निमित्त निपाह...
By अोंकार करंबेळकर | Published: May 28, 2018 04:07 PM2018-05-28T16:07:41+5:302018-05-28T16:10:40+5:30
झिका, इबोला, बर्ड फ्लू, स्वाइन फ्लू, डेंग्यू, आता नुकताच आलेला निपाह.. आजपर्यंत कधीच न ऐकलेले हे असे साथीचे आजार ‘अचानक’ कुठून येतात? मोठ्या देशांनी विकसनशील देशांत मुद्दाम पसरवलेले हे रोग असतात, हा व्हायरल ‘संशय’ कितपत खरा? आपली औषधं खपवण्यासाठी कंपन्यांचं हे ‘मार्केटिंग गिमिक’ असतं की आरोग्याबाबत आपणच केलेली आपली हेळसांड?
‘मैने इंजेक्शन दे दिया है, उन्हे आराम की सख्त जरुरत है!’
- असले डायलॉग्ज ऐकत शिक्षण झालेल्या भारतीयांचं औषधं आणि नवे आजार याबद्दलचं ज्ञान गेल्या दोन दशकांमध्ये चांगलंच वाढलं आहे. पूर्वी केवळ ताप, सर्दी, खोकला हे लहान आजार आणि टायफॉइड, कावीळ हे मोठे आजार यापलीकडे लोकांना फारसं ज्ञान नसायचं; पण आता प्रत्येक आजारातला अगदी दुर्मीळ प्रकारही लोकांना माहिती असतो. नेहमी दिल्या जाणाऱ्या औषधांची नावंही लोकांना पाठ असतात. हे सगळं सांगायचं कारण म्हणजे या आठवड्यात आलेल्या, आपल्या सगळ्यांना काळजीत पाडणाºया दोन बातम्या! या बातम्यांनी औषधं, आपल्या देशातील आरोग्यक्षेत्राची झालेली हेळसांड आणि अर्धवट माहितीवर उपचार घेणारे सुशिक्षित लोक यांच्यावर बोट ठेवलं आहे.
पहिली बातमी आहे ती आरोग्य सुविधांची भारतातील स्थिती किती खालावलेली आहे हे दाखवणारी. आरोग्यसेवेची उपलब्धता आणि आरोग्य सुविधांचा दर्जा, या संदर्भात लॅन्सेटनं केलेल्या सर्वेक्षणानुसार, १९५ देशांच्या यादीत भारताचा १४५वा क्रमांक लागतो. या यादीत चीन खूप वर आहेच; पण बांगलादेश, श्रीलंका, भूतान या लहान, ‘मागास’ शेजाºयांनीही भारताला मागे टाकले आहे.
भारतातील आरोग्य सुविधांमध्ये १९९० नंतर सुधारणा झाल्याचं ‘ग्लोबल बर्डन आॅफ डिसीज स्टडी’नं नमूद केलंय खरं; पण वेगानं होत असलेल्या विकासाचा विचार करता आपण अगदीच मागे आहोत असं दिसतं आहे. आरोग्यसेवांची उपलब्धता आणि त्यांची गुणवत्ता याबाबतीत भारताला ४१.२ गुण देण्यात आले आहेत, तर याच आकडेवारीत पाच देशांची आरोग्यसुविधा व आरोग्यसुविधांचा प्रसार चांगल्या प्रकारे झाल्याचं दिसून येतं. आइसलँड (९७.१ गुण), नॉर्वे (९६.६), नेदरलँडस (९६.१) लक्झेंबर्ग (९६ गुण) हे पहिल्या चार क्रमांकांवर आहेत, तर फिनलंड आणि आॅस्ट्रेलिया यांना प्रत्येकी ९५.५ गुण मिळाले आहेत. दुसरी बातमी आहे ती केरळमध्ये आलेल्या निपाह व्हायरसची. केरळच्या दोन जिल्ह्यांमध्ये वटवाघळाद्वारे पसरल्या जाणाºया ‘निपाह’ या रोगजंतूमुळे काही जणांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आल्याने संपूर्ण देशात खळबळ माजली. आजूबाजूची राज्यंही त्यामुळे खडबडून जागी झाली आहेत. केरळच्या काही जिल्ह्यांमध्ये पर्र्यटकांनी जाऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
२००९ साली आलेल्या स्वाइन फ्लूच्या साथीमुळे आपल्याकडे अशीच खळबळ उडाली होती. आजवर कधीच न ऐकलेल्या तापांच्या साथी, त्यांच्यावर उपचार माहिती नसणं, त्याची लस उपलब्ध नसणं आणि त्यांच्यामुळे होणारे मृत्यू हे सगळं वाचलं की सामान्य जनता साहजिकच गडबडून जाते, हतबलता येते. काही वर्षांच्या टप्प्यांनी जगभरात नवे रोगजंतू आणि त्यांच्यामुळे होणारे मृत्यू किंवा इतर परिणाम पाहायला मिळत आहेत. दोन वर्षांपूर्वी ब्राझील आणि दक्षिण अमेरिकेतील इतर देशांमध्ये ‘झिका’ या रोगामुळे अस्वस्थता पसरली होती. गर्भवती मातेलाच या विषाणूची बाधा होऊन होणाºया बाळाचं डोकं लहान होणं तसंच अशक्त बालकं जन्माला येण्यास सुरुवात झाली होती. बहुतांशवेळा संबंधित देशांमधील आरोग्ययंत्रणा अशा नव्या रोगांना तोंड देण्यासाठी सक्षम नसतात. त्यातून हे देश गरीब किंवा विकसनशील असतील तर आरोग्य सुविधा आणखीच कमकुवत असतात.
