मेरा वतन!
By admin | Published: October 8, 2016 02:12 PM2016-10-08T14:12:59+5:302016-10-08T14:12:59+5:30
लक्ष्मीकांत देशमुख लिखित ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’ या महाकादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज पुणे येथील दिलीपराज प्रकाशनातर्फे होत आहे. त्यानिमित्त या कादंबरीतील संपादित अंश..
- लक्ष्मीकांत देशमुख
जेव्हा अन्वरला दोन शब्द बोलण्याची विनंती झाली, तेव्हा तो क्षणभर रिकामा व बधिरसा झाला. त्याला पुन्हा नजरेसमोर भविष्यसूचक अंधार दाटून आल्याची जाणीव होत होती. क्षणभर स्थळकाळाचा विसर पडल्यासारखा झाला.
‘मेरे अजिज भाईयों और बहनो..
माझं बोलणं या लोकशाहीचा संकोच करायला व तिचा घास टिपण्यासाठी दबा धरून बसलेल्या तालिबान्यांना कदाचित आवडणार नाही. न आवडू दे. मी काही वर्षांपूर्वी त्यांनी पेरलेल्या सुरुंगस्फोटात दोन्ही पाय गमावून बसलो आहे. और इस वक्त मैं उम्र की ऐसी दहलीज पें हूँ की, वहाँ मौत डराती नही, बल्की हमनवाज लगती हैं । त्यामुळे आज मी स्पष्ट बोलणार आहे.
आपल्या शूर देशात गेल्या शंभर वर्षांत प्रथम राजा अमानुल्ला, मग झहीर शहा व प्रेसिडेंट दाऊदखानांची १९७९ पर्यंत राजेशाही व लष्करशाहीची हुकमत होती, पण अवामची मुफलिसी कमी होत नव्हती. धर्माच्या नावानं स्त्रीशिक्षणाला कट्टर मूलतत्त्ववादी विरोध करीत होते व औरतजातीला त्यांनी बुरख्याच्या काळोख्या अंधारात लोटलं होतं. त्यापासून तिची सुटका होत नव्हती. त्यामुळे समता आणि न्यायासाठी आम्ही मार्क्सवाद आणि सोव्हिएत युनियनकडून प्रेरणा घेऊन सौरक्रांती घडवून आणली.
अवामची हुकूमशाही प्रस्थापित केली. तिच्या रक्षणासाठी सोव्हिएत युनियनची रेड आर्मी आली आणि पाश्चात्त्य जगानं; खास करून अमेरिकेनं हे रशियाचं आक्रमण आहे असा आरडाओरडा केला आणि आम्हाला पराभूत करण्यासाठी प्रथम मुजाहिदीन - ज्याचे गुलबुदिन हेकमतियार आजही पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी संधी व वाट पाहत आहेत, मग तालिबानचा राक्षस त्यांनी उभा केला व त्याला बळ दिलं. आम्हाला वाटलं, रेड आर्मी निघून गेली, तरी दहा वर्षे अवामनं जी खुशहाली व अमन उपभोगलं आहे, ती अवाम आम्हास साथ देईल व आम्ही खंबीरपणे तालिबानचा मुकाबला करून त्यांना परास्त करू. त्यांना शिकस्त देऊ.. पण आम्ही नाकाम झालो. तालिबान्यांनी सत्ता राबवीत १९९८ ते २००१ या काळात आपल्या देशावर अनन्वित अत्याचार करीत पुन्हा एकदा काळ्या जाहिली कालखंडात आपल्या देशाला लोटायचा प्रयत्न केला. हे सारं आपण सारे जाणताच. भाईयों और बहनो, मी त्यावर अधिक भाष्य करणार नाही, पण ९/११ च्या आघातानं न्यू यॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन मोठे टॉवर्स आत्मघाती हल्ला करून उद्ध्वस्त केले गेले. त्यामुळे अमेरिकेनं ‘वॉर आॅन टेरर’ सुरू केलं आणि आपल्या देशातील तालिबान्यांचा नि:पात केला. त्यांनी मग आपल्या देशात लोकशाही प्रस्थापित केली.
गेली दहा वर्षे त्यांचं सैन्य असल्यामुळे त्यांच्या भरवशावर अफगाणिस्तानच्या अवामला लोकशाही व बऱ्यापैकी स्वातंत्र्य उपभोगायला मिळत आहे... पण म्हणून काही त्यांनी आपल्या देशावर हमला केला व आपणास गुलाम केलं असं कोणी म्हणत नाही.
लेकिन जनाब मिनिस्टर साब, आप फिर एक बडी गलती करने जा रहे हो । तालिबान्यांशी शांतता वार्ता करून समझौता करण्याची. त्यासाठी आता तुम्ही अमेरिका नाही तर पाकिस्तानची मदत घेत आहात. हे अधिक धोकादायक आहे जनाब। तेव्हा रेड आर्मी गेली व तालिबानची सत्ता आली. आता नजीकच्या भविष्यात अमेरिकेचे व नाटोचे सैन्य पूर्णपणे जेव्हा जाईल, तेव्हा पुन्हा दबा धरून बसलेले तालिबानी झडप घालून लोकशाहीचा जीव तर घेणार नाहीत? पुन्हा सत्तेवर तर येणार नाहीत? फिर तालिबान आने का मतलब जमुरियत का खात्मा, फिर लिबरल अॅडमिनिस्ट्रेशन को पीछे ढकेलना, औरत को फिर स्कूल, कॉलेज और आॅफिस से जुदा करना और घर दिवारी की चौखट में और काले बुरखे के काले समंदर में डुबा देना... हम जैसे अलग सोच रखनेवालों को ‘काफीर’ ठहराकर तब जैसे जमिला को सरे आम पत्थरसे मारा, वैसा ही कुछ आगे होने का मुझे शक लगता है...
आता पुन्हा एकदा आपण इतिहासाच्या एका नाजूक वळणावर उभे आहोत. अमेरिकन सेना पूर्णपणे या भूमीतून गेल्यानंतर लोकशाही व शांतता टिकावी म्हणून तुम्ही नेक इराद्यानं तालिबानला शांतता प्रक्रियेत सामील करून घेत आहात.. और ये बडी गलती हो सकती है. मेरे खयाल से किसी भी सूरत में तालिबानसे हात मिलाना ठीक नही. अमेरिका ‘गुड तालिबान’, ‘बॅड तालिबान’ असा जो भेद करीत आहे, तो पण चुकीचा आहे. ते आपण समजून घ्यावं. देअर इज नो गुड तालिबान. दे आर बॅड तालिबान. दे आर ब्लडेड टेररिस्ट!..
(लक्ष्मीकांत देशमुख लिखित ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’ या महाकादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन आज पुणे येथील दिलीपराज प्रकाशनातर्फे होत आहे. त्यानिमित्त या कादंबरीतील संपादित अंश.)