दोस्त दोस्त ना रहा...
By admin | Published: September 17, 2016 02:44 PM2016-09-17T14:44:16+5:302016-09-17T14:44:16+5:30
देशभरातील अनेक राज्यांत दुय्यम भूमिका घेत प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याची वेळ काँग्रेसवर आली. बिहारपासून बंगालपर्यंत पारंपरिक शत्रूंसोबत तह झाले. पण यात ना ते पक्ष सुखी झाले, ना काँग्रेस आश्वस्त राहिली
Next
>दिनकर रायकर
संगम हा राज कपूरचा गाजलेला सिनेमा. गोष्टीइतकाच गाण्यांसाठीही गाजलेला. ‘बोल राधा बोल संगम होगा के नही...’ आणि पियानोच्या सुरावटीवरचं ‘दोस्त दोस्त ना रहा...’ ही गाणी कमालीची गाजली. १९६४ साली हा सिनेमा पाहिला तेव्हा ज्याची कल्पनाही केली नव्हती, ते मी आज इतक्या वर्षांनी करतो आहे. संगमच्या गाण्यांचा संदर्भ राजकारणाशी जोडतो आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांचे ताजे वक्तव्य हे त्यासाठी निमित्त ठरले.
‘काँग्रेस पक्ष स्वत: तर बुडालाच, शिवाय आम्हाला सोबत घेऊन बुडाला,’ असे खासदार पटेल यांनी कार्यकर्त्यांसमक्ष सांगण्यास सुरुवात केली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अकोल्यातील निवडणुकांच्या तोंडावर कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेसवर केलेली टीका तीव्र स्वरूपाची आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसने कुठलाही भ्रष्टाचार किंवा घोटाळा केलेला नाही. मात्र आमच्यामागे घोटाळ्याचे आरोप तसेच तपासाचे शुक्लकाष्ठ काँग्रेस नेत्यांनी लावले’, असा दावा खासदार पटेल यांनी अकोल्यात केला. ‘आमचे सरकार राज्यात सत्तेवर असताना काँग्रेसला शिवसेना-भाजपापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस जास्त डाचत होता. पृथ्वीराज चव्हाणांसारख्या काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीला त्रास देण्यासाठी तपासाचे शुक्लकाष्ठ मागे लावले’, असा त्यांचा मुख्य आरोप आहे.
ते एवढ्यावरच थांबले नाहीत. ‘अल्पसंख्याक, दलित काँग्रेसबरोबर असतात, काँग्रेसच जुना पक्ष आहे असे म्हणतात. पण आता तशी स्थिती राहिलेली नाही. काँग्रेसचे वर्चस्व आहे अशी स्थिती कुठे राहिलेली नाही’, असे निरीक्षणही प्रफुल्ल पटेल यांनी नोंदविले आहे.
- हा सारा तपशील इथे विस्ताराने लिहिण्यासही कारण आहे. काँग्रेसच्या महाराष्ट्रातील सर्वात जवळच्या मित्रपक्षातून झालेल्या या टीकेचा राजकीय अन्वयार्थ लावताना हा तपशील आवश्यक आहे.
राष्ट्रवादी आळवत असलेले ‘दोस्त दोस्त ना रहा...’चे धृपद अनपेक्षित नाही. अर्थात ते आताच का? महाराष्ट्रातील सत्ता गेल्यानंतर जवळपास दोन वर्षे लोटल्यानंतर हे अधोरेखित करावेसे का वाटले असेल? ही फक्त राष्ट्रवादी काँग्रेसची भावना आहे, की काँग्रेसचे सगळेच मित्रपक्ष काँग्रेसकडे याच पद्धतीने पाहतात?