मादागास्कर बेटावर गेले काही महिने प्लेगनं नव्यानं तोंड वर काढलं आहे. शेकडो लोक या प्लेगमुळे विस्थापित झाले असून, २२१ लोकांचे यामुळे प्राण गेले आहेत. २०१४ साली आफ्रिकेतील देशांमध्ये ‘इबोला’ने असेच थैमान घातलं होतं. गरीब, आदिम जमातींमधील लोक इबोला या भयानक रोगाला एकापाठोपाठ एक बळी पडले. हा रोग सर्वप्रथम आफ्रिका आणि नंतर इतर खंडांमध्ये पसरला अशी भीती युरोप आणि पाश्चिमात्य देशांना वाटू लागली. त्यामुळे इबोला पसरलेल्या देशांना पर्यटकांनी भेट दिली आहे का, हे आपल्या देशात विमानं उतरण्यापूर्वीच तपासलं जाऊ लागलं.
आता भारतामध्ये निपाहच्या अवचित थैमानामुळे काळजीचं वातावरण आहे. वास्तविक हेनिपावायरस या रोगजंतूमुळे भारतात पश्चिम बंगाल, आसाम आणि शेजारच्या बांगलादेशात गेल्या वीस वर्षांमध्ये अनेक लोकांचे प्राण गेले आहेत. पण स्वाइन फ्लूच्या उद्रेकानंतर हतबलतेमध्ये आणि घबराट पसरण्यामध्ये वाढ झाली आहे.
हे असे कधीच न ऐकलेले रोग येणं म्हणजे कोणत्या तरी मोठ्या देशांनी आपल्या देशात मुद्दाम पसरवलेले रोग आहेत तसंच लठ्ठ उद्योग असलेल्या बहुराष्ट्रीय औषध कंपन्या आपली औषधं खपविण्यासाठी हे सगळं करतात असा एक समजही पसरला आहे. निपाहसारख्या साथींचा फैलाव झाल्याच्या बातम्या आल्या की ‘‘तसे’ मेसेजेस किती व्हायरल होतात याचा अनुभव आपण घेतलेला असतोच.
- पण पुण्यामधील सुप्रसिद्ध डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी मात्र अशी शक्यता नसल्याचं सांगितलं आहे. भोंडवे म्हणतात, खरं कारण आपल्याकडच्या सरकारमध्ये असलेल्या अनास्थेमध्ये आहे. आपण जीडीपीच्या केवळ १ टक्का खर्च आरोग्यावर करतो, मग त्यात संशोधनाला असा कितीसा वाटा मिळणार असा त्यांचा प्रश्न आहे. आपण कोणत्याच रोगावर संशोधन करून औषध निर्माण करण्याचा प्रयत्न करत नाही किंवा एखादा आजार आला की मग यंत्रणा खडबडून जागी होते व औषधासाठी धडपड सुरू होते. फार्मा कंपन्या त्यावर सतत संशोधन करत असतात आणि गरजेपोटीच औषधाची निर्मिती त्यांच्याकडून केली जाते. त्यामुळे आधी औषध आणि मग आजार अशी शक्यता डॉ. भोंडवेंना चुकीची वाटते. या अचानक येणाºया, कधीच न ऐकलेल्या आजारांबद्दल आणि एकूणच आरोग्यक्षेत्रातील गोंधळाबद्दल डॉ. भोंडवे यांनी आपल्या अनुभवातून निरीक्षणं मांडली आहेत.
एकेकाळी भारतामध्ये प्लेग, देवी हे रोग होते. आज भारतामध्ये हे रोग नाहीत. अर्थात एखाद्यावेळेस पोषक स्थिती निर्माण झाली तर सूरतमध्ये आला तसा प्लेग येऊ शकतोच. पण देवी रोगाला १९७१ साली भारताने समूळ नष्ट केलं. भोंडवे सांगतात या देवीचे विषाणू अभ्यासासाठी अमेरिका आणि रशियामध्ये ठेवण्यात आले आहेत. उद्या जर याचा कोणी दुरूपयोग केला तर त्याला तोंड देण्यासाठी १९७१ साली असणारी भारतीयांची प्रतिकारक्षमता आपल्यामध्ये नाही. त्यामुळे आजार नव्याने येण्याची व नवे आजार येण्याची काही भाकितं करता येत नाहीत.
