कर्मचाऱ्यांचे भागले; एसटी आतातरी प्रवाशांची कदर करील का?, प्रवाशांची आर्त हाक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 06:48 AM2022-04-09T06:48:36+5:302022-04-09T06:49:26+5:30

न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे का असेना, एसटी संदर्भातील काही मूलभूत प्रश्न सर्वांसमोर ठेवावेसे वाटतात

msrtc strike is over now Will ST appreciate the passengers or not | कर्मचाऱ्यांचे भागले; एसटी आतातरी प्रवाशांची कदर करील का?, प्रवाशांची आर्त हाक!

कर्मचाऱ्यांचे भागले; एसटी आतातरी प्रवाशांची कदर करील का?, प्रवाशांची आर्त हाक!

Next

एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे त्यांच्या काही मागण्या मान्य झाल्या, शरद पवारांच्या घरावरही त्यांनी हल्ला केला, पण सर्वसामान्य प्रवाशांना वाली कोण?

न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे का असेना, एसटी संदर्भातील काही मूलभूत प्रश्न सर्वांसमोर ठेवावेसे वाटतात : मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्यांची वा आमदारकीची संधी हुकलेल्या राजकीय कार्यकर्त्यांची वर्णी एसटी महामंडळाच्या संचालक पदावर वा अध्यक्षपदावर लावली जाते. आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेता महामंडळात वर्णी लावलेले लोक या महामंडळाकडे ‘चरते कुरण’ किंवा ‘दुभती गाय’ म्हणूनच पाहत आले आहेत. त्यामुळेच ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या एसटीच्या ब्रीदवाक्याचा या लोकांना सोईस्कर विसर पडतो. एसटी कर्मचाऱ्यांनी  किमान संप करुन तरी आपले काही हक्क व अधिकार मिळवले. आपल्या मागण्यांसाठी शुक्रवारी त्यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील घरावरही हल्ला केला. एसटीच्या दीन बापुड्या प्रवाशांना कोणीही वाली नाही. त्यांची दया ना सरकारला येत ना महामंडळाला. 

‘ गाव तिथे एसटी’ या तत्त्वानुसार अनेक खेड्यापाड्यात उन्हापावसात तासन्तास खेड्यातील प्रवासी एसटी बसची वाट पाहत उभे असतात. या प्रवाशांना निवाऱ्याची  सोय करण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची किंवा मायबाप सरकारची नाही का?  दरवर्षी एसटी महामंडळ न चुकता प्रवासी भाड्यात वाढ करते. गणेशोत्सव- दिवाळीत तर तिकिटामागे दहा रुपये जादा कर आकारते . पण या बदल्यात प्रवाशांना काय मिळते? .... तर हाडे खिळखिळया करणाऱ्या एसटी गाड्या !  

ग्रामीण भागातील प्रवाशांच्या नशिबी हेच खटारे असतात! प्रत्येक तिकिटामागे घेतला जाणारा प्रवासी विम्याचा एक रुपया असे रोज जमा होणारे लाखो रुपये जातात कुठे ? या पैशांचा विनियोग कशासाठी केला जातो? एखाद दुसरा अपवाद वगळता महाराष्ट्रातील जवळपास सर्वच एसटी स्थानकातील स्वच्छतागृहे म्हणजे साक्षात (प्रति) नरकवास ! काही ठिकाणी खासगी क॔त्राटदारांना ‘सुलभ शौचालये’ चालवायला देऊनही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही ! 

या ठिकाणी प्रवाशांकडून पाच - दहा रुपये घेऊनही त्यांची कुचंबणा होते. तीच गोष्ट एसटीच्या उपाहारगृहांची! इथे चढ्या भावात निकृष्ट दर्जाचे भोजन प्रवाशांच्या पोटात ढकलले जाते. यावर नामी शक्कल एसटीच्या चालक - वाहकांनी शोधून काढली आहे. अधिकृत उपाहारगृहात बस न थांबवता खासगी हाॅटेल मालकांशी साटेलोटे करुन अनधिकृत ठिकाणी गाडी थांबवून अवाजवी दरातील खाद्यपदार्थ प्रवाशांना नाईलाजाने   विकत घ्यायला लावतात. (मुंबईहून पुण्याकडे एसटीने जाताना  लोणावळ्याच्या पुढे एका अलिशान खासगी हाॅटेलसमोर गाडी अर्धा - पाऊण तास थांबवली जाते. असे अनेक अनधिकृत ‘क्षुधा शांती थांबे’ महाराष्ट्रात आहेत. )  चालक - वाहकांच्या या मनमानीला एसटी महामंडळ चाप बसवेल काय? हल्ली ऑनलाइन तिकीट बुकिंग होते.

तिकिटाचे  ऑनलाइन आरक्षण होते, मग विद्यार्थ्यांना मासिक सवलतीचे पास ऑनलाईन का मिळत नाही ? शाळेचे तास बुडवून त्यांना मासिक पासासाठी तासन्तास रांगेत का उभे रहावे लागते? काही ठिकाणची एसटी स्थानके मोडकळीस आली आहेत ( उदा. रायगड जिल्ह्यातील पेण स्थानक) तर  काही ठिकाणची एसटी स्थानके जमीनदोस्त झाली आहेत (उदा. रायगड जिल्ह्यातील सुधागड पाली ) या स्थानकांची उभारणी कधी करणार? गौरी - गणपती , दिवाळी , होळी यांसारख्या सणासुदीला लाखो चाकरमानी आपल्या गावाकडे जातात. पुरेशा गाड्यांअभावी ह्या प्रवाशांना हाल्अपेष्टा सहन कराव्या लागतात.  याच संधीचा गैरफायदा घेऊन खासगी वाहनचालक या प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्यांचे आर्थिक शोषण करतात. हे दरवर्षीच घडते. यावर एसटी  महामंडळ कोणती ठोस उपाययोजना करणार आहे? सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढला, आता प्रवाशांच्या समस्यांकडे तातडीने लक्ष घालून त्यांचे निराकरण करावे हीच सगळ्यांची माफक अपेक्षा आहे.

- टिळक उमाजी खाडे, 
नागोठणे, ता. रोहा (रायगड)

Web Title: msrtc strike is over now Will ST appreciate the passengers or not

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.