नदालशाही

By admin | Published: June 14, 2014 05:49 PM2014-06-14T17:49:08+5:302014-06-14T17:49:08+5:30

फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये नदालचे विजयी होणे हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे होते. त्याच्या दृष्टीने व भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने अधिक. कारण, विम्बल्डन स्पर्धाही खुणावू लागली आहे. जगज्जेता बनण्यासाठी पुन्हा एकदा महारथींना भिडावे लागणारच..

Nadalshahi | नदालशाही

नदालशाही

Next

- नंदन बाळ

तुल्यबळ प्रतिस्पर्धी जेव्हा एकमेकांना भिडतात, तेव्हा त्यातील रंगत ही पाहण्यासारखी असते. त्यातून एखादाच शेरास सव्वाशेर निघतो. खरंतर कमी लेखावं असं कुणीच नसतं. सारेच सरस. पण, तरीही त्यातला एक अव्वल ठरतो. आधीच्या स्पर्धेत पराभूत झालेला एखादा पुढच्या स्पर्धेत विजेता ठरून जातो. फ्रेंच ओपन स्पर्धेत नवव्यांदा विजेतेपद पटकाविणारा राफेल नदाल हादेखील याच माळेतला एक सुवर्णमणी! 
फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये नदालचे विजयी होणे हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे होते. त्याच्या व भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने अधिक ‘क्ले’वर नदाल हा बादशहासारखा खेळतो, असा अनुभव आहे. आठ पैकी सहा सामने त्याने जिंकलेले असतात; परंतु या वर्षीची स्पर्धा काहीशी वेगळी होती. कारण, यापूर्वी रोम, माद्रीदमध्ये नदालचा पराभव झाला होता. त्या पार्श्‍वभूमीवर त्याने ही स्पर्धा जिंकणे हे वैशिष्ट्यपूर्ण होते. त्याने या स्पर्धेत विजयात सातत्य राखले. तरीही शंकेची पाल मनात चुकचुकत होती. कारण, अंतिम फेरीत जोकोवीच समोर होता. नुकत्याच झालेल्या इटालियन ओपन स्पर्धेमध्ये जोकोविचने नदालला पराभूत केले होते. त्यामुळे तोच कडवा प्रतिस्पर्धी अंतिम फेरीत होता. पण, या स्पर्धेत जिंकायचेच, अशा निग्रहाने उतरलेला नदाल इतक्या सहजपणाने हार मानणार्‍यांतला नव्हता. काहीही झाले तरीही आता मी तयार आहे, असे त्याच्या मनाने घेतले होते. यापूर्वीच्या प्रत्येक सामन्यात जोकोविचला विजयासाठी झुंजावे लागले होते. त्याने तो पूर्ण थकलेला होता. तुलनेत नदालचे पाय अंतिम सामन्यात ताजेतवाने व कमी थकलेले होते. हा सर्वांत मोठा अँडव्हान्टेज नदालला मिळाला. त्या पाच दिवसांत त्याला जेमतेम चार तास कोर्टवर खेळावे लागले होते, तर त्या तुलनेत जोकोविचला सात ते आठ तास कोर्टवर खेळावे लागल्याने, तो चांगलाच दमला होता. त्यामुळे मॅच लांबल्यानंतर नदालचे वर्चस्व स्पष्ट झाले. दोन आठवड्यांपूर्वीच नदालला हरविणार्‍या जोकोविचला शारीरिक साथ मिळाली असती आणि त्याची दमछाक झाली नसती, तर नदालला हा विजय इतका सोपा नक्कीच नव्हता. कदाचित निकालही वेगळा लागू शकला असता. यावेळी फ्रेंच ओपन स्पर्धेमध्ये नदाल नेहमीपेक्षा खूपच जास्त ‘अँग्रेसिव्ह’ वाटला. हे त्याने दमलेल्या जोकोविचला आणखी दमवण्यासाठी केले की जोकोविचने संधी दिल्याने नदालला आक्रमक खेळ करण्याची अनायसे संधी चालून आली, हे नेमकेपणाने सांगता येणार नाही. परंतु, या पैकी काहीतरी एक होते खरे. यापूर्वी नदाल इतका आक्रमक कधीही खेळताना दिसला नाही. त्यामुळे हा फॉर्म राहिल्यास नदालला विम्बल्डनला खूप चांगली संधी आहे. 
 
