संगीत

By Admin | Published: September 2, 2016 04:14 PM2016-09-02T16:14:34+5:302016-09-02T16:14:34+5:30

‘‘तू कोणते संगीत ऐकतोस?’’ या प्रश्नाचे मी कधीही नीट उत्तर देऊ शकत नाही. मी पुष्कळ काही ऐकत असतो. वाचत किंवा लिहित नसेन तर उरलेला बराच वेळ मी घरात आणि कारमध्ये खूप वेगवेगळे संगीत ऐकण्यात घालवतो. आपण ऐकायचे संगीत आपण निवडत नसतो. मांजर जसे राहायचे घर स्वत: निवडते तसेच संगीताचे आहे. ते आपल्याला निवडते. आपण कोणत्या प्रतलावर जगत आहोत, आपल्या मनामध्ये काय चालू आहे यानुसार आपले मन आपोआप ओळखीच्या किंवा अनोळखी संगीताची निवड करीत असते.

Music | संगीत

संगीत

- सचिन कुंडलकर

भारतामधील सामान्य नागरिकांतील भावनिक समृद्धी जिवंत ठेवण्याचे काम आपल्या सिनेमातील गाणी करतात. कारण घरात आणि समाजात परंपरा पाळत कुटुंबातील सर्वांचे पोट भरण्याचे आणि वंश चालवण्याचे काम करत भारतीय माणूस इतका मेटाकुटीला आलेला असतो की त्याला कोणतीही सोपी संवेदना उरेल अशी शक्यता नसते. या सगळ्यामुळे सामान्य माणसाच्या आतील स्वप्ने, त्याच्या कुंपणापलीकडील आकांक्षा, त्याचे राग, द्वेष, उन्माद, वासना या व्यक्त करायला तो क्रिकेटपटू आणि सिनेमाच्या हीरोवर आयुष्यभर अवलंबून राहतो. क्रि केट आणि सिनेमातली गाणी यांनी भारतीय माणसाचे डोके ताळ्यावर ठेवले आहे. 
धार्मिक आणि कौटुंबिक परंपरा आणि आचारविचार यांनी त्या माणसाचे हातपाय इतके करकचून बांधलेले असतात की स्वत:तर्फे विजयी व्हायला, नाचायला, सेक्स आणि प्रेम करायला त्याला सचिन तेंडुलकर किंवा रणबीर कपूर लागतो. बाहेर जाऊन मोकळेपणाने स्वत: काही करायची धमक त्याच्यात उरलेली नसते. दुसऱ्याचे यश पाहून आपल्याला ते मिळाले आहे असे तो मानून घेतो. त्यामुळे भारतात नोकऱ्या करणारी अनेक माणसे वर्षानुवर्षे सुट्या टाकून क्रि केट पाहतात किंवा मोबाइलवर सिनेमातली गाणी सतत पाहत बसतात. पावसात ओल्या झालेल्या हिरॉइनला हिरोने मारलेली मिठी आपणच मारली आहे असे समजून खूश होतात. भारतीय माणसाच्या या सततच्या भुकेल्या अपंगत्वामुळे भारतात चित्रपट संगीताचा अप्रतिम खजिना तयार होत राहिला आहे, जो जगात इतर कोणत्याही देशात नाही. जात पात धर्म भाषा सगळे विसरून वर्षानुवर्षे अनेक कलाकारांनी मराठी हिंदी बंगाली मल्याळी तमिळ तेलुगु भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी निर्माण करत ठेवली आहेत. 
ए. आर. रेहमानसारखा निसर्गाची कुठलीतरी जादूई ताकद मिळालेला संगीतकार सर्व भाषांमध्ये एकापेक्षा एक सरस गाणी गेली वीसएक वर्षे निर्माण करतोच आहे. माझ्या पिढीचा मोठे होण्याचा आलेख मांडायला बसले तर त्याच्या प्रत्येक टप्प्यावर रेहमानचे कोणतेतरी एक गाणे असते. चित्रपट बनवताना माझा सगळ्यात जास्त आवडता भाग कोणता असेल तर तो चित्रपटातील गाणी बनवण्याचा. मला माझ्या चित्रपटांमध्ये आग्रहाने गाणी हवी असतात. पटकथेचे काम पूर्ण झाले की मला संगीतकारांसोबत चालणारी अनेक म्युझिक सिटींग करायला फार आवडतात. मी गाण्याशिवायचा भारतीय सिनेमा असेल याचा विचारच करू शकत नाही.
