वेगली नजर हवी

By admin | Published: November 22, 2014 05:21 PM2014-11-22T17:21:36+5:302014-11-22T17:21:36+5:30

मतिमंद म्हणजे अँबनॉर्मल असं म्हणताना, जे दिसायला नॉर्मल आहेत; परंतु अंतर्बाह्य अँबनॉर्मल आहेत त्यांचं काय? ‘घाडी’ हा चित्रपट तिथेच लक्ष वेधण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. तसाच ‘द फेस ऑफ द अँश’ हा शाख्वान इद्रिस याचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आणि पुन्हा ‘घाडी’सारखाच अनुभव! पहिला असून पहिला वाटत नाही, अशी माध्यमाची आणि विषय हाताळणीची समज!

Need a different look | वेगली नजर हवी

वेगली नजर हवी

Next

- अशोक राणे

 
दुसरं महायुद्ध हे मानवी इतिहासातलं एक अतिशय भीषण वास्तव आहे. त्यावर कुणी कसा हलकाफुलका, गमतीदार सिनेमा बनवू शकतो?’
१९८६मध्ये हैदराबाद येथे भरलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोपाचा चित्रपट म्हणून रोबटरे बेनिग्नीचा ‘लाइफ इज ब्युटिफूल’ दाखविण्यात आला होता. तो पाहून बाहेर येताच आमच्या एक मान्यवर इंग्रजी पत्रकार मैत्रिणीने आपली तीव्र नापसंती या शब्दांत व्यक्त केली होती. त्या महायुद्धात होरपळलेल्या युरोपियनांनी जे भोगलं होतं, ते आम्ही अनेक चित्रपटांतून पाहिलं होतं. ते पाहून पार हादरून गेलो होतो. ७0 वर्षे झाली त्या काळ्याकुट्ट भूतकाळाला; परंतु आजही चित्रपटातून तो दिसतो आहे. याच वास्तवाकडे थोड्या वेगळ्या नजरेने पाहावंसं वाटलं, अगदी त्याच्या गमत्या स्वभावानुसार पाहावंसं वाटलं तर बिघडलं कुठे? रोबटरे बेनिग्नीने तेच केलं आणि ते करताना ते भीषण वास्तव नजरेआडही केलं नाही. परवा बुसान महोत्सवात अमीन डोरा या लॅबननच्या दिग्दर्शकाचा ‘घाडी’ हा चित्रपट पाहताना आमची ती मैत्रीण आणि ही सारी चर्चा आठवली. दिग्दर्शक म्हणून अमीनचा हा पहिला चित्रपट! आमच्या त्या मैत्रिणीने जर तो पाहिला असता तर पुन्हा तेच म्हणाली असती.. ‘‘मतिमंद मुलांच्या आयुष्यावर कुणी कसं बरं असा चित्रपट काढू शकतो?’’
अशी दुर्दैवी मुलं जन्माला येतात तेव्हा त्यांच्या आई-वडिलांना काय परिस्थितीतून जावं लागतं, याची कल्पनादेखील करणं शक्य नाही. अशा मुलांना स्पेशल मुलं असं म्हटलं जातं. त्यांच्या आई-वडिलांची, इतर कुटुंबीयांची अवस्थादेखील मग स्पेशलच होऊन जाते. हा प्रश्न एका समजदारीने हाताळला जातो आहे; परंतु म्हणून त्यातलं गांभीर्य कमी होत नाही.
चित्रपटातल्या या मुलाचं नाव घाडी आहे. तो तिसर्‍या मजल्यावरच्या खिडकीत बसून वेळीअवेळी ओरडतो. किंचाळतो. खरं तर तो बोलतो आहे. परंतु इतरांसाठी ते ओरडणं, किंचाळणंच आहे. त्यामुळे त्याने कावलेली वस्तीतली माणसं घाडीला मतिमंद मुलांच्या बोर्डिंगमध्ये पाठवा, असा त्याच्या आई-वडिलांकडे तगादा लावतात. आई-वडील घाडीचं सारं काही नीट करीत असतात. त्यांनी ते वास्तव मनापासून स्वीकारलंय. घाडीच्या दोन बहिणी आहेत. त्या जुळ्या आहेत. त्यांनाही आपला हा भाऊ आवडतो. तिघांचं गोष्टी सांगणं, खेळणं असं छान चाललेलं आहे. घाडीच्या वडिलांचाही आपल्या तीनही मुलांवर खूप जीव आहे. तात्पर्य काय, तर ते कुटुंब मजेत आहे. अगदी नॉर्मल आयुष्य जगतं आहे. परंतु वस्ती त्यांचा हा निवांतपणा टिकू देत नाही. घाडीचा काही तरी ताबडतोब बंदोबस्त करा, अशी त्यांची कायमची आणि आग्रही मागणी आहे. घाडीला नजरेआड करायला ते कुटुंब तयार नाही.