विम्बल्डनचे आव्हान : विम्बल्डन स्पर्धेच्या वेळी मरे अधिक चांगला व प्रभावी खेळ दाखवण्याची शक्यता जास्त आहे. कारण, एक तर त्याचे ‘होम टाऊन’ असल्याने त्याला प्रेक्षकांचे भक्कम पाठबळ साथीला असेल. जोकोविच हा सातत्याने उत्तम कामगिरी करीत आलेला आहे. त्यामुळे त्याच्या खेळातील बहर कायम राहण्याची आशा आहे. फेडरर हा माझा फेव्हरेट आहे हे खरेच; पण आता वयाचा फरक जाणवू लागला आहे. त्यामुळे चांगले पाच सेट खेळून फेडरर जिंकू शकेल, असे आता वाटत नाही. कितीही फिट असलात, तरी वयाचा फरक पडतो हे त्याच्या देहबोलीवरून जाणवू लागले आहे. अन्यथा ‘टॉप टेन’मध्येही नसणारा एखादा खेळाडू समोर असताना, तुमची इतकी दमछाक होण्याचे काही कारण नसते. मॅच लांबत जाते, तसतशा फेडररच्या जिंकण्याच्या आशा संपतात, असे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे या सार्‍यामध्ये नदाल काय करणार आणि बाजी मारू शकणार का, हा प्रश्न उरतो. फ्रेंच ओपन आणि विम्बल्डनमध्ये साधारणत: दोन-तीन आठवड्यांचाच कालावधी असतो. त्यामध्ये क्ले वरून ग्रासवर खेण्यासाठी हा खूप कमी कालावधी ठरतो. कारण, हे दोन संपूर्णत: वेगळे प्लॅटफॉर्म असतात. त्यामुळे ग्रासवर नदाल कसे पुनरागमन करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. पण, नदालने जो काही फिटनेस पुन्हा एकदा मिळविला आहे त्याला खरंच तोड नाही. विजयाची एक माळ गळ्यात पडल्यानंतर नदालसह सार्‍याच दिग्गज खेळाडूंना खुणावतंय ते विम्बल्डन. त्यासाठी पुन्हा एकदा हे सारे तुल्यबळ एकमेकांना भिडताना दिसणार आहेत.. विजयाच्याच जिद्दीने!
 
शारापोवाचे स्ट्रगल 
महिलांच्या बाबतीत सांगायचे, तर सेरेना विल्यम्स आणि लि ना या दोन्ही महत्त्वाच्या खेळाडू पहिल्या तीन दिवसांतच बाहेर गेल्याने, शारापोवाच फेव्हरेट राहणार, हे तर स्पष्ट होते; पण तसे असूनही प्रत्येक सामन्यामध्ये तिला पहिला सेट हारून, मग पुन्हा विजयासाठी झगडावे लागले आहे. इतकेच काय युजिन बुशार्ड या अगदी १८ वर्षांच्या युवा खेळाडूने तिला घाम फोडला होता. त्यामुळे अंतिम फेरीतही शारापोवाला झगडावे लागले. सिमोना हॅलेपने तिला चांगली लढत दिली. विजयाचा किनारा अगदी जवळ आला होता, तेव्हादेखील शारापोवाची सर्व्हिस ढेपाळली होती. तिसर्‍या सेटमध्ये पुनरागमन करून तिने अखेर विजय मिळवला. 
 
(लेखक आंतरराष्ट्रीय कीर्तीचे टेनिस प्रशिक्षक आहेत.)
 

Web Title: Nadalshahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.