आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- मिट्टी में है दम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2018 06:10 AM2018-09-09T06:10:43+5:302018-09-09T06:10:43+5:30

स्पर्धा कुठलीही असो, पदकतालिकेत ग्रामीण खेळाडूंचा वरचष्मा कायम दिसतो. यंदाची आशियाई स्पर्धाही याला अपवाद नव्हती. खेळायला मैदान नाही, पुरेसं साहित्य नाही, प्रशिक्षक नाहीत, खेळण्यायोग्य कपडे नाहीत, योग्य आणि पुरेसा डाएट नाही. तरीही हीच पोरं भारी का ठरतात?

The mystery of India's brilliant performance in the Asian Games is in the dust. | आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- मिट्टी में है दम.

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या चमकदार कामगिरीचं रहस्य- मिट्टी में है दम.

Next
ठळक मुद्देखेलो इंडिया- भारताचं क्रीडा धोरण बदलताना दिसतंय, नेमकं काय होतंय मैदानात? भारताची पदकांची भूक त्यानं वाढेल?. प्रत्यक्ष मैदानावरचा हा लेखाजोखा.

-रोहित नाईक

नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतातल्या गरीब घरातल्या होतकरू मुलांनीच बहुतेक पदकं आणली. अर्थात दरवेळी हेच चित्र असतं. त्यात फार काही बदल असतो असं नाही, पण जिंकण्याची, पुढे जाण्याची, खेळात काहीतरी करून दाखवण्याची ऊर्मी मोठय़ा प्रमाणात दिसते ती ग्रामीण भागातच, यावर आता जवळ जवळ शिक्कामोर्तब झालंय.

आशियाई स्पर्धा संपल्यानंतर सोशल मीडियावर जे मेसेजेस, जोक्स व्हायरल होत होते, तेदेखील काय सांगत होते?.
‘‘आय अँम अ कॉम्प्लॅन बॉय. आय अँम होर्लिक्स गर्ल. बूस्ट इज दी सिक्रेट ऑफ माय एनर्जी.. काहीच उपयोग नाही रे. सगळी मेडल्स गरिबाची पोरं आणतात.. भाकरी चटणी इस दी सिक्रेट ऑफ माय एनर्जी!’’

यातील विनोद बाजूला ठेवला, तरी वस्तुस्थितीही फारशी वेगळी नाही.

आशियाई स्पर्धेतील भारतीय पदक विजेत्या खेळाडूंचे राहणीमान, त्यांची जीवनशैली आणि आर्थिक परिस्थिती पाहिली, तर जवळपास सारेच सर्वसामान्य घरातील आणि छोट्या शहरातील, खेड्यातील होते.

बजरंग पुनिया, विनेश फोगट, दत्तू भोकनळ, नीरज चोप्रा, मनजित सिंग, स्वप्ना बर्मन, हिमा दास, अमित पांघल, राही सरनोबत, हे सारेच खेळाडू संघर्ष करीत पुढे आले आहेत.

खेळण्यासाठी आवश्यक सोयीसुविधांची कमतरता असतानाही न डगमगता या खेळाडूंनी खडतर वाटचाल करत आपले लक्ष्य साधले. याचा अर्थ शहरी भागांतील खेळाडूंची वाटचाल त्या तुलनेत सहज झाली असे अजिबात नाही. खेळाडू कोणताही असो, मेहनत, संघर्ष आणि अडथळे ओलांडतच त्यांना पुढे जावं लागतं.
ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये का दिसते ही जिद्द? खायला खुराक नसला तरी शहरी मुलांच्या तुलनेत का दिसतोय त्यांचा फिटनेस?

 

जगण्याशी लढाई करत करतच ही मुलं पुढे जातात, त्यामुळे कष्टाचं त्यांना फारसं कौतुक नसतं हे तर खरंच; 
पण ग्रामीण भागातले बहुतेक खेळाडू आपल्या खेळाकडे ‘करिअर’ म्हणून बघायला लागलेत, खेळ हीच एक अशी गोष्ट आहे, जी आपल्याला, आपल्या आयुष्याला तारून नेईल आणि आपल्याला, आपल्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवू शकेल, हे त्यांना आता पुरतं कळून चुकलंय.

