विश्वास पाटलांच्या प्रतिभेला ‘नागकेशर’ ची बाधा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:00 AM2019-03-31T06:00:00+5:302019-03-31T06:00:06+5:30

नागकेशर ही विषवेल रानात उगवली तर अख्खा फड खाऊन टाकते, असे या कादंबरीच्या मलपृष्ठावर म्हटले आहे. विश्वास पाटील यांच्या दर्जेदार साहित्याच्या मळ्याला नागकेशरची बाधा झाली आहे...

'Nagkeshar' obstruction to vishwas patil creations | विश्वास पाटलांच्या प्रतिभेला ‘नागकेशर’ ची बाधा 

विश्वास पाटलांच्या प्रतिभेला ‘नागकेशर’ ची बाधा 

googlenewsNext

-  अविनाश थोरात-  

पानिपत, संभाजी, महानायक यांसारख्या ऐतिहासिक आणि झाडाझडती सारख्या सामाजिक कादंबºया लिहिणारे संवेदनशील आणि संशोधक लेखक विश्वास पाटील यांच्या सहकारसम्राटांवरील कादंबरीबाबत उत्सुकता होती. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांना जवळून पाहावयास मिळालेल्या अनुभवातून मराठी मातीचा अस्सल गंध असलेले राजकीय कंगोरे उलगडणारे सकस लिखाण वाचायला मिळेल, असे वाटले होते. परंतु, चंद्रमुखीपासूनच कादंबरी फिल्मी करण्याची त्यांना सवय लागली आहे. दाक्षिणात्य मसालापटाप्रमाणे कादंबरीत ठासून मसाला भरण्याच्या प्रयत्नात साहित्यमूल्यच हरवून गेले आहे. एखाद्या हिंदी पॉकेटबुकप्रमाणे कादंबरी वाटते. नागकेशर ही विषवेल रानात उगवली तर अख्खा फड खाऊन टाकते, असे या कादंबरीच्या मलपृष्ठावर म्हटले आहे. विश्वास पाटील यांच्या दजेर्दार साहित्याच्या मळ्याला नागकेशरची बाधा झाली आहे. 
विश्वास पाटील यांचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही विषयाचा ते सांगोपांग अभ्यास करतात. संशोधन चिंतनातून संवेदनशीलपणे विषय मांडतात. त्यामुळे पानिपतह्णने इतिहास घडविला. धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लिहिलेल्या झाडाझडतीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. संभाजी, महानायक ही मराठी कादंबरीतील अजरामर लेणी ठरली. नॉट गॉन विथ द विंड सारख्या नितांत सुंदर लेखसंग्रहातून त्यांनी परदेशी साहित्य आणि चित्रपटांची सफर मराठी प्रेक्षकांना घडविली. लस्ट फॉर लालबाग सारख्या कादंबरीबाबत वाद असले तरी मुंबईचे आणि गिरणगावचे इतके भेदक दर्शन आजपर्यंत आलेले नाही.  
चंद्रमुखीत तमाशा कलावंत चंद्रमुखी व एका खासदाराची प्रेमकथा दाखविली होती. त्यानिमित्ताने थोडेसे राजकारणही आले होते. परंतु, नागकेशर ची जाहिरात करतानाच ज्यांची घराणी राजकारणात आहेत आणि ज्यांच्या घरात राजकारण आहे; अशा मुरब्बी नेत्यांनी, त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी, बेरकी नातेवाइकांनी आणि वेशीत घोडे अडविणाºया विरोधकांनी दिलखुलास आस्वाद घ्यावी अशी.... कादंबरी असे म्हटले होते. ज्येष्ठ सनदी अधिकारी या नात्याने त्यांनी मुंबईपासून अनेक जिल्ह्यांत काम केले. त्यामुळे  राजकारणातील डावपेच, शहप्रतिशह, राजकीय प्रक्रियेचा संदर्भ आणि अन्वयार्थ लावण्याबरोबरच बदलत्या राजकारणाचा वेध पाटील घेतील असे वाटत होते. याचे कारण म्हणजे ताम्रपट, मुंबई दिनांक, सिंहासन यांसारख्या कादंबºयांनंतर अस्सल राजकीय म्हणावी अशी कादंबरी आलीच नाही.पण पाटील यांनी जणू मसालापटाची कथा लिहिली आहे. ती देखील अस्सल नाही तर काही चित्रपटांतील प्रसंगही घेतले आहेत. सहकारसम्राटाचा पुतण्या कारखान्यातील एका अधिकाºयाच्या पत्नीला उचलून घेऊन जातो. हा अधिकारी पोलिसांकडे जातो; पण त्याचे कोणी ऐकत नाही. गावातील सगळ्यांना हे माहीत असते; परंतु कोणी त्याबाबत बोलत नाही. त्याच्या मुलांचा अभ्यास बुडत आहे, असेही तो म्हणतो. जणू राउडी राठोड चित्रपटातील हा प्रसंगच. असे एक नाही अनेक प्रसंग आहेत. कारखान्याच्या बॉयलरमध्ये फेकून खून करण्यासारख्या महाराष्टÑाच्या सहकार क्षेत्रातील वदंतांचाही त्यांनी वास्तविकता आणण्यासाठी वापर केला आहे. कादंबरीचे मुख्य सूत्र हे डोंगरे-देशमुख घराणे या एकाच कुटुंबातील सहकारमहर्षी बापूराव आणि बबननाना या दोन भावांमध्ये कारखान्यातील सत्तेसाठी सुरू झालेल्या संघर्ष आणि राजकारणाचे हे चित्रण आहे. कुटुंबातील सुना हे राजकारण पुढे नेतात. पण हे करताना अतर्क्य घटनांचा भडिमार आहे. प्रिन्स देशमुख हा लग्नाच्या आदल्या दिवशी ठरलेले लग्न मोडून पतीच्या मारहाणीची तक्रार करण्यासाठी येणाºया तरुणीशी लग्न करतो. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होतो. पती तक्रार करतो, पण कोणी दखल घेत नाही. नंतर ही तरुणी साखर कारखान्याची संचालक होते. पंतप्रधानांना भाषण करून प्रभावित करते. 
मसाल्यासाठी शृंगारिक नव्हे तर कामुक प्रसंग आणि अवतरणांचा भारामार आहे. चंद्रमुखीमध्ये विषयाची गरज म्हणून ते होते. परंतु, येथील वर्णने सांगताही येणार नाहीत. (कदाचित कादंबरीचे मूल्य वाढविण्यासाठीच ते योजलेले असावेत.) विश्वास पाटील यांच्यासारख्या लेखकाच्या साहित्याला संदर्भमूल्य आहे, असे म्हणतात. मराठीतील सर्वात प्रभावी लेखकाने केलेले हे महाराष्टÑाचे चित्रण बिहारही बरा वाटावा असे आहे. महाराष्टÑाचे राजकारण, त्याचे बदलते रूप, सहकार चळवळ, तिचा राज्याच्या अर्थकारणावर झालेला परिणाम, या निमित्ताने बºया-वाईट अर्थाने झालेली शैक्षणिक क्रांती यांचा गेल्या पंधरा-वीस वर्षांतील पट मांडण्याची संधी विश्वास पाटील यांना होती. ती त्यांनी घालविली आहे. 
                                                                                                                                        (लेखक लोकमत मध्ये मुख्य उपसंपादक आहेत.)        

Web Title: 'Nagkeshar' obstruction to vishwas patil creations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.