मुंबई!

By Admin | Published: June 17, 2016 05:20 PM2016-06-17T17:20:34+5:302016-06-17T17:57:46+5:30

लहानपणी मी मुंबईला गेलो की उंच इमारती, रस्त्यावरून फिरणारी सुंदर कपड्यातली माणसे पाहून घ्यायचो, जुनी ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे वाचायचो. हे शहर माझ्याशी बोलायचे. तिथे स्मगलर होते, सिनेमातले नट होते, पोलीस तर आमच्या घरातच होते. हे शहर मला त्याकाळी खूप ऊर्जा द्यायचे आणि मोठी स्वप्ने रंगवायला मदत करायचे..

Mumbai! | मुंबई!

मुंबई!

 सचिन कुंडलकर

मी मुंबई शहरामध्ये राहायला आलो तेव्हा ह्या नव्या शहरातील प्रत्येक नवी गोष्ट नि जागा अनुभवायला आणि प्यायला आसुसलेला होतो. लोकल ट्रेनच्या डब्यातून प्रवास करताना मी हिरीरीने खिडकीची जागा पटकावून बाहेरची दृश्ये पाहत बसायचो. टॅक्सी किंवा कुणाच्या कारमधून प्रवास केलाच कधी तर शेजारी कोण काय बोलतंय ह्याकडे माझे लक्ष नसायचे, इतका मी ह्या नव्या शहराच्या प्रेमात होतो. 
लहानपणी मी पुण्याहून येणार असे ठरले की माझी काकू तिची फियाट गाडी काढून मला व्हीटी स्टेशनवर न्यायला येत असे. ती स्वत: उत्तम ड्रायव्हर होती. मला काकूचे ते रूप फार म्हणजे फार आवडते आणि काही केल्या व्हीटी स्टेशन पाहिले की मला सर्वप्रथम तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तेव्हा आमच्याकडे गाडी नव्हती. फक्त मोठ्या काकांकडे होती. पण काकू कधीही गाडीला ‘आमची गाडी’ म्हणत नसे. ती ‘आपली गाडी’ असे म्हणायची. त्यामुळे मला काही काळ आपल्याकडेही गाडी आहे असे ह्या शहरात वाटायचे आणि खूप मस्त गुदगुल्या व्हायच्या. काकू तिच्या नीट नेसलेल्या सुंदर पाचवारी साडीचा पदर डोक्यावरून ओढून घ्यायची आणि व्हीटी स्टेशनबाहेर सुसाट गाडी हाणायची. मी एखाद्या सुपरवूमनकडे पाहावे तसे तिच्याकडे पाहून घ्यायचो आणि कुलाब्यातील आमच्या घराच्या वाटेवर दिसणारे ब्रिटिशकालीन जुन्या आर्किटेक्चरमध्ये घडलेले हे अद्भुत, भव्य आणि ताकदवान शहर पाहत बसायचो. माझे काका तेव्हा आधी कुलाबा पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर आणि मग दक्षिण मुंबईचे सहायक पोलीस कमिशनर होते. त्यामुळे रस्त्यावरचे सगळे ट्रॅफिक पोलीस काकूची गाडी ओळखून रिगल सिनेमाजवळील आणि त्यापुढील सिग्नलला सॅल्यूट मारायचे आणि मला काकू अजूनच सुपरवूमन वाटायची.
मी उंच इमारती पाहून घ्यायचो, रस्त्यावरून फिरणारी सुंदर कपड्यातली माणसे पाहून घ्यायचो, जुनी ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे वाचायचो. माझ्या शहरातला छोटा गोड आटोपशीरपणा जाऊन इथे मला एखाद्या ताकदवान धबधब्यासमोर आपण उभे आहोत असे वाटायचे. हे शहर माझ्याशी बोलायचे. मला ह्या शहराची कधीही भीती वाटली नाही. 
