हे काही महायुद्ध नाही..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:02 AM2020-03-15T06:02:00+5:302020-03-15T06:05:03+5:30
आताची परिस्थिती आणीबाणीची आहे. लोकांमध्ये इतकी अस्वस्थता कधीच नव्हती; पण त्याला इतकं काय घाबरायचं?
- जॉर्जिओ रॉसेटी
कोरोना व्हायरसनं आमच्याकडे थैमान घातलं आहे. लोक भयभीत झाले आहेत. सरकारनंही लोकांना घराबाहेर न पडण्याची, सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याची विनंती केली आहे. काही प्रतिबंधात्मक उपायही योजले आहेत. त्यामुळे आजच्या घडीला इथल्या बर्याच उद्योगधंद्यांना टाळे लागले आहे. बार, रेस्टॉरण्ट्स, चित्रपटगृहे, थिएटर्स बंद आहेत. बहुतेक कंपन्या, संस्थांनी आपापल्या कर्मचार्यांना घरून काम करण्याची (वर्क फ्रॉम होम) परवानगी दिली आहे. ज्या कर्मचार्यांना कार्यालयीन ठिकाणी जाण्याशिवाय गत्यंतरच नाही, असे लोकच फक्त प्रत्यक्षात कामावर जात आहेत. आत्यंतिक गरजेशिवाय आणि आता बाहेर पडावंच लागेल, अशी परिस्थिती उद्भवल्याशिवाय लोकांनी घराबाहेर पडणं बंद केलं आहे. अनेकांनी आपापल्या घरात किराणा साठवून ठेवला आहे. तो संपल्यावर, पुन्हा भरण्यासाठी फक्त काही वेळ ते किराणा दुकानांत जात आहेत.
आमचं अख्खं शहर रिकामं आहे. रस्त्यावर सन्नाटा आहे. अर्थात गेल्या काही दिवसांपासून मीही घराबाहेर पडलेलो नाही; पण जे फोटो आणि व्हिडीओ मी पाहिलेत, त्यातलं चित्र तरी असं दिसतं आहे. जणू काही एका आभासी आणि अतार्किक परिस्थितीत आम्ही सारेच जगतो आहोत. आयुष्यात पहिल्यांदाच अशी परिस्थिती आम्ही अनुभवतो आहोत. काय करावं, कोणालाच काहीच सुचत नाहीये; पण सरकारी सूचना मात्र प्रत्येक जण आता गांभीर्यानं पाळतो आहे.
सगळ्याच गोष्टी बंद पडल्याचा फटका मुलांच्या शिक्षणालाही बसला आहे. पण त्यावर पर्याय म्हणून अनेक शाळांनी आता डिजिटल, व्हच्यरुअल क्लासरूम्सचा पर्याय अवलंबायला सुरुवात केली आहे.
आताची परिस्थिती आणीबाणीची आणि अभूतपूर्व अशी आहे. लोकांमध्ये इतकी भीती यापूर्वी मला कधीही दिसली नव्हती. तरीही एक गोष्ट मात्र मला आवर्जून सांगावीशी वाटते, आमचं घराणं स्वातंत्र्यसैनिकांचं आहे. आपल्या वयाच्या केवळ पंचविशीत असताना माझ्या दोन्ही आजोबांनी दुसर्या महायुद्धात भाग घेतलेला आहे. त्या महायुद्धाच्या जखमांचे व्रण घेऊन आयुष्यभर ते जगले. काय असतील त्या वेदना? आता तर फक्त काही आठवडे आम्हाला घरात, सोफ्यावर आरामात बसायचं आहे. बाकी काहीच करायचं नाहीये. महायुद्धापेक्षा तर ही परिस्थिती बिकट आणि गांभीर्याची नाही ना? मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे?
त्यातल्या त्यात वाईट गोष्ट एकच की, आमचं सोशल लाइफ जवळपास पूर्णत: बंद झालं आहे. मित्र आणि आमच्या नातलगांसोबतच्या आमच्या भेटीगाठी बंद झाल्या आहेत. आमच्यासारख्या सोशल लोकांना ही गोष्ट जरा कठीणच जातेय; पण त्याची मनोमन तयारी आता प्रत्येकानं केली आहे.
प्रत्येक जण आपल्या गरजेनुसार बाहेर पडू शकतो, कामावर जाऊ शकतो, किराणा आणण्यासाठी वाटेल तेव्हा बाहेर पडू शकतो; पण त्यावर प्रत्येकानंच स्वनियंत्रण आणलं आहे. गर्दीचा त्रास होऊ नये म्हणून सुपरमार्केटसारख्या ठिकाणी मात्र काही निर्बंध आणले आहेत. तिथे काही काळ थांबावं लागू शकतं एकमेकांपासून दोन किंवा चार मीटरचं अंतर राखून रांगेत उभं राहावं लागू शकतं; पण त्याची मानसिक तयारी आता प्रत्येकानंच ठेवली आहे.
(लेखक इटलीतील रहिवासी आहेत.)
(मुलाखत आणि शब्दांकन : समीर मराठे)