सर्वाच्च न्यायालयानं दिला फटाक्यांना फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 06:05 AM2018-10-28T06:05:00+5:302018-10-28T06:05:00+5:30
फटाके हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग, सण साजरे करण्यापासून ते आनंद, विजयाचं प्रतीक म्हणून फटाक्यांचं स्थान अनन्यसाधारण; पण त्यातल्या घातक गोष्टींचा विचार करून सर्वोच्च न्यायालयानं त्यावर नियंत्रण आणलं आहे. अर्थात न्यायालयीन लढाईचा किंवा प्रदूषणविरोधी लढाईचाही हा शेवट नाही. एक टप्पा मात्र आपण निश्चितच पुढे गेलो आहोत.
विनय र. र.
कुठलाही आनंद व्यक्त करायचा असो, विजय साजरा करायचा असो, आपलं अस्तित्व दाखवून द्यायचे असो.. फटाक्यांशिवाय आपले पान हलत नाही. फटाके म्हणजे आनंदाचे, सणाचे, ‘शक्ती’चेही प्रतीक आहेच; पण या फटाक्यांना आपण इतके सरावलो आहोत की त्यामुळे इतरांना काही त्रास होत असेल हा विचार आपल्या मनाला स्पर्शही करत नाही. यंदाच्या दिवाळीत मात्र हा विचार आपल्याला नक्की करावा लागेल, कारण आता सर्वोच्च न्यायालयानेच आपल्या निर्णयाने सर्वांना बजावले आहे, आपण फटाके केव्हा आणि कधी वाजवावेत ते..
फटाक्यातला आनंदही कायम ठेवणारा आणि फटाक्यातून होणारा त्रासही कमी करणारा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. त्यानुसार यंदाच्या दिवाळीत आणि सर्वच सणांमध्ये त्या दिवसांत जास्तीत जास्त दोन तास फटाके वाजवता येतील. दिवाळीच्या काळात संध्याकाळी ८ ते १० आणि नाताळ, नववर्ष दिन या काळात केवळ अर्धा तास; रात्री अकरा पंचावन्न ते साडेबारा!
सर्वाेच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका खटल्याचे हे निमित्त. या खटल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या खटल्यातल्या दोघा वादींचे वय !
२०१५ साली खटला दाखल करतेवेळी एकाचे वय होते सहा महिने आणि दुसऱ्याचे १४ महिने ! त्यांच्या वतीने त्यांच्या वडिलांनी हा खटला दाखल केला. आपल्या जगण्याच्या अधिकाराच्या आड येणारे दिल्लीतले प्रदूषण आणि त्याचा एक भाग म्हणजे फटाक्यांनी होणारे प्रदूषण. फटाक्यांवर पूर्ण बंदी घालावी, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली होती.
फटाक्यांच्या उद्योगावर वार्षिक सहा हजार कोटी रुपयांची उलाढाल होते त्याशिवाय विशेषत: तामिळनाडूमध्ये शिवकाशी येथील पाच लाख कुटुंबांची रोजीरोटी फटाके बनवणं या उद्योगावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाला कराच्या रूपाने उत्पन्नही मिळते. राज्यघटनेच्या कलम २१ नुसार ‘आरोग्याचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.’ अशा सगळ्या बाबींचा गुंता लक्षात घेऊन न्यायमूर्ती ए.के. सिक्र ी आणि अशोक भूषण यांनी फटाक्यांसंबंधीचा हा निकाल दिला.
दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाला येथील वाहनांची प्रचंड वाहतूक, अनियमित बांधकामे आणि शेजारच्या राज्यात जाळण्यात येणारी शेती ही कारणे आहेतच, ‘दिवाळीत उडवले जाणारे फटाके हेच प्रदूषणाचे एकमेव कारण नाही, हे खरे असले तरी आम्ही केवळ प्रेक्षक म्हणून त्याकडे पाहू शकत नाही. फटाक्यांच्या धमाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि त्यातील विषारी वायूंमुळे तसेच धुराच्या कणांमुळे होणारे हवेचे प्रदूषण बंद झालेच पाहिजे’, अशी या निकालामागची भूमिकाही न्यायाधीशांनी मांडली.
