निदा

By admin | Published: February 13, 2016 05:47 PM2016-02-13T17:47:52+5:302016-02-13T17:47:52+5:30

निदांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये कायम एक एकाकीपण दिसलं. गर्दीत असूनही विचारात हरवलेलं. अफाट दु:ख त्यांनी पचवलं होतं.प्रत्येक गोष्टीची फार मोठी किंमतही त्यांनी चुकवली होती. फुटपाथवर आयुष्य काढण्यापासून ते प्रतिष्ठितांनीही सलाम करण्यार्पयतचा त्यांचा प्रवास विलक्षण होता. मानवतेशी त्यांची बांधिलकी होती. ही बांधिलकी त्यांनी अखेरपर्यंत जपली.

Nida | निदा

निदा

Next
>- आल्हाद काशीकर
 
निदा फाजली हा एक मोठा अध्याय आहे. वेगवेगळ्या क्षेत्रत असे अध्याय असतात. तो कालखंड त्या माणसांचा असतो. त्यांच्या अवतीभोवती घटना, माणसं, कथा फिरत असतात, बनत असतात. नुकताच शरद जोशी नावाचा एक अध्याय संपला. तसेच निदा होते. अतिशय निर्भय माणूस. कुठल्याही गोष्टीबद्दल मत व्यक्त करताना त्याचे काय बरेवाईट परिणाम होतील, याचा विचार निदा करीत नसत. अगदी स्वत:च्या खासगी जीवनाबद्दलसुद्धा जगाला सारं काही सांगण्याची हिंमत त्यांनी दाखवली.                                       
माझं त्यांच्याशी पहिल्यांदा बोलणं झालं त्यावेळी त्यांना मी त्यांचा पत्ता विचारला. ते म्हणाले, ‘मधुबन बार के सामने मेरा घर है वर्सोवा में.’ मी मनात म्हटलं, शायरचा हाच योग्य पत्ता असू शकतो! मी अनेकदा त्यांच्या घरी जायचो. साधारणत: संध्याकाळी. अनेक विषयांवर ते बोलत. 
निदा एक अंतर्दृष्टी होती. फार मोठी किंमत जीवनात चुकवलेला तो माणूस होता. आपल्या भूमिकेवर ते कायम ठाम राहत. त्याचमुळे फाळणीनंतर पाकिस्तानातही जाण्याचे  त्यांनी नाकारले.
पुढे त्यांच्या आईचे पाकिस्तानात निधन झाले. मात्र आईच्या आजारपणात व मृत्यूनंतरदेखील निदा व्हिसा न मिळाल्यामुळे पाकिस्तानात जाऊ शकले नाहीत. निदांचा एक दोहा या प्रसंगावरच आहे. 
मैं रोया परदेस में  भिगा माँ का प्यार,
दुख ने दुख से बात की  बिन चीठ्ठी बिन तार
निदांनी अशी बरीच दु:खं पचवली. मुंबईच्या फुटपाथवर आयुष्य काढण्यापासून ते अत्यंत प्रतिष्ठित व्यासपीठांवर आपले विचार व्यक्त करण्यार्पयतचा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. निदांचे चाहते जगभरात आहेत. अमेरिका, ब्रिटन, दुबई इत्यादि अनेक देशांमध्ये त्यांना मुशाय:यांसाठी बोलावले जायचे. भारतात अनेक मुशाय:यांमध्ये त्यांचा सहभाग होता. निदांना साहित्य अकादमीचा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता, पद्मश्री मिळाली होती. मला नेहमी वाटायचे की निदांना ज्ञानपीठ मिळायला हवे. मात्र दुर्दैवाने असे होऊ शकले नाही. कमालीच्या सोप्या भाषेत सगळं आकाश ते उलगडून दाखवित. 
त्यांचे एक पुस्तक आहे. ‘तमाशा मेरे आगे’. मराठीत मी त्याचे भाषांतर केले आहे. विविध व्यक्तिरेखांवर व आठवणींवर आधारित असे सुंदर लेख निदांनी लिहिले. विविध शायर, त्यांचे भावविश्व व त्या त्या वेळेचा कालखंड, संस्कृती, मानवी चेहरे, स्वभाव इत्यादि सगळं त्यांनी या लेखांमध्ये लिहिलं. मानवी स्वभावाविषयीची त्यांची जाण अफाट होती. ते माणसांना वाचू शकत होते पुस्तकांसारखे.
निदांचे एक मित्र अंत्यविधीच्या वेळी मला म्हणाले की निदा कबीरपंथी होते. निदांचे काही दोहे जगजितसिंगांनी गायले आहेत. ‘इनसाइट’ या अल्बममध्ये ते दोहे आहेत. त्यामध्ये निदांचं एक दार्शनिक रूप दिसतं. तत्त्वज्ञ निदा त्यात जाणवतात. 
दो और दो का जोड हमेशा 
चार कहा होता है,
सोच समझ वालों को थोडी
नादानी दे मौला,
बच्चा बोला देखकर मस्जीद आलिशान
अल्ला तेरे एक को इतना बडा मकान.
त्यांच्या काही गजलासुद्धा अप्रतिम आहेत.
दुनिया जिसे कहते है  जादू का खिलौना है, 
मिल जाये तो मिट्टी है  खो जाये तो सोना है.
त्यांची आणखी एक गजल.
अपनी मर्जी से कहॉँ  अपने सफर के हम है,
रुख हवाओंका जिधर का है  उधर के हम है.
