बाबासाहेब व म. गांधींच्या मानवी मूल्यांच्या समन्वयाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 06:02 AM2020-12-06T06:02:00+5:302020-12-06T06:05:04+5:30
गांधीच आपणाला समजावून घेऊ शकतात, अशी बाबासाहेबांची धारणा होती. बाबासाहेब व म. गांधी या दोघांनाही आधुनिक भारत घडवायचा होता. ज्या भारतात गरिबातील गरीब माणसाला हा देश आपला वाटेल. ज्यात ज्येष्ठ आणि कनिष्ठ वर्ग नसेल..
- बी.व्ही. जोंधळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व म. गांधी या दोन महामानवांत अस्पृश्यतेच्या प्रश्नावरून घनघोर वैचारिक संघर्ष झाला हे खरे; पण असा वैचारिक संघर्ष करताना या दोन्ही महापुरुषांनी एकमेकांविषयी मनात द्वेष बाळगला नाही, हे विशेष! बाबासाहेब व म. गांधी हे दोघेही आधी राजकीय सुधारणा की आधी सामाजिक सुधारणा, या वादात न अडकता, दोन्ही सुधारणा एकत्रच झाल्या पाहिजेत, असे सांगत होते. अर्थात, तरीही बाबासाहेबांचे प्रथम प्राधान्य सामाजिक सुधारणांनाच होते. असे असूनही या दोन महापुरुषांत संघर्ष झडला तो का? तर बाबासाहेबांनी झगडून मिळविलेल्या स्वतंत्र मतदारसंघास म. गांधींनी प्राणांतिक उपोषण करून केलेल्या विरोधामुळे. अस्पृश्य हे हिंदू समाजाचाच एक भाग असल्यामुळे हिंदू समाजात फूट पडून अस्पृश्य हे अस्पृश्यच राहू नयेत, म्हणून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ नये, अशी गांधींची भूमिका होती. दुसरे असे की, म. गांधींचा प्रारंभीच्या काळी वर्णव्यवस्थेवर विश्वास होता. गांधीजी पिढीजात व्यवस्थेचेही समर्थन करीत होते. बाबासाहेबांनी यासंदर्भात गांधीजींना पत्र लिहून त्यांच्या असे लक्षात आणून दिले की, ‘महात्मा जन्माने वैश्य आहेत; पण त्यांच्या पूर्वजांनी ब्राह्मणांचा व्यवसाय असलेल्या मंत्रिपदासाठी आपल्या पिढीजात व्यवसायाचा त्याग केला आहे. गांधीजींनी हाती तराजू धरण्याऐवजी वकिलीपेशा स्वीकारला. त्यांच्या लहान मुलाने वैश्य म्हणून जन्म घेऊन ब्राह्मण मुलीशी विवाह केला. काँग्रेसने अस्पृश्यांसाठी काय केले, असा प्रश्न विचारतानाच काँग्रेसचा सभासद होण्यासाठी गांधींनी खादीची वगैरे जशी अट घातली, तशी अस्पृश्यता निवारणासाठी एखाद्या अस्पृश्य विद्यार्थ्याला घरी ठेवीन वा त्याला घरी जेवायला बोलवीन वा घरगुती कामासाठी एखादी अस्पृश्य वर्गातील महिलेला काम देईन अशी अट का? घातली नाही, असाही प्रश्न बाबासाहेबांनी गांधींना केला होता.
म. गांधींच्या ‘हरिजन’ साप्ताहिकाच्या पहिल्या अंकासाठी पाठविलेल्या संदेशात बाबासाहेबांनी लिहिले होते, ‘भारतातील बहिष्कृत वर्ग ही जातीसंस्थेची निर्मिती असून, जोपर्यंत या देशात जाती अस्तित्वात आहेत, तोपर्यंत बहिष्कृतवर्गही असेल. या बहिष्कृत वर्गाला मुक्त करावयाचे, तर हिंदू धर्मातील वाईट चालीरीती धुऊन त्यांंना शुद्ध केल्याखेरीज हिंदू धर्माला वाचविता येणार नाही.’ बाबासाहेबांच्या या संदेशाने गांधीजींच्या वर्णाश्रम धर्मावरच घाव घातला. गांधीजींच्या महात्मेपणावर टीका करताना मला मातृभूमी नाही, असे सांगताना राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी राष्ट्र निर्माण व्हावे लागते आणि माणसाला माणुसकीची वागणूक मिळावी लागते, हेच बाबासाहेब गांधीजींना बजावून सांगत होते. बाबासाहेबांच्या अशा घणाघाती टीकेमुळे गांधी अंतर्मुख होत गेले आणि सुताराच्या मुलाने सुतारच व्हावे म्हणणारे गांधी स्वतंत्र भारताचा पहिला राष्ट्रपती सफाई कामगाराचा मुलगा व्हावा आणि आंतरजातीय विवाहांचा पुरस्कार करताना आपण त्याच विवाहांना उपस्थित राहू की, वधू-वरापैकी एक जण हरिजन असेल, असे बोलू लागले. अर्थात, ‘हरिजन’ या शब्दावरही बाबासाहेबांनी आक्षेप घेतला. आम्ही हरीची लेकरे आहोत, तर तुम्ही काय दानवाची लेकरे आहात काय, असा जो प्रश्न त्यांनी केला होता, तो रास्तच होता.
येरवडा कारागृहात म. गांधीजींशी झालेल्या भेटीत बाबासाहेबांनी हिंदू मन विवेकाने वागत नाही. आम्हाला मंदिर प्रवेश का नाही, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा गांधींनी मंदिर प्रवेशाला आपण प्राधान्य देतो, असे म्हटले होते. गांधीजींच्या प्रेरणेने केंद्रीय विधिमंडळात मंदिर प्रवेशाचे विधेयक मांडण्यात आले होते; परंतु या विधेयकाला पुजाऱ्यांचा व सनातनी हिंदूंचा विरोध होता.
गांधीच आपणाला समजावून घेऊ शकतात, अशी बाबासाहेबांची धारणा होती. बाबासाहेब व म. गांधी या दोघांनाही आधुनिक भारत घडवायचा होता. ज्या भारतात गरिबातील गरीब माणसाला हा देश आपला वाटेल. ज्यात ज्येष्ठ आणि कनिष्ठ वर्ग नसेल. अस्पृश्यता, धर्मांधता व जातीयतेला स्थान नसेल. समता, स्वातंत्र्य, बंधुभाव नि धर्मनिरपेक्ष लोकशाहीची मूल्ये रुजलेली असतील. या पार्श्वभूमीवर विचारवंत, बुद्धिवाद्यांनी पुरोगामी राजकारण्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी गांधी-आंबेडकरांची मानवी मूल्ये समाजात रुजविण्याचे असिधारा व्रत अंगीकारणे हीच बाबासाहेबांना खरी मानवंदना ठरेल.
(लेखक आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक आहेत.)