दोन लाख हातांच्या बळावर कोरोनाशी झुंजणारे ‘मुंबई मॉडेल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 06:02 AM2021-05-09T06:02:00+5:302021-05-09T06:05:05+5:30
एकमेकांत गुंतलेल्या साखळ्यांनी अख्खे यंत्र सतत फिरते ठेवावे तशी एक महाकाय यंत्रणा मुंबई महानगरपालिकेने विकसित केली आहे. देशभरात वाखाणल्या जात असलेल्या या यंत्रणेचे दुवे उलगडणारा विशेष लेख.
- भक्ती चपळगावकर
मुंबईच्या पूर्व उपनगरातल्या एका इमारतीत काम करणाऱ्या २४ गृह मदतनिसांची नुकतीच कोरोना तपासणी करण्यात आली. या मदतनिसांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. पण, स्थानिक वॉर्डमधील आरोग्य विभागात काम करणाऱ्या कम्युनिटी आरोग्य स्वयंसेवक दर्शना इमारतीच्या सचिवाकडे सतत पाठपुरावा करून इमारतीत नियमित येणाऱ्यांची तपासणी करून घ्या, अशी वारंवार विनंती करीत होत्या. इमारतीच्या रहिवाशांनी कुरकुर केली; पण दर्शनाच्या पाठपुराव्यामुळे शेवटी इमारतीत आरटीपीसीआर चाचणी कँप झाला. २४ पैकी ८ जणांना कोरोनाची लागण आहे हे कळले. हे सर्व कर्मचारी पूर्णतः लक्षणविरहित होते. पण, ‘सुपरस्पेडर’ ठरू शकले असते. त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्याची सूचना दर्शनाने दिली. या इमारतीच्या सचिव राजलक्ष्मी अय्यंगार म्हणतात, ‘दुसरी लाट फार मोठी आहे. लोक घाबरलेले आहेत. मी दिवसातून अनेक वेळा दर्शनाशी संपर्क करून माझ्या शंका विचारते. ती सतत व्यग्र असते, पण प्रत्येक वेळी माझ्या फोनला उत्तर देते, माझ्या शंकांचे निरसन करते, इतकेच नाहीतर माझ्या इमारतीतल्या प्रत्येकाने लस घ्यावी म्हणून ती आग्रही आहे.’ गंमत म्हणजे राजलक्ष्मी प्रत्यक्ष कधीही दर्शनाला भेटलेल्या नाहीत... अशा शेकडो दर्शना आज कोरोना विरुद्धच्या लढाईत रात्रंदिवस लढत आहेत. ज्याची दखल सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा घेतली. त्या मुंबई मॉडेलच्या महाकाय साखळीतला दर्शना एक दुवा आहे आणि मॉडेल कसे राबवले जाते याचे हे एक उदाहरण.
आजच्या घडीला जवळपास लाखभर लोक मुंबईत कोरोनाविरुद्धच्या लढाईत सामील झाले आहेत. या साखळीत कमिशनरपासून अगदी तळागाळातले कार्यकर्ते, वॉर्ड कर्मचारी, ऑफिसर्स, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, इलेक्ट्रिशियन्स, तंत्रज्ञ, फायर ब्रिगेड कर्मचारी, घन कचरावेचक यांसारखे वेगवेगळ्या विभागात काम करणारे लोक आहेत. एका विशाल वर्कशॉपसारखे हे ‘मुंबई मॉडेल’ आहे तरी काय, याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न.
--------------------------
उपलब्ध ऑक्सिजनचा पुरेपूर वापर
उपलब्ध ऑक्सिजनचा पुरेपूर वापर, योग्य वितरण आणि बफर स्टॉक तयार ठेवणे अशा योजनांमुळेच आज मुंबई मॉडेल आदर्श ठरले आहे. ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी सर्व रुग्णालये व जम्बो रुग्णालयांमध्ये स्वतंत्रपणे ऑक्सिजन निर्मिती केली जाईल. याशिवाय ८०० अतिदक्षता विभागातील खाटांसाठी स्वतंत्र निविदा काढण्यात आली आहे. सर्व नवीन जम्बो कोविड रुग्णालयांत ७० टक्के खाटा या ऑक्सिजन खाटा तर २०० खाटा अतिदक्षता विभागात असणार आहेत.
