लोकसहभागातून निसर्ग संवर्धनाचा नाशिक पॅटर्न

By admin | Published: June 4, 2016 11:39 PM2016-06-04T23:39:42+5:302016-06-04T23:39:42+5:30

नाशिक येथील ‘फाशीचा डोंगर’ ही एक उजाड टेकडी. गेल्या वर्षी ‘आपलं पर्यावरण ग्रुप’च्या सदस्यांनी लोकसहभागातून एकाच दिवशी 11 हजार रोपं लावली. त्यांचं संगोपन, संवर्धन केलं. अनेक अडचणींतून मार्ग काढला.

Nasik Pattern of Nature Conservation through Public Relations | लोकसहभागातून निसर्ग संवर्धनाचा नाशिक पॅटर्न

लोकसहभागातून निसर्ग संवर्धनाचा नाशिक पॅटर्न

Next
>- अजहर शेख
 
नाशिक येथील ‘फाशीचा डोंगर’ ही एक उजाड टेकडी.
गेल्या वर्षी ‘आपलं पर्यावरण ग्रुप’च्या सदस्यांनी लोकसहभागातून एकाच दिवशी 
11 हजार रोपं लावली. त्यांचं संगोपन, संवर्धन केलं. अनेक अडचणींतून मार्ग काढला.
या प्रयोगाचं वैशिष्टय़ म्हणजे लोकांनी उत्स्फूर्तपणो श्रमदान केलं, त्यांच्याच मदतीनं निधी उभा राहिला, सजग कार्यकर्ते तयार झाले आणि एका हरित कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.
आता त्याहीपुढचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आहे.
 
