चिखल आणि कमळ
By admin | Published: May 6, 2014 04:01 PM2014-05-06T16:01:37+5:302014-05-06T16:01:37+5:30
छडी लागे छमछम..या तत्त्वावर अनेक शिक्षकांचा विश्वास असतो व त्याला जागत ते मुलांना फोडून काढण्याचा उद्योग सतत करत असतात. मात्र, काही शिक्षक मुलांच्या चुका नेहमी पदरात घेतात. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात.
-प्रा. डॉ. द. ता. भोसले
छडी लागे छमछम.. या तत्त्वावर अनेक शिक्षकांचा विश्वास असतो व त्याला जागत ते मुलांना फोडून काढण्याचा उद्योग सतत करत असतात. मात्र, काही शिक्षक मुलांच्या चुका नेहमी पदरात घेतात. त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. हाच मार्ग कसा प्रभावी आहे, हे दाखवून देणारा एक हृद्य अनुभव.
त्या विद्यालयातील सारेच सहकारी त्यांना वेगवेगळ्या नावांनी पुकारतात. कुणी त्यांना एम. पी. म्हणतो. कुणी त्यांना ‘मॅप’ या शब्दाने हाक मारतो. कुणी त्यांना ‘मा पा’ असे म्हणतो. अनेक जण चेष्टेच्या सुरात त्यांना ‘जावई बापू’ अशा शब्दाने टोमणे मारतात. ‘जावई बापू’ असे म्हणण्याचे कारण असे, की त्यांचे धाकटे बंधू या संस्थेच्या अध्यक्षांचे जावई आहेत; पण यांचे मूळ नाव आहे ‘मारुती आबाजी पाटील’. त्यालाच संक्षिप्त रूप देऊन प्रत्येक शिक्षक त्यांना बोलतो. त्यांची पूर्ण ओळख द्यायची झाली, तर ते आहेत माध्यमिक शिक्षक. अध्यापनाचा विषय आहे भूगोल; पण पूर्ण वेळ शिक्षकासाठी काही तास कमी पडत असल्याने ते पृथ्वीच्या गोलाबरोबरच मराठीही शिकवितात. इतिहासाचे तास घेतात. स्टाफमधला कुणी रजेवर गेला असेल, तर वा एखाद्या तासावर जायचा कंटाळा आला असेल, तर हे ‘एम.पी.’साहेब कोणताही विषय आणि कोणत्याही वर्गावर जाऊन शिकवितात. पाककलेचे तास सोडून सार्या विषयांत ते निष्णात आहेत आणि पारंगतही.
संस्थेचे संस्थापक अध्यक्षच त्यांच्या भावाचे म्हणजे पर्यायाने यांचेही सासरे असल्यामुळे अनेक जण त्यांना या नात्याचा फायदा घ्यायला सांगतात. म्हणजे शाळाप्रमुखाच्या कारभारात हस्तक्षेप करणे, स्वत:च एखादा निर्णय घेऊन मुख्याध्यापकांना त्याची कारवाई करण्याचा आदेश देणे, आपले तास नव्याने नोकरीस लागलेल्या शिक्षकांना घ्यायला सांगणे किंवा या नात्याच्या आधारे काही आर्थिक फायदा उपटणे; पण असल्या गैर गोष्टी त्यांना बिलकूल पसंत नाहीत. मनाला पटत नाही. आपल्या समाजात ध्येयवेडे, निष्ठावंत, त्यागी, प्रामाणिक आणि सेवाभावी अशा शिक्षकांची, समाजसुधारकांची जी थोर आणि श्रीमंत परंपरा आहे, त्यांचा आदर्श या महाशयांसमोर असतो. त्यांचे जीवन आणि कार्य त्यांनी मनापासून अभ्यासले आहे. शिक्षक हा समाजाचा शिल्पकार आहे. व्यक्ती, समाज आणि देश यांच्या सर्वांगीण आणि चिरंतन अभ्युद्याचा तो ऊर्जास्रोत आहे, यावर यांची दृढ श्रद्धा आहे आणि त्यानुसार ते आचरण करतात. गैरमार्गाने मिळविलेला पैसा हे पाप आहे, असे मानून ते थोडासाही भ्रष्टाचार करीत नाहीत. ज्यासाठी आपण पगार घेतो, ते काम टाळणे म्हणजे दुराचरण आहे, असे मानून ते नियमितपणे तास घेतात. इतकंच काय, रविवारीदेखील जादा तास घेतात. आळस हा मृत्यूचा मित्र आहे, यावर श्रद्धा असल्याने ते शाळेची छोटी-मोठी कामे करतात. इतरांचेही तास आनंदाने घेतात. माणसाने मनाने निकोप, निरामय आणि चिरतरुण राहायचे असेल, तर वय विसरून शाळेतल्या मुलांमध्ये मूल होऊन खेळले पाहिजे, वावरले पाहिजे, या विचारावर त्यांचा दृढ विश्वास असल्यामुळे ते मोठय़ांच्या गर्दीपेक्षा छोट्यांच्या कोलाहलातच जास्त रमतात. साने गुरुजींच्या वचनाप्रमाणे जो मुलांचे मनोरंजन करतो, तो देवाला विशेष प्रिय असतो; हे त्यांनी व्रत म्हणून स्वीकारल्याने ते मुलांना गोष्टी सांगतात, मुलांची नाटके बसवतात, त्यांच्याकडून नृत्याचे कार्यक्रम करवून घेतात आणि भूगोल हाच विषय असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहलीही काढतात. मुख्य म्हणजे मुलांवर ते मनापासून प्रेमही करतात. मुलांनी केलेल्या खोड्या वा किरकोळ गुन्हे यांसाठी ते शिक्षा करीत नाहीत. वास्तविक पाहता ते एम.