निदांच्या लेखनात शब्द जिवंत होऊन यायचे. ‘होशवालों को खबर क्या बेखुदी क्या चीज है’, ‘कभी किसी को मुकम्मल जहाँ नही मिलता’, ‘तु इस तरहा से मेरी जिंदगी मे शामील है’.   
जगजितसिंग आणि निदा फाजली यांची प्रदीर्घ काळ दोस्ती होती. निदांच्या अनेक गजला जगजितजींनी गायल्या. अनेक कार्यक्रम दोघांनी सोबत केले. अशा कार्यक्रमांमध्ये निदा स्वत:च्या गजलांचा अर्थ समजावून सांगत व जगजितजी त्या गजला गात. निदा फाजली व जगजितसिंग या दोघांनी मिळून अनेक अप्रतिम रचना निर्माण केल्या, त्या मैफली, तो काळ लाखो लोकांच्या भावविश्वाचा एक भाग बनलेला आहे. 
निदांचं खरं मोठेपण त्यांच्या मानवतेशी असलेल्या बांधिलकीत होतं. जीवनभर त्यांनी ही बांधिलकी मानली. अगदी 1992 च्या मुंबई दंगलीत त्यांना त्यांच्या धर्मामुळे एका हिंदू मित्रच्या घरी आसरा घ्यावा लागला. त्यावेळीदेखील त्यांचे मत पूर्वग्रहदूषित झाले नाही. ते मानवतेची गाथा जीवनभर गातच राहिले. त्यांच्या एका दोह्यामध्ये त्यांनी लिहिले. 
चाहे गीता बाचीये,  या पढीये कुराण,
तेरा मेरा प्यार ही,  हर पुस्तक का ज्ञान
त्यांच्या सुधारक व मानवतावादी विचारांमुळे कट्टरपंथी मुस्लिमांची प्रचंड नाराजी त्यांनी ओढवून घेतली. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांमधील गरिबी, शोषण, बकालपणा बघून ते नेहमी विचारायचे की, जर हेच कायम राहणार होतं तर मग ही फाळणी का केली गेली? मानवता हाच निदांचा खरा धर्म होता, पूजा होती. 
घर से मस्जीद है बहोत दूर,  चलो यु करलो,
किसी रोते हुए,  बच्चे को हसाया जाये.
त्यांच्या या ओळी जीवनविषयक तत्त्वज्ञान सांगतात. ‘जिंदगी हिसाबों से जी नही जाती’ हे निदांच्या एका लेखाचं शीर्षक होतं. निदांचं जीवनदेखील असंच चाकोरीबाहेरचं व अफाट होतं. जगताना त्यांनी कधी हिशेब केले नाहीत आणि नियतीनेदेखील त्यांना सर्व काही भरभरून दिले.
निदांनी आयुष्य बघितलेलं होतं. त्यांच्या डोळ्यांत कारुण्याची छटा होती, दुस:याचं दु:ख समजून घेण्याची इच्छा होती. दुस:याच्या अडचणी, वेदनांना आपलं समजण्याची भूमिका होती. जगभरातल्या विचारवंतांची पुस्तकं निदा वाचायचे. जागतिक, सामाजिक व राजकीय अंत:प्रवाहांची त्यांना सखोल जाण होती. निदांनी अनेक विषयांवर असंख्य पुस्तकं लिहिली. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय घटनांवर ते अभ्यासपूर्ण बोलायचे व वेगळाच दृष्टिकोन आपल्या लक्षात आणून द्यायचे.
एकदा ते म्हणाले, कुठल्याही देशाची फाळणी केवळ धर्म वेगळे असल्यामुळे होत नाही. तसे असते तर पाकिस्तान व बांगलादेश वेगळे झाले नसते. धर्म सारखा असूनदेखील संस्कृती वेगळी असणं हेदेखील या देशांच्या फाळणीसाठीचं महत्त्वाचं कारण होतं. एखाद्या समाज शास्त्रज्ञासारखे ते बोलत असत. 
पण हे सगळं होतं तरीही मला निदा फाजलींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये एक एकाकीपण नेहमी दिसलं. गर्दीत असूनही एकटे विचारात हरवलेले. अगदी बोलतानादेखील ते विचार करीत, चिंतन करीत बोलत आहेत, असं जाणवायचं. अतिसंवेदनशील माणसांचं असं होतं. ज्यांनी जीवनात अफाट दु:ख बघितलेलं असतं त्यांचं काळीज जास्त पोखरलं जातं, ज्यांचं काळीज जास्त पोखरलं जातं तेवढी त्यांची जगाचं दु:ख समजून घेण्याची क्षमता विस्तारत जाते. 
निदांचं हृदय असं ज्ञानेश्वरांसारखं, तुकारामांसारखं होतं. निदा या शब्दाचा अर्थ ‘हाक’ असा होतो. निदा एक आकाश होते. निदा एक फकीर होते, निदा मानवतेचे वारकरी होते. निदांचं जीवन, निदांचं साहित्य, निदांच्या आठवणी आम्हाला हाच संदेश देतात की वातावरण कितीही गढूळ झालं तरी तुमचं अंत:करण गढूळ होऊ देऊ नका. मानवतेवरची श्रद्धा कायम ठेवा. 
निदांसारखा शायर पुन्हा होणार नाही. निदांच्या अंत्यविधीला मी गेलो, त्यावेळी तिथे अभिनेते रजा मुराद भेटले. मी त्यांना म्हटलं, आज आपण एका महान शायराला अखेरचा निरोप द्यायला आलेलो असताना मला तुमच्यावरच चित्रित झालेलं ते गाणं तीव्रपणो आठवतंय. 
मैं शायर बदनाम, मैं चला. मैं चला..
 