‘‘तू कोणते संगीत ऐकतोस?’’ या प्रश्नाचे मी कधीही नीट उत्तर देऊ शकत नाही. कारण मी पुष्कळ काही ऐकत असतो. वाचत किंवा लिहित नसेन तर उरलेला बराच वेळ मी घरात आणि कारमध्ये खूप वेगवेगळे संगीत ऐकण्यात घालवतो. आपण ऐकायचे संगीत आपण निवडत नसतो. मांजर जसे राहायचे घर स्वत: निवडते तसेच संगीताचे आहे. ते आपल्याला निवडते. आपण कोणत्या प्रतलावर जगत आहोत, आपल्या मनामध्ये काय चालू आहे यानुसार आपले मन आपोआप ओळखीच्या किंवा अनोळखी संगीताची निवड करीत असते. माझी संगीताची जाणीव ज्या क्षणांनी, माणसांनी आणि दिवसांनी समृद्ध केली त्या क्षणांना आठवताना मी माझ्या आयुष्यातला तो दिवस विसरूच शकत नाही. 
२१ जून १९९९ चा दिवस.
मी पहिल्यांदा परदेशात गेलो होतो तो काळ. पॅरिसमध्ये दरवर्षीप्रमाणे या दिवशी म्युझिक फेस्टिव्हल होता. माझी म्युझिक फेस्टिव्हलची तोपर्यंतची समजूत ही सवाई गंधर्ववर बेतलेली होती. एक मोठा हॉल असेल किंवा स्टेज असेल, तिथे आम्ही सगळ्यांनी जायचे, मग गायक येतील आणि आपण ते ऐकायचे. आम्हाला २० जूनला फिल्म स्कूलमध्ये दुसऱ्या दिवशी वर्ग नसतील असे सांगण्यात आले. उद्या म्युझिक फेस्टिव्हल आहे. उद्या कॉन्सर्ट अटेंड करा. हाच तुमचा वर्ग. मी बरं म्हणालो आणि रूमवर आलो. 
सकाळी मी माझ्या हॉटेलच्या खोलीत उठलो ते एका वेगळ्याच वाद्याच्या आवाजाने. मी खिडकीबाहेर जाऊन पाहिले आणि थक्क झालो. खालचा सगळा चौक माणसांनी फुलून गेला होता आणि सर्व रस्त्यांवर आपल्याकडे गणपती पाहायला माणसे फिरतात तशी शहरभर फिरत होती. मित्रांसोबत मी बाहेर पडलो आणि जातो तिथे वेगवेगळ्या देशांचे म्युझिक वाजवणारे लोक होते. फुटपाथवर, मेट्रो ट्रेनमध्ये, चौकातील कारंज्याच्या भोवती, सगळ्या विद्यापीठांच्या अंगणात. जिथे बघावे तिथे छोट्या आणि मोठ्या कॉन्सर्ट चालू होत्या. आफ्रिका, लॅटिन अमेरिका, उत्तर आणि पूर्व आशिया या खंडांमधील संगीत मी कधी ऐकले नव्हते. मी दिवसभर मित्रांसोबत चालत राहिलो. भलेमोठे पॅरिस शहर जणू एक स्टेज बनले होते. किती आणि काय ऐकाल? 
- मी माझ्या ओळखीच्या प्रदेशापलीकडे त्या दिवशी जायला शिकलो. आपण नेहमी ओळखीचे आणि सुरक्षित संगीत ऐकत राहतो. अनोळखी अनुभवाची आपल्याला भीती वाटत राहते. ती माझी भीती त्या दिवशी पॅरिसमध्ये संपली. मला माहीत असलेल्या पाश्चिमात्य रॉक आणि पॉप या दोन्ही संगीताच्या पलीकडे मी गेलो. मी गायकांशी गप्पा मारल्या, अनोळखी वाद्ये हाताळून पाहिली. सगळ्या शहरभर जणू मोठी पार्टी चालू होती. माणसे गप्पा मारत होती, गात होती, नाचत होती. प्रत्येकाला म्युनिसिपाल्टीतर्फेलायसन्स आणि परफॉर्म करायची जागा आखून दिली होती. एका मोठ्या पार्कमध्ये त्या दिवशी रात्री माझा आवडता गायक ब्रायन अदाम्स येणार होता. माझी म्युझिकची आवड विस्तारून त्याला माझा आकार देण्यात या दिवसाचा किती मोठा हात आहे ! 