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण, आदिवासी खेळाडूंना घडवणारे, त्यांना आंतरराष्ट्रीय पदकांपर्यंत नेणारे ‘साई’चे कोच विजेंद्रसिंग आणि त्यांच्यासारख्या अनेक जणांचं हेच म्हणणं आहे. जगण्याची लढाईच या मुलांना पुढे खेचून आणते आणि त्यांच्यामुळेच आपल्याला पदकं मिळतात.

अर्थात शंभर कोटींपेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या देशातून तुम्हाला किती पदकं मिळतात, हा प्रश्न जरूर विचारता येईल; पण त्यामागे अनेक कारणं आहेत.

गुणवत्ता प्रत्येकात असते, असू शकते; पण त्याजोडीला जिद्द, कठोर मेहनत घेण्याची तयारी आणि अखेरपर्यंत हार न मानण्याची वृत्तीही खेळाडूत असावी लागते. ग्रामीण खेळाडू त्यात आपली छाप सोडतात. म्हणूनच अडचणीचा बाऊ न करता जिद्दीनं वाटचाल करणारे स्वप्ना बर्मन, हिमा दास, अमित पांघल, नीरज चोप्रा, सुधा सिंग. यांसारखे खेळाडू स्पर्धांत चमकताना दिसतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियाई विजेत्या खेळाडूंची परवा 5 सप्टेंबरला दिल्लीत भेट घेतली.
त्यावेळी खेळाडूंचं कौतुक करताना त्यांनीही वस्तुस्थितीवर बोट ठेवताना सांगितलं, ‘ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरातील खेळाडूंनी आशियाई स्पर्धेत लक्षवेधी कामगिरी करत भारताचा तिरंगा अभिमानाने फडकावला. सोयी-सुविधांचा अभाव असतानाही देशासाठी स्वत:ला झोकून देत केलेली तुमची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागांमध्ये मोठी गुणवत्ता दडलेली असून, या गुणवत्तेचा आम्हाला विकास करायला हवा. ज्या खडतर परिस्थितींचा सामना करून हे खेळाडू चमकले आहेत, त्या परिस्थितींची लोकांना कल्पना नाही.’

ग्रामीण भागातील गुणवत्ता बाहेर काढून त्यांना प्रशिक्षण दिल्यास, त्यांच्या अडचणी दूर केल्यास ग्रामीण भागातून खरोखरच मोठय़ा प्रमाणात निखळ चकाकतं सोनं बाहेर पडू शकेल, याचं हे निदर्शक आहे. 

खेळाडूंना आधुनिक सोयीसुविधा व उच्च दर्जाचे प्रशिक्षक मोठय़ा शहरांतच मिळू शकतात हेही तितकेच खरे, मात्र यशस्वी होण्यासाठीची कणखर मानसिकता ग्रामीण भागातच मोठय़ा प्रमाणात सापडू शकते, हे आताच्या आशियाई स्पर्धांनीही पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. लहानपणापासूनच आव्हानांना तोंड देत अभावांना भिडण्याची सवय ग्रामीण खेळाडूंना जिंकण्याची ऊर्मी देते.

कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही, कितीही संकटं आली तरीही डगमगून जायचं नाही, ही वृत्तीच ग्रामीण खेळाडूंच्या यशाचे रहस्य आहे.
त्यांच्यापुढे असणा-या अडचणींचा पाढाही छोटा नाही. खेळण्याजोगे सपाट मैदान नाही, पुरेसे साहित्य नाही, खेळण्यायोग्य कपडे नाहीत, प्रशिक्षक नाहीत, योग्य आणि पुरेसा डाएट नाही. एक ना दोन. अशा अनेक अडचणींना तोंड देत ग्रामीण खेळाडू आपले लक्ष्य साधतात. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचे आव्हान पेलण्याची त्यांची वृत्तीच भविष्यात निर्णायक ठरते.