- इकबाल सिंह चहल (मुंबई महापालिका आयुक्त)
महाकाय आणि गुंतागुंतीची पण सक्रिय यंत्रणा
कोरोनाची पहिली लाट यायच्या आधी पालिकेने उपलब्ध साधनसामग्रीचा अंदाज घेतला. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले. दिशा दिली, सगळे विभाग एकत्र आले आणि त्यांनी एका दिलाने काम सुरू केले म्हणून आज मुंबई बऱ्या व्यवस्थेत आहे. हे सगळे काम करताना आम्ही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आयुक्तांबरोबर सगळ्या उच्च अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर काम केले, दवाखान्यांना भेटी दिल्या, त्यांचा वावर सगळ्या कर्मचारी वर्गाच्या लक्षात आला. यामुळे कर्मचाऱ्यांनी स्वतः सकारात्मक होऊन कोविडविरुद्धच्या लढाईत स्वतःला झोकून दिले. अधिकारी बाहेर पडले तेंव्हा मास्क, ग्लोव्हजचा वापर करीत होते, त्यामुळे या गोष्टींचे महत्त्व इतरांना पटले. पण, हे सगळे सोपे होते असे नाही. प्रशिक्षण, फॉलो अप, कुणी चुकत असेल तर दुरुस्ती करणे या गोष्टी होत गेल्या. ही सततची प्रक्रिया आहे. मी तुमच्या सोबत आहे, हा संदेश अधिकाऱ्यांनी सामान्य कर्मचाऱ्यांना देणे गरजेचे आहे. यातून आज कोविडविरुद्धच्या लढाईत एक महाकाय आणि गुंतागुंतीची पण सक्रिय यंत्रणा मुंबईत उभी राहिली आहे.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त)
---------------------------------------------
दाटीवाटीच्या वस्त्यांत सर्वत्र धारावी मॉडेल
मुंबईतले साठ टक्के लोक दाटीवाटीच्या वस्त्यांत राहतात, नाव धारावीचे असले तरी सगळ्या दाटीवाटीच्या वस्त्यांत हाच फॉर्मुला वापरण्यात आला.
१. पहिला टप्पा : क्वारंटाईन सेंटर - दाटीवाटीच्या घरात राहणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह लोकांसाठी पालिकेने सुरुवातीलाच क्वारंटाईन सेंटर उभारले. झोपण्याची, जेवण्याची, विरंगुळ्यासाठी सोय केली, योगासनांचे वर्ग घेतले. विलगीकरणात राहणे गरजेचे आहे, हे समजावले. लोक क्वारंटाईन सेंटरकडे जायला तयार झाले, हे मोठे यश होते.
२. दुसरा टप्पा : सर्व्हे - पॉझिटिव्ह लोकांच्या नातेवाइकांचा सर्व्हे केला गेला. लक्षणे असतील त्यांची कोविड तपासणी करून पॉझिटिव्ह असलेल्यांचे विलगीकरण केले.
३. तिसरा टप्पा : खाजगी डॉक्टर्स - दाटीवाटीच्या वस्त्यांत खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सना क्लिनिक उघडायला सांगितले. त्यांच्या सुरक्षेसाठी साधने पुरवली, या डॉक्टर्सचा उदरनिर्वाह थांबला नाही आणि त्यांच्या माध्यमातून नवे पेशंट सापडू लागले.
४. चौथा टप्पा - सॅनिटायझेशन - वस्त्यांचे सॅनिटायझेशन केले गेले.
५. पाचवा टप्पा - एनजीओ - एनजीओच्या मदतीने व्यापक सर्व्हे करण्यात आले.
६. सहावा टप्पा - तयार अन्नाचे वाटप - वस्त्यावस्त्यांत तयार अन्नाची पाकिटे वाटण्यात आली. या कामात महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागाचे लोक सहभागी झाले आहेत.
----------------------
जम्बो सेंटर्स
विलगीकरण, उपचार, आयसीयू, व्हॅक्सिनेशन अशा वेगवेगळ्या कामांसाठी मुंबईतल्या मोक्याच्या ठिकाणी महाकाय जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आली. पहिली लाट ओसरल्यानंतर आता या जम्बो सेंटर्सचा उपयोग काय? अशी टीका होऊ लागताच महालक्ष्मी इथले सेंटर जमीनदोस्त केले. पण, बाकीच्या सेंटर्ससाठी ३१ मार्चपर्यंत थांबायचा निर्णय महापालिकेने घेतला. आता दुसऱ्या लाटेची त्सुनामी आल्यावर या सेंटर्समध्ये हजारो लोक उपचार घेत आहेत. डॉक्टरांची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची फौज इथे काम करते.
