नवं प्रॉडक्ट!
By admin | Published: September 30, 2016 06:14 PM2016-09-30T18:14:12+5:302016-09-30T18:32:09+5:30
सुश्मिता सेनने आंतरराष्ट्रीय सौदर्यस्पर्धा जिंकली आणि अनेक न्यूनगंडात्मक भावना भारतीयांच्या मनामध्ये वाढू लागल्या.
- सचिन कुंडलकर
सुश्मिता सेनने आंतरराष्ट्रीय
सौदर्यस्पर्धा जिंकली आणि
अनेक न्यूनगंडात्मक भावना
भारतीयांच्या मनामध्ये वाढू लागल्या.
आपण चांगले दिसत नाही,
आपले शरीर सुंदर नाही,
आपल्याला टक्कल आहे,
आपले दात पुढे आहेत,
आपण गोरे नाही, उंच नाही,
स्त्रीने आणि पुरुषाने कसे दिसायचे,
कोणत्या मापात असायचे याचे
सक्त मापदंड शहरी नागरिकांमध्ये
वेगाने पसरू लागले.
समाजातला अबोल निरागसपणा
वेगाने नष्ट होत गेला.
भीड, संकोच वाढीला लागला
आणि एक नवीनच भारतीय
तयार होत गेला..
टीव्हीवर पाहिलेल्या दोन प्रतिमा डोळ्यासमोरून जात नाहीत. प्रत्येक पिढीची टीव्हीवर पाहिलेल्या आणि न विसरता येणाऱ्या क्षणांची आठवण असते. माझ्यासाठी हे दोन प्रसंग आहेत. सुश्मिता सेनने मिस युनिव्हर्स स्पर्धा जिंकल्याचा क्षण आणि
न्यू यॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरचे दोन्ही टॉवर्स कोसळतानाचा क्षण. टीव्हीवर मी हजारो लाखो प्रतिमा जवळजवळ रोज पाहत आलो असेन. पण या दोन क्षणांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यावर जे अप्रत्यक्षपणे दूरगामी परिणाम केले त्यामुळे बहुधा हे क्षण मला विसरता आले नसावेत. एक क्षण विजयाचा आणि अभिमानाचा आणि दुसरा दहशत आणि मती गुंगवून टाकणाऱ्या जागतिक राजकारणाचा.
सुश्मिता सेन आणि पाठोपाठ मिस वर्ल्ड बनलेल्या ऐश्वर्या रायचा सगळ्या देशाला खूप अभिमान वाटला होता. त्या क्षणापासून ते आज टीव्हीवर शाहरुख खान आणि जॉन अब्राहम पुरुषांनी गोरे बनण्याच्या क्रीमची जाहिरात करीत आहेत, या दोन गोष्टींच्या मधील वीस- बावीस वर्षांत भारतीय माणसाने स्वप्रतिमेचा फार मोठा असा प्रवास केला आहे.
आपापल्या घरांमधील जुने फोटोंचे अल्बम काढून पुन्हा शांतपणे कधी पाहत बसला आहात का? कशी होती ती माणसे? जास्त साधी होती. फोटोग्राफी ही अशी एक कला आहे जी भूतकाळाची कविता तयार करते. जुन्या फोटोमध्ये नुसती त्या प्रसंगाची आठवण नसते, तर माणसाच्या आयुष्याचे त्या काळचे डिझाइन त्या फोटोत गोठवून ठेवलेले असते. आपले चेहरे, आपले हसू, आपली उभे राहायची, बसायची पद्धत, आपले पेहराव, आपला आत्मविश्वास, आपली घरे, त्यात कुठे कुठे आपण स्वत:सुद्धा बसलेलो असू. साध्या परवडेल अशा कपड्यात. कुणी दिसण्याची फारशी तमा न बाळगता प्रेमाने एकत्र आले आहेत. सर्व भावंडांना एकसारखे कपडे शिवले आहेत. बायका बाहेर पडण्यासाठी, फोटोसाठी किती सोपेपणाने तयार होत असत. त्या-त्या गावच्या किंवा शहराच्या बाजारात सर्वोत्तम जे मिळेल आणि परवडेल ते घालून. आपण आणि सिनेमातले नट यात फरक असतो ही जाणीव होती आपल्या सगळ्यांना त्या काळामध्ये.