 
 
निदांचे जीवन हाच एक कादंबरीचा, चित्रपटाचा विषय आहे. फाळणी झाली तेव्हा त्यांचे सगळे कुटुंब पाकिस्तानात गेले तरीही निदा हट्टाने भारतातच राहिले. त्यावेळी ते म्हणाले, ‘एका कागदाच्या नकाशावर तुम्ही रेषा ओढाल आणि म्हणाल, की देशाची फाळणी झाली! मला हे मान्य नाही. फाळणी झाली हे मी कधीही मान्य करणार नाही.’ फार मोठी किंमत त्यांनी त्यांच्या या मतासाठी दिली. खरं तर निदा ज्यावेळी मुंबईत फुटपाथवर राहत होते, त्यावेळी त्यांचे भाऊ व सगळे कुटुंब पाकिस्तानात आर्थिकदृष्टय़ा संपन्न झाले होते. काही वर्षानी कुटुंबीयांनी पुन्हा निदांची 
समजूत काढली, मात्र निदा 
पाकिस्तानात गेले नाहीत. 
 
(लेखक प्रसिद्ध गजलगायक, कवी असून, निदांच्या कुटुंबीयांचे जवळचे मित्र आहेत. निदांबरोबर अनेक मैफलीत त्यांचा सहभाग होता आणि निदांच्या ‘तमाशा मेरे आगे’ या पुस्तकाचे भाषांतरही त्यांनी केले आहे.)
alhad30001@gmail.com

Web Title: Nida

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.