लंडन शहराविषयी मी थोडेफार वाचले होते. त्याची प्रतिकृती असल्यासारखे होते तेव्हा हे शहर. माझ्या अनुभवातील मुंबई तेव्हा मरीन लाइन्सच्या पलीकडे जायची नाही. पुढच्या उपनगरांची नावेसुद्धा मला माहीत नव्हती. ‘गिरगाव नंतर मुंबई संपते’ असे मला वाटायचे. ह्याचे कारण काकूची मुंबई हीच माझी मुंबई होती. ती नेईल तितकी. काकू वाहतुकीचे नियम नीट पाळायची आणि गाडी वळण्याआधी हात बाहेर काढून गोल फिरवायची तेव्हा तर मला आश्चर्याने भोवळ यायची बाकी असायची. कसं काय बुवा जमतं हिला असं वाटायचं. 
हे शहर मला त्याकाळी खूप ऊर्जा द्यायचे आणि मोठी स्वप्ने रंगवायला मदत करायचे. मला इथले विविध प्रकारचे अनेक मजेशीर आडनावाचे आणि खूप भाषा बोलणारे लोक आवडायचे. आपल्याला इंग्रजी बोलता येत नाही ह्याचा एक त्वेष मनात हे शहर उत्पन्न करायचे. मला हे माहीत होते की एक दिवस मी इथे कायमचा राहायला येणार आहे. कुठे राहणार आहे, काय करणार आहे हे कळत नव्हते. पण मला इथल्या बहुभाषिक वातावरणाचे जितके आकर्षण तयार झाले होते, तितके अजून कुठल्याही गोष्टीचे झाले नव्हते. मला भाषा मोहात पाडतात ह्याचा मला लहानपणापासून अनुभव आहे. एखादा माणूस परकी भाषा सहजपणे बोलला की त्या व्यक्तीविषयी एक सेक्स अपील तयार होते. त्याचा शारीरिकतेशी संबंध नसतो.
हे माझे म्हणणे त्यांनाच कळेल ज्यांना सेक्स अपील ह्या शब्दाचा अनुभव आणि अर्थ जगून माहीत आहे. परक्या भाषेकडे माझे मन आसुसून धाव घेत असे हा माझा लहानपणापासूनचा अनुभव आहे. कारण परक्या भाषेत दोन माणसे बोलतात आणि आपल्याला ते कळत नाही तेव्हा खूप मोठी गुपिते आपल्या अंगावरून वाहून जात असतात. आणि मला गुपिते निर्माण करायला खूप आवडतात. आपण गुपिते निर्माण करायची आणि इतर लोकांपुढे ओल्या चाऱ्यासारखी फेकून आपण मजा पाहत बसायचे हे करायला मला इतके आवडते की काय सांगू ! 
माझ्या गोड, साध्या एकपदरी ऐतिहासिक शहरातली गुपिते संपत चालली होती. हे नवे शहर इतक्या नवनव्या भाषा बोलणाऱ्या माणसांनी भरलेले होते की इथे गुपितांना तोटा नसणार हे मला कळून चुकले होते. खऱ्या अर्थाने त्यावेळी मला मुंबई शहर सेक्सी वाटत होते. तिथे स्मगलर होते. सिनेमातले नट होते. पोलीस तर आमच्या घरातच होते. त्यामुळे लहान वयातच सुरू होणारा आणि प्रत्येकाच्या मनात दीर्घकाळ चालणारा चोर-पोलिसाचा खेळ मला ह्या शहरात बसून खेळायला फार आवडायचे. माझा स्वभावच बैठा. मला खायला-प्यायला घालून, हातात एक पुस्तक देऊन एका ठिकाणी बसवले की मी विचार करत, गोष्टी रचत, कुणाला त्रास न देता पुन्हा भूक लागेपर्यंत तासन्तास बसून असायचो. अशी बैठ्या स्वभावाची माणसे चोर-पोलीस फार चांगले खेळतात. लपाछपीसुद्धा. मुंबई शहरात मी सैरावैरा धावत आरडओरडा करत असे खेळ खेळत बसायचो. मग संध्याकाळ व्हायची आणि काकू गाडीतून चक्कर मारायला जाऊया असे म्हणून आम्हाला घराबाहेर काढायची. 
