शिक्षकांचा कणा अजूनही ताठ आहे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 07:06 AM2018-10-14T07:06:06+5:302018-10-14T07:06:06+5:30
दिल्ली सरकारसारखी प्रेरणा घेऊन, उत्साही शिक्षकांना सोबत घेऊन, दबावतंत्र झुगारून काम करणे गरजेचे वाटते.
- रमेश सरोदे, पुणे
मी पुणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक आहे. दि. ७ आॅक्टोबरच्या मंथन पुरवणीमध्ये ‘मुक्काम खिचडीपूर’ हा अमृता कदम यांचा लेख वाचून मनाला हुरूप आला. परंतु, या लेखाच्या निमित्ताने मनात साचून राहिलेली धगधग वर येऊ पाहातेय. कारण दिल्ली सरकार हे करू शकते तर मग इतर ठिकाणी का नाही? याचे उत्तरही अर्थात अमृता कदम यांनी दिले आहे, ‘राजकीय इच्छाशक्ती’!
अनेक शिक्षक ही शिक्षणपद्धती सुधारू पाहतात, बदलू पाहतात, नवनवीन प्रयोग, पद्धती, कल्पना, संकल्पना आणू पाहतात; परंतु त्यांची कुचंबना होते. शाळेच्या अधिकाऱ्यांपासून राजकीय पुढारी, कार्यकर्ते, पगारापुरतेच काम करणारे मुख्याध्यापक (अपवाद वगळता) इ. सर्वांचाच वचक व भीतीयुक्त वातावरणाला सामोरे जावे लागत आहे. त्यात अशैक्षणिक कामांनी तर वैताग आणला आहे. शिकवायला वेळच पुरत, मिळत नाही. एखादी नवीन संकल्पना शाळेत राबवावी म्हटलं तर सहकार्य कमीच परंतु उलट दबाव व जो करेल त्यानेच सर्व जबाबदारी घ्यायची. शाळेत शिस्त लावायची म्हटलं तरी पालकांचा दबाव वाढतो. परिणामी वाईट बोल, शिव्या ऐकाव्या लागतात.
अशा एक ना अनेक समस्या. यामधूनही आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय. दिल्ली सरकारसारखी प्रेरणा घेऊन, उत्साही शिक्षकांना सोबत घेऊन, दबावतंत्र झुगारून काम करणे गरजेचे वाटते. परंतु हे सर्व माझ्यासारख्या खेडेगावातून आलेल्या शिक्षकाला जमत नाही. फक्त इच्छाशक्तीवर काही होऊ शकत नाही. हे सर्व काही समजतं, पण इच्छा असूनही वळत नाही.
अनेक मुलांना ६ वी, ७ वी ला असून, नीट लिहिता, वाचता, विचार करता येत नाही. काही शिक्षक अशा मुलांना शिकविण्याचा प्रयत्न करतात तर मध्येच ही माहिती पाहिजे, ती माहिती पाहिजे, ही मीटिंग, ती मीटिंग... त्यात महानगरपालिका शाळेतील पालकांची मानसिकता वेगळीच. कधीही वर्गात, शाळेत येतात. नियम सांगितले शाळेचे तर स्थानिक नेत्यांकडून दबाव, उलट उत्तरे अशी परिस्थिती.. तरीही बघुया, अजून कणा ताठ आहे, बुद्धीची धार तेज आहे. नवीन शिकण्याची आणि करण्याची, घडविण्याची आस आहे, इच्छा आहे.