‘ग्रीन’ फटाके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:05 AM2019-10-27T06:05:00+5:302019-10-27T06:05:10+5:30

दिवाळी आणि फटाके यांचा अतिशय जवळचा संबंध.  मात्र याच फटाक्यांमुळे प्रदूषणही मोठय़ा प्रमाणावर होते. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर ताशेरे ओढले होते. मात्र यातून सुवर्णमध्य काढताना ‘निरी’च्या संशोधकांनी  तीस टक्के प्रदूषण कमी करणारे तंत्रज्ञान विकसित केले. त्याचा परिणाम यंदाच्या दिवाळीत दिसू शकेल.

'NIRI' Scientists developed 'Green' fireworks to reduce pollution.. | ‘ग्रीन’ फटाके

‘ग्रीन’ फटाके

Next
ठळक मुद्दे‘ग्रीन’ फटाके यंदा बाजारातदेखील आले आहेत. त्यामुळे यंदा प्रदूषणाची पातळी दरवर्षीपेक्षा कमी असेल, अशी आशाआहे.

- योगेश पांडे

दिवाळी म्हणजे प्रकाशपर्व. अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारा व तेजाने नटलेला दिव्यसोहळा. घरोघरी आनंदाची वात तेवत ठेवणार्‍या या उत्सवाचे फटाक्यांशी विशेष नाते आहे. अगदी मोठय़ांपासून ते बच्चेकंपनीकडून आतषबाजीसाठी पुढाकार घेतला जातो व फटाक्यांच्या आवाजाने कोण ‘मोहल्ला’ दणाणून सोडतो, यासाठी स्पर्धाच लागते. मात्र रात्री आनंदोत्सव शांत झाल्यावर देशभरात सगळीकडे समान चित्र दिसून येते. सगळीकडे असतो फक्त ‘धुआं धुआं’च.
कानठळ्या फोडणारे फटाके फुटून शांत झाले असतात; पण त्या वातावरणात श्वास घेण्यासाठी अनेकांना अक्षरश: धडपड करावी लागते. अगदी काही तासांची मौज अनेक दिवस पुरणारे आजार देऊन जाते. दिवाळी लोकांच्या जीवनाशी जुळलेला सण, त्यामुळे फटाक्यांवर सरसकट निर्बंध लावता येणे शक्य नाही. अन् उत्साहात पर्यावरणाचे नुकसानदेखील हिताचे नाही. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून ‘सीएसआयआर’ (कौन्सिल ऑफ सायण्टिफिक अँण्ड इंडस्ट्रीयल रिसर्च) व ‘नीरी’ (नॅशनल एन्व्हायर्नमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट) यांच्या वैज्ञानिकांनी संशोधनाला एक वेगळी दिशा दिली व त्यांच्या भगीरथ प्रयत्नातून जन्म झाला तो ‘ग्रीन’ फटाक्यांचा.
दिवाळीतील प्रदूषणामुळे दिल्ली, मुंबईसारख्या मोठय़ा शहरांसोबतच लहान शहरांतदेखील मोठी समस्या निर्माण होताना दिसून येत आहे. फटाक्यांमुळे वातावरणात ‘पीएम’सह (पर्टिक्युलेट मॅटर) ‘सल्फर डायऑक्साइड’, ‘कार्बन मोनॉक्साइड’ यासारख्या पर्यावरणाला हानी पोहोचविणार्‍या वायूंचे उत्सर्जन मोठय़ा प्रमाणात होते. केवळ वायूप्रदूषणच नव्हे तर ध्वनिप्रदूषणाची पातळी या कालावधीत अत्युच्च पातळीवर असते. ‘नीरी’च नव्हे तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या अहवालातूनदेखील ही बाब वारंवार समोर आली आहे. त्यातच मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयानेदेखील दिवाळीतील फटाक्यांच्या प्रदूषणावर ताशेरे ओढले होते. अशास्थितीत प्रदूषणविरहित दिवाळी कशी साजरी होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. लोकांना दिवाळीचा आनंददेखील साजरा करता यावा व पर्यावरणालादेखील फारसे नुकसान होऊ नये यासाठी सुवर्णमध्य गाठताना ‘सीएसआयआर’ व ‘नीरी’च्या वैज्ञानिकांनी दिवस-रात्र एक केली. 2018 हे वर्ष एक महत्त्वाचा टप्पा गाठणारे ठरले. सर्वसाधारण फटाक्यांपेक्षा 30 टक्के कमी प्रदूषण करणारे फटाके तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले व देशभरातील फटाके उद्योगांमधील चित्र बदलले. अनेक फटाके उत्पादकांनी या तंत्रज्ञानाचा उपयोग केला असून, ‘ग्रीन’ फटाके यंदा बाजारातदेखील आले आहेत. त्यामुळे यंदा प्रदूषणाची पातळी दरवर्षीपेक्षा कमी असेल, अशी आशाआहे.
प्रभावी अंमलबजावणी महत्त्वाची
वैज्ञानिकांनी मोठय़ा कष्टांनी ‘ग्रीन’ फटाक्यांचे तंत्रज्ञान विकसित केले. अनेक फटाके उत्पादकांनी या तंत्रज्ञानाचा उपयोगदेखील केला. मात्र प्रत्यक्ष बाजारात हे फटाके सहजतेने उपलब्ध आहेत का, याची प्रशासनाने चाचपणी केली पाहिजे. समाजात अद्यापही ‘ग्रीन’ फटाक्यांसंदर्भात हवी तशी जनजागृती झालेली नाही. अनेकांना असे फटाके बाजारात आले आहेत, याची माहितीदेखील नाही. त्यामुळे सरकारी पातळीवर यासंदर्भात पुढाकार अपेक्षित आहे. ‘ग्रीन’ फटाके जनसामान्यांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पावले उचलली तर त्याचे अनुकूल परिणाम दिसून येतील. केवळ ‘ग्रीन’ तंत्रज्ञानाचा ‘ढोल’ बडविला व प्रत्यक्षात हे फटाके लोकांपर्यंत पोहोचलेत नाही तर मग पालथ्या घड्यावर पाणी अशीच अवस्था होईल.