जुने फोटो पाहताना मला लक्षात येते की ज्याच्या हातात कॅमेरा असे त्याच्या हातात फार मोठी सत्ता आहे ही नकळत भावना समोरच्या लोकांच्या चेहऱ्यावर येई. माणसाच्या हसण्यामध्ये काळानुसार जो फरक पडत जातो त्याचा फार सुंदर अंदाज जुन्या फोटोंचे अल्बम पाहताना येतो. त्या काळच्या फोटोमधील हसूसुद्धा जास्त सोपे आणि निरागस होते. दात पुढे असलेली एखादी मावशी कधी ते लपवत नसे. तसेच मोकळेपणाने हसायची. फोटो काढायचा क्षण आला की माणसे श्वास रोखून पोट आत घेत नसत. माणसे जास्त शांत निवांत होती. दिसण्याची स्पर्धा आणि भीती समाजात कमी होती. माणसांना पाप-पुण्याची, नीती-अनीतीची, फसवले जाण्याची भीती असेल; पण मी कसा दिसतो आहे आणि मी असा दिसलो नाही तर लोक मला काय म्हणतील ही भीती घेऊन माणसे जगत नव्हती. हौस आणि भीती यात फरक असतो. माणसे साधी असली तरी त्यांना सौंदर्याची आवड आणि जाण होती. दिवाळी- दसऱ्याला, सणावाराला, लग्नाला माणसे तेजस्वी दिसत. कारण आतून काहीतरी फुलून आलेले असे. एक निरागसपणा होता. सणवार असतील तेव्हाचे मोजके आणि त्याच वेळी मिळणारे दिखाव्याचे क्षण असत. त्यामुळे त्यांना किंमत होती.
सुश्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांना जिंकवून भारतीय समाजाचा निरागसपणा खूप नकळतपणे काढून घेतला गेला.
उत्तरेला दिल्लीसारखी दिखाऊ वृत्तीची सत्ताधारी श्रीमंत शहरे सोडता संपूर्ण भारत देश आपापल्या स्थानिक दृष्टीने स्वत:ला नटवत असे. त्यामुळे पोशाखांची जास्त विविधता होती. लोकांना भारतीय पेहरावाची लाज वाटत नसे. अगदी तरुणांनासुद्धा नाही. जुन्या फोटोमध्ये कुटुंबाच्या खास प्रसंगी किती विविधतेने नटलेली माणसे दिसतात. मला आठवते त्याप्रमाणे माणसे भारतातील इतर प्रांतामधील पोशाख सणावारांना हौशीने घालायची. कितीतरी मध्यमवर्गीय मराठी कुटुंबामध्ये पुरुष पठाणी पोशाख शिवायचे, मुली गुजराती पद्धतीचे घागरे घालायच्या, गंमत म्हणून बंगाली पद्धतीच्या साड्या नेसायच्या. दर उन्हाळ्याच्या सुटीत आमच्या आजूबाजूची अनेक कुटुंबे काश्मीरला जाऊन येत आणि तिथल्या स्थानिक पोशाखात स्वत:चे फोटो काढून आणत. बहुतांशी घरात आता ते फोटो लाजून लपवून ठेवलेले असतील.
माझा एक काका होता, ज्याला फोटो काढायची खूप आवड होती. काही दिवसांनी अचानक तो कॅमेरा घेऊन आमच्याकडे येत असे. माझा धाकटा भाऊ आमच्या घरात सगळ्यात गोरा गुबगुबीत आहे. काकाला त्याचे फोटो काढायचे असत. त्याला तयार करून त्याचे फोटो काढणे सुरू झाले की मी खूप हिरमुसला होऊन घरामध्ये बसून राहत असे. असे किती तरी वेळा घडल्याचे मला आठवते. आपण चांगले दिसत नाही ही जाणीव मला घरातल्या काकाच्या फोटोच्या अनेक प्रसंगांनी करून दिली. आमच्याकडे तीन चार तरी फोटो असे आहेत ज्यात मी कंटाळून रडतो आहे, कारण माझ्या भावाचे फोटो काढून संपल्यावर मग माझा एक फोटो काढायला काकाने मला बोलावले आहे. उगाच माझी समजूत घालायला.
