असण्या-नसण्यात.
By admin | Published: January 16, 2016 01:16 PM2016-01-16T13:16:50+5:302016-01-16T13:16:50+5:30
कम्प्युटरवरची रेष, हे नवीन माध्यम का असू नये? - हा प्रश्न घेऊन एक जातीचा चित्रकार नव्या डिजिटल माध्यमाशी दोस्ती करतो आणि ब्रशऐवजी आयपॅडला, त्यावर डाउनलोड केलेल्या अॅप्सना आपलं माध्यम बनवतो, तेव्हा काय घडतं?
Next
>सोनाली नवांगुळ
पारंपरिक असो वा आधुनिक,
सर्व प्रकारच्या माध्यमांमध्ये
सहज संचार असणारे प्रसिद्ध चित्रकार
चंद्रमोहन कुलकर्णी यांचं
‘माय वे ऑफ डिजिटल पेंटिंग’
हे पुस्तक ज्योत्स्ना प्रकाशनातर्फे
नुकतंच प्रकाशित झालं आहे.
त्यानिमित्त..
नव्या माध्यमामध्ये काही गोष्टी नसणं हेच त्याचं ‘असणं’ आहे. त्याचं व्यक्तिमत्त्व आहे ते! कॉम्प्युटरवर मारलेली रेष ही आपण नवीन माध्यम म्हणून का स्वीकारू नये?’’ - चंद्रमोहन कुलकर्णींच्या या प्रश्नानंच ‘माय वे ऑफ डिजिटल पेंटिंग’ या त्यांच्या नव्या पुस्तक प्रयोगाविषयीच्या प्रश्नांची उत्तरं सुरू झाली. चंद्रमोहन यांची रेष जशी बाकदार, ठाम आणि हाक घालणारी तसंच त्यांचं बोलणं, लिहिणं! पारंपरिक चित्रकलेची जवळपास सगळी अंगं स्वाभाविकपणो हाताळणारा हा हरफन मौला काहीही नवं करत असेल तर समजून घेणं अनिवार्यच. त्या प्रयत्नात झालेल्या गप्पांचा हा अंश..
लहानपणी शेवटचा वरणभात खाऊन झाला की त्या ओलसर ताटात मी बोटानं चित्रं काढत राहायचो. आई दणकवायची, कसला हा नाद म्हणून! - ते काही पेंटिंग नव्हतं. तो हाताला, मनाला लागलेला चाळा. तो काही सुटायचा नाही. चित्रकारितेशीही असाच चाळा करत प्रत्येक माध्यमाची बलस्थानं आणि मर्यादा शोधाव्यात, त्यातून नवं भान यावं याचं मला आकर्षण वाटतं. काळानुरूप समोर आलेलं तंत्रज्ञानसुद्धा मला हाक मारतं. कुठल्याच माध्यमाशी फटकून वागणं मला शक्य नाही. कॉम्प्युटर-मोबाइलसारखी साधनं वापरून चित्रं काढण्याची मला भीती नाही. मुळात आपण माध्यमांना फार महत्त्व देऊन ठेवतो. त्यामुळे मग त्याची भीती येते. आपल्याकडं नवं स्वीकारण्यासाठी पुष्कळदा लोक, ज्येष्ठ कलावंत तयार नसतात.
पण मुळात भीती कसली?
नव्याचा स्वीकार का होत नाही?
- एक बरं की मी जरा कमी पवित्र माणूस आहे. कागदावर रंग आणि ब्रशनी केलेलं चित्रच पवित्र असं मी मानत नाही. माझा स्टुडिओ पाहाल तर एक खोली कॉम्प्युटरची आहे. तिथे फक्त तेवढंच. उपयोजित प्रकारचं खूपसं काम तिथे चालतं माझं. ते आटोपून मी दुस:या खोलीत येतो. तिथे रंग, ब्रश, कॅनव्हास, कागद, खडू, इझल, रंग पुसायची फडकी आणि तो विशिष्ट वास असं सगळं असतं. तिथून इथे आलो की मी तिथलं विसरतो. तिथे ‘अनडू’ कमांड आहे, ती इथे नाही. इथे रंग सांडणार, पाणी पडणार, ती पुसायची फडकी लागणार. दोन्हीतल्या फरकाचं जास्त भान ठेवावं लागतं. बायको आणि मैत्रीण यांच्यात घोळ घालतात तसा इथे घालून चालणार नाही. मग पंचाईत होते. - मात्र डिजिटल माध्यमात काम करताना पारंपरिक चित्रकलेवरचं प्रेम मात्र अजून वाढायला मदत होते, म्हणजे मला झाली हे खरंच!’’