दारामागे लपून पलीकडून येणाºया व्यक्तीला भो.. असा मोठा आवाज करून दचकवणे यात एक गंमत वाटते. मग समोरची व्यक्ती प्रथम दचकते, घाबरते आणि नंतर आवाज करणारी व्यक्ती आपली परिचित आहे कळल्यावर - अरे यात काहीच धोका नव्हता, असा सुटकेचा भावही तिच्या चेहºयावर दिसतो. मुळात तीच अनपेक्षितपणाची गंमत या फटाके वाजवण्यातून येत असावी.
आवाज करून आपण लोकांच्या लक्षाच्या केंद्री असणं हा आपल्याला सुखी करणारा भाग आहेच. त्याशिवाय फटाक्यांची आतषबाजी डोळ्यांना आल्हाददायक वाटते; पण या फटाक्यांचा विपरीत परिणामही मोठा आहे.
फटाक्याच्या धुराचा त्रास विशेषत: अस्थमा, दमा असणाºया नागरिकांना भोगावा लागतो. फटाक्याच्या धुराबरोबर हवेत उडालेले बारीकबारीक कण नाकावाटे आपल्या फुफ्फुसात जाऊन बसतात. अशा ठिकाणी फुफ्फुसात असणारी आॅक्सिजन ग्रहण करण्याची क्षमता नाहीशी होते. फटाक्याचा त्रास आजूबाजूच्या लोकांना होतो, तसा फटाके उडवणाºयांनाही होतो; पण फटाके उडवण्याचा आनंदात तो त्रास त्यांना तेव्हा जाणवत नाही.
सर्वोच्च न्यायालयाच्या आताच्या निकालाने फटाक्याच्या दारूमध्ये असणारी घातक रसायने कमी करणे किंवा पूर्णत: काढून टाकणे असे उपाय सुचवले आहेत. दारूचे परिक्षण आणि तपासणीची जबाबदारी ‘पेसो’ म्हणजेच पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संघटनेकडे सोपवली आहे. फटाके स्फोटानंतर होणाºया बारीक कणांचे प्रमाण ३५ टक्क्यांनी कमी करणे तसेच नायट्रोजन आणि सल्फर यांच्या आॅक्साइड्सचे प्रमाण कमीत कमी असेल असे पाहणे ही ‘पेसो’ची जबाबदारी आहे.
फटाक्याच्या रचनेनुसार त्याच्या आवाजाची तीव्रता अधिक किंवा खूप अधिक असते. फटाक्यांच्या रचनेवरही नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाने सोपवली आहे. त्यानुसार लिथियम, आर्सेनिक, अँटिमनी, पारा आणि शिसे याची कोणतीही रसायने फटाक्यांच्या दारूत असणार नाहीत. हिरव्या रंगाचा उजेड देणारे बेरीयमचे क्षार आणि लाल रंगाचा उजेड देणारे स्ट्राँशियमचे क्षार यांचेही प्रमाण खूपच कमी करायला लागणार आहे. फटाक्यांची दारू बनवणाºयांना आता रंगीत आतषबाजीसाठी पर्यायी रसायने शोधावी लागतील.
वाजवण्यावर नाही, विक्रीवरच बंदी !
अनेक देशांमध्ये फटाके सरसकट उडवण्याला बंदी आहे. फटाक्यांवर बंदी नाही; पण फटाके उत्पादनावर मात्र अनेक ठिकाणी नियंत्रणे आहेत.
कॅनडामध्ये १८ वर्षांखालील मुलांना फटाके विकणे हा गुन्हा आहे. क्रोएशियामध्ये फटाक्यांच्या आवाजावरून त्याचे तीन प्रकार केले आहेत. त्यातले भारी आवाजाचे फटाके २७ डिसेंबर ते १ जानेवारी या काळातच उडवता येतात.
चीनमध्ये फटाके उडवताना झालेल्या चेंगराचेंगरीनंतर १९९३ ते २००५ पर्यंत फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती. आता बरेच चिनी लोक फटाक्यांची आतषबाजी आपापल्या घराच्या गच्चीवरून बघण्यातच आनंद मानतात.
