ मिळणार नसेल किंवा त्या माणसाच्या कामातून तो मोकळा होण्याची वाट पाहावी लागणार असेल तर मात्र एक प्रकारच्या एकांताला चांगला पर्याय हा दुसऱ्या प्रकारचा एकांत ठरतो. अनोळखी माणसांनी गजबजलेले जग नाही. 
शिवाय जरी कुणी लग्न केलेले असेल तरी कुणालाही सारखे आपले प्रेमाचेच तेच ते माणूस नको असते. पावसाळ्यात कात टाकावी वाटते. नवे काही हुंगावे वाटते. चुलीवरचे काही लागते. प्रेमाशिवायची सोबतही चालणार असते. सारखे प्रेम प्रेम, साडी, गाडी, हप्ता, मुले, फीया, प्रेम प्रेम, पोळी, भाजी, नवा फ्लॅट, दागिने, भांडणे, माझी आई, तुझी आई, माझा बाप, तुझा बाप, सासर, माहेर, दिवाळी, दसरा.. असे करून कंटाळा आलेला असतो. प्रेमात पडून घरी लग्न करून आणलेल्या माणसांचे सुरुवातीला रोज उत्साहाने उतरवलेले आतले कपडे आता दिवसा दोरीवर वाळताना पाहून सगळे आकर्षण चार दिवसात संपलेले असते. त्यालाच लग्न म्हणतात हे कळलेले असते. अशा परिस्थितीत कुणी बोलत नाही हे कुटुंबाला घाबरून, पण पहिल्या पावसात नव्या मनाला भेटणे केव्हाही चांगले. त्यामुळे आपले भले होते. कामाला उत्साह येतो. तात्पुरते आणि नवे माणूस पावसाळ्यात सोबत असण्यासारखे सुख नाही. त्यामुळे एक उपाय सांगतो, तो कुणालाही करून पाहता येईल.
गेल्या पावसाळ्यात मी गाडीत माझा आय पॉड, दोन पुस्तके, चालायचे बूट आणि काही कपडे टाकून घरातून निघालो आणि ओल्या झालेल्या दक्षिण मुंबईत मस्तपैकी एका हॉटेलमध्ये जाऊन दोन दिवस राहिलो. आपल्याच शहरात पाहुणा म्हणून आल्यासारखे. मला किती मजा आली हे मी सांगूच शकत नाही. आता तर जणू चटक लागल्यासारखी वाटते आहे. खोलीत सामान पसरून टाकले आणि सरळ पोहायला गेलो. हातात मार्टीनी घेऊन पूलमध्ये डुंबत बसलो. अनोळखी लोकांशी गप्पा मारल्या. मी मुंबईत अनेक वेळा ‘मी इथे राहत नाही, पुण्याहून आलोय’ असे सांगतो, तसे सगळ्यांना सांगितले. थोड्या वेळाने माझाही माझ्यावर विश्वास बसू लागला. दम लागेस्तोवर पोहलो आणि बाहेर पडून कॉफीशॉपमध्ये जेवलो. आणि चालायचे बूट घालून सरळ पावसात फिरायला बाहेर पडलो. रविवारी दक्षिण मुंबई रिकामी असते. फार सुंदर दिसते. मोठ्या ब्रिटिशकालीन इमारतींना ग्लानी आलेली असते आणि मोठे रस्ते आपली वाट पाहत असतात. मी नरीमन पॉइंटपासून गिरगाव चौपाटीपर्यंत समुद्रकाठाने रमत गमत चालत राहिलो. समुद्राच्या प्रचंड लाटा पावसाळ्यात मरीन लाइन्सच्या किनाऱ्यावर येतात. त्या अंगावर घेत. मग चालायचा कंटाळा आल्यावर टॅक्सीला हात करून हॉटेलवर परत गेलो. गरम शॉवर घेऊन लोळत टीव्हीवर सिनेमे पाहिले. उठलो आणि स्पामध्ये जाऊन थाई मसाज घेतला. आपण कुठे आहोत हे शांतपणे विसरून गेलो. मी ओळखीच्या शहरात आहे हे विसरलो. आणि होतो तिथेच पाहुणा बनलो. घरच्या जबाबदारीतून सुटी घेतली. कुणाही ओळखीच्या माणसाला भेटणे टाळले. स्पामधून बाहेर पडून ग्रीन टी पीत एक पुस्तक घेऊन तिथेच लोळत पडलो आणि झोपी गेलो. काही वेळाने स्पा बंद होताना मला कुणीतरी उठवायला आलं. मी एरवी कधीही करत नाही त्या सगळ्या गोष्टी अशावेळी करतो. कारण मी नसतोच नं माझ्या जगात. मग मी आखलेले नियम बदलून टाकतो. आपले नियमच आपल्या आड येतात हे अशावेळी कळते. उदाहरणार्थ त्यावेळी मी स्पामधून जागा होऊन, खोलीत जाऊन तयार झालो आणि न लाजता माझे ढेरपोटे शरीर घेऊन पबमध्ये गेलो आणि मोकळेपणाने घेरी येईपर्यंत नाचलो. 
सुटीला बाहेर गेले की दिवस एकट्याने घालवावा, रात्र नव्हे. आपल्याच शहरात विरघळून गेले की हे करणे शक्य होते. त्यासाठी कुठेही बाहेर सुटीला जावे लागत नाही. उत्तम चांगल्या हॉटेलमध्ये जाऊन गुप्त होऊन जायचे. 
आपल्याच वातावरणात विरघळून गेले नाही आणि सतत दिसत राहिले तर आपल्याला गुदमरल्यासारखे होते. त्यासाठी मधेमधे आपल्या मनाच्या हितासाठी प्रत्येक स्त्री-पुरु षाने मिस्टर इंडिया व्हायला लागते. नाहीतर आयुष्य फार रटाळ आणि तेच ते बनते. 
(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)

Web Title: Mr. India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.