सुन्न वास्तव.

By admin | Published: September 26, 2015 02:10 PM2015-09-26T14:10:54+5:302015-09-26T14:10:54+5:30

टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील विचक्षण ‘दृश्यांची’ चित्रमालिका.

Numb reality | सुन्न वास्तव.

सुन्न वास्तव.

Next
>- अशोक राणे
 
 
कुठल्या फिल्म्स पाहिल्या आज?’’
आपण आपल्या जागेवर येऊन बसतो आणि स्थिरावतो तोच शेजारी बसलेली व्यक्ती विचारतेच. जगभरच्या सर्वच चित्रपट महोत्सवांत हा अनुभव येतो. यातून दोन गोष्टी साधतात. एक तर महोत्सवात पाहिलेल्या चित्रपटांवर तिथल्या तिथे संवाद होतो. त्या-त्या चित्रपटांसंबंधीचे नवनवे पैलू उलगडतात. ‘जातभाईं’कडून दरवेळी वेगळं काही तरी हाती लागतं आणि याचा खूप फायदा होतो. टोरांटोमध्ये हेच सारं मी नव्या कुतूहलाने अनुभवतोय.
आपल्याकडे खूप वेळा मला विचारलं जातं की, ‘आपले’ चित्रपट असे का आणि ‘त्यांचे’ तसे का? या प्रश्नाचं उत्तर चित्रपट साक्षरतेत आहे. ‘इथे’ अशी साक्षरता आहे म्हणूनच ‘रूम’ सारखे चित्रपट बनतात. अगदी पॅलेस्टाईनच्या युद्धभूमीवरदेखील ‘द आयडोल’ सारखी कलाकृती निर्माण होते.
हेनी अबू-असद या पॅलेस्टिनच्या दिग्दर्शकाच्या ‘द आयडोल’मध्ये टीव्हीवरच्या रिअॅलिटी शोमधून निर्माण झालेल्या एका आयडोलची गोष्ट आहे. मुळात ही एक सत्य घटना आहे. तिचा नायक मोहम्मद असाफ खराखुरा आहे. याक्षणी तो आपल्या या जगात आपल्या आसपास वावरतो आहे. रिअॅलिटी शोज आणि त्यातून जन्माला येणा:या सेलिब्रिटीज यांच्या पल्याड जाणारा हा मोहम्मद असाफ आहे. कारण तो गाझा पट्टीतून पुढे आलेला पॅलेस्टिनीयन आहे. आत्ता, अगदी अलीकडे म्हणजे 2क्13 मध्ये त्याने मध्यपूव्रेतला ‘अरब आयडोल’चा किताब प्राप्त केला. जगात कुठेही कधीही त्याला जाता यावे म्हणून त्याला अक्षरश: अख्ख्या जगाचा व्हिसा देण्यात आला आहे. कारण तो आहे पॅलेस्टाईनच्या शांतीचा दूत. त्याची सगळी कहाणीच एक विलक्षण आख्यायिका आहे.
लहानपणापासूनच त्याला गाण्याचं वेड होतं. संगीत त्याच्या रोमरोमात भिनलेलं होतं. त्याची धाकटी बहीण नूर हिला भावातल्या या प्रतिभेचा शोध लागतो आणि ती मुलगी असूनही पुढाकार घेते. त्याच्या पाठीशीच नव्हे तर बरोबरीने उभी राहते. ही दोन भावंडं आणि त्याचे दोन मित्र अश्रफ आणि ओमर असा या चौघांचा बँड उभा राहतो. विवाह सोहळ्यात गाण्याची त्यांना संधी मिळते. मोहम्मदच्या विलक्षण गायकीला सर्व थरातून दाद मिळते. मोहम्मदपेक्षाही नूर एक फार मोठं स्वप्न पाहत असते. इजिप्तची राजधानी कैरोमधल्या भव्य ऑपेरा थिएटरमध्ये मोहम्मदने गाण्याचं.. परंतु पुढे जे अनेक अडथळे त्यांच्या वाटेत उभे राहणार असतात त्याची सुरुवात याच वळणावर होते. नूरला किडनीचा आजार