बहुआयामी व्यक्तिमत्व- वालचंद संचेती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2019 07:00 AM2019-07-14T07:00:00+5:302019-07-14T07:00:13+5:30
कोणतीही पार्श्वभूमी नसताना आयुष्याचे मार्गक्रमण करीत यशस्वी जीवन जगण्याचे भाग्य वालचंदजींना लाभले आहे...
- जवाहरलाल बोथरा-
व्यापार, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची विशेष छाप पाडणारे दि पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष आणि कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष वालचंद संचेती हे १४ जुलै २०१९ रोजी ८१व्या वर्षात पर्दापण करीत आहेत.यानिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वावर टाकलेला प्रकाशझोत!...
विकासाचा ध्यास, नाविन्याची कास आणि समाजाच्या प्रश्नांचा अभ्यास ही त्रिसूत्री कायम डोळ्यासमोर ठेऊन प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशाच्या शिखरावर पोहोचलेले बहुआयामी आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणजे वालचंदजी देवीचंद संचेती! या त्रिसूत्रीच्या जोरावर स्वत:च स्वत:च्या आयुष्याचा शिल्पकार होत त्यांनी व्यापार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये स्वत:च्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवित समाजात एक अढळ स्थान निर्माण केले आहे.
प्रतिकूल परिस्थितीत अडचणींवर मात करीत यश मिळविणाऱ्या व्यक्तीला समाज आदराने मान देत असतो. कोणतीही पार्श्वभूमी नसताना आयुष्याचे मार्गक्रमण करीत यशस्वी जीवन जगण्याचे भाग्य वालचंदजींना लाभले आहे. कायम दुष्काळी परिस्थिती असलेला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर हा तालुका. या तालुक्यातील रुई छत्रपती या खेडेगावात त्यांचा जन्म १४ जुलै १९३९ रोजी झाला. चौथीपर्यंतचे शिक्षण या गावात झाल्यावर ते १९५० मध्ये ते पुण्यात आले. त्यांचे काका दगडूराम संचेती पुण्यात राहत असत. त्यांच्याकडे राहून त्यांनी नूतन समर्थ विद्यालयातून पाचवी व सहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतरचे जुन्या मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या राजा धनराज गिरजी हायस्कूलमध्ये झाले. या शाळेतील शिक्षकांमुळे त्यांच्यावर चांगले संस्कार झाल्याचे ते नेहमी सांगतात.
पुण्यात काकांचा अन्नधान्य व मिरचीचा व्यापार होता. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काकांच्या दुकानातच व्यापारचे धडे गिरविले. त्यानंतर मिरचीचा स्वतंत्र व्यापार सुरू केला. दि पूना मर्चंट्स चेंबरमध्ये १९६० साली बाबा पोकर्णा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. बाबांच्या बरोबर सुमारे २२ वर्षे काम करण्याची अनमोल संधी त्यांना मिळाली. दोन वर्षे सहसचिव, २२ वर्षे उपाध्यक्ष, १९९१-९२ मध्ये अध्यक्ष आणि २०१४ मध्ये पुन्हा अध्यक्ष म्हणून काम करत ते चेंबरच्या माध्यमातून व्यापाºयांची सेवा करीत आले आहेत. भूसार बाजार हा नाना पेठ, भवानी पेठ, रविवार पेठ आणि गणेश पेठ परिसरात होता. चेंबरचे कार्यालयही तेथेच होते. गुलटेकडी मार्केट यार्ड येथे बाजाराचे स्थलांतर झाल्यानंतर याठिकाणी भव्य असे व्यापार भवन उभारण्यात आले. त्यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.
दिवाळीत गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी, म्हणून सुमारे ३० वर्षांपूर्वी लाडू-चिवडा उपक्रम सुरू केला. ते कार्य अव्याहतपणे आजही सुरू आहे. या उपक्रमाची नोंद ‘लिम्का बुक व गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. व्यापारातील घडामोडी आणि त्याचे व्यापारावर होणाच्या परिणामांबाबत ते अत्यंत जागरूक असतात. व्यापाºयांवर आलेल्या कोणत्याही संकटाच्यावेळी ते धावून जातात. जड वाहतुकीच्या बंदच्यावेळी झालेल्या आंदोलनात त्यांनी तुरुंगवासदेखील भोगला. सेस, जकात, एलबीटी अशा अनेक करांची अंमलबजावणी होताना सरकारकडून लादण्यात आलेल्या जाचक तरतूदींविरोधात त्यांनी अग्रेसर राहून लढा दिलेला आहे. व्यापाºयांचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमी कार्यरत असतात. कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष म्हणून ते अत्यंत उल्लेखनीय कार्य करीत आहेत. १३४ वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेल्या या शैक्षणिक संस्थेचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम त्यांनी केले आहे. आधुनिकतेची कास धरतानाच शैक्षणिक मूल्य आणि संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून ते नेहमीच आग्रही असतात. निगडी प्राधिकरण येथे संस्थेचे मोठे संकुल उभे राहिले आहे. एमबीए कॉलेज, हॉटेल मॅनेजमेंट यांसारख्या आधुनिक काळाशी सुसंगत अभ्यासक्रम सुरू केले आहेत. ई-लर्निंगची सुविधा देणारी ही पहिली संस्था आहे. याचे श्रेय अर्थातच संचेती यांचे आहे. आयुष्याच्या ८१ व्या वर्षात पदार्पण करताना त्यांच्या मनात कृतार्थतेच्या भावना उमटतात. पत्नी, मुलगा, मुली, सून आणि जावई असा त्यांचा सुखी परिवार आहे. उमेदीच्या काळात त्यांचे बंधू भगवान संचेती यांनी त्यांना मोलाची साथ दिली. सध्या मुलगा दीपेश व सून हे फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय पाहतात. त्यांचे वडील कै. देविचंद संचेती यांनी त्यांच्या गावाला पोस्ट आॅफिस, शाळा, दवाखाना सुरू करण्यासाठी परिश्रम घेतले. सामाजिक सेवेचे बाळकडू त्यांना घरातच मिळाल्याने ते सामाजिक क्षेत्रात कार्यशील राहिलेले आहेत. त्यांच्या यशामध्ये पत्नी मीना यांचा मोठा वाटा असल्याचे ते आवर्जुन सांगतात. आई सोनुबाई यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनाही इतरांशी प्रेमाने वागण्याची शिकवण मिळाली. संचेती यांनी केलेल्या कार्याची दखल जनतेबरोबरच सरकारनेही घेतली आहे. दिवंगत राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. दि पूना मर्चंट्स चेंबरतर्फे २००० मध्ये ‘उत्तम व्यापारी पुरस्कार’ देऊन त्यांना गौरविण्यात आले. केईएम रुग्णालयात चिल्ड्रन वॉर्ड सुरू केल्याबद्दल त्यांचा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. कोणत्याही कामात यश प्राप्त करायचे असेल तर चिकाटी व जिद्दीने काम करावे लागते. आत्मविश्वासाने वाटचाल करावी लागते. अपयश आले तरी खचून न जाता धडाडीने पुढे चालत राहण्याची उर्मी मनात असावी लागते, हे विचार ते मांडत असतात. त्याप्रमाणे ते आजवर मार्गक्रमण करत आले आहेत. आयुष्याचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करीत असताना समाधानी, सुखी व आनंदी जीवन जगल्याची भावना त्यांच्या मनात आहे. व्यापाराबरोबरच सामाजिक बांधिलकीचे व्रत घेतलेले संचेती यांना सहस्रचंद्रदर्शनानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा! (लेखक पूना मर्चंट्स चेंबर्सचे सचिव आहेत)