नयनमनोहर बदामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:43 AM2019-02-03T00:43:43+5:302019-02-03T00:45:07+5:30

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी शहर हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. शिल्पकला, गुहा, लेणी, धार्मिकस्थळ आणि व्यापारी पेठ अशा अनेकविध अंगांनी बदामीचा लौकिक वाढतच आहे.

Nayanamohar Badami | नयनमनोहर बदामी

नयनमनोहर बदामी

Next

- डॉ. सुभाष देसाई -

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बदामी शहर हे एक सुंदर पर्यटनस्थळ आहे. शिल्पकला, गुहा, लेणी, धार्मिकस्थळ आणि व्यापारी पेठ अशा अनेकविध अंगांनी बदामीचा लौकिक वाढतच आहे.

चालुक्यांच्या काळात बदामीला वातापी असे म्हणत. पूर्वी ग्रीक भूगोलतज्ज्ञ टॉलेमी या व्यापारी केंद्राला बदाममी असे म्हणत. येथील मलप्रभा नदीच्या काठावर प्राचीन संस्कृतीच्या अनेक खुणा सापडतात.
चालुक्य सम्राटाचा काळ हा इ. स. ६३१ ते ७४१चा. त्यावेळची भाषा कानडी आणि तेलुगू. बारा आणि तेराव्या शतकानंतर त्या दोन स्वतंत्र भाषा झाल्या. राजा मंगलेशचा काळ ६०२चा होता. या राजाचा उल्लेख कवी कालिदासाच्या रघुवंशात येतो. अहिवोलाच्या टेकडीवरील मंदिरात कालिदास व भार्गव या दोन कवींचा उल्लेख आढळतो. इ. स. ४५५ ते ४६७ मध्ये कालिदास सम्राट विक्रमादित्याच्या दरबारात होता. पाटलीपुत्र म्हणजे बिहार येथील गुप्त वंशाच्या राजाशी हे घराणे संबंधित होते. बदामीचा राजा पुलकेशीने उत्तर प्रदेशमधल्या हर्षवर्धन राजाचा पराभव केला. त्या विजयाप्रीत्यर्थ अहिवोलाला शिवमंदिर उभारले आहे. मागुती मंदिरात शिलालेखाचा उल्लेख आढळतो. कर्नाटकात शक युग बदामीच्या चालुक्य राजवटीने सुरू केले. खास बदामीच्या संग्रहालयात तसा शिलालेख आढळतो.

इ. स. ५४३मध्ये गुरुवार हा बृहस्पतीवार आहे असा उल्लेख दुसरा पुलकेशी राजाने सर्वप्रथम केला. राजा विक्रमादित्याने इ. स. ६९२ मध्ये शनिवार हे नाव प्रथम वापरल्याचा उल्लेख शिमोगा येथील शिलालेखावर केला आहे. तमिळनाडूचा पल्लव वंशाच्या नरसिंहाने इ. स. ६४२ मध्ये बदामी जिंकली. या युद्धात पुलकेशी दुसरा बदामीचा राजा मारला गेला. (त्याने ६१० ते ६४२ या काळात राज्य केले). त्याचा बदला विक्रमादित्य दुसरा याने (७३३ ते ७४४) कांचीपूरम जिंकून घेतला. त्या काळाची माहिती येथील मंदिराच्या दगडी स्तंभांवर कोरलेली आहे. यापूर्वी बदामीला मी दहा-बारा वेळा गेलो आहे; परंतु खालचे शिवमंदिर आणि वरचे शिवमंदिर मी पाहिलेले नव्हते. या योगायोगाला आमचे मित्र डॉक्टर विजय चव्हाण हे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आहेत. त्यांच्या पत्नी डॉक्टर रश्मी चव्हाण या दोघांनी बदामीचीे सहल अचानक ठरवली. त्यांच्या विनंतीनुसार मी जॉईन झालो. बरोबर अजिंक्य पाटीलही होते.

बदामीला शाकंभरी यात्रा सुरू होती. त्यामुळे बनशंकरी देवीच्या मंदिरात लाखोंनी भाविक जमलेले होते. मंदिराच्या परिसरातून जाऊन आलो आणि नंतर दुसऱ्या दिवशी पहाटे पाच-सहाला उठून बदामी गुफेंच्या दिशेने निघालो. अंधार अजूनही होता तोपर्यंत समोरच्या टेकडीवरील शिव मंदिराची वाट चालू लागलो. अतिशय सुंदर आणि त्यातून बदामीचे दृश्य फारच सुंदर दिसत होते. तिथून आम्ही खाली उतरलो. एखाद्या इंग्लिश चित्रपटातील दृश्याप्रमाणे वेगळाच निसर्ग, वेगळी रंगसंगती असणारे प्रचंड दगड आणि त्यातून जाणारी वाट हे पाहून मन प्रसन्न होते. तेथून शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना ठरावा अशी लेणी बघत निघालो.

पूर्वी चांदोबाच्या मासिकांमध्ये दिसणारी चित्रे या भागातील असावीत असे वाटू लागते. शेवटचे लेणी हे जैन धर्मीयांचे दैवत भगवान महावीरांच्या वर आहे. याठिकाणी एक यमसल्लेखना घेऊन मोक्ष मिळवलेल्या स्त्रीचे शिल्प आहे. त्यानंतर पट्टदखल आणि तिथून अहिवोल येथे जाऊन शिल्पकलेची अनेक मंदिरे पाहिली. आपण जा आणि आनंद लुटा. कोल्हापूरपासून फक्त २३५ किलोमीटर अंतरावर साडेचार तासांचा कारचा प्रवास आहे. येथे निवासाची उत्तम सोय आहे. कोल्हापूर-संकेश्वर- गोकाक-यरगट्टी आणि बदामी असा रस्त्याचा मार्ग आहे.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Web Title: Nayanamohar Badami

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.