फुंकर घालणारे स्वर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 06:01 AM2021-03-07T06:01:00+5:302021-03-07T00:35:02+5:30
संगीत-नृत्यासारख्या कला या निव्वळ, भरल्या पोटी चार घटका मनोरंजन करण्यासाठी, जीव रमवण्यासाठी नसतात. त्यांचे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असणे हे किती वेगळ्या, अर्थपूर्ण पातळीवरचे असते हे सांगणारी ही सारी उदाहरणे !..
- वंदना अत्रे
“नृत्य हेच जणू जगातल्या सर्व समस्यांवर उत्तर आहे अशा आवेगाने ती नाचत होती.. अखेर थकून ती कोसळली तेव्हा तिच्यासह सगळे सभागृह स्फुंदून-स्फुंदून रडत होते...” चार्ल्स फाब्री नावाच्या नृत्य समीक्षकाने यामिनी कृष्णमूर्ती यांच्या मैफलीबद्दल केलेली ही नोंद आहे. यामिनी या कुचीपुडी आणि भरतनाट्यम शैलीच्या प्रसिद्ध कलाकार. अनाथ मुलांच्या शिक्षण आणि संगोपनासाठी निधी उभा करण्यासाठी त्यांनी ज्या शेकडो मैफली केल्या त्या मैफलींबद्दल वाचताना जाणवत होता या मैफलींना संस्मरणीय करणारा सहृदय मानवी स्पर्श..! एरवी बिदागीसाठी होणारी मैफल आणि एखादा अनाथ मुलगा किंवा पुरामध्ये आपले सर्वस्व गमावून बसलेले कुटुंब यांच्यासाठी होणारी मैफल यात नेमके काय वेगळेपण असते? कदाचित बोटाच्या चिमटीत पकडता येणार नाही ते. पण कोणासाठी तरी आपल्या कलेचे समर्पण करण्याची ही भावना श्रोत्यांसह त्या कलाकाराला एक वेगळ्याच भावावस्थेत नेत असणार नक्कीच ! ही भावना जाणवली यहुदी मेनुहिन यांच्या चरित्रात. २०व्या शतकातील हा सर्वोत्तम व्हायोलिनवादक. दुसरे महायुद्ध पेटले आणि त्याला वाटू लागले, दोस्त राष्ट्रांच्या सैनिकी तुकड्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी काहीतरी करायला हवे. मग आपले व्हायोलिन घेऊन हा पोहोचला अलास्काच्या लष्करी तळावर सैनिकांना आपले वादन ऐकवण्यासाठी. या काळात अनेक सैनिक तळांवर जाऊन त्याने केलेल्या मैफलींची संख्या किती असेल? तब्बल पाचशे! दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषाविरुद्ध ठणकावून आवाज उठवणाऱ्या या कलाकाराने १९५१ साली भीषण दुष्काळात भारत होरपळून निघत असताना पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना फोन केला आणि विचारले, “मी काय करू शकतो तुमच्या देशासाठी?” पंतप्रधानांनी दिलेले आमंत्रण स्वीकारून त्यांनी भारतात विविध शहरांमध्ये मैफली करीत दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारला.
हे वाचताना मग आठवण येत राहते ती एम.एस. सुब्बलक्ष्मी यांची.
कितीतरी हॉस्पिटल्स, अनाथाश्रम, शाळा-महाविद्यालय याच्या उभारणीसाठी चारआणे तिकीट लावून होणाऱ्या त्यांच्या मैफलींना हजारो श्रोत्यांची तुडुंब गर्दी लोटत असे. साक्षात देवाला आपल्या स्थानावरून उतरून पृथ्वीवर भक्ताकडे आणण्याची ताकद असलेल्या त्यांच्या स्वरातील स्तोत्र, भजने ऐकताना श्रोत्यांमध्ये बसलेला एखादा हमाल, गाडी हाकणारा आणि भांडी घासणारी यांच्याही डोळ्याला पाण्याच्या धारा लागलेल्या असत..! कोणतीही लौकिक देवघेव नसलेल्या कलाकार आणि समाज या नात्यातील जिव्हाळ्याचे हे केवढे कोवळे, हृद्य रूप ! आणि जेव्हा युद्ध-स्थलांतर-उपासमार आणि त्यामुळे उद्भवलेल्या भलभलत्या साथी अशा संकटांच्या भोवऱ्यात माणसांचे समूह चिरडून-भरडून निघू लागतात तेव्हा ती कोण्या एका देशाची उरत नाहीत. या वेदनांचे घाव सगळ्या जगभरातील संवेदनशील माणसांना घायाळ करू लागतात. त्यातून निर्माण होते एखादी अशी मैफल जी मानवतेसाठी करता येणाऱ्या कामाचा आदर्श उभा करते. Concert for Bangla desh हे या मैफलीचे नाव. बांगला देशाच्या निर्मितीसाठी लढल्या गेलेल्या युद्धानंतर निर्माण झालेले लाखो स्थलांतरितांचे अगतिक लोंढे आणि त्यांची उपासमार आणि आरोग्याची भयावह हेळसांड बघून थेट न्यू यॉर्कमधील मॅडीसन स्क्वेअरमध्ये जमले अनेक कलाकार. त्यात होते पंडित रविशंकर, अल्लारखा, अली अकबर खांसाहेब असे कितीतरी भारतीय आणि त्यांच्या बरोबर होते जॉर्ज हॅरिसन, बॉबी डिलन आणि बिली प्रेस्टन. त्या दिवशी व्यासपीठावर रंगत जाणारी मैफल समोर उपस्थित असलेल्या हजारो रसिक नागरिकांना रिझवत नव्हती तर हेलावून टाकत होती. कारण त्या स्वरांच्या मागे त्यांना दिसत होते जगण्यासाठी लढत असलेले अनेक निरपराध भुकेकंगाल...!
पाच-सात वर्षांपूर्वी चेन्नईमध्ये आलेल्या अक्राळविक्राळ पुराने अय्येल नावाच्या एक कारागिराचे दुकान त्यातील सामानासह गिळंकृत केले. बघता-बघता त्याच्या डोळ्यासमोर सर्वस्व वाहून जाताना तो बघत होता... हा कोणी सामान्य कारागीर नव्हता. अनेक प्रसिद्ध नृत्य कलाकारांचे नृत्यासाठी लागणारे तऱ्हेतऱ्हेचे कपडे सफाईने शिवणारा तो कसबी कलाकार होता. मग, हे सगळे कलाकार अय्येलने शिवलेले कपडे घालून त्याच्या दुकानात आले. कोणाच्या हातात शिलाई मशीन होते, कोणाच्या हातात कापडाचे तागे. या कलाकारांनी मिळून या गरीब कलाकाराला पुन्हा नव्याने उभे केले.. कृतज्ञतेपोटी..! किती सुंदर आहे हा अनुभव...!
(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)