देवरायांमधले नवरात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 08:00 AM2019-10-06T08:00:00+5:302019-10-06T08:00:08+5:30
पश्चिम घाटात फार पुर्वी पासून येथे नवरात्र व पारंपारिक ऊत्सव साजरे केले जातात. नवरात्री ची पुजा ही निसर्ग निर्मितीची पुजा आहे.नवरात्री मध्ये मंडपीवर वेगवेगळी फळे बांधून फळांचे व धान्य पेरून त्याचे पुजन केले जाते...
- प्रा. किशोर सस्ते
हजारो वर्षांपूर्वी आदिमानव भटकंती सोडून जेव्हा शेतकरी झाला तेव्हा जंगलांचे सपाटीकरण करून शेती करू लागला त्यावेळेस त्यास पर्यावरणाच्या हाणीची व संवर्धनाविषयी जागृती निर्माण झाली व त्याने जंगलाच्या काही भागांचे संवर्धन करून संरक्षण करण्याचे ठरवले. मग या भागालाच लोक श्रद्धेने देवराई, देवरहाट किंवा देवाचं बन म्हणू लागले. लोकांनी देवावरच्या श्रद्धेने, देवाचा कोप होण्याच्या भीतीने या जंगल क्षेत्रांना संपूर्ण संरक्षण दिले म्हणजेच झाडतोड करायची नाही. एखादी औषधी वनस्पती कौल लावल्याशिवाय घ्यायची नाही त्यामुळे शेकडो वर्षे हे जंगलांचे काही भाग संरक्षिले गेले, जंगलांचे हे भाग बाळस धरू लागले. लता-वेली आणी झाडे झुडपांची वाढ पूर्ण होऊ लागली. वारूळांमध्ये, साचलेल्या पाल्या पाचोळ्यांमध्ये, वेलींच्या झोपाळ्यावर आणी भल्या मोठ्या झाडांच्या ढोलीत निसर्गाची व जैवविधतेची असंख्य रूपे वाढू व खेळू लागली. अश्या परंपरागत समृध्दी वनश्री वारसा असणार्या निमसदाहरीत व आर्द्र पानझडी वने असणाऱ्या देवराया आजही अनेक प्रजातीं आणी वैशिष्टांसह सह हजारो वर्षापासून उभ्या आहेत . ती एक शिखर परिसंस्था आहे. ज्या परिसरात देवराई असेल त्या परिसरातील ती सर्वोच्च प्रकारची नैसर्गिक अवस्था असते. ती विविध पिकांच्या,फळांच्या व फुलांच्या जनुकांचा व बीजांचा अधिकोष आहे. अशी वर्षोनवर्ष राखलेली जंगले पश्चिम घाटात आहेत; फार पुर्वी पासून येथे नवरात्र व पारंपारिक ऊत्सव साजरे केले जातात.
नवरात्री ची पुजा ही निसर्ग निर्मितीची पुजा आहे.नवरात्री मध्ये मंडपीवर वेगवेगळी फळे बांधून फळांचे व धान्य पेरून त्याचे पुजन केले जाते. हि आराध्य दैवते म्हणजे विंझाई, वरसुबाई, शिवाई, कमळजाई, शितळादेवी आणी अंजनीमाता इ. वाघजाई, कडूबाई, काळूबाई, सटवाई, सोमजाई आणी सातेरी या मातृदेवता. या देवता वैदिक काळाच्याही खूप आधीपासूनच्या त्यांची या काळानंतर लक्ष्मी, पार्वती, दुर्गा ही रूपं विकसित झाली. या मातृ दैवता प्रमाणेच या देवराया एका विशिष्ट वनस्पती च्या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या ऊदा.केवडा असलेली केतकाईची राई , वारस वृक्षा ची वरसुबाई, धुपाची झाडे म्हणून धुपरहाट, बांबू- कळक म्हणून कळकाई , मावळात असणारी आजिवली देवराई सदाहारीत जंगलाचे दर्शक असणार्या भेरल्या माडासाठी प्रसिद्ध आहेत. मातृ देवता ते वृक्ष देवता हा विकास म्हणजे विज्ञान आणि उपासनेचा सर्वोत्तम कळस म्हणावा लागेल. आदिमानवाने वृक्षाला तर देवता मानलेच पण भुमी माती आणी पाणी या आदितत्वाचे सुद्धा पुजन केले म्हणून मातृ देवता या जलदेवता आहेत,अश्या जलदेवता असणाºया देवराया देखील आहेत. देवरायांमध्ये असलेली भुमीवरील वारूळे हे माता रेणूकाचे रूप, वारूळाची माती ही अगदी मऊ - नरम कणांची-रेणूंची बनलेली म्हणून ती रेणुका होते. गोवा व कोकणात अशी वारूळे असणाºया देवराया आहेत त्यास सातेरी देवी असे म्हणतात.
