अस्वस्थ आणि अवघड! - नयनतारा सहगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 06:03 AM2019-02-03T06:03:00+5:302019-02-03T06:05:08+5:30

आज? आज शांतता आहे. सगळे शांत, चूप बसलेत! हे योग्य नाही. या अशा काळात शांत राहणं, गप्प बसणं खतरनाक ठरेल.

Nayantara Sehgal speaks about the difficult time in India ! | अस्वस्थ आणि अवघड! - नयनतारा सहगल

अस्वस्थ आणि अवघड! - नयनतारा सहगल

Next
ठळक मुद्देआपण अत्यंत अवघड काळात जगतोय. या अशा काळात शांत राहणं, गप्प बसणं खतरनाक ठरेल.

- नयनतारा सहगल

मी डेहराडूनला राहते, शांत-खासगी आयुष्य जगते. मी लेखक आहे, वक्ता नाही. त्यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात माझ्या न झालेल्या भाषणाला मराठी माणसांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला हे ऐकलं तेव्हा मला धक्काच बसला. माझ्या विचारांना समर्थन लाभलं; शहरांत, छोट्या शहरात राज्यभर ते भाषण वाचलं गेलं, अनेक संस्थांनी सभा घेतल्या, तिथं त्या भाषणाचं सामूहिक वाचन केलं, इतक्या मार्गांनी इतक्या लोकांनी ते भाषण वाचलं, मला आश्चर्यच वाटलं. हे सारं कळल्यावर मनात बरंच काही दाटून येतं आहे. मात्र एकाच शब्दांत सांगते, बहौत बहौत शुक्रिया!
हे विलक्षण आहे, अजब आहे. देशात असं कुठल्याच राज्यात घडलेलं नाही, मात्र महाराष्ट्रात घडलं. म्हणून मी म्हणते जय महाराष्ट्र!
मात्र मनात एक खंतही आहे. खेद वाटतोय की, मुंबई नावाचं हे इतकं महान बहुविधतेनं सजलेलं शहर, इथं एवढी मोठी फिल्म इंडस्ट्रीही आहे. मात्र त्या उद्योगातली माणसं एक चकार शब्दानं काही बोलली नाहीत. आपल्या स्वातंत्र्याचं दमन होत असताना ही माणसं काहीही बोलायला तयार नाहीत. काही माणसं बोललीही असतील; पण तो अपवाद. मात्र एक संपूर्ण उद्योग म्हणून सिनेउद्योगानं काहीही भूमिका घेतली नाही. आनंद पटवर्धनांसारख्या दिग्दर्शकानं पुरस्कार परत केले, मात्र बाकी या उद्योगातली माणसं गप्पच आहेत.
माझ्या लहानपणीची एक गोष्ट सांगते. अजून आठवतंय मला. पारतंत्र्यातला काळ. मी जन्माला आले, वाढले ते पारतंत्र्यातच. त्या काळात तर स्वातंत्र्य -‘आझादी’ या शब्दाच्या उच्चारावरही बंदी होती. नुसतं आझादी असं म्हटलं तरी तुरुंगवास, देशनिकाली, नाहीतर मृत्युदंड हे आम होतं. मोठा अवघड काळ होता. त्याकाळात स्वातंत्र्याच्या लढ्याला आणि मूल्याला सिनेउद्योगानं मात्र मोठी साथ दिली. अगदी लहान असताना मी पाहिलेला सिनेमा आठवतो. अशोककुमार यांची भूमिका असलेला नया संसार. ‘आझादी’ हा शब्द वापरायलाही तेव्हा बंदी होती. त्यामुळे सिनेमात आझादी शब्द वापरला, संवाद असला तर तो सेन्सॉरमधून सुटला नसता. मात्र त्या सिनेमातलं एक गाणं मला अजून आठवतं. ते पाहून मी वडिलांना विचारलं होतं, बापू ये कैसे हुआ?
ते म्हणाले, गाने की वजह से!
ते गाणं काय होतं?
एक नया संसार बनाए,
ऐसा एक संसार
जिसमे धरती हो आझाद,
जीवन हो आझाद,
भारत हो आझाद,
जनता हो आझाद,
जनता का राज जगत में
जनता की सरकार
- हे असं गाणं, त्यातले हे शब्द पारतंत्र्यात असताना सिनेमासाठी लिहिण्याची, गाण्याची, दाखवण्याची हिंमत त्यावेळी सिनेमाकर्त्यांनी केली!!
.. आणि आज?
आज शांतता आहे. सगळे शांत, चूप बसलेत!
या शहरातला एखादा खिन्न, दु:खी आवाज माझ्या कानावर तिकडे डेहराडूनमध्येही पडतो. त्या आवाजाचं नाव नसिरुद्दीन शहा. त्या आवाजात काही फक्त त्यांच्या पोटच्या मुलांची काळजी नव्हती, तो आवाज या देशातल्या सगळ्या मुस्लिमांच्या सुरक्षिततेविषयी बोलू पाहात होता.
इथं निष्पाप लोक मारले जात आहेत, कारण काय? ते एका विशिष्ट धर्माचे आहेत. काहींना तुरुंगात डांबलं जातं आहे. मी अस्वस्थ होते याने. पाहवत नाही मला हे!
ज्यांनी बोललं पाहिजे त्यातलं कुणी कुणी बोलत नाही. सगळे चिडीचूप. कुणाकुणाच्या लग्नात नाचगाणी करण्यात दंग.
अधिक काय बोलणार?
आपण अत्यंत अवघड काळात जगतोय. या अशा काळात शांत राहणं, गप्प बसणं खतरनाक ठरेल. आपण आज शांत राहिलो तर त्याचे परिणाम विकृत असतील. आपला देश, आपली संस्कृती, सभ्यता हे सारं जगात आणि जगाहून वेगळं आहे. इथं अनेक संस्कृती एकत्र नांदतात, अनेक धर्म सुखानं एकमेकांसह राहतात, जगण्याच्या अनेक कल्पनातून जीवन आकार घेतं, आपलं जगणं समृद्ध-श्रीमंत करतं.
हे सारं टाळून, नाकारून आपल्याला एका संस्कृतीत कोंबून बसवण्याचा प्रयत्न चालला आहे. मात्र आपलं सांस्कृतिक बहुविधतेचं जे संचित आहे ते आपण का गमवायचं? शामी कबाब ते रोगन जोशपर्यंत जगण्याच्या अनेक अंगात जे जे अन्य धर्मांनी आणलं, ते का गमवायचं? इस्लाम, ख्रिश्चन, शीख या साऱ्या धर्मांसह जगताना जे बहुवैविध्य लाभलं ते तरी का नाकारायचं, का गमवायचं?
इथं राहणारे आपण सारे हिंदू नाही, नसूही.. मात्र आपण सगळे हिंदुस्थानी आहोत.. हम ये हिंदुस्थानियत को नहीं छोडेंगे.. कभी छोडनी भी नहीं चाहिए!

(अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिलेलं आमंत्रण नाकारल्याने उपस्थित न राहू शकलेल्या नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीत ‘एकत्र येण्या’चा कार्यक्रम लेखक-कलावंतांनी सामूहिकपणे मुंबईत आयोजित केला होता. त्याप्रसंगी केलेल्या भाषणाचा अनुवाद)

Web Title: Nayantara Sehgal speaks about the difficult time in India !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.