आपण चांगले दिसत नाही, आपले हसू इतरांपेक्षा बरे नाही, आपले शरीर सुंदर नाही, आपल्याला टक्कल आहे, आपले दात पुढे आहेत, आपण गोरे नाही, आपण उंच नाही, आपण सडपातळ नाही अशा अनेक न्यूनगंडात्मक भावना भारतीयांच्या मनामध्ये वाढू लागल्या जेव्हा सुश्मिता सेनने आंतरराष्ट्रीय सौदर्यस्पर्धा जिंकली. स्त्रीने आणि पुरुषाने कसे दिसायचे, कोणत्या मापात असायचे याचे सक्त मापदंड शहरी नागरिकांमध्ये वेगाने पसरू लागले. दिसण्यावर अतिरिक्त पैसे खर्च करायची सवय भारतीय मध्यमवर्गाला लागली. गावोगावी प्रचंड वेगाने जीम उघडल्या, ब्यूटिपार्लर उघडली. शिवून घेण्याच्या कपड्यांची संस्कृती संपत गेली, आणि दुकानात ज्या अमेरिकन किंवा युरोपियन मापाचे छोटे कपडे मिळतात त्या कपड्यात बसण्याची सक्ती सामान्य माणसावर येऊन पडली. सर्व समाजामध्ये असणारा एक अबोल निरागसपणा होता तो वेगाने नष्ट होत गेला. भीड आणि संकोच वाढीला लागला. भारतीय शरीराची एक निसर्गदत्त ठेवण आहे. तिला संपवून टाकायला सुरुवात झाली. छाती, कंबर याची मापे आंतरराष्ट्रीय फॅशन कॅटलॉगनुसार ठरू लागली.
आजच्या लग्नसमारंभात घरातले लोक ज्या पद्धतीने नटतात ते पाहिले की मला त्यांची दया येते. पंजाबी आणि गरीब अमेरिकन धेडगुजरी पद्धतीने घातलेले कपडे, बायकांच्या चेहऱ्यावर थापलेला मेकअप, जे घालून पायाला फोड येतील असे बूट. आपल्या सर्व मराठी सणसमारंभात माणसे फार भयंकर आणि कुरूप दिसतात. आपले जुने फोटो काढून पाहावेसे वाटत नाहीत याचे कारण आपल्या समाजामधील आत्मविश्वास आणि निरागसपणा या परस्परपूरक पण विरोधी भावना अगदी रसातळाला जाऊन पोचल्या आहेत आणि आपण टीव्ही आणि भडक चित्रपटाचे गुलाम होऊन बसलो आहोत.
मी १९९४ साली बारावीत होतो. फार वेगाने पुढच्या दोन तीन वर्षात दिसण्याच्या पद्धतीत तरुण मुलांनी बदल सुरू केले. आमच्या शहराचा कपड्याचा आणि फॅशनचा सेन्स हा मुंबईहून येत असे कारण आमच्याकडे पुरेशी दुकाने नव्हती.
मी जाड दिसतो आणि तसे दिसणे चांगले नाही याची जाणीव मला या काळात नकळत करून दिली गेली. माझ्यातला न्यूनगंड या काळात प्रचंड वाढीला लागला. आपण जाड आहोत म्हणून एकटे पडतो आणि आपण एकटे पडतो म्हणून अजून अजून जाड होत जातो या दुष्टचक्रात माझा नकळत प्रवेश होऊ लागला. मला बाजारात तयार कपडे मिळेनासे झाले. मी त्या काळात अघोरी उपासमार आणि चुकीचे व्यायाम केले. माझे चुकत असूनही ते का आणि कसे चुकते आहे हे सांगायला माझ्या आजूबाजूला कुणीही नव्हते. त्या काळात ‘डीओडरण्ट मारून मुली पटवता येतात’ अशा पद्धतीच्या जाहिराती टीव्हीवर सुरू झाल्या. सगळेच्या सगळे लोक गल्लीबोळात उघडलेल्या जीममध्ये जाऊन चुकीचे आणि घातक असे बॉडीबिल्डिंगचे व्यायाम करू लागले. प्रेम आणि सेक्सया दोन्ही गोष्टींमध्ये असणारा फरक कॉलेजच्या मुलामुलींना कळेनासा झाला. मी त्या काळाचे प्रॉडक्ट आहे.
(क्रमश:)