घरोघरी व देवराई मधल्या देवळामध्ये नवरात्र तर साजरे होतेच पण हे देवराईमधल्या पाणी, माती व वनस्पती वापरून केलेल्या नैसर्गिक नवरात्राचे हे छोटे रूप आहे. भारतात १३००० पेक्षा जास्त देवराया आहेत.
महाराष्ट्रात सध्या २४०० देवराया आहेत.
आदीमानव कंदमुळे खाऊ लागला व शेती मध्ये धान्य पेरण्यासाठी जंगलातून त्याला बियाणे मिळाले. अशी अनेक जंगली पिकांची वाणे येथे आढळतात.या वाणांचा वापर करून सध्याची संकरीत वाणे विकसीत झाली आहेत.
उदा. रानबाजरी, सावे, राळे, बडमूग, जवस, तीळ, देवभात, बागबेरी, नागेली व कोळवा; मसाल्यामध्ये रानमीरी, रानहळद व आले. महाराष्ट्राच्या अतिपावसाच्या प्रदेशात कढीपत्ता व तमालपत्र मिळते याची कल्पना सुद्धा नसेल. अरूणाचल प्रदेश मधल्या जंगली कांदा व लसणाच्या प्रजाती, आसामची गुलाबी केळी; फूलांमध्ये मोगर्या सारखी कुसुर ही वनस्पती, सुवासिक सुरंगी, दवना ,केवडा व बकुळ आणि इतर सुगंधी वनस्पती; गूलाब कलम करण्यासाठी महाबळेश्वर व लोणावळा येथून आणलेले गावठी गूलाबांचे खुंट. फळांमध्ये द्राक्षांसारखी जंगली कजोरणी, चिक्कू सारखा अळू, केळासारखी चवेणी.
फळभांज्यामध्ये वांग्यासारखी चिचार्डी व कारल्यासारखी कटुर्ली - कडवंची; कंदमुळांमध्ये माईनमूळ यादी द्यायची म्हटल तर खूप मोठी जंत्री आहे. हि सगळी पिकांची वाण, सुवासिक रंगीबेरंगी फुले आणी समधूर फळांनी मानवाची ओटी धरमीमातेने भरली आहे.
हिरवी धरणीमाता जशी सुजलाम सुफलाम व निर्मानशील असते, त्याचेच प्रतीक म्हणून देवीस हिरवी साडी चोळी देतात.
वेदांमध्ये सोळा प्रकारच्या माता सांगितल्या आहेत,उदा. आत्या, आजी, बहीण किंवा इतर नाती; पण सर्वात श्रेष्ठ आपली जन्मदाती आई आहे. देवीचे सर्व रूपे आपल्या आईमध्ये असतात पण सर्व मातांमध्ये श्रेष्ठ धरणीमाता आहे; नवरात्रात जसे आपण नऊ दिवस घटाची सेवा करतो तसेच या धरणीमातेच्या पृथ्वीरूपी घटाची सेवा म्हणजेच संरक्षणाचा वसा आपण घेतला पाहिजे.आपल्या कुलदेवतेची कृपा व्हावी व तिचे सदैव छत्र आपल्यावर राहावं म्हणून आपण नवरात्र करतो तसेच या धरणीमातेच्या निसर्गाचे अखंड नवरात्र करून, पर्यावरण जागरूकतेचा नंदादीप तेवत ठेऊन प्रदूषण मुक्तीचा आणि संवर्धनाचा जागर करू व हिरवीगार सोनेरी विजयादशमी साजरी करण्याचा संकल्प करू.