मान्सूनची चाहूल लागली किंवा पर्यावरण दिन जवळ आला की आजकाल सगळीकडे सुरू होते ती वृक्षारोपणासाठीची लगबग, धावपळ आणि पळापळ. शासन, विविध संस्था आणि नागरिकांपासून सा:यांचाच हा मुहूर्त साधण्यासाठी मग कोण तो आटापिटा! जणू 5 जून या पर्यावरण दिनाचा मुहूर्त जर टळला तर लावलेलं एकही झाड जगणार नाही की काय!
पर्यावरण दिनाच्या निमित्तानं खरोखरच निसर्गाविषयीची सजगता जागृत होत असेल तर उत्तमच, पण एवढा गाजावाजा करून लावलेल्या या रोपांचं पुढे काय होतं? पैशाचा आणि मानवी श्रमांचा जो खुर्दा होतो तो नेमका कशासाठी आणि कुणासाठी?.
निसर्ग संवर्धनाचे संजीवक प्रयोग ठिकठिकाणी निश्चितच होताहेत, पण त्यांचं स्वरूप फारच विस्कळीत आणि ठरावीक भागांपुरतं, ठरावीक गटांपुरतंच मर्यादित आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या पुढाकारातून आणि सहभागानं असे प्रयोग, प्रयत्न झाले तरच ते टिकतील आणि वाढतीलही. अशाच प्रामाणिक प्रयत्नांची एक गुढी नाशिकमध्येही रोवली गेली. या प्रयोगाचं नाव आहे ‘आपलं पर्यावरण ग्रुप’ आणि त्याचे प्रमुख कार्यकर्ते आहेत शेखर गायकवाड. या गटातील हरित सैनिकांची चिकाटी आणि त्यांच्या निरंतर प्रयत्नांमुळे हा प्रयोग आता राज्यात ‘नाशिक पॅटर्न’ म्हणून रुजू होऊ पाहतो आहे.
शेखर गायकवाड हे मुळात पक्षिप्रेमी. पक्षी जगवायचे तर आधी निसर्ग, झाडं जगली पाहिजेत हे त्यांच्या लक्षात आलं. सुरुवातीला त्यांनी एकटय़ानंच प्रामाणिक प्रयत्न सुरू केले. पक्ष्यांसाठी, चिमण्यांसाठी घरटी बनवणं, लोकांना ती फुकट वाटणं, पक्ष्यांसाठी उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करणं, झाडं लावणं, वाचवणं. आजूबाजूच्या लोकांना, विशेषत: तरुणांनाही त्यासाठी सजग करणं. 
सुरुवातीला स्वत:पासून आणि स्वत:च्या घरापासून त्यांनी सुरुवात केली. उगवत्या दिनकराच्या साक्षीने सुरू होणारा त्यांचा नित्याचा उपक्रम बघून बहुसंख्य लोक त्यांच्याशी जोडले गेले. अर्थातच यामध्ये तरुणांची संख्या अधिक होती, आहे. बघता बघता त्यांचं एक नवं कुटुंबच तयार झालं. वैयक्तिक स्तरावर आणि कुठलाही गाजावाजा न करता त्यांचं काम सुरू होतं. पण हे काम वाढवायचं तर नागरिकांचा सहभागही त्यात वाढला पाहिजे हे प्रकर्षानं त्यांच्या लक्षात आलं. त्यासाठी त्यांनी एक भन्नाट कल्पना लढवली.
नाशिकच्या सातपूर परिसरात ‘फाशीचा डोंगर’ नावाची एक टेकडी आहे. वनविभागाच्या अखत्यारित हा सारा परिसर येतो. या ठिकाणी वृक्षारोपण करण्याची परवानगी त्यांनी वनविभागाकडून मिळवली आणि त्यासाठी लोकांनाही आवाहन केलं. गेल्या वर्षी त्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाची 5 जून ही तारीखही त्यांनी निवडली. नागरिकांच्या सहभागातून एकाच दिवशी दहा हजार झाडं लावायची अशी ती कल्पना होती. म्हटलं तर ही कल्पना तशी ‘फिल्मी’ होती. कारण गाजावाजा केलेल्या अशा प्रयोगांचं नंतर काय होतं ते सा:यांनाच माहीत आहे. असे प्रयोग फसण्याचीच शक्यता जास्त असते. म्हणजे त्या क्षणाचा, त्या दिवसाचा तो मोठा ‘इव्हेण्ट’ होतो, पण नंतर त्याचा बहुश: फियास्कोच होतो. कारण नंतर पुढचा पर्यावरण दिन येईर्पयत कोणी तिथे फडकतच नाही. ‘आपलं पर्यावरण ग्रुप’ आणि त्यांच्या हरित सैनिकांचं वैशिष्टय़ हे की त्यांनी असा फियास्को होऊ दिला नाही. आणि एवढं मोठं आव्हान त्यांनी नुसतं स्वीकारलंच नाही, तर जिद्दीनं ते तडीसही नेताहेत. हे काम अजूनही संपलेलं नाही आणि कार्यकर्ते, नागरिक त्यासाठी आजही सजगतेनं प्रयत्न करताहेत. नागरिकांचा स्वयंस्फूर्त सहभाग हे त्याचं महत्त्वाचं वैशिष्टय़.
कार्यकत्र्यानी फाशीच्या डोंगरावर दहा हजार खड्डे खोदून प्रत्येक खड्डय़ाजवळ रोप तयार ठेवले होते. नाशिककरांनी 5 जूनला सकाळी आठ वाजेपासूनच या ठिकाणी गर्दी करत प्रत्येकी एक रोप लावले. सूर्य पार मावळतीला जाईर्पयत नाशिककर नागरिक उत्स्फूर्तपणो, कुटुंबासह इतक्या दूर, डोंगरावर वृक्षारोपणासाठी येत होते. केवळ दहाच तासांत विक्रमी अकरा हजार रोपांची नियोजनबद्ध लागवड या ठिकाणी करण्यात आली. ख:या अर्थानं हा ‘वन महोत्सव’ होता. त्यानंतर फाशीच्या या डोंगराचं ‘देवराई’ असं नामकरण करण्यात आलं. गेल्या वर्षी लावण्यात आलेली ही अकर हजार रोपं. बरोब्बर बारा महिन्यांनंतर आज काय आहे त्यांची स्थिती?
- बहुतांश रोपटी जगली आहेत आणि त्यांची दमदार वाढ झाली आहे. कारण, या काळात नागरिकांनी आणि कार्यकत्र्यानी घेतलेले अथक परिश्रम. पर्यावरण दिनाचा त्यांनी ‘इव्हेण्ट’ होऊ दिला नाही. अनेक अडचणी आल्या, पण निर्धारानं आपल्या हेतूला ते चिकटून राहिले. अकरा हजार झाडं तर लावली, पण त्यानंतर तब्बल पंधरा दिवस पावसानं तोंडच दाखवलं नव्हतं. पण अशी परिस्थिती येऊ शकते, हे कार्यकत्र्यानी गृहीतच धरलं होतं. त्यानंतर दोनच दिवसांनी प्रत्येक सदस्यानं पुन्हा देवराई गाठली, प्रत्येक रोपटय़ाची पाहणी केली आणि नित्यनेमानं त्यांनी पाणी देणं सुरू केलं. हे शक्य झालं कारण पावसानं दडी मारली तर रोपटय़ांची वाताहत होईल, अशी शक्यता लक्षात घेऊन आधीच तसं नियोजन व तयारी करण्यात आली होती. पंधरवडय़ानंतर मात्र वरुणराजानं जोरदार हजेरी लावली आणि अवघ्या महिनाभरातच डोंगरावर गवताचा हिरवा गालिचा पसरला. 