पी. म्हणजे ‘मेंबर ऑफ पार्लमेंट’ असल्यामुळे आणि एका अर्थाने शाळेचे जावईच असल्यामुळे ते कोणतीही कठोर शिक्षा सुनावू शकतात; पण एखाद्या मुलाने गुन्हा केला, तर त्याला शिक्षा करण्याऐवजी ते स्वत:लाच शिक्षा करून घेतात. या प्रकारे दर आठवड्याला ते शिक्षा भोगत असतात. अशी अनेक उदाहरणे सांगण्यासारखी असली, तरी नमुना म्हणून एकाचा उल्लेख करतो. एकदा नववीच्या काही खोडकर मुलांनी वर्गामध्ये मधल्या सुट्टीत भिंतीवर शाई शिंपडली. दोन-तीन ठिकाणी हा पराक्रम केला. वर्ग अतिशय विचित्र, बेंगरुळ दिसू लागला. एम. पी. या वर्गावर आले. चौकशी केली. कोणीही तयार होईना. अनेकांना त्यांनी विचारले; पण भीतीपोटी कोणीही शाई टाकणार्या मुलाचे नाव सांगेना. शेवटी या महाशयांनी स्वत:च बादली व फडके आणून शाईचे डाग पुसून वर्ग स्वच्छ केला. पुढच्या आठवड्यात या आगाऊ पोरांनी सार्या वर्गात कचरा केला. कागदाचे तुकडे करून सर्वत्र फेकले. सरांनी कुणाकडेही चौकशी न करता तासाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्व कागद गोळा करून कचरापेटीत टाकले. या टारगट पोरांना अधिकच चेव आला असावा. त्यांनी जिन्यातून खाली जाताना जिन्याच्या कोपर्यात ठेवलेली कचर्याची बादली लाथेनं पालथी केली. सारा कचरा पायर्या पायर्यांवर सांडला. शिवाय, कोपर्यात मुद्दाम पचापचा थुंकले. एकाने नाक मोकळे केले. वर्गातल्या काही मुला-मुलींना हे आवडले नाही. त्यांना खूप वाईट वाटले आणि शाळा सुटल्यावर तीन-चार मुलांनी या दंगेखोर व चावटपणा करणार्या पोरांची नावे या सरांना सांगितली. एम.पीं.नी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र, दुसर्या दिवशी त्या वर्गावर गेल्यावर त्या खोडकर मुलांना फळ्याजवळ बोलावले आणि त्यातील एकासमोर आपला तळहात धरून ‘‘या माझ्या हातावर थुंक . मी तो स्वच्छ करतो; पण तुझी असणारी शाळा माऊली घाण करू नको,’’ असे म्हणून त्याच्या ओठाजवळ हात नेले. तो रडू लागला. दुसर्या मुलाला जवळ बोलावले. त्याच्या हातात ओल्या फांदीची छडी दिली आणि समोर आपला हात धरून ते म्हणाले, ‘‘मी काल पायरीवर कचरा पसरला, शिवाय राहावले नाही; म्हणून थुंकण्याचा पराक्रम केला. खरे तर हा गुन्हा आहे. तो गुन्हा माझ्या हातून घडला आहे; म्हणून शिक्षा म्हणून तू या छडीने जोरात फटके मारून माझा हात रक्तबंबाळ कर. त्याशिवाय माझी खोड जिरणार नाही.’’ आणि दगडासारखा निर्जीव झालेल्या त्या मुलाचा छडी घेतलेला हात ते आपल्या हातावर मारू लागले. छडी धरलेला आपला हात तो मागे-मागे घेत असतानाच एम.पी. सर त्याच्या मनगटाला धरून आपल्याच हातावर छडीचे रट्टे लावत होते. शेवटी तो मुलगा भोकाड पसरून रडत सरांच्या पायांवर कोसळला. त्यानंतर मग सरांनी तिसर्या मुलाला जवळ बोलावले. पायांजवळ असलेला कागदी पुडा मोकळा केला आणि त्यात असलेला हार आपल्या हातात घेऊन ते म्हणाले, ‘‘या गुणी विद्यार्थ्याने सतत तीन वेळा आपल्या शाळेवर प्रेम केले आहे. एकदा भिंतीवर शाई शिंपडून, एकदा वर्ग घाण करून आणि तिसर्यांदा जिन्यावर नाक शिंकरून. यापूर्वी अशी सेवा कोणीही केली नसेल; म्हणून त्याने केलेल्या या सेवेबद्दल वर्गातर्फे मी त्याचा हार घालून सत्कार करतो.’’ सर त्याच्या गळ्यात हार घालण्यापूर्वीच त्याने सरांच्या पायांवर डोके टेकविले. नंतर वर्गासमोर क्षमायाचना केली. असा मूर्खपणा न करण्याचे वचन दिले.
असे हे एम.पी. रिकाम्या वेळेत भरपूर वाचन करतात. सर्व विषयांचे वाचन करतात. रोज तुकोबांच्या अभंगांचे पारायण करतात आणि रोज सायंकाळी घरकाम करणार्या बाईच्या मुलीचा सेवा म्हणून तासभर अभ्यास घेतात. अडीअडचणीला मदत करतात. त्यामुळे ते कृतार्थ जीवनाचा आनंद उपभोगतात.
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व
नवृत्त प्राचार्य आहेत.)