--------------------------
अखंड कार्यरत वॉर रूम्स
मे २०२० च्या सुरुवातीला इक्बाल सिंग चहल यांची नेमणूक मुंबई मनपा आयुक्त म्हणून झाली आणि त्यांनी कोविड रिपोर्टिंगसाठी वॉर रूम्सची योजना आखली. वॉर्डनिहाय कोविड हेल्पलाइन तयार करण्यात आल्या. या वॉर्डनिहाय हेल्पलाइन्सना फोन लावल्यानंतर वॉर रूम टेलिफोन ऑपरेटर पेशंटचे नाव, पत्ता, त्यांच्या नातेवाइकांचे नंबर इत्यादी माहिती घेतात. त्यांच्या शंकांचे निरसन करतात. कोरोना पेशंटच्या विशिष्ट गरजा - विलगीकरणाची व्यवस्था, हॉस्पिटलमध्ये बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, आयसीयू ॲम्ब्युलन्स हवी आहे का? याच्या अंदाजासाठी पेशंटची वैद्यकीय माहिती घेतली जाते. वॉर रूम्समध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर्सबरोबर वैद्यकीय कर्मचारीसुद्धा आहेत. वॉर रूम्समध्ये जमा होणारी माहिती डीएमयू डॅशबोर्डावर एकत्र केली जाते आणि तिथून पेशंटला नेमकी काय मदत हवी आहे, याचा अंदाज वैद्यकीय अधिकारी घेतात. मग, जिथे गरज आहे अशा ठिकाणी ॲम्ब्युलन्स पाठवून पेशंटला दवाखान्यात दाखल केले जाते. या वॉर रूम्स २४ तास सुरू असतात.
-----------------------------------
वॉर्डावॉर्डात कसे काम होते?
वॉर्डअंतर्गत कोरोना व्यवस्थापनाचे व्यवस्थापन सहायक आयुक्तांच्या देखरेखीखाली होते. विभागाचे किंवा वॉर्डचे वैद्यकीय अधिकारी कामकाजाचे आयोजन, नियोजन, वर्गीकरण आणि कार्यवाही करतात. टी वॉर्डाचे आरोग्य अधिकारी डॉ. राहुल साळुंके यांनी दिलेल्या माहितीनुसार-
1. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की आयसीएमआरच्या वेबसाईटवर नोंद होते. सकाळी चार वाजता ही यादी घोषित झाली की आरोग्य विभागाचे काम सुरू होते.
2. पेशंटचे नाव, नंबर, पत्ता यासह ही वॉर्डनिहाय माहिती त्या त्या वॉर्डाला दिली जाते. आरोग्य विभागाचे कर्मचारी या पॉझिटिव्ह व्यक्तींशी संपर्क साधतात. उपचारांच्या गरजेप्रमाणे रुग्णांची वर्गवारी होते.
3. गंभीर लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवता येणे शक्य आहे का, कोमोर्बिटी आहे की नाही, याची चौकशी केली जाते.
4. विभागवार वॉर रूममधून फोनवर चौकशी केल्यानंतर प्रत्यक्ष पडताळणीसाठी आरोग्य विभागाची टीम त्या कुटुंबाला भेट देते, त्यांना सल्ला देते, गरजेनुसार रुग्णवाहिका पाठवून कोविड रुग्णालयात दाखल करते.
5. दिवसभराच्या शोधमोहिमेत किती रुग्णांना घरी विलगीकरणात ठेवले, किती जणांना दवाखान्यात ठेवले, किती रुग्णांना इतर विभागांत पाठविण्यात आले, याचा अहवाल रोज संध्याकाली बीएमसीच्या मुख्य पोर्टलवर देण्यात येतो.
---------------------------------------------------
अनेक विभागांचे हात एकत्र येतात तेव्हा...
मुंबई मॉडेलच्या केंद्रस्थानी फक्त आरोग्य विभाग नाही, हे विशेष! महानगरपालिकेसोबत अखंड राबत असलेल्या पोलीस यंत्रणेबरोबरोबरच हे मुंबई मॉडेल वेगवेगळ्या विभागांबरोबर एकत्रित काम करते. जम्बो सेंटर उभारण्यासाठी इंजिनीअरिंग विभाग, सांडपाणी विभाग डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे.
