नूपुरनाद..

By admin | Published: August 5, 2016 06:29 PM2016-08-05T18:29:23+5:302016-08-05T18:29:23+5:30

कलेच्या स्वतंत्र वाटचालीत भेटलो आणि आयुष्याचा प्रवास सोबत करायचे ठरवले तेव्हा एकमेकांना एक वचन दिले.. परस्परांशी कधीही स्पर्धा न करण्याचे. पण एका टप्प्यावर वाटू लागले, एकमेकांच्या कलेचा आदर ठीक आहे, पण त्याहीपुढे जाऊन काही करता येईल?

Nupuranad .. | नूपुरनाद..

नूपुरनाद..

Next
>शब्दांकन - वन्दना अत्रे
 
स्वाती व धनंजय दैठणकर.
कलेच्या स्वतंत्र वाटचालीत भेटलो आणि आयुष्याचा प्रवास सोबत करायचे ठरवले तेव्हा एकमेकांना एक वचन दिले.. परस्परांशी कधीही स्पर्धा न करण्याचे. पण एका टप्प्यावर वाटू लागले, एकमेकांच्या कलेचा आदर ठीक आहे, पण त्याहीपुढे जाऊन काही करता येईल? कलाकार म्हणून अधिक समृद्ध करणारे आणि कलेची नव्याने परीक्षा घेणारे असे काही? त्यातूनच आकाराला आला एक सहप्रयोग..
संतूर-भरतनाट्यमची शुद्धता जपणारा आणि दोहोंतली सुंदरता गुंफणारा...
 