- या प्रश्नांचा धांडोळा घेताना मन स्वाभाविकपणे मागे गेले. पत्रकारितेच्या प्रवासातील अनेक घटना, बरेच संदर्भ यानिमित्ताने ताजे झाले. मुदलात काँग्रेसची वाटचाल एकला चलो रे या जातकुळीतली. या पक्षाचा जनमानसावर असलेला पगडा इतका प्रभावी होता, की स्वातंत्र्योत्तर काळात सत्ता संपादनासाठी अन्य राजकीय पक्षांची मदत घेण्याची वेळ काँग्रेसवर आली नव्हती. पं. नेहरूंचा करिश्मा आणि एकूणच काँग्रेसविषयीची देशभरातील व्यापक आस्था यामुळे इतर राजकीय पक्षांना पाय रोवून उभे राहणेही कठीण झाले होते. माकपा, भाकपासारखे डावे पक्ष आणि जनसंघीय त्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत होते. पं. नेहरूंच्या कारकिर्दीत या स्थितीत बदल झाला नाही.
पं. नेहरूंच्या पश्चात लालबहादूर शास्त्रींच्या तुलनेने अल्पकालीन कारकीर्दीतही राजकीय स्थिती बदलली नाही. राष्ट्रीय पातळीवर जे चित्र होते, तेच महाराष्ट्रातही होते. काँग्रेसचा प्रभाव आणि वरचष्मा इतका होता, की इतर पक्षांची मदत या पक्षाला घेण्याची वेळ येणे अशक्यप्राय वाटत होते.
- पण बदल हाच काळाचा स्थायिभाव, असे म्हणतात. नेमके तेच १९६०च्या दशकाच्या अखेरीस अनुभवास आले. इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची वाटचाल सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच म्हणजे १९६९ साली इंदिरा गांधी यांनी आर्थिक सुधारणांच्या दिशेने पहिले मोठे पाऊल टाकण्याची तयारी केली. बँकांच्या राष्ट्रीयीकरणाची तयारी सुरू झाली.
मला आठवते आहे, त्या काळीही बँकांच्या युनियनमध्ये डाव्यांचे वर्चस्व होते. जनसंघाशी नाळ असलेलाही मोठा वर्ग बँकांच्या सेवेत होता. परिणामी राष्ट्रीयीकरणाची प्रक्रिया संघर्षाविना पार पाडावयाची तर डाव्या-उजव्यांचे सहकार्य घेणे क्रमप्राप्त होते. इंदिरा गांधींनी ते घेतलेही. काँग्रेसने इतर पक्षांकडे मागितलेली मदत म्हणून राजकीय इतिहासकारांनी या घटनेची ठळक नोंद घेतली.
असे घडू शकते, याची साक्ष देणारी चंद्रकोर राजकीय नभांगणात उगवली. त्याचे प्रतिबिंब काँग्रेसच्या महाराष्ट्रातील राजकारणातही उमटले.
मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी डाव्यांचा, विशेषत: खूपच आक्रमक व प्रभावी असलेल्या कामगार चळवळीचा प्रभाव कमी करण्यासाठी नवे राजकारण सुरू केले.
