पुस्तकांतून येत आहेत राेज नवे विषय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 10:28 IST2025-03-30T10:28:35+5:302025-03-30T10:28:50+5:30

Marathi Sahitya News: एकूणच तो काळ गाजवला तो या विविध वाङ्मयप्रकारांनी. मग आज नेमकं काय बदललं आहे? कादंबरीचा फॉर्म हाताळणारे किंवा चांगली कसदार कथा लिहिणारे लोक कमी होत गेले की हे सारं वाचणाऱ्या वाचकांची संख्या रोडावत गेली? 

New topics are coming out of books every day. | पुस्तकांतून येत आहेत राेज नवे विषय

पुस्तकांतून येत आहेत राेज नवे विषय

- नीरजा  
(लेखिका - कवयित्री)
ज्या काळात आमची पिढी मराठी साहित्याकडे वळली तो काळ होता ललित साहित्याच्या बहराचा. त्या काळात कादंबरी, कथा, कविता, ललित लेखन, वैचारिक लेखन, चरित्रात्मक लेखन आणि नाटक अशा काही रुपबंधातील पुस्तकं आमच्या हातात पडत होती. ललित लेखनातून उभं राहाणारं वास्तव तपासतानाच, त्यातून  झिरपणाऱ्या जादूई वास्तवातही माणसं रमत होती. लेखकानं उभ्या केलेल्या फँटसीत रमतानाचा स्वतःचा आणि जगण्याचा शोध घेत राहाणारी आमची पिढी या फॉर्मच्या प्रेमात होती. कथा, कादंबरी, नाटकं तर त्या काळातलं मन रमवण्याचं आणि विचार करायाला लावण्याचं साधन होतं. ह. ना. आपटे, अण्णाभाऊ साठे , दिवाकर कृष्ण, बाबूराव बागूल यांच्यापासून सुरु झालेला आमच्या पिढीचा प्रवास अरूण साधू, भालचंद्र नेमाडेंपर्यंत पोचला. कथेच्या क्षेत्रात जी.ए. कुलकर्णी यांनी गारूडच केलं होतं सर्वांवर. प्रभाकर पेंढारकरांचं रारंगढांग न वाचलेला आमच्या पिढीतला एकही तरुण सापडला नसता. किरण नगरकर तर  नव्या पिढीचे नायकच झाले होते त्याकाळात. भाऊ पाध्ये, कमल देसाई, गौरी देशपांडे, श्याम मनोहर, रंगनाथ पठारे  यांच्यासारखे लेखक-लेखिका असोत की मर्ढेकर, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ, अरूण कोलटकर, ग्रेस, महानोर यांच्यासारखे कवी असोत एकूणच तो काळ गाजवला तो या विविध वाङ्मयप्रकारांनी. मग आज नेमकं काय बदललं आहे? कादंबरीचा फॉर्म हाताळणारे किंवा चांगली कसदार कथा लिहिणारे लोक कमी होत गेले की हे सारं वाचणाऱ्या वाचकांची संख्या रोडावत गेली? 

गेली दोन वर्षं लोकमत साहित्य पुरस्कारांची निवड करताना असा अनुभव आला की प्रत्येक विभागातील एका पुरस्कारासाठी निवड समितीला पुस्तक निवड करण्यासाठी विशेष संघर्ष करावा लागला नाही. पुरस्कारासाठी आलेल्या पुस्तकांत  कादंबरी, कथा, कविता या विभागात या काळाची, तसेच रुपबंधाच्या बाबतीत काही प्रयोग करणारी  अशी फारशी पुस्तकंच नव्हती की ज्यावर समितीची प्रदीर्घ चर्चा होईल. अनुवादित पुस्तकांतही कथा, कादंबऱ्या आणि चांगले कवितासंग्रह क्वचितच हाती लागले. एक काळ असा होता की मामा वरेरकरांनी अनुवादित केलेल्या शरद्चंद्र चटर्जींच्या कादंबऱ्यांनी वेड लावलं होतं वाचकांना. गेल्या वीसपंचवीस वर्षांत तर गजानन मुक्तीबोधांपासून ते उदय प्रकाश, मंगलेश डबराल, विनोदकुमार शुक्ल यांच्यासारख्या हिंदीतल्या लेखकांच्या  पुस्तकांचे अनुवाद मराठीत येत होते. पण आज परिस्थिती बदलली आहे. अनुवादित पुस्तकंही  चरित्र, आत्मचरित्र, आणि ऐतिहासिक-वैचारिक दस्तावेज या प्रकारातलीच जास्त दिसली.