यंदाच्या आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंपैकी अनेक खेळाडू असे आहेत ज्यांच्याकडे साहित्यांची कमतरता होती; पण तरीही ते डगमगले नाहीत. ज्युनिअर विश्व अँथलेटिक्स स्पर्धेत विश्वविक्रमासह सुवर्ण पटकावल्यानंतर भालाफेकपटू नीरज चोप्राच्या प्रशिक्षकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. शिकवायला कोणीच नव्हतं, तरीही त्यानं एकलव्याच्या निष्ठेनं यू-ट्यूबच्या माध्यमातून सराव केला आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णफेक केली. ही लढाऊ वृत्तीच अशा मेहनती खेळाडूंना यशस्वी करत असते.

दोन्ही पायांना सहा बोटे असल्याने अयोग्य शूजसह धावणारी स्वप्ना बर्मन असो, बॉक्सिंगचे ग्लोव्हज घेण्याइतपतही पैसे जवळ नसलेला अमित पांघल असो, बेरोजगार धावपटू मनजित सिंग असो, ग्रामीण स्वप्नंच वास्तवात आली ही वस्तुस्थिती आहे.

गावात सोयी-सुविधांचा अभाव, सरावासाठी जायचे झाल्यास जवळच्या शहरातही जाण्यासाठी प्रवासामध्ये दररोज 7-8 तास खर्च करण्याची वेळ अनेक खेळाडूंवर येते. प्रवासाचा वेळ वाचविण्यासाठी अनेकजण घरापासून दूर राहण्याचा निर्णय घेत स्वावलंबी जीवन जगतात. वेळच्यावेळी आपली स्वत:ची कामे उरकून वेळेवर सरावाला जाणे, आपल्या खेळात सवरेत्तम ठरण्यासाठी कठोर मेहनत घेणे यासाठी मानसिकरीत्या खूप सक्षम असावे लागते. यामध्ये ग्रामीण खेळाडू हमखास उत्तीर्ण होतात. अन्यथा पश्चिम बंगालमध्ये पत्र्याच्या घरात राहणारी स्वप्ना बर्मन देशाची सुवर्णकन्या कधीच बनली नसती. हेप्टॅथलॉनच्या अंतिम फेरीत खेळत असताना दाढ दुखत असूनही स्वप्नाने माघार घेण्याचा निर्णय न घेता गालावर पट्टी लावूनच सहभाग घेतला. अखेरपर्यंत प्रयत्न न सोडता तिने थेट सुवर्ण पटकावले. ही मानसिक कणखरता ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात दिसते.


सहावेळा  पदकांचे अर्धशतक

आतापर्यंत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 18 सत्रांतील कामगिरीवर नजर टाकल्यास दिसून येईल की, भारताने आतापर्यंत केवळ 6 वेळा एकूण पदकांचे अर्धशतक झळकावले. स्पर्धेच्या पहिल्या सत्रात एकूण 51 पदकांची कमाई केलेल्या भारताने दुसरे स्थान पटकावले. ही आतापर्यंत भारताची सर्वात यशस्वी कामगिरी ठरली. मात्र यानंतर पदकांचे अर्धशतक झळकावण्यासाठी भारताला 1982 सालापर्यंत प्रतीक्षा करावी लागली. यावेळी भारताने 57 पदके जिंकताना पदकतालिकेत पाचवे स्थान मिळवले. यानंतर भारताने 2006 सालापासून आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात यश मिळवले. 2006 साली (53), 2010 साली (65), 2014 साली (57) आणि 2018 साली (69) अशी सलग चार वर्ष भारताने पदकांचे अर्धशतक झळकावले.


(लेखक लोकमतच्या मुंबई आवृत्तीत सहायक उपसंपादक आहेत.)
rohitnaik7388@gmail.com

Web Title: The mystery of India's brilliant performance in the Asian Games is in the dust.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.