‘स्वास’, ‘सफल’, ‘स्टार’ने रचला इतिहास
‘सीएसआयआर’अंतर्गत येणार्‍या विविध प्रयोगशाळांत ‘ग्रीन’ फटाके निर्माण करण्यात आले आहेत. यांना ‘स्वास’ (सेफ वॉटर रिलिझर), सफल (सेफ मिनिमल अँल्युमिनियम), ‘स्टार’ (सेफ थर्माइट क्रॅकर्स) अशी नावे देण्यात आली आहेत. या फटाक्यांचा आवाजदेखील कमी असून, पर्यावरणाला लक्षात घेऊन हे फटाके बनविण्यात आले आहे. पारंपरिक फटाक्यांमध्ये वापरण्यात येणार्‍या रसायनांमध्ये बदल करण्यात आले आहे. ‘बेरियम नायट्रेट’विरहित हे फटाके आहेत. ‘ग्रीन’ फटाक्यांमध्ये कुठलेही घातक रसायने नाहीत. फटाक्यांमधील विविध घटकांना हटवून कमी धोकादायक तत्त्वांचा वापर करण्यात आला आहे. तसेच फटाक्यांमधून निघणारा धूर, बारीक कण यांचे प्रमाणदेखील कमी असते. ‘सल्फर डायऑक्साइड’चे उत्सर्जन न करतादेखील फटाके तयार करण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत.
- डॉ. साधना रायलु, मुख्य प्रधान वैज्ञानिक, ‘नीरी’

‘नीरी’चे आणखी एक पाऊल पुढे
‘नीरी’कडून ‘ग्रीन’ फटाक्यांचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असले तरी संस्थेकडून प्रत्यक्षात फटाक्यांची निर्मिती होत नाही. देशातील विविध उत्पादकांना हे तंत्रज्ञान पुरविण्यात आले आहे. आताच्या स्थितीत आणखी सुधारणा व्हावी व ‘ग्रीन’ फटाक्यांमधून होणार्‍या प्रदूषणात 55 ते 60 टक्क्यांची घट व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ‘नीरी’मध्ये फटाक्यांच्या माध्यमातून होणार्‍या उत्सर्जनाची चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येथे पारंपरिक फटाके व ‘ग्रीन’ फटाक्यांवर अभ्यास करण्यात येत आहे. दोन्हींमधून निघणारा धूर, आवाज, रासायनिक घटक इत्यादींची तुलना करण्यात येत आहे.
- डॉ. राकेश कुमार, संचालक, ‘नीरी’