मला लहानपणापासून, म्हणजे माझा धाकटा भाऊ जन्माला आला तेव्हापासून, मी सावत्र मुलगा आहे असे वाटायचे. तेव्हा दुपारच्या टीव्ही मालिका अस्तित्वात नव्हत्या तरीही असे विनोदी आणि नाट्यमय विचार माझ्या मनात सतत यायचे. मला वाटायचे की आता आपल्या आईवडिलांना आपली गरज नाही तर आपण घरातून पळून जाऊ. मी तासन्तास घरातून पळून मुंबईला येऊन इथे मोठा स्मगलर किंवा काकांपेक्षा मोठा पोलीस बनायचा विचार करत बसायचो. अमिताभचे सिनेमे फार लहान वयात प्रमाणाबाहेर पाहिल्याचा तो परिणाम असावा. पण मला मुंबई माझी वाटू लागली होती. पुणे शहर हे गोड गोड बालोद्यान होते आणि खरे आयुष्य इथे होते. 
आज हे सगळे आठवण्यामागचे कारण हे की गेला एक तास मी गाडीत बसून पुस्तक वाचत होतो आणि एकदाही मी ढुंकूनही बाहेर ह्या शहराकडे पाहिले नाही. मला रोजचे तेच ते रस्ते पाहावेसे वाटत नाहीत. मी स्मगलरांच्या आणि पोलिसांच्या ब्रिटिश मुंबईपासून खूप लांब एका उपनगरात राहतो. मी मुंबईत राहतो असे मी म्हणत असलो तरी मुंबईतल्या लोकांना ती मुंबई वाटत नाही. मला पिंपरी-चिंचवड, तळेगावविषयी जे वाटते तसे मूळ मुंबईकरांना माझ्या उपनगराविषयी वाटत असावे. मी मध्येच मुंबईत आहे हे विसरूनच जातो. राबत बसतो. 
मागे रणजितने, माझ्या निर्मात्याने गौतम राजाध्यक्षांना आमच्या सिनेमासाठी अंधेरीत यायला फोन केला. ते गिरगावात राहायचे. ते मोठा उसासा टाकून म्हणाले, ‘अहो, तिथे अंधेरीत कुठे येऊ हो? इथे मुंबईत शो असेल तेव्हा सांगा’. म्हणजे मी मुंबईत राहतच नाही तर ! 
इतके काम करतो मी आणि सतत धावत असतो तेव्हा मधेच असे वाटते की हेच करायला तू ह्या शहरात आलास का? 
- मला अचानक भान येते.. आपला चोर-पोलिसाचा खेळ चालू आहे की नाही? तो चालू राहायला हवा. बाकीचे सगळे होत राहील. 
खूप दिवस चोरपोलीस खेळले नाही तर मग मुंबईत कशाला राहायचे? साबरमती आश्रमात नसतो गेलो? मी स्वत:ला बजावतो. आपल्याला मूळ काम काय करायचे होते? तर मनातला चोरपोलिसाचा खेळ जिवंत ठेवायचा होता. म्हणून तर आपण आपले गाव सोडले. बस आता निवांत आणि सुरू कर तो खेळ. एक- दोन- तीन..
ह्या शहरात चोर, पोलीस, स्मगलर, घर सोडलेला लहान मुलगा, त्याला ट्रेनमध्ये भेटणारी वेश्या, व्हीटी स्टेशनवर उतरल्यावर त्याचे कुणी कुणी नसणे, नळावरचे पाणी पिऊन राहणे, हमाली करणे, बूट पॉलिश शिकणे, मग एक दिवस फियाट गाडीतून एक सुंदर देखणी बाई गाडीतून उतरून येते आणि त्या मुलाला इंग्रजीत विचारते, ‘तुम मेरे लिये काम करोगे?’ 
- हो, मला आत्ता इंग्रजी येत नाही म्हणून हे हिंदीत आहे. पण ती इंग्रजीतच विचारणार आहे, ‘मेरे लिये काम करोगे?’ मग तो मुलगा म्हणतो, ‘क्यू नही मॅडम? हम तो आयाइच है याहा काम करके नाम कमाने.’ 
मग आपल्या पाचवारी साडीचा पदर डोक्यावरून गच्च ओढून घेऊन ती बाई कुलाब्याच्या दिशेने सुसाट गाडी सोडते. रस्त्यावरचे पोलीस तिला सॅल्यूट करतात तेव्हा तो मुलगा म्हणतो, ‘एक दिन ये सारे पोलीस्लोग हमकोभी सॅल्यूट मारेंगे...’

Web Title: Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.