जडतो. तिच्यावरच्या महागडय़ा उपचारासाठी पैसा उभा करण्यासाठी मोहम्मद सर्वप्रकारे प्रयत्न करतो. परंतु त्याला यश येत नाही. नूरचा मृत्यू तो टाळू शकत नाही. त्याने तो पार खचून जातो. संगीत सोडून देतो. मात्र एक दिवस तो रस्त्याने अक्षरश: सरपटत जाणा:या माणसाला पाहतो आणि त्याच्यातली ईर्षा जागी होते. शिवाय, ‘तू एक दिवस खूप मोठा गायक होशील’ हे नूरचे शब्द सतत त्याला स्मरण देत राहतात. आणि मग मोहम्मद पुन्हा एकदा जोमाने उभा राहतो. अडथळे, अडचणी नवनवी रूपं घेऊन उभ्या राहतात. परंतु मोहम्मदला आता कुणीच रोखू शकत नाही.. आणि तो अरब आयडोलची स्पर्धा पहिल्या क्रमांकाने जिंकतो. ‘द आयडोल’ची कथा मुद्दामच इतकी तपशीलवार सांगितली. वाचणा:याची पहिली प्रतिक्रिया होईल. काय एवढं विशेष आहे यात? नसेल. नव्हे नाहीच. पॅलेस्टाईनमध्ये हे सारं घडतंय एवढं एक विशेष सोडलं तर ही कुठल्याही मेलो. मेलो. मेलोड्रामा सिनेमाची गोष्ट वाटावी असा सारा प्रकार आहे. त्यात पुन्हा त्यात लहान मुले आणि त्यांचे नाना उद्योग. म्हणजे मग बघायलाच नको. परंतु इथेच या चित्रपटाचं वेगळेपण आहे. कुठल्याही क्षणी मेलोड्रामाच्या काठाला सहजपणो लागू शकणारी गोष्ट अलगद वळसा घेत पुढे जाते आणि मग हाती लागतो एक निखळ अनुभव देणारा रोखठोक सिनेमा! कायम स्मरणात राहील असा! पटकथा कशी असावी याचा वस्तुपाठ समोर ठेवणारी या चित्रपटाची पटकथा अभ्यास करावी अशीच आहे. एकूणच गोष्टीला, आशयाला सहजपणो पुढे नेत आवश्यक ती नाटय़मयता अचूक साधणारा हा चित्रपट आहे. आणखी एका गोष्टीसाठी आवजरून दाद द्यायला हवी आणि ती म्हणजे रंगभूषा- मेकअप! लहान वयातला देखणा, लोभसवाणा मोहम्मद तरुणपणी अगदीच कसाबसा दिसतो. परिस्थितीने आधीचा सारा निरागसपणा कुठल्या कुठे निपटून टाकल्यासारखा पार ओकाबोका दिसणारा, रोडावलेला, ओबडधोबड. आणि मग त्याच मोहम्मदचं वळणावळणावर पालटत जाणारं रूप! मेकअपमधले बारकावे सहजपणो नजरेत भरतात आणि अर्थातच दाद घेऊन जातात. संगीताबद्दल तर बोलायलाच नको. अरबी गायकीच्या नाना त:हा संगीताची बाजू दणकट करून जातात. 
सालेम ब्राrी या अल्जेरियन दिग्दर्शकाच्या ‘लेट देम कम’ या फ्रान्स-अल्जेरिया यांची संयुक्त निर्मिती असलेल्या चित्रपटाचे एक निर्माते आहेत. जागतिक ख्यातीचे दिग्दर्शक कोस्टा गावरास! ‘ङोड’, ‘हना के’, ‘मिसिंग’ आदि जागतिक सिनेमातील श्रेष्ठ कलाकृती ठरलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक कोस्टागावरास जगभर ओळखले जातात राजकीय पटकर्ते म्हणूनच! त्यामुळे ‘लेट देम कम’ हादेखील प्रखर राजकीय पट असणार हे ओघानेच आलं.