इंधनाचे वेगळे पर्याय शोधायला हवेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 07:00 AM2018-09-30T07:00:12+5:302018-09-30T07:00:12+5:30
शासनाने जट्रोफा पिकाला उत्तेजन देण्यासाठी आणि इंधन अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शेतक-यानाही त्यामुळे एक वेगळा पर्याय उपलब्ध होईल.
- व्ही. पी. जोशी, कोल्हापूर
लोकमतच्या ‘मंथन’ पुरवणीत अलीकडे काही उत्कृष्ट लेख वाचनात आले. त्यातून बरीच माहिती मिळाली आणि योग्यायोग्यतेचं भानही आलं. जट्रोफा पिकाची लागवड सर्वप्रथम नाशिक जिल्ह्यात झाली आणि तेही विनायक पाटील यांच्यासारख्या माजी मंत्र्यांकडून! त्यांच्याच प्रयत्नांमुळे जट्रोफा सातासमुद्रापार गेला, त्यावर वेगवेगळे प्रयोग झाले. जट्रोफाच्या तेलावर त्यावेळी वाहनं चालवण्याचाही प्रयोग झाला. आणि आता पुन्हा जट्रोफाच्या इंधनावर विमान चालवण्यात आलं. जट्रोफातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म तर त्यामुळे कळलेच, पण जट्रोफा पीक सध्या शेतक-यासाठी किफायतशीर नाही, हेही त्यांनी अतिशय मुद्देसुदपणे आणि प्रामाणिकपणे मांडले. अन्यथा जट्रोफाचे इतके फायदे आहेत, हे कळल्यावर शेतक-यानी या पिकाच्या लागवडीसाठी धाव घेतली असती. मात्र विनायक पाटील यांनी सावधानतेचा सल्ला दिल्यामुळे शेतकरी वेळीच सावध झाले. परंतु शासनाने या पिकाला उत्तेजन देण्यासाठी आणि इंधन अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत. शेतक-यानाही त्यामुळे एक वेगळा पर्याय उपलब्ध होईल.
केरळमध्ये नुकत्याच आलेल्या पुरावरून तिथे जी आपत्ती ओढवली आणि तिथल्या लोकांचा नेमका प्रश्न काय आहे, त्यांना कशाची गरज आहे, याचं नेमकं आणि अचूक वर्णन योगेश गायकवाड यांनी केलं. निसर्गाची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला की निसर्गही योग्यवेळी आपला प्रताप दाखवतो. माणसाला विकास आवश्यक आहे, हे निसंशय खरं; पण त्यासाठी आपण निसर्गाला शत्रूच समजायला पाहिजे असं नाही, याचा योग्य तो धडा आपण केरळच्या घटनेवरून घेतला पाहिजे.
शाळकरी मुलांना दुधाच्या भुकटीऐवजी दूध दिले पाहिजे, याबाबत हेरंब कुलकर्णी यांचा लेख अभ्यासपूर्ण होता. दुधाचा प्रश्न नेमका काय आहे, दुधाचा योग्य वापर केला तर मुलांचे पोषण होईलच; पण शेतक-याचे जीवनमान उंचावण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो, हे त्यांचे निरीक्षण अचूक आहे. मात्र शाळकरी मुलांकडे लक्ष देताना गर्भवती मातांचीही काळजी घेतली पाहिजे. दूध उपयुक्त आहे हे खरं, पण त्यात क जीवनसत्त्व, लोहतत्त्व नसते. कणीस, मका, ऊस. हे पदार्थही पाचवीच्या पुढच्या विद्यार्थ्यांना देता आले तर पाहायला हवे. गाजर, केळी, टमाटे हे पदार्थ तुलनेनं स्वस्त, पौष्टिक, अधिक उत्पादन देणारे आहेत, मुलं आणि गर्भवती माता यांच्यासाठी काही वेगळे पर्याय वापरता आले तर सकस अन्नाचा प्रश्न सुटू शकेल.