भूमिपुत्रांच्या हक्कासाठी स्थापन झालेल्या शिवसेनेचा डाव्यांच्या विरोधात पद्धतशीर वापर करून घेण्याचे तंत्र वसंतरावांनी अवलंबिले. कामगार नेते कृष्णा देसाईंच्या निर्घृण खुनानंतर शिवसेनेवर टीकेचे मोहोळ उठले. याच शिवसेनेचे वामनराव महाडिक विधिमंडळात दाखल होतील, याची व्यवस्था काँग्रेसमधून केली गेली. शिवसेनेचा तत्कालीन मुख्यमंत्र्यांकरवी झालेला वापर उघड होता. परिणामी शिवसेनेला ‘वसंतसेना’ हे राजकीय संबोधनही चिकटले. पुढे आणीबाणीच्या काळात डावे, समाजवादी आणि जनसंघ इंदिरा गांधींच्या विरोधात ठामपणे उभे असताना बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र काँग्रेसची पाठराखण केली. त्यासंदर्भातील एक घटना माझ्या पक्की स्मरणात आहे. १९७७ साली लोकसभा निवडणुकीत आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पानिपत झाले. त्यावेळी जनता पार्टीची विशाल विजय सभा शिवाजी पार्कवर झाली होती. त्या काळी सभेला माणसे भाड्याने आणावी लागायची नाहीत. उत्स्फूर्तपणे त्या सभेला आलेले लोक पायी परत जाताना त्यांच्यावर शिवसेना भवनातून दगड आणि सोडावॉटरच्या बाटल्यांचा पाऊस पडला. बिथरलेल्या लोकांनीही रस्त्यावरचे दगड शिवसेना भवनावर भिरकावले. ते दृश्य अनेकांच्या आजही स्मरणात आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेची तेव्हाची मैत्री त्यानंतर लागलीच अधोरेखित झाली. त्यानंतर काही महिन्यांतच मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक झाली. त्यात मुरली देवरा काँग्रेसकडून निवडून गेले. शिवसेनेच्या सहकार्यातूनच ते शक्य झाले. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना गिरणी कामगारांचा संप फोडण्यासाठीही काँग्रेसने शिवसेनेची मदत घेतली. पण कालांतराने ही मैत्री संपुष्टात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांमधून इंदिरा गांधींची विडंबनात्मक नक्कल सुरू झाली.
१९८० च्या दशकाच्या शेवटाला राममंदिराच्या प्रश्नावर हिंदुत्वाची लाट आली आणि हा दोस्ताना इतिहासजमा झाला. या लाटेने देशाचे राजकारण पुरते ढवळून निघाले. बिगरकाँग्रेसी अल्पजीवी सरकारांनंतर पी. व्ही. नरसिंह राव पंतप्रधान झाले. त्यांचे सरकार वाचविताना काँग्रेसने झारखंड मुक्ती मोर्चासारख्या छोट्या पक्षाची मदत घेतली. पुढे तर परिस्थिती आणखी बदलली.
वाजपेयींच्या नेतृत्वाखालील रालोआला तोंड देण्यासाठी काँग्रेसलाही आघाडीच्या राजकारणाचा आधार घ्यावा लागला. ज्यांना काँग्रेसने कधी मोजलेही नव्हते, त्यांना खाशा पंगतीत बसविण्याची वेळ आली. महाराष्ट्रात शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी पाट लावावा लागला. सत्तेत एकत्र असतानाही राष्ट्रवादीच्या खच्चीकरणाचे प्रयत्न काँग्रेसच्या काही नेत्यांनी केले. ते कुऱ्हाडीचा दांडा... या म्हणीसारखे अंगलट आले.
देशभरातील अनेक राज्यांत दुय्यम भूमिका घेत प्रादेशिक पक्षांशी आघाडी करण्याची वेळ काँग्रेसवर आली. बिहारपासून बंगालपर्यंत पारंपरिक शत्रूंसोबत तह झाले. पण यात ना ते पक्ष सुखी झाले, ना काँग्रेस आश्वस्त राहिली.
- याची प्रचिती आली, की काँग्रेसच्या मित्रांकडून दोस्त दोस्त ना रहा...ची धून आळवली जाते.
यात काँग्रेसचा दोष नाही. राजाला मांडलिकत्व पचनी पडत नाही. दुय्यम भूमिका घेत आघाडी करण्याची मानसिकता काँग्रेसच्या डीएनएत नाही. अगदी व्यावहारिक भाषेत सांगायचे तर...
जमीनदाराला सहकारी शेतीचा प्रयोग किती काळ मानवणार?
काँग्रेसच्या नव्या मित्रांनी एवढे तरी समजून घ्यायला नको का?
(चार दशकांहून अधिकच्या पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले लेखक ‘लोकमत’चे समूह संपादक आहेत.)