अशातच पोरांना गोष्ट सांगता सांगता घाडीच्या वडिलांकडून देवदूताचा उल्लेख येतो. त्यांचं गोष्ट सांगणं तिथल्या तिथे थांबतं. त्यांच्या डोक्यात एक कल्पना चमकून जाते आणि चित्रपटाची गोष्ट एक वेगळं वळण घेते. घाडी हा सामान्य मुलगा नसून तो देवदूत आहे असं पसरवून दिलं जातं.. आणि पाहता पाहता सगळं दृश्यच बदलून जातं. घाडीच्या उच्चाटनासाठी आग्रही झालेली वस्तीतली माणसे मग या देवदूताच्या भजनी लागतात. त्यातली बहुतेक जण काही ना काही गैर गोष्टी करीत असतात. आता ते सुधारतात. परंतु एक दिवस हे देवदूत प्रकरणाचं बिंग फुटतंच. वस्ती घाडीच्या घरात घुसते. घाडीचे वडील खालमानेने आपला अपराध मान्य करतात. परंतु आता वस्तीला खर्‍या अर्थाने शहाणपण आलेलं असतं. शेवटी सगळं कसं छान छान होतं वगैरे वगैरे.
आमच्या त्या मैत्रिणीसारखे लोक यावर म्हणतील की, समाज एकीकडे मतिमंद मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चाललाय आणि इथे देवत्वाचा वापर करून उलटा प्रवास केला आहे. ‘रॅशनल थिंकिंग इज नॉट एव्हरीबडीज कप ऑफ टी’ हे सूत्र अमान्य कसं करता येईल. समाजातला बराच मोठा वर्ग देवाला घाबरतो, याची देव न मानणार्‍यांनी हवी तेवढी चेष्टा करावी; परंतु वास्तव जिथल्या तिथेच राहतं. अमीन डोरानं त्याचाच वापर करून घेत आपली गोष्ट सांगितली आहे. त्याहीपेक्षा मतिमंद म्हणजे अँबनॉर्मल, असं म्हणताना जे दिसायला नॉर्मल आहेत; परंतु अंतर्बाह्य अँबनॉर्मल आहेत त्यांचं काय? ‘घाडी’ तिथेच लक्ष वेधण्याचा यशस्वी प्रयत्न करतो. तो पाहताना मला राज कपूर यांचा ‘जागते रहो’ही आठवला. एका निरागस माणसाला चोर ठरवून त्याच्या पाठलागावर असलेले चाळकरीच कसे चोर, दुवर्तनी असतात, असा त्याचा आशय होता. घाडी ज्या वस्तीत राहतो तिथे बरेचसे असेच दुर्वर्तनी आहेत. देवदूताची भीती वाटून एकेक सन्मार्गाला लागतात आणि घाडी देवदूत नाही हे उघड झाल्यावरदेखील सन्मार्ग टाकत नाहीत. वस्ती शहाणीसुरती होऊन जाते. घाडीविषयी तिला माया वाटू लागते.
या गोष्टीला आणखी दोन वेगळे कंगोरे आहेत. चित्रपट सुरू होतो तेव्हा घाडीचे वडील हे आठेक वर्षांचे शाळकरी मूल असतात. बावळट, गबाळा असं त्यांचं रूप असतं. कुणीही यावं आणि टपली मारून जावं असं ध्यान. त्याचा एक वर्गमित्र त्याचं जवळपास रॅगिंगच करत असतो. असा हा बिच्चारा पोरगा केवळ त्याच्याविषयी सहानुभूती असलेल्या वर्गमैत्रिणीमुळेच कसाबसा तरून जातो. मोठा होऊन तिच्याशीच लग्न करतो. त्या डांबरट पोरालाही हीच पोरगी आवडत असते; पण ती त्याला दाद देत नाही. चित्रपट सुरू झाल्यानंतर आपल्या वयाच्या आठव्या वर्षापासूनच्या घडामोडी सांगत घाडीचा जन्म होऊन तो आठ वर्षांचा होईपर्यंतचा काळ घाडीचा बाबा आपल्या आत्मकथनाद्वारा चित्रपटाच्या अवघ्या २0 मिनिटांत उभा करतो. ‘एवढी मोठी कादंबरी तीन तासांत कशी सांगायची’ किंवा ‘एखाद्या ऐतिहासिक महापुरुषाचं चरित्र एवढय़ा कमी वेळात कसं मांडायचं’ अशा तक्रारी करणार्‍यांनी हा ‘घाडी’ आणि त्यातली ही २0 मिनिटं अवश्य पाहावीत. कुठल्याही पटकथेत व्यक्तिरेखा कशा कथन-नॅरेटिव्ह-पुढे नेतात त्याचाही हा चित्रपट उत्कृष्ट वस्तुपाठ म्हणता येईल.