‘चिनी’ फटाक्यांचा धोका कायम
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ‘ग्रीन’ फटाक्यांवरील संशोधनासंदर्भात ‘सीएसआयआर’ व ‘नीरी’च्या वैज्ञानिकांवर विश्वास टाकला आहे. ‘ग्रीन’ फटाके यंदा प्रथमच मोठय़ा प्रमाणात दिसून येत असले तरी बाजारात ‘चिनी’ फटाकेदेखील आहेत. या फटाक्यांचा आवाजदेखील मोठा असतो व यातून विविध धोकादायक वायुंचे उत्सर्जनदेखील मोठय़ा प्रमाणात होते. हे फटाके धोकादायक ठरू शकतात.
- डॉ. शेखर मांडे, महासंचालक, ‘सीएसआयआर’

‘ग्रीन’ फटाके
* ‘ग्रीन’ फटाके ओळखण्यासाठी विशेष लोगो फटाक्यांच्या पाकिटावर देण्यात आला आहे.
* ‘ग्रीन’ फटाके वाजविताना मोठा आवाज आणि आकर्षक रोषणाईदेखील पाहायला मिळते. यात वापरण्यात आलेल्या घटकांमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते.
* सध्या बाजारात ग्रीन फटाक्यांची संख्या कमी असली तरी जास्तीत जास्त फटाके आणण्यासाठी सरकार प्रय}शील आहे.
* सर्वसाधारण फटाक्यांमधील ‘बॅरियम नायट्रेट’ धोकादायक. गळा, फुफ्फुसांचा होऊ शकतो आजार.
* ‘ग्रीन’ फटाक्यांत ‘बॅरियम नायट्रेट’ऐवजी ‘पोटॅशियम नायट्रेट’चा उपयोग; सोबतच ‘झिओलाइट’, ‘सिलिका जेल’चादेखील वापर.
* ‘सीरी’, ‘आयआयटीआर’, ‘आयआयसीटी’, ‘एनसीएल’, ‘सीईसीआरआय’, ‘एनबीआरआय’, ‘सीएमईआरआय’ या संस्थांचेदेखील ‘नीरी’ला सहकार्य.

‘पर्टिक्युलेट मॅटर’चा धोका ओळखा
दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या धुरामुळे ‘पीएम’चे प्रमाण वाढते. हवेत असलेले अतिसूक्ष्म कण, धूळ, मातीचे कण, वायू इत्यादींचे मिर्शण होऊन ‘पीएम’ (पर्टिक्युलेट मॅटर) तयार होतात. ‘पीएम 2.5’ ला जास्त धोकादायक मानण्यात येते. याचा आकार 2.5 मायक्रोमीटरहूनदेखील लहान असतो. हे सूक्ष्मकण श्वासनलिकेवाटे थेट शरीरात शिरण्याचा धोका असतो. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ची निर्धारित पातळी 10 मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतकी आहे, तर भारतात ही पातळी 40 मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर इतकी आहे. दिवाळीच्या कालावधीत अनेक शहरांमध्ये ही पातळी याहून फार अधिक प्रमाणात वाढते.

530 प्रमाणपत्रांचे झाले वाटप
‘ग्रीन’ तंत्रज्ञानाने निर्माण झालेल्या फटाक्यांमधील उत्सर्जनाची चाचणी करण्याची सुविधा नागपुरातील ‘नीरी’, ‘एनएबीएल’ (नॅशनल अँक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टिंग अँण्ड कॅलिबरेशन) येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय फटाका उत्पादनाचे माहेरघर असलेल्या शिवकाशी येथे ‘रेस’ची (रॉ मटेरियल कम्पोझिशनल अँनालिसिस) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत फटाके उत्पादकांना उत्सर्जनासंदर्भातील 530 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. 165 फटाके उत्पादकांना हे तंत्रज्ञान पुरविण्यात आले आहे.

yogesh.pande@lokmat.com
(लेखक ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीत उपमुख्य उपसंपादक आहेत.)

Web Title: 'NIRI' Scientists developed 'Green' fireworks to reduce pollution..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.