अगोदर पावसानं ओढ दिली, नंतर पाऊस आला, पण एक नवीच समस्या उभी राहिली. पावसामुळे हे गवत असं भसाभसा वाढलं की नाशिककरांनी लावलेली रोपटी कंबरेएवढय़ा वाढलेल्या गवतांमध्ये हरवून गेली. आता गवताच्या वेढय़ात ही रोपटी वाढणार तरी कशी? कंबरेएवढं गवत आणि सगळीकडे चिखलाचा किचकिचाट. त्यांनी पुन्हा नागरिकांना आणि मित्रंना आवाहन केलं. गवतात हरवलेली अकरा हजार रोपं शोधून त्यांच्याभोवतीचं गवत कापणं हे सोपं काम नव्हतंच. गवतामुळे सापांचाही वावर तिथे वाढला होता. सुरक्षिततेसाठी या ग्रुपने मग गमबूटचे सोळा जोड, वीस विळे, कोयते, गवत कापणीसाठी लोखंडी धारदार पंधरा स्टिक खरेदी केल्या आणि आपलं काम सुरू ठेवलं. गवत कापणी व प्रत्येक रोपटय़ाभोवती आळे करून त्यांना पाणी देण्याचं काम ऑक्टोबर्पयत सुरू होतं. चाळीस एकर जागेमधील गवत कापताना ग्रुपच्या प्रत्येक सदस्याने घाम गाळला. यादरम्यान काही मजुरांचीही मदत घेण्यात आली. ऑक्टोबर्पयत सर्वच रोपं गवताच्या विळख्यातून मुक्त करण्यात या ग्रुपला यश आलं.
तोर्पयत विजयादशमीचा सण जवळ आला होता. त्यांना पुन्हा एक कल्पना सुचली. सोनं वाटण्याच्या नावाखाली आपटय़ाची व कांचनची झाडे ओरबाडली जातात, त्याऐवजी ही रोपटीच जर एकमेकांना भेट दिली तर? - त्यांनी तोही प्रयोग केला. हिवाळा सुरू झाला आणि मग देवराईतील प्रत्येक रोपटय़ाभोवती आळं करण्याचं काम हाती घेण्यात आलं. देवराईच्या जमिनीचा पोत पाणी धरून ठेवणारा नसल्यामुळे नोव्हेंबर महिन्यापासून पुन्हा नित्यनेमाने रोपटय़ांना पाणी घालण्याच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. पाण्याचे कनेक्शन वाढवून अडीच इंच व्यासाची पाइपलाइन सहाशे फूट अंतरार्पयत टाकण्यात आली. या पाइपलाइनला आठ ते दहा ठिकाणी ‘पॉइंट’ घेऊन नळ्यांची संख्या वाढवण्यात आली. प्रत्येक पॉइंटला नळी जोडून पुढे शेकडो मीटर्पयत असलेल्या रोपाला पाणी पोहचविण्याचा प्रयत्न ग्रुपच्या सदस्यांनी केला. कार्यकत्र्यानी ‘पॉइंट’ वाटून घेतले आणि सकाळ-दुपार-संध्याकाळ अशा दिवसाच्या तीनही प्रहरी आळीपाळीनं डोंगरावर येऊन रोपटय़ांना पाणी दिलं. मुख्य जलवाहिनीच्या पॉइंटवरून जोडलेली पाण्याची नळी दाबामुळे निघणार नाही म्हणून सर्व पॉइंटला क्लिप लावण्यात आली. त्यासाठी ग्रूपच्या एका सदस्याकडे स्वतंत्र टूल बॅगच देण्यात आली होती. मात्र हे सारं करीत असताना पाण्याची नासाडी होणार नाही याकडेही जाणीवपूर्वक लक्ष पुरवण्यात आलं. उन्हाळ्यात गवत वाळून वणवा पेटण्याचाही धोका असतो. त्यासाठी डिसेंबरअखेर शेखर गायकवाड आणि ग्रुपच्या सदस्यांनी दोन ते अडीच किलोमीटर्पयत चोहोबाजूंनी शास्त्रशुद्ध पद्धतीने जाळपट्टा घेतला. नवं वर्ष एक नवंच संकट घेऊन आलं. वनविभागाकडून दहा ते बारा वर्षापूर्वी या डोंगरावर ‘ग्लिरिसिडिया’ नावाची झाडं लावण्यात आली होती. या झाडांना येणा:या फुलो:याचा चिकटा सहा महिन्याच्या रोपटय़ांच्या पानावर पडू लागला. रोपटय़ांसाठी ते जणू विषच होतं. 
काय करता येईल?
दर आठवडय़ाला रोपटय़ांना पाणी देताना पाने धुवून टाकण्याची नवी योजना सदस्यांनी हाती घेतली. सुमारे दीड महिना रोपटे धुण्याची योजना राबविण्यात आली. त्यामुळे चिकटारूपी विषापासून रोपटी सुरक्षित राहू शकली. मार्च महिन्यात देवराईवर पुन्हा एक नैसर्गिक संकट आले ते किडीच्या प्रादुर्भावाच्या रूपाने. या संकटाने कार्यकत्र्याच्या पायाखालची जमीन सरकली. कीटकनाशकांच्या क्षेत्रत काम करणा:यांपासून तर प्रगतिशील शेतकरी आणि वनअधिका:यांना पाचारण करण्यात आले; मात्र कोणालाही उपाय सुचविता आला नाही. जंगली ससेदेखील देवराईवर वाढल्यामुळे त्यांच्याकडूनही काही प्रमाणात रोपटय़ांना नुकसान पोहचविले गेले. अखेर निसर्गानेच निसर्गाचे संकट धुवून काढले. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात आलेल्या जोरदार वादळी पावसाने किडीचा प्रादुर्भाव नाहीसा झाला आणि आपलं पर्यावरण ग्रुपने सुटकेचा नि:श्वास सोडला. 
मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा वाढला. देवराईच्या जमिनीचा पोत पाणी धरून ठेवणारा नसल्यामुळे प्रत्येक झाडाला दररोज पाणी देण्याची वेळ या ग्रुपवर आली. उन्हाळ्यात नाशिककर नागरिकांचीदेखील मदत झाली. मार्च महिन्यापासून शहरातील बहुसंख्य लोक विके ण्ड देवराईवर साजरा करू लागले. तिथे आल्यावर स्वयंस्फूर्तीने झाडांना पाणी देऊ लागले. हे चित्र बघून एक नवीन ऊर्जा ‘आपलं पर्यावरण ग्रुप’ला मिळाली.
 