१. घन कचरा व्यवस्थापन विभाग -
महानगरपालिकेचा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट विभाग असतो, त्याला साफसफाई करणे, परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम आहे. सार्वजनिक शौचालये असतात त्यांची स्वच्छता आणि सॅनिटायझेशन हे काम हा विभाग सांभाळतो. मुंबईतल्या वस्त्या स्वच्छ राहाव्यात म्हणून घन कचरा व्यवस्थापन विभाग झटत आहे.
२. पेस्ट कंट्रोल विभाग -
मलेरिया आणि डेंग्यूचा प्रसार थांबवण्याचा मोठा अनुभव या विभागाकडे आहे. आता हा विभाग कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठीसुद्धा औषध फवारणी करतो.
३. फायर ब्रिगेड - अग्निशमन विभाग आपली मोठी वाहने घेऊन मोठ्या आस्थापना, रस्ते, वाड्या वस्त्यांमध्ये फवारणी करण्यासाठी मदत करतो.
४. इंजिनीअरिंग विभाग - तातडीने जम्बो सेंटर उभारणे, आरोग्य सुविधा बळकट करणे, नव्या आरोग्य सुविधा उभारणे, ऑक्सिजन पुरवठा यासाठी अभियांत्रिकी विभागाचा वापर केला गेला.
५. सांडपाणी व्यवस्थापन विभाग - जम्बो सेंटर उभारताच त्यांना अंडरग्राउंड सिवरेज सिस्टिमला जोडण्याचे काम या विभागाने सांभाळले.
६. खाजगी डॉक्टर्स - महानगरपालिकेच्या स्वतःच्या आरोग्य विभागाबरोबरच दाटीवाटीच्या भागात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर्सची मदत घेण्यात आली. धारावीसारख्या वस्त्यांमध्ये याचा खूप उपयोग झाला.
७. स्वयंसेवी संस्था - मुंबईत जागोजागी स्वयंसेवी संस्थांचे साहाय्य घेण्यात आले.
८. कम्युनिटी हेल्थ व्होलंटीयर्स - या स्वयंसेवकांना महानगरपालिका मानधन देते. पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर काय करायचे याचे ट्रेनिंग त्यांना देण्यात आले आहे. त्यानुसार हे स्वयंसेवक वस्त्या, गृहनिर्माण संस्था यांच्या संपर्कात असतात.
- शिवाय चेहरा नसलेल्या कोविड योद्ध्यांची संख्या कोणी सांगू शकणार नाही; कारण महापालिकेच्या कर्मचाऱ्यांबरोबरच यात स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्तेसुद्धा आहेत. कित्येक तळागाळाच्या कार्यकर्त्यांच्या नोंदी नाहीत. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकांणी म्हणतात, निदान लाखभर लोक तरी मुंबईला सुरक्षित ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत.
------------------------
...आता पुढच्या लाटेची तयारी!
ही लढाई सोपी नाही, संपली तर अजिबात नाही. उलट बीएमसी पुढच्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. पहिली लाट येऊन गेल्यानंतर जम्बो सेंटर रिकामी झाली होती. पण, ३१ मार्चपर्यंत ही सेंटर्स सुरू ठेवायचा निर्णय महानगरपालिकेने घेतला. ते या अनाम योद्ध्यांच्या पथ्यावर पडले. या काळात त्यांनी ऑक्सिजन सप्लाय सिस्टिम विकसित केली.
आता ही फौज तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याच्या तयारीत आहे. अजून तीन ते चार जम्बो कोविड सेंटर्स विकसित करीत आहे. ऑक्सिजन सप्लाय, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स, औषधे, व्हेंटिलेटर्स या सगळ्या आघाड्यांवर काम सुरू आहे. लोक काम करीत आहेत आणि त्यांच्याबरोबर एकत्रितरीत्या व्यवस्था काम करते आहे. ही व्यवस्था सेल्फ ड्रिव्हन सिस्टिममध्ये विकसित करण्याचा उद्देश बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला आहे. लढाईला जाताना जशी आपण सामूहिक रसद घेऊन जातो, तसे सगळ्या विभागांना बरोबर घेऊन मुंबई ही लढाई लढत आहे.
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
bhalwankarb@gmail.com
(छायाचित्रे- दत्ता खेडेकर, मुंबई)