सुगरण झाली... सखी माझी...।।
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 08:15 AM2018-12-09T08:15:00+5:302018-12-09T08:15:02+5:30
सखी माझी : हे सारे अनुभवताना, चराचरातील सारी चैतन्यरूपं मात्र माझ्या लाडक्या सखीत सामावल्याचा मला क्षणोक्षणी भास होतो.
- योगिराज माने
वावरात घाम गाळून व बारमाही कष्ट करून माझ्या चिलापिलांना घास भरवणारा मी एक कष्टकरी. आम्ही बांधलेलं एक छोटंसं घर. त्या घरात मी, माझे आई-वडील, माझी लेकरं व मला भक्कम साथ देणारी माझी सखी हे सारे जण आनंदानं राहतात. आमच्या परिवाराला पिढ्यान्पिढ्या पोसणारा काळ्या वावराचा तुकडा म्हणजे आमचा जीव की प्राण. वावराची मशागत करून बी-बियाणाची तजवीज केली की मी आभाळाकडं एकटक लावून बघत बसतो. कधी एकदा पावसाच्या सरी बरसतील अन् सारं वावर न्हाऊन निघेल, असं मला वाटतं. चराचरालाच पावसाची प्रतीक्षा असते.
पावसाची पहिली सर येताच आसुसलेली काळीमाय मोहरून जाते. पावसाच्या प्रत्येक थेंबाला ती आपल्या पोटात हर्षोल्हासानं सामावून घेते व तृप्त होते. अवघ्या जगतात चैतन्य पसरतं. पावसात मनसोक्त आंघोळ केल्यामुळं झाडेवेली तजेलदार व टवटवीत दिसू लागतात. पाखरांच्या गावात जलोत्सव सुरू होतो. अनेक पाखरं सामूहिक पाऊसगाणी गाऊ लागतात. काही पाखरं तर आपल्या इवल्याशा पंखांवर पावसाचे अलवार थेंब झेलत झेलत या झाडावरून त्या झाडावर घिरट्या घालतात. काही पाखरं आपल्या जोडीदारासमवेत पावसाचं संगीत अनुभवतात. पावसाचा प्रत्येक मौल्यवान थेंब वावरात मुरल्यामुळं सबंध वावराला मऊमऊ लोण्याचं रूप प्राप्त होतं. माझ्या तळपायाला पडलेल्या भेगांवर चिखलरूपी मलम हे वेदनाशामकाचं काम करतं. हे वर्ष चांगलं जाईल या आशेनं माझ्या व परिवाराच्या आनंदाला पारावार उरत नाही. वावर वापशाला येताच पेरणीची लगबग सुरू होते. सारे गावकरी डोळ्यात हिरवं स्वप्न घेऊन कामाला लागतात.
तांबडं फुटताच चाड्यावर मूठ धरून पेरणी करताना जणू एका दाण्यातून हजार दाण्याच्या निर्मितीप्रक्रियेस सुरुवात होते. सखीच्या हातच्या न्याहरीला अमृताची चव येते. आम्ही दोघं न्याहरीला बसताच राजासर्जाही हिरव्यागार रानबांधाकडं वेगानं धावू लागतात. हे सारे अनुभवताना, चराचरातील सारी चैतन्यरूपं मात्र माझ्या लाडक्या सखीत सामावल्याचा मला क्षणोक्षणी भास होतो. मी आनंदानं सखीला निरखून बघताक्षणीच माझ्या लेखणीला आपोआप झरे फुटू लागतात.
वावरात मुरे । पावसाचा थेंब ।।
तरारता कोंब । सखी माझी ।।
न्याहरीला चव । अमृताची आली ।।
सुगरण झाली । सखी माझी ।।