गेल्या काही वर्षांत समोर जी पुस्तकं  येताहेत त्यावर नजर टाकली तर लक्षात येतं, की पूर्वी ज्याला संकीर्ण असं नाव असायचं त्या वाङ्मयप्रकारातील जास्तीत जास्त पुस्तकं बाजारात येत आहेत. पर्यावरण, आरोग्य, प्रवास, खाद्यसंस्कृती, शेती, पाणी, सामाजिक कार्य, एखाद्या प्रदेशाची ऐतिहासिक, भौगोलिक माहिती, संगीत, कला, चित्रकला विश्वातील माहिती इत्यादी माहितीवजा पुस्तकांची संख्या ललित वाङ्मयप्रकारांच्या तुलनेनं फारच वाढत चालली आहे.  एखाद्या चित्रकाराचं, संगीतकारचं, गायकाचं, कलाकाराचं, लेखकाचं, सामाजिक कार्यकर्त्याचं  आत्मचरित्र किंवा  चरित्र छापणं हे देखील या काळाचं वैशिष्ट्य आहे. एखादा विषय घेऊन म्हणजे कधी महाराष्ट्रातील लेणी असोत की वस्त्रपरंपरा असो, अतिशय सुंदर मांडणी करत या विषयांवर लिहिलं जातंय.

गुगलनं लोकांना माहिती मिळवण्याची  जी सवय लावली आहे त्या सवयीमुळे माहिती देणाऱ्या पुस्तकांकडे लोकांचा कल जास्त दिसतोय. विचार देणारी, वैचारिक मांडणी करणारी, जीवनाची आणि मानवी नातेसंबंधांची गुंतागुंत दाखवणारी, कथा-कादंबरी-नाटक यांसारखा नाट्यात्मक व सृजनात्मक अनुभव देणारी पुस्तकं मात्र फार कमी लिहिली जाताहेत हे गेल्या काही वर्षात प्रकाशित झालेल्या पुस्तकांची यादी  पाहिली तर लक्षात येतं.

माणसाच्या हातात आलेली विविध करमणूकीची साधनं आणि तंत्रज्ञानामुळे उपलब्ध झालेली माध्यम यामुळे उथळ, वरवरच्या जगात रमणाऱ्या माणसांना विचार करायला लावणारं काही नको आहे का? असा विचार मनात येतो. कदाचित आजच्या पिढीचे प्रश्न वेगळे असावेत. त्यांच्या जगण्यातच इतकी गुंतागुंत आहे की त्यांना कथा कादंबऱ्यातून येणारे सामाजिक, राजकीय, मानसिक गुंते यांत रमण्याची इच्छा उरली नसावी. रोजचंच आय़ुष्य इतकं कठिण झालं आहे की आता ताण वाढवणारं काही वाचण्याची त्यांना इच्छाच उरली नसावी. सहज सोपं हाती मिळालं तर वाचावं आणि नाहीतर सोडून द्यावं अशी वृत्ती बळावलेली दिसते. विविध सोशल माध्यमांवर ब्लॉग वाचण्याची आणि चटपटीत वाचण्याची सवय लागल्यानंही आता विचार करायला लावणारं काही नको आहे का? असाही प्रश्न पडतो. एकीकडे वाचकांची संख्या कमी होते आहे तर दुसरीकडे प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची संख्याही वाढते आहे. अनेकांच्या हाती पैसा आहे. स्वखर्चानं पुस्तकं काढणारेही खूप आहेत. आपण जे काही लिहिलं आहे ते पुस्तकरुपात यायलाच पाहिजे हे स्वप्न पाहणारे लोक स्वतःच स्वतःची पुस्तकं काढताहेत. आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन पुस्तकं  काढणारे प्रकाशकही वाढले आहेत. अशा काळात पुस्तकांच्या रूपबंधाबाबत जाण असणारे लेखक आणि त्याच्या दर्जाबाबत  खात्री देणारे प्रकाशक कमी होत गेले तर  पूर्वीसारखी साक्षेपी संपादकांच्या आणि प्रकाशकांच्या हाताखालून गेलेली आणि प्रकाशित केलेली दर्जेदार पुस्तकं कशी मिळणार हा प्रश्नच आहे.

Web Title: New topics are coming out of books every day.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marathiमराठी