कदम कदम मिलाये जा.
देवराईच्या संरक्षणासाठीही नागरिकांनी उत्स्फूर्त मदत केली. नाशिकच्या ‘क्रेडाई’ने रोपांसाठी संरक्षक कुंपणाची सोय करून दिली. पुण्याचे उद्योजक धनंजय शेडबाळे जे व्हॉट्सअॅपमुळे कार्यकत्र्याशी जोडले गेले होते त्यांनी स्थानिक प्रजातीची सुमारे दहा हजार रोपे दान केली. खासगी नर्सरीच्या व्यावसायिकांनीही नाममात्र शुल्कामध्ये रोपे उपलब्ध करून दिली. वनविभागाकडूनही रोपे मिळाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खड्डे खोदणा:या वीस जोडप्यांचे कुटुंबीय याच ठिकाणी महिनाभर तळ ठोकून होते. त्यांना ताजा भाजीपाला राजू भालेराव व उमापती ओझा यांनी मोफत पुरविला. रोपे आणणो, खड्डे खोदणो, तसेच इतर कामांसाठी कार्यकत्र्यानी कर्ज काढून निधीची जमवाजमव करण्याची तयारी केली. साधारण लाखभर रुपये तरी खर्च येणार होता. रमेश अय्यर यांना हे कळल्यावर ते आणि त्यांचे मोठे बंधू के. पी. हरिहरण यांनी आपल्या कुटुंबीयांमार्फत अध्र्या तासातच हा निधी उपलब्ध करून दिला. विपश्यना केंद्रामधील पाण्याच्या डोहामधून देवराईर्पयत अशी दीड किलोमीटर पाण्याची पाइपलाइन टाकण्याचा खर्च मनोज टिब्रेवाल यांनी स्वयंस्फूर्तीने स्वीकारला. देवराईच्या संरक्षणासाठी दोन सुरक्षारक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी सिक्युरिटी कॅबिन नाशिकच्या एलआयसी गडकरी चौक शाखेने दान केली.
 
