पर्यटक नव्हे पाहणा

By admin | Published: January 24, 2015 02:44 PM2015-01-24T14:44:44+5:302015-01-24T14:44:44+5:30

समजा तुम्ही दक्षिण आफ्रिकेत प्रवासाला जाताय, तिथे हॉटेलऐवजी कुणा कुटुंबाच्या घरीच राहता आलं, त्यांच्याकडेच जेवणाची व्यवस्था झाली, त्यांच्याबरोबरच खरेदीसाठी फिरता आलं, आणि त्यांचाच तरुण मुलगा आफ्रिकन सफारीसाठी तुमचा गाइड असला, ..तर?

Not seeing tourists | पर्यटक नव्हे पाहणा

पर्यटक नव्हे पाहणा

Next

 जगाच्या एका टोकाला राहणार्‍या कुणा भटक्याला जगाच्या दुसर्‍या टोकावरचा समानधर्मा शोधून देण्याची ऑनलाइन यातायात

 
- अर्चना राणे-बागवान
 
ब्रायन चेस्की आणि जो गिबिया हे दोघे रूममेट्स. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहायचे. खिशात कडकी. अपार्टमेंटचं भाडंही परवडणं मुश्कील अशी परिस्थिती होती. त्याच झगझगीत असताना त्यांनी एक जाहिरात पाहिली. इंडस्ट्रीयल डिझायनर्स सोसायटी ऑफ अमेरिका (आयडीएसए) तर्फे एक मोठी कॉन्फरन्स होणार होती. त्यासाठी येणार्‍या प्रतिनिधींपैकी ज्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये करणं शक्य झालं नाही, त्यांच्यासाठी राहणं आणि नाश्ता अशा सोयी पुरवण्याची तयारी असलेल्या कुटुंबांसाठी कमी दिवसांत पैसे मिळवण्याची संधी अशी ती जाहिरात होती. ती वाचून ब्रायन आणि जो ने आपल्या लिव्हिंग रूममध्ये तीन गाद्या टाकून एक तात्पुरती बेडरूम तयार केली आणि तीन प्रतिनिधींच्या राहण्या-जेवणाची सोय करून पैसे कमावले.
- ही आयडिया भलतीच भारी होती.
ब्रायन आणि जो यांनी आपल्या घरातली जागा अशी  ‘तात्पुरती’ देऊन पैसे कमावण्याच्या आणखी संधी शोधल्या आणि काही दिवसांतच पर्यटनातल्या एका नव्या ट्रेण्डने आकार घेतला - ‘एअर बेड अँण्ड ब्रेकफास्ट’ - ब्रायन, जो आणि त्यांचा तिसरा पार्टनर नाथन यांनी स्थापन केलेली कंपनी. विविध देशांत राहणार्‍या लोकांसाठी एकमेकांच्या घरीच (विकतच्या) पाहुणचाराची सोय करून देणारं इंटरनेटवरचं पहिलं संकेतस्थळ.
देश-विदेशात प्रवासाला गेल्यावर हॉटेलमध्ये राहण्याऐवजी एखाद्या स्थानिकाच्या घरी राहणं, त्या कुटुंबाबरोबर फिरणं-जेवणं यातून तो देश अधिक जवळून अनुभवता येणं हा या व्यवस्थेतला मोठा फायदा. आणि हे सारं कमी खर्चात उपलब्ध होणं हा दुसरा.
जगाच्या एका टोकाला राहणार्‍या कुणा भटक्याला जगाच्या दुसर्‍या टोकावरचा समान धर्म शोधून देण्याची सगळी यातायात ‘एअर बेड अँण्ड ब्रेकफास्ट’च्या (एअर बीएनबी) माध्यमातून केली जाते.
ऑगस्ट २00८ मध्ये एअर बीएनबीचं अधिकृत संकेतस्थळ सुरू झालं. आजवर या कंपनीद्वारे १९0 देशांतील ३४ हजार शहरांमध्ये तब्बल आठ लाख यजमानांची (होस्ट्स) साखळी तयार केली गेली आहे. कंपनीचं मुख्यालय सॅन फ्रान्सिसकोमध्ये आहे. 
एअर बीएनबीवर होस्ट आणि गेस्ट अशी विभागणी केलेली असते. दोघांनाही सर्वप्रथम आपलं अकाउण्ट, प्रोफाइल तयार करावं लागतं. या प्रोफाइलच्या माध्यमातून पर्यटकाला यजमानाबाबत, तर यजमानाला पर्यटकांविषयीची संपूर्ण माहिती मिळते. जोवर एखादा पर्यटक एखाद्या होस्टच्या घरी राहायचं ठरवत नाही, तोपर्यंत त्या होस्टला संपर्ककरण्याविषयीची माहितीच काय साधं त्याचं संपूर्ण नावही पर्यटकाला कळू दिलं जात नाही. या कम्युनिटीवर यजमानाला आपण करत असलेल्या राहण्याच्या व्यवस्थेची सर्व छायाचित्रं पोस्ट करावी लागतात. मग ती अगदी त्याच्या रूममधल्या जमिनीवर घातलेली छोटी गादी असो वा एखादं सुसज्ज अपार्टमेंट. सर्व सोयी-सुविधांची सविस्तर माहिती भाडेकिंमतीसह देणंही बंधनकारक असतं. आसपास असलेल्या सुविधांबाबतही (मार्केट, फिरण्यासारखी ठिकाणं वगैरे) माहिती द्यावी लागते. आपण देत असलेल्या सुविधांनुसार व जागेनुसार योग्य ते पैसे ठरवावे लागतात. शेवटी सर्व माहिती छायाचित्रांसह एअर बीएनबीच्या होस्ट पेजवर अपलोड करावी लागते. 
कोणी आपल्या घरी राहायला यावं हे ठरवण्याचं  स्वातंत्र्य यजमानाला असतं. तुमच्या घरी राहायला येऊ इच्छिणार्‍या पर्यटकाची संपूर्ण माहिती जाणून घेऊन मगच त्याची रिक्वेस्ट स्वीकारायची की नाकारायची हे तुम्ही ठरवू शकता.
- पैसे टाकून हॉटेलांमधली विकतची कोरडी व्यवस्था स्वीकारायची आणि जगात कुठेही जा, त्याच प्रकारच्या हॉटेलच्या तशाच खोलीत त्याच सवयीच्या चवीचं अन्न विकत घ्यायचं हे ‘आऊटडेटेड’ ठरत असतानाच्या या काळात पर्यटकांना आस आहे ती जिथे जाऊ तो देश त्याच्या रूप-रंगासह, चवी-ढवींसह अनुभवण्याची. त्यासाठी रुळू लागलेली ही नवी ऑनलाइन वाट.
- एकदा चालून पाहायला काय हरकत आहे?
ऑस्ट्रेलियात कुणा स्टिफनीच्या फार्म हाऊसवर राहायला जायला आणि एखाद्या इटालियन नाहीतर क्यूबन कुटुंबाला आपल्या घरी राहायला बोलावून पाहायला काय हरकत आहे?
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)

Web Title: Not seeing tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.