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या अवघ्या दोन दशकांनंतर ऐंशीच्या दशकात अल्जेरियात इस्लामी मूलतत्त्ववाद्यांनी जो दहशतवाद आणला त्या काळातली ही गोष्ट आहे. इथले मुस्लीम आणि पार तिकडचे मध्यपूव्रेतले यात तशी ब:यापैकी तफावत. परंतु तालिबान्यांकडून स्फूर्ती घेऊन काही धर्माधांनी जवळपास दशकभर अल्जेरियात अनागोंदी निर्माण केली. सामान्यांचं जगणं बिकट करून टाकलं. कुणाला कशाचीच शाश्वती राहिली नाही. परंतु याही परिस्थितीत जनतेने या दहशतवादाला भीक न घालता धैर्याने परिस्थितीला तोंड दिलं. आणि म्हणूनच चित्रपटाचं शीर्षक आहे. ‘लेट देम कम’! परंतु त्याची किंमतही अल्जेरियन जनतेला मोठय़ा प्रमाणात मोजावी लागली. त्यांच्या आप्तस्वकियांच्या निर्घृण हत्त्या त्यांना पाहणं भाग पडलं. चित्रपटाच्या नायकाला ज्या अवस्थेतून जावं लागतं ते तर पार हादरवून टाकणारं आहे.
नूरुद्दीन आपली पत्नी यास्मिना आणि दोन मुलांसह याच दहशतीच्या छायेत वावरतो आहे. पण घाबरून कसं चालणार, दैनंदिन व्यवहार तर पार पडायलाच हवेत याच मताचा तो आहे. सगळा समाजच या धारणोतून जातो आहे. काहींची माथी भडकलीत. येतील आज ना उद्या था:यावर असाही विश्वास मनामनांत आहे. आणि त्याला तडा देणा:या, थरकाप उडविणा:या घटनाही सभोवताली घडत आहेत. नूरुद्दीनच्या खास मित्रचीही निर्घृण हत्त्या झाली आहे.
उपनगरात राहणारा नूरुद्दीन काही महत्त्वाच्या घरगुती कामासाठी शहरात जातो. त्याची छोटी मुलगी त्याच्या सोबत आहे. वाटेत एका ठिकाणी त्याची गाडी बंद पडते. दिवेलागणीची वेळ होत आलेली असते. कुणाची तरी मदत घ्यावी म्हणून रस्त्याकडेच्या वस्तीत नूरुद्दीन जातो आणि तिथलं दृश्य पाहून थिजून जातो. मुली, स्त्रिया यांचे छिन्नविच्छिन्न देह इथे तिथे लटकलेले असतात. नूरुद्दीन घाबरतो. मुलीच्या नजरेस पडणार नाही अशा बेताने तिला घेऊन पळत सुटतो आणि दहशतवादी त्याला गाठतात. उचलून छातीशी घेतलेल्या मुलीला तो इतकं गच्च आवळून धरतो की ‘मी गुदमरतेय बाबा’ हे तिचे शब्दही त्याच्या कानी येत नाहीत. समोर उभ्या ठाकलेल्या दहशतवाद्यांनी आपल्या मुलीच्या देहाची विटंबना करू नये म्हणून तोच आपल्या हाताने तिचं नरडं आवळतो. दहशतवाद क्रौर्याचं एक महाभयानक टोक गाठतो.
‘द आयडोल’ आणि ‘लेट देम कम’ या दोन्ही चित्रपटांना सत्य घटनांचा आधार आहे. म्हणजेच यातून आजच्या जगाचंच वास्तव समोर येत आहे.
मूळच्या डॉक्युमेंटरीमेकर असलेल्या सालेम ब्राrी याचा हा पहिलाच कथापट! परंतु त्याची माध्यम जाण इतकी प्रगल्भ आहे की कुठेही असं वाटत नाही की हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे.
 
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत.)
 
ashma1895@gmail.com

Web Title: Numb reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.