मृत जंगल जिवंत करायचेय 
जंगल म्हणजे केवळ हिरवे वाळवंट नव्हे. त्या ठिकाणी जैवविविधतेचे संगोपनही होणो गरजेचे आहे. त्यामुळे जैवविविधतेची जोपासना करणारे भारतीय प्रजातीचे विविध वृक्ष लावण्यावर आम्ही जास्त भर देत आहोत. नाशिकच्या देवराईवर पुढील दोन वर्षात नैसर्गिकरीत्या जैवविविधतेचे संवर्धन येथील वृक्षराजीद्वारे होताना दिसून येईल. जंगलांमध्ये विविध पक्षी, प्राणी यांचा वावर असला तरच ते जंगल जिवंत वाटते. नाशिकमध्ये दरवर्षी वनमहोत्सवाच्या माध्यमातून ‘ट्री मॅरेथॉन’ ही संकल्पना आम्हाला रुजवायची आहे. 
- शेखर गायकवाड 
संस्थापक अध्यक्ष, ‘आपलं पर्यावरण ग्रुप’
 
भारतीय प्रजातीचे वृक्ष
वनमहोत्सवात हरित वाळवंटाला फाटा देण्यात आला आहे. जैवविविधता जोपासणा:या पर्यावरणपूरक रोपांच्या लागवडीवर भर देण्यात आला. यामध्ये वड, पिंपळ, क डुनिंब, चिंच, पापडा, खाया, बेहडा, हिरडा, आवळा, करंज, शिवण, तीवस, क दंब, भोकर, पुत्रंजीवा, उंबर, पायरी, बाभूळ, काटेपांगारा, अजान, काटेसावर, बुच, काळाकुडा, कळम, सोनसावर, सीताफळ, रांजाई, पांढरा कुडा, मोह, अजरुन, खैर, बुचपांगारा, सीता अशोक, काजू, बेल, करवंद, ताम्हण, फणशी, बकुळ, चेरी, बहावा यांसारख्या देशी प्रजातीच्या रोपांचा समावेश आहे.
 
असे आहेत ‘हरित सैनिक’
सर्वसामान्य नागरिकांसह अनेक तरुणांनी नाशिकमधील वनराई हिरवी करण्यासाठी प्रयत्न केले, आजही करताहेत. त्यातील काही नावे. 
सुजाता काळे, तुषार गांगुर्डे, प्रसाद कुलकर्णी, राहुल आयरेकर, कौस्तुभ शुक्ल, करण आंबेरकर, सागर दळे, निकिता कुलकर्णी, संध्या जैन, 
मिलिंद मुंढे, ऐश्वर्या गुजराथी, विवेक आंबेकर, 
अक्षय भोगले, प्रसाद गायधनी, गिरीश कांगने, 
राजू भालेराव, गौरी गायकवाड.

Web Title: Nasik Pattern of Nature Conservation through Public Relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.