आपल्याकडे लोकांनी स्वत:च औषधं घेण्याची सवय लावून घेतली आहे. कित्येक अॅण्टीबायोटिक्सची नावं लोकांना तोंडपाठ असतात आणि लोक ते सरळ औषधांच्या दुकानातून घेतात व त्यांना ती दिलीही जातात. डॉ. भोंडवे म्हणतात, अशा प्रकारे अॅण्टीबायोटिक्स भरपूर घेतल्यामुळे आपली शरीरं त्यासाठी रेझिस्टंट झाली आहेत, म्हणजे आता पुढच्या वेळेस वेगळी किंवा अधिक तीव्रतेची अॅण्टीबायोटिक्स घ्यावी लागणार. आज डॉक्टरांकडे येणारे लोक दोन-चार प्रकारची औषधं खाऊनच येतात. एक दोन दिवस काहीच चाललं नाही की मग डॉक्टरचा दरवाजा ते ठोठावतात.
निपाह रोगजंतूने हातपाय पसरल्यावर आलेल्या तणावाबद्दल डॉ. भोंडवे स्वाइन फ्लूपासूनच्या आठवणी सांगतात. २००९ मध्ये सिरमने याची लस आणल्यावर लोकांनी अक्षरश: रांगा लावून ती टोचून घेतली. अशी पहिली बॅच हातोहात संपल्यावर दुसरी बॅच बाजारात आली. पण तोपर्यंत स्वाइन फ्लू ओसरला होता. त्यामूळे बहुतांश लस परत घ्यावी लागली किंवा नष्ट करावी लागली. जोपर्यंत गळ्याशी येत नाही तोपर्यंत आपल्याकडच्या व्यवस्था जाग्या होत नाहीत. डेंग्यूची साथ गेली आठ वर्षे दरवर्षी येत आहे; पण जोपर्यंत रुग्ण दवाखान्यात दाखल होत नाहीत किंवा एखाद-दोन बातम्या येत नाहीत तोपर्यंत त्याची दखल कोणीही घेत नाही. डेंग्यूप्रमाणे स्वाइन फ्लूदेखील पावसाळ्यात दरवर्षी येतो. त्याकडे गांभीर्याने पहाण्याऐवजी लोकांसकट सरकारने या रोगांशी सामना करण्यासारखी परिस्थिती तयार केलेली नाही, असं डॉ. भोंडवे सांगतात.
आपल्याकडे रोगापेक्षा त्याबद्दल गैरसमज पसरवण्यामध्ये आणि चुकीच्या नोंदी करण्याच्या पद्धतीवरही ते बोट ठेवतात. डेंग्यूवर किवी नावाचं फळ औषध म्हणून घेण्याची टूम निघाली आहे याबद्दल ते काळजीने बोलतात. चारेक वर्षांपूर्वी हे बाहेरून आलेलं फळ पंचवीस तीस रुपयांना मिळायचं. आता अचानक ८०-९० रुपयांना मिळायला लागलं आहे. यामुळे प्लेटलेट्स वाढतात असं सांगितलं जातं. ते खरं असो वा खोटं; पण केवळ प्लेटलेट्स वाढवणं हा डेंग्यूवरचा उपचार नाहीच असं डॉ. भोंडवे सांगतात.
ते म्हणतात, कदाचित तुम्ही प्लेटलेट्स वाढवू शकाल; पण डेंग्यूनं तुमच्या शरीरातील सर्व अवयवांवर परिणाम झालेला असतो तो कसा दूर कराल? पपई किंवा किवीसारखं एक फळ खाऊन तुम्ही पूर्ण बरे होणार नाही हे लोकांना कसं समजवायचं? मग याचाच फायदा घेऊन कंपन्यांनी आता पपईचं एक्सट्रॅक्शन असलेल्या गोळ्या बाजारात आणल्या आहेत. आपल्या अज्ञानामुळं समाजाचं नुकसान होत आहे.
डेंग्यूचे पेशंट दरवर्षी महानगपालिकेला कळवले तरीही त्याची नोंद घेतली जात नाही. जितके पेशंट सरकार एका शहरात दाखवते, प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी अधिक ते असतात. मात्र जाणीवपूर्वक त्याची नोंद घेणं टाळलं जातं आणि रुग्णांची संख्या कमी असल्याचं दाखवलं जातं. हीच गत टीबीची असल्याचं ते सांगतात. क्षयावर साधारणत: ९ महिने उपचार घ्यावे लागतात.
मात्र बहुतांश रोगी अल्पवेतन असणारे, गरीब घरातले, तर कधी व्यसनीही असतात. हे रुग्ण काही दिवस औषधोपचार घेऊन बंद करतात. पुन्हा लोकांमध्ये मिसळतात. औषधांना पुरून उरणारा टीबी तयार झाल्यामुळे त्याकडे खरंच काळजीने पहाण्याची गरज डॉ. भोंडवेंना वाटते. कुठल्याही रोग, आजाराबाबत आपल्याकडे दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात. ‘मार्केटिंग गिमिक’ म्हणून एकतर त्याकडे सरळसरळ दुर्लक्ष करायचं किंवा योग्य ती काळजी घेण्यापेक्षा अगदीच घाबरून जाऊन हतबल व्हायचं! या दोन्हीही गोष्टींपासून आपण वाचायला हवं आणि आपली योग्य ती काळजी घ्यायलाच हवी..