शब्द, रंग आणि समजुतीच्या आणि अर्थाच्या प्रदेशात मला संगीत घेऊन जाते. मी सध्या हेन्री निल्सन या १९७० च्या दशकातील अमेरिकन गायक आणि लेखकाचे म्युझिक ऐकतो आहे. तसेच घरामध्ये मी लिहित असताना जॉन कोलट्रेन आणि मायील्स डेविस यांचे संगीत लावून ठेवतो. मी स्वयंपाक करताना नेहमी जॅझ म्युझिक ऐकतो. त्याने सगळ्या घराला एक ताल आल्यासारखा होतो. मी सध्या महेश काळे याला महाराष्ट्राचा एल्विस अशी पदवी दिली आहे. सतत तो मुलगा कुठे ना कुठेतरी गातच असतो. आज इथे, उद्या तिथे. शंकर महादेवनने त्याच्याकडून गावून घेतलेला अरु णी किरणी हा तराणा मी परदेशात फिरत असताना इस्तंबूलमधील ताक्सिम स्क्वेअरमध्ये एका रात्री बाकावर झोपून आकाशाकडे पाहत सतत ऐकत बसलो होतो. शंकर, एहसान आणि लॉय या त्रिकुटाचा मी फार मोठा फॅन आहे. मला कधीतरी त्यांच्यासोबत एकत्र फिल्म करायची आहे. यान टीअर्सन या फ्रेंच गायकाचे संगीत मला खूप ऊर्जा देते. त्याच्या संगीतामुळे मला लिहायला सुचते. तसेच मला उषा उत्थप या तमिळ गायिकेचा आवाज खूप आवडतो. त्यांनी हिंदी चित्रपटात गायलेली अनेक गाणी मी ऐकत राहतो. लेडी गागा या अमेरिकन पॉप गायिकेला मी उगीचच आजपर्यंत कमी दर्जाची मानत आलो होतो. नको तिथे आपला मराठी बाणा आड येतो. खूप प्रसिद्ध काही असले की आपण नाके मुरडतो. मी काही दिवसांपूर्वी एका पार्टीत तिचे गाणे ऐकले आणि चाट पडलो. काय कमाल गाते ती. श्रेया घोषाल आणि सुनिधी चौहान माझ्या लाडक्या आहेत. माझ्या चित्रपटात त्या गायल्या आहेत. किती मोठी रेंज आहे दोघींच्या आवाजाला. टीना टर्नर आणि नीना सिमोन या दोन्ही जुन्या अमेरिकन गायिका मला जाम आवडतात. व्हिस्की व्हॉइस म्हणता येईल असे त्यांचे आवाज आहेत. 
मला गदिमांनी लिहिलेली सर्वच्या सर्व गाणी आवडतात. ते माझे फार लाडके आहेत. लावण्यांचा मी मोठा फॅन आहे. लावणी या विषयावर आनंद मोडक आणि मी तासन्तास गप्पा मारत बसायचो. मी चित्रपटांमधून भरपूर लावण्या ऐकल्या आहेत तसेच यमुनाबाई वाईकरांना बैठकीची लावणी सादर करताना पाहिले आहे. शकुंतलाबाई नगरकर किती मस्त सिडक्षन करतात ते मी अनुभवले आहे. जगदीश खेबुडकरांनी मराठी गाण्यांना दिलेली झिंग आणणारी शब्दकळा माझ्या घरात तरंगत असते. मी पिंजराची गाणी सारखा ऐकतो. कधीतरी कुणालातरी परत असे मस्त करारे लिहिता यावे असे वाटते. अजय-अतुल माझे लाडके आहेत आणि तसाच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तो माझा संगीतकार मित्र अमित त्रिवेदी. 
मी संगीताचा अनुभव घेताना मनाच्या सर्व खिडक्या आणि त्वचेची सर्व छिद्रे उघडी ठेवतो. भाषा किंवा संगीताचा प्रकार माझ्या आवडीनिवडीच्या आड येत नाही. 
क्र मश: 

(ख्यातनाम लेखक, दिग्दर्शक)

kundalkar@gmail.com

Web Title: Music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.