वरवर पाहणारा प्रेक्षक अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा चित्रपट म्हणून या चित्रपटाची सहज वासलात लाऊ शकेल. परंतु, ज्या पद्धतीने समाजातील अंधश्रद्धेचा दिग्दर्शकाने वापर केलाय तो थोरच म्हणावा लागेल. सिनेमाच काय कुठलीही कलाकृती किंवा जगातली कुठलीही गोष्ट अशी वरवर, एकारलेपणाने पाहिली तर त्याचा गाभा कळणारच नाही. नॉर्मल कोण आणि अँबनॉर्मल कोण, हाच या चित्रपटाचा गाभा आहे. दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच चित्रपटात अमीन डोरा एका प्रगल्भतेनं आपला कथाशय, त्यातल्या अंत:प्रवाहासह हाताळतो.
आणखी एक महत्त्वाचा आणि अर्थातच इतका लक्षणीय चित्रपट मी बुसानमध्ये पाहिला, तो म्हणजे.. ‘द फेस ऑफ द अँश’. शाख्वान इद्रिस याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आणि पुन्हा इथे ‘घाडी’सारखाच अनुभव! पहिला असून पहिला वाटत नाही अशी माध्यमाची आणि विषय हाताळणीची समज! शिवाय पहिल्याच चित्रपटात ब्लॅक ह्युमर हा जॉनर लीलया हाताळण्याचं कौतुकास्पद कसब, कौशल्य!
याला इराक-इराण युद्धाची पार्श्‍वभूमी आहे. चित्रपट इराकची निर्मिती आहे. इराकच्या उत्तरेकडील एका कुर्दिश गावातला अब्दुल रेहमान आपल्या पुतण्याच्या लग्नाच्या तयारीला लागलाय. पुतण्या युद्धभूमीवर आहे. इकडे त्याच्या लग्नाची लगबग जोरात चाललेली असताना एक दिवस मिलिटरीची लोकं त्याचा मृतदेहच घेऊन गावात येतात. कॉफिन अब्दुल रेहमानच्या हाती देतात, सही घेतात आणि निघून जातात. आता बिचार्‍या काकाला पुतण्याच्या अंत्यविधीची तयारी करणं क्रमप्राप्त ठरतं. या दरम्यान त्याच्या अशा लक्षात येतं, की पुतण्याची सुंताच झालेली नाही. त्याशिवाय दफनच करता येणार नाही.. आणि मग त्यासाठी सुंताचा विधी करणार्‍या वृद्धाचा शोध, त्याने उपस्थित केलेल्या शंका, त्यातून निर्माण झालेले अनेक प्रश्न, हा पुतण्याच आहे की अन्य कुणी अशीच मुळातून उपटलेली शंका, म्हणून मग तो मृतदेह पुन्हा मिलिटरीला नेऊन देण्यासाठी केलेले अक्षरश: नाना प्रकारचे अकल्पनीय उपद्व्याप, नोकरशाहीचा कोरडेपणा, लाचखोरी अशा असंख्य वळणावरून ही गोष्ट आणि दफनाविना पुतण्याचा देह फिरत राहतो आणि आपली हसता हसता पुरेवाट होते. आता पुन्हा आमच्या या मैत्रिणीसारखं कुणीतरी इराक-इराण युद्धाच्या भीषण वास्तवाचं प्रकरण पुढे करीत ‘असं कसं खिदळू शकता’ असा जाब विचारू शकेल. वरवर हे सारं हसण्यासारखं असलं तरी आतून या चित्रपटाला जे वास्तव दाखवायचं आहे ते तो दाखवतोच आहे. इतकंच नाही, तर युद्धखोरीत गुंतलेल्यांना त्यातल्या निर्थकतेचं भान देण्याचाही तो यशस्वीपणे प्रयत्न करतो. मात्र, यासाठी तो नेहमीची वास्तववादी शैली न वापरता ब्लॅक ह्युमरचा वापर करतो आहे. दिग्दर्शक किंवा एका नेमक्या नजरेने पाहणारा प्रेक्षक युद्धजन्य वास्तव कदापि हसण्यावारी नेत नाही. त्याचं गांभीर्य अजिबात सुटत नाही.
‘द फेस ऑफ अँश’ पाहताना ‘अ डेथ ऑफ अ ब्युरोकट्र’ या फार पूर्वी पाहिलेल्या क्यूबन तसेच आपल्या गिरीश कासारवल्लीच्या ‘तबरने कथे’ या कन्नड चित्रपटाची आवर्जून आठवण झाली. ब्लॅक ह्यूमर या तिघांनीही एका प्रगल्भपणे आणि अतिशय सहजगत्या वापरला आहे आणि म्हणूनच हे तीनही चित्रपट संस्मरणीय झालेत. एक गोष्ट मात्र ध्यानी नक्कीच घेतली पाहिजे, की केवळ वरवर जे दिसतं ते न पाहता अशा कलाकृती सर्वांगाने पाहिल्या पाहिजेत. 
(लेखक भारतीय व जागतिक चित्रपटांचे व्यासंगी अभ्यासक, दिग्दर्शक व परीक्षक आहेत.) 

 

Web Title: Need a different look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.