- पण एक माध्यम हाताळताना का नि कसं वाढतं दुस:या माध्यमाबद्दलचं प्रेम?
- लोकांना, काही कलावंतांनाही वाटतं की कॉम्प्युटरवर किंवा डिजिटल माध्यमात काम केलं की ‘तयार’ मिळणार सगळं! चित्र काढण्याचं बरचसं काम आपला आयपॅड आणि त्यावर डाउनलोड केलेलं अॅप करतं आणि आपल्याला फारसं काही करावं लागत नाही असाही एक मोठा गैरसमज आहे. असं ‘रेडी’ काही मिळत नाही. चित्रं ‘काढावं’ लागतं आणि त्यासाठी ते मनात, मेंदूत असावं लागतं. त्याकरता पारंपरिक चित्रकलेच्या माध्यमाशी ओळख असावी लागते. ज्यांना ती नाही व डिजिटल माध्यम वापरायचं आहे त्यांना ती करून घ्यावीच लागेल.
कारण डिजिटल माध्यमाचा डोलारा पारंपरिक माध्यमाच्या पायावरच उभा आहे. डिजिटल माध्यमातून कॅनव्हासवर मी गेली दोन-अडीच र्वष प्रयत्न करून त्याच्या शक्यता शोधल्या, फरक जाणले. स्वाभ्यासानं आणि संशोधनानं मला हे तंत्र ब:यापैकी अवगत झालं.
इथे कॅनव्हासची साइज, त्यातल्या नाईफची, ब्रशची ठरावीक सीमेपर्यंतच वाढणारी जाडी, पिक्सेलचं तंत्र अशा नियमबद्ध चौकटीत काम करून मी पुन्हा पारंपरिक आणि बंधमुक्त अशा चित्रकारितेकडे वळतो, तेव्हा त्यातली नवी शक्तिस्थळं उमगून माझं ज्या त्या माध्यमांवरचं प्रेम दाट होतं. नव्याला कमी लेखून जुन्याची निष्ठा नाही दाखवता येत!’’
चित्रकलेची किमान समज असणा:यांनी हे पुस्तक वाचलं नि त्यातलं करून पाहिलं की डिजिटल चित्र काढणं सोपं जाईल?
- इथे मला चित्रकलेच्या विचाराबद्दल, सर्जनात्मक प्रक्रि येविषयी बोलायचं नाही. डिजिटल माध्यम तुम्हाला प्रभावीपणो कसं हाताळता येईल हे मात्र मी सांगितलेलं आहे. संगीताचंच पाहा.
तिथले लोक कुठलीही नवी गोष्ट किती लवकर स्वीकारतात!
डिजिटल तंत्रचा संगीतात ज्या प्रमाणात उपयोग झाला तितका चित्रकलेत नाही झाला. आजही चित्रशाळांमध्ये कलेच्या दृष्टीने कॉम्प्युटर शिकवला जात नाही. 2क्15 सालात सर्वात तरुण असणारं डिजिटल माध्यम ‘मुख्य’ असायला हवं, कारण त्याशिवाय काम पुढे जात नाही. हे क्षेत्र मोठं आहे. प्रसारमाध्यमांमध्ये, टीव्हीवरती, जाहिरातींमध्ये, त:हेत:हेच्या इव्हेंट्समध्ये या माध्यमाचा चांगला वापर अनेक तरुण,
नवे चित्रकार करू शकतात. नेटवर फोरम असतात अॅप्सवाल्यांचे. तुमचं काम अपलोड केलं की तुम्हाला या क्षेत्रत काम करणारे चार नवे लोक माहिती होतात, तुमचा संवाद होतो. कुणी काय काम केलंय बघता येतं. पण या सगळीकडेच चित्रकला खूप सिंथेटिक पातळीवर हाताळल्यामुळे तीत ‘जीव’ आलेला नाही. फक्त अॅप्लिकेशन म्हणून पाहिलं गेलं.
मला यात नवनिर्मितीच्या दाट शक्यता जाणवल्या म्हणून या तंत्रची प्रभावी हाताळणी करण्याबद्दल मी लिहिलं आहे. डिजिटल माध्यम आणि पारंपरिक माध्यम यांच्याशी भिडतानाच्या संवेदना, त्यावेळी मेंदूतून पाझरणारी रसायनं वेगळीच असणार हे उघड आहे; पण ‘वेगळी’ काय हे तपासून बघायला हवं ना?
माध्यमांवर अपेक्षा लादायची गरज नाही. वेगवेगळ्या माध्यमातून येणा:या निर्मितीच्या शक्यतांचा विचार तुम्हाला गंडातून, गैरसमजातून मोकळं करतो..
मोकळं व्हायला हवं!
sonali.navangul@gmail.com