जर्मनीमध्ये १२ वर्षांखालच्या मुलांनी फटाके उडवण्यास कायद्याने बंदी आहे. हॉँगकॉँग आणि व्हिएतनाममध्ये केवळ सरकारच फटाके उडवू शकते. खासगी व्यक्तींना तसे केल्यास शिक्षा होते. नॉर्वेमध्ये रॉकेट किंवा बाण यावर बंदी आहे. बाकीचे फटाके उडवलेले चालतात. याउलट स्वीडनमध्ये रॉकेटसारखेच फटाके उडवलेले चालतात.
विशिष्ट वेळातच फटाके वाजवल्यामुळे त्या काळात प्रदूषणाची तीव्रता खूप वाढेल अशी शंका अनेक जणांनी व्यक्त केली असली तरी न्यायालयाने हा तडजोडीचा भाग आहे, असेही सुचित केले आहे.
अर्थात न्यायालयीन लढाईचा हा शेवट नाही किंवा प्रदूषणविरोधी लढाईचाही हा शेवट नाही. एक टप्पा मात्र आपण निश्चितच पुढे गेलेलो आहोत.
फटाक्यांच्या धमाक्यात दडलेय काय?
फटाके कागदाचे, पुठ्ठ्याचे, प्लॅस्टिकचे, मातीच्या भाजून बनवलेल्या सुगड्यांचे असतात. त्यात चंदेरी रंगाची दिसणारी पूड असते. तिला दारू म्हणतात. या दारूमध्ये प्रामुख्याने तीन प्रकारची रसायने असतात. एक प्रकार म्हणजे स्वत: जळणारे पदार्थ किंवा रसायने. दुसरा प्रकार म्हणजे आॅक्सिजन तयार करणारी रसायने आणि तिसरा, जळताना रंगीत दिसणारी रसायने.
कोळसा, गंधक, अँटिमनी, अँटिमनी सल्फाइड ही स्वत: जळतात. त्यांची बारीक पूड करून ती वापरतात. अर्थात ही रसायने कक्ष तापमानाला पेटत नाहीत. अधिक तापमानाला पेटतात. त्यासाठी त्यांना थोडे गरम करावे लागते. उष्णता वाढवण्यासाठी फटाक्याला वात असते. वात पेटवली की कोळसा गंधक इत्यादी रसायने तापतात आणि मग ती पेटतात.
या जळणाºया रसायनांना अधिक प्रकाशित होत जळण्यासाठी अधिक आॅक्सिजन लागतो. तो दुसºया प्रकारच्या रसायनांपासून मिळतो. यासाठी पोटॅशियम नायट्रेट, पोटॅशियम क्लोरेट यांचा वापर केला जातो. नायट्रेट, क्लोरेट यांच्यामध्ये आॅक्सिजनचे प्रमाण जास्त असते. गरम होऊन ही रसायने विघटित होतात त्या वेळेला तो आॅक्सिजन मुक्त होतो आणि वापरला जातो.
दारूच्या मिश्रणाचा तिसरा प्रकार म्हणजे जळणाºया पदार्थांना रंग देणे. लोखंडी वस्तूंना धार लावताना गरम झालेल्या लोखंडाचे लाल पिवळे कण बाहेर पडताना दिसतात. अशा प्रकारचे, तापले की रंगीत प्रकाश पाडणारे कण दारूत असतात. त्यामध्ये लोखंडाप्रमाणे मॅग्नेशियम, पिवळ्या रंगासाठी सोडियम क्षार, लाल रंगासाठी स्ट्रॉँशियम, हिरव्या रंगासाठी बेरियम असे क्षार घातलेले असतात.
वातीला बत्ती लावून ती जळायला लागल्यावर फटाक्याच्या आतल्या भागात खूप उष्णता निर्माण होते. त्यातून तयार झालेल्या वायूंमुळे दाब निर्माण होतो आणि फटाका फुटतो. कोंडलेल्या वायूंवरचा दाब अचानक कमी झाला की त्याचे आकारमान खूप वाढते आणि त्यामुळे मोठा आवाज होतो. स्फोटामुळे दारूमधले घटक लांब फेकले जातात, काही पेटतात. त्यातले सल्फर डायॉक्साइड, कार्बन डायआॅक्साइड नायट्रोजनची विविध आॅक्साइड्स, कार्बन मोनॉक्साइड अँटिमनी वायू.. हे घटक घातक आहेत.