मरणासन्न अजगराला नवजीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 06:34 PM2018-10-13T18:34:56+5:302018-10-14T09:10:00+5:30
निसर्गाच्या कुशीत : साधारणत: सहा महिन्यांच्या कालावधीत त्याने हे पहिले भक्ष्य खाल्ले होते. आमच्या प्रयत्नांना आलेले हे मोठे यश होते. त्यानंतर आम्ही पुन्हा दोन कोंबड्या टाकल्या. त्याने त्या रात्रीतूनच फस्त करून टाकल्या. तब्बल आठ महिन्यांच्या उपचारांनंतर मूळठिकाणी जंगलात त्याला सोडून दिले. निसर्गाचे लेकरू निसर्गाकडे सोपविले.
- सिद्धार्थ सोनवणे
उसाच्या शेतात दोन दिवसांपासून एक भलामोठा अजगर एकाच जागेवर वेटोळे घालून बसलेला आहे. तो जिवंत आहे की मेला, हेही सांगता येत नाही, असा फोन वडगाव (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथील शेतकरी विशाल शेळके यांनी केला. तातडीने मी आणि सहकारी मित्र अमोल ढाकणे शेताकडे निघालो. शेतात जाण्यापूर्वी वडगावातून एका युवकाला सोबत घेतले. कधी नव्हे एवढा मोठा अजगर पाहण्यासाठी अख्खा शिवार जमला होता.
गर्दीतून वाट काढत मी उसाच्या सरीत असलेला अजगर पकडला. तो कुठलीच हालचाल करीत नव्हता. फक्त जिवंत असल्याचे जाणवत होते. तो अजगर उपस्थितांना दाखवला आणि त्याच्याविषयी असलेली भीती, गैरसमज दूर केले. अजगर माणसाला खात नाही तर शेतातील पिकांची, अन्नधान्याची नासाडी करणाऱ्या उंदीर, घुशी, ससे, रानडुकरे, हरिण यांना खाते. त्यामुळे आफ्रिकेतील शेतकरी शेतात अजगर पाळतात. अजगर चावला तरी माणूस मरत नाही. तो बिनविषारी असतो. हे सारे सांगितल्यानंतर जमलेल्या लोकांचा निरोप घेऊन ते अजगर विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सर्पराज्ञी’त उपचारासाठी दाखल केले.
अजगर खूपच घाण झाला होता. त्याचा उग्र वास येत होता. त्याला गोचिडेही खूपच झाली होती. त्याला आंघोळ घातली. पावडर लावून एक-एक करीत त्याच्या अंगावरील सर्व गोचिडे हातांनी काढून टाकली. त्यानंतर शिरूर कासार येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय चौरे व डॉ. नीलेश सानप यांना ‘सर्पराज्ञी’त बोलावून घेतले. पहिले काही दिवस दोन-तीन दिवसाला डॉक्टर येत आणि त्याची तपासणी करून इंजेक्शन देत. नंतर दर पंधरा दिवसाला. त्यानंतर दर महिन्याला ही तपासणी सुरू होती. सृष्टी दररोज सकाळी उठल्यावर कोवळ्या उन्हात सोडून त्याच्या अंगाची मालिश करीत असे.
दिवसामागून दिवस जात होते. दीड महिना झाला तरी अजगराच्या प्रकृतीत कसलीच सुधारणा दिसून येत नव्हती. एकेदिवशी सृष्टी त्याची मालिश करीत असताना अजगर स्वत:ची मान उचलत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यादिवशी डॉक्टर आले आणि त्याला पुन्हा एकदा इंजेक्शन दिले. त्या दिवसापासून सृष्टी मालिश केल्यानंतर त्यास मोठ्या पाणवठ्यात पोहण्यासाठी सोडायची. तोही पाण्यात हळूहळू शरीराची हालचाल करू लागला. चार महिन्यांनंतर अजगर चांगलीच हालचाल करू लागला आणि ‘सर्पराज्ञी’त आल्यानंतरची पहिली कात त्याने टाकली. त्यानंतर आम्ही त्याच्या पिंजऱ्यात खायला दोन कोंबड्या टाकल्या. १०-१२ दिवसांनंतर त्याने त्यातली एक कोंबडी मारून टाकली. दुसरी कोंबडी एक महिन्यानंतर खाऊन टाकली.
साधारणत: सहा महिन्यांच्या कालावधीत त्याने हे पहिले भक्ष्य खाल्ले होते. आमच्या प्रयत्नांना आलेले हे मोठे यश होते. त्यानंतर आम्ही पुन्हा दोन कोंबड्या टाकल्या. त्याने त्या रात्रीतूनच फस्त करून टाकल्या. तो आता चांगल्या प्रकारे खात-पीत होता. पूर्णपणे बरा झाला होता. त्यामुळे त्याला निसर्गात सोडून देण्यासाठी विभागीय वन अधिकारी अमोल सातपुते यांना सोबत घेऊन त्यांच्या हस्ते अजगरास तब्बल आठ महिन्यांच्या उपचारांनंतर त्याच्या मूळठिकाणी जाऊन सोडून दिले. निसर्गाचे लेकरू निसर्गाकडे सोपविले.
(संचालक, ‘सर्पराज्ञी’ वन्यजीव पुनर्वसन केंद्र, तागडगाव, जि. बीड)