जीवनाची नवी दृष्टी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 06:02 AM2020-08-09T06:02:00+5:302020-08-09T06:05:06+5:30
ज्या मदत आणि मार्गदर्शनाच्या आपण शोधात आहोत, नेमक्या त्याच दिशेनं नेताना आपल्याला आश्वासक वाट आणि दिशा दाखवणारं एक पुस्तक लेखिका मेघा दर्डा यांनी लिहिलं आहे. ‘क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भीतीवर मात कशी करायची हे त्यांनी अतिशय सोप्या, सहज शैलीत समजावून सांगितलं आहे.
एका अतिशय आव्हानात्मक अशा काळात आपण जगत आहोत. गतीमान जीवनशैली, शिक्षण आणि करिअरमधली जीवघेणी स्पर्धा, छोट्या शहरातून मोठय़ा शहरात होणारं स्थलांतर. अशा अनेक गोष्टींशी सामना करीत असताना, कोणीतरी आपल्याला मार्गदर्शन, मदत करावी असं सारखं आपल्याला वाटत असतं.
ज्या मदत आणि मार्गदर्शनाच्या आपण शोधात आहोत, नेमक्या त्याच दिशेनं नेताना आपल्याला आश्वासक वाट आणि दिशा दाखवणारं एक पुस्तक लेखिका मेघा दर्डा यांनी लिहिलं आहे. ‘क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड’ या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भीतीवर मात कशी करायची हे त्यांनी अतिशय सोप्या, सहज शैलीत समजावून सांगितलं आहे.
एका लहान गावातल्या मुलीचा चित्तवेधक प्रवास म्हणजे हे पुस्तक. ही मुलगी गावातून महानगरात जाते, तिथे गेल्यावर स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी मिळवण्यापासून ते आजपर्यंत अपरिचित असलेल्या जगात स्वत:ची ओळख निर्माण करण्यापर्यंत अनेक आव्हानांना तोंड देते.
कथानायिका अनुराधा भीतीवर मात करत आपले ध्येय कसे साध्य करते, बदल स्वीकारत, विश्वास व्यवस्था बदलत कशी पुढे जाते हा प्रवास लेखिका एका कथेच्या माध्यमातून आपल्यापुढे मांडते.
अनेकदा आपल्याला न आवडणार्या नोकरीमध्ये आपण चिटकून राहतो, नकोशा नातेसंबंधांत अडकून पडतो, याचं कारण पर्याय नसल्याची भीती! भयाचं हेच बंधन आपल्याला कैदेत अडकवून ठेवतं.
हीच भीती आपल्या आशेवर पाणी फेरते आपली स्वप्नं उद्ध्वस्त करते. मात्र भीतीवर मात करायची असेल, तर आपल्या विश्वास प्रणालीचा आपण पुनर्विचार केला पाहिजे, हे लेखिका प्रभावीपणे सांगते. त्यामुळे भीती हा एक अडथळा न राहता, स्व-जाणीव आणि नातेसंबंधांतील प्रगतीची ती पायवाट ठरते.
वर्तणूक चिकित्सक, मानसिक बदलांच्या अभ्यासक आणि मार्गदर्शक असलेल्या लेखिकेने अतिशय सुबक आणि प्रवाही भाषेत सांगितलेली ही कहाणी जणू वाचकांचीच कहाणी आहे. त्यामुळे वाचकाला बांधून ठेवतानाच जीवनाची नवी दृष्टी हे पुस्तक देते.
क्रॅकिंग द फिअर ऑफ कोड- मेघा दर्डा
प्रकाशक- पेनमॅन बुक्स डॉट कॉम
पाने- 122, किंमत- 499 रुपये