नमस्कार. मी स्वाती, भरतनाट्यमची साधक कलाकार. मी धनंजय, संतूरवादक. एरवी, पोस्टाच्या पाकिटावर आणि बँकेच्या खात्यावर असलेली आमची ओळख श्री. आणि सौ. दैठणकर अशी आपली सर्वसामान्य असली, तरी रोजच्या आमच्या जगण्यात मात्र आमची कला हेच आमच्या जगण्याचे मक्सद. अनेकदा त्याच्याही पलीकडे जाणारे. त्या कलेमुळेच तर भेटलो एकमेकांना. जगण्याचा आपला म्हणून एक ध्यास घेऊन स्वतंत्रपणे वाटचाल सुरू असताना भेटलो आणि लग्न करायचे ठरवले तेव्हा हुंडा-वरदक्षिणा अशा पारंपरिक देवाणी-घेवाणीपेक्षा फार मौल्यवान असे काही आम्ही एकमेकांना दिले, ते होते वचन. कलाकार म्हणून कधीही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्नही न करण्याचे, परस्परांशी कधीही स्पर्धा न करण्याचे. पण एका टप्प्यावर आलो तेव्हा वाटू लागले, हे स्वतंत्रपणे एकमेकांच्या कलेचा आदर करीत जगणे ठीक आहे, त्याच्या पुढे जाऊन काही करता येईल? एकमेकांना कलाकार म्हणून अधिक समृद्ध करणारे असे, आपल्या कलेची नव्याने परीक्षा घेणारे असे काही? 
संतूर आणि भरतनाट्यम यांची शुद्धता जराही ढळू न देता, या दोहोंत जी सुंदरता आहे ती एकत्र आणता येईल? प्रयत्नांचा पहिला भाग होता तो स्वातीच्या नृत्यनाटिकांना धनंजय यांनी दिलेल्या चाली. संतूरवादक म्हणून संगीताचा विचार करणे आणि एखाद्या विषयाला अनुरूप, त्याला उठाव देणाऱ्या चाली सुचणे या दोन भिन्न गोष्टी. वेगळ्या प्रतिभेची मागणी करणाऱ्या. या अनुभवाने आम्हाला खूप काही दिले. सहजीवनात आणि कलाकार म्हणून. एक तर, असे काम करणे हा आमचा एक प्रकारे एकत्र केलेला रियाज होता. संगीत-नृत्यावर आम्ही स्वत:शी जो विचार करतो, बाहेरच्या जगाकडे आपल्या चष्म्यातून बघत जे संस्कार घेतो, टिपतो त्याची देवाणघेवाण यानिमित्ताने होत राहिली. आणि दुसरे, व्यावहारिक पातळीवर काम करताना आमच्या कौटुंबिक अडचणी कधी आमच्या वाटेत आल्या नाहीत. कारण कोणत्याही वेळी, आमच्या सोयीने काम करणे आम्हाला शक्य होते. हा प्रयोग आम्हाला दोघांना आमच्या आजवर न जाणवलेल्या सामर्थ्याची ओळख करून देणारा होता. धनंजयसाठी हे संतूरच्या पलीकडे जाऊन एका वेगळ्या शैलीसाठी रागसंगीताकडे बघण्याचे शिक्षण होते तर स्वातीला, नृत्यासाठी संतूरच्या वैशिष्ट्यांची नव्याने ओळख होण्याचे होते. या अनुभवाची बीजे दोघांच्या मनात खोलवर कुठेतरी होती, ज्याला अंकुर फुटले ते ‘नूपुरनाद’ या आमच्या वेगळ्या प्रकारच्या सहसादरीकरणाच्या प्रयोगात. 
आमच्या कलेकडे सर्वस्वी नव्या दृष्टिकोनातून बघण्याचा, त्याला संदर्भाच्या एका नव्या चौकटीत बसवण्याचा हा प्रयत्न होता. कधी थकवून टाकणारा, तर कधी कित्येक तास काम करण्याची ऊर्जा देणारा. या प्रवासात आम्हाला जाणवले, संतूरचे तरल स्वर आणि भरतनाट्यममधील अभिनय यांची सांगड घालता येऊ शकेल. संतूरमधील छंद आणि नृत्यातील नृत्य हे छान एकत्र जमून येते. या अनुभवातील नितांतसुंदर गोष्ट कोणती होती ठाऊक आहे? आजवर भरतनाट्यम शब्दांच्या साहाय्याने मांडत होते, आता प्रथमच स्वरांना नृत्याकार द्यायचा होता. आणि हा प्रवास निर्गुण स्वरांकडून सगुण नृत्याकडे आणि परत निर्गुण अशा अनुभवाकडे नेणारा होता. आत्ता ती घटना आठवतेय.. 
इटलीतील एका छोट्या, कॅबेला गावातील ही गोष्ट. ‘नूपुरनाद’ बघण्यासाठी पाच हजार प्रेक्षकांचा भरगच्च समुदाय समोर होता. भारतीय संगीत-नृत्याचे बहुरंगी जग फारसे न जाणणारा, पण त्याविषयी अमाप कुतूहल असलेला. एका परीने आमच्या नव्या प्रयोगास अनुकूल असा. भारतीय संगीतातील नियम काट्यांच्या तराजूपासून आणि सोवळ्या-ओवळ्याविषयी आग्रही असणाऱ्या वर्गापासून दूर असलेला. पण म्हणूनच मनावर काहीसे दडपण होते. आमचा हा प्रयोग या श्रोत्यांना भारतीय संगीताच्या गाभ्यात असणाऱ्या आनंदकंदापर्यंत घेऊन जाईल? स्वर आणि तालाच्या एकत्र संवादातून, मुरक्या-खटक्यातून जे काही निर्माण होते तो आनंद आणि त्यातून एका असीम शांततेकडे नेणारी वाट यांना पण भेटेल? हे दडपण कलाकार म्हणून आम्हा दोघांच्या मनावर होते हे एकमेकांशी न बोलताही आम्हाला ठाऊक होते. कार्यक्र म संपला. प्रेक्षागृहात मोठाले पडदे लावले होते, कार्यक्र म नीट दिसावा यासाठी त्या पडद्यांवर आम्हाला दिसत होते आम्हाला उभे राहून दाद देणारे प्रेक्षक एकीकडे डोळ्यातील अश्रू पुसत होते. ही घसघशीत पावती होती आमच्या सहा महिन्यांच्या रियाजाला, त्यात झडलेल्या चर्चांना, त्यादरम्यान कधीमधी झालेल्या खमंग वादांना आणि पुन्हा-पुन्हा केलेल्या सरावाला.
आमचे सहजीवन सुरू होण्यापूर्वी स्वतंत्रपणे आम्ही दोघेही एका निर्णयावर ठाम होतो, पूर्णवेळ कलाकार म्हणूनच काम करण्याचा. संतूरवादक की आयुर्वेदिक डॉक्टर? असा प्रश्न काही काळ आमच्यातील एकापुढे, म्हणजे धनंजयपुढे होता. आणि तो प्रश्न पडण्यापूर्वीही संतूर की तबला असा मोठा अवघड प्रश्नही समोर होता. घरातील कमालीच्या संगीतप्रेमामुळे अगदी न कळत्या वयापासून तबला शिक्षण सुरू झाले होते, पण तरीही मनात कुठेतरी एखादे स्वरवाद्य वाजवायला शिकण्याची इच्छा सतत उसळ्या मारीत होती. त्याच काळात संतूर कानावर पडले. शिवजींचे संतूर. कानाला आणि मनाला आश्वस्त करणाऱ्या वाहत्या पाण्याच्या नादाचा वेग आणि आश्वासकता होती त्यात. त्याच क्षणी मी ठरवले, संतूरच शिकायचं. ही गोष्ट तीसेक वर्षांपूर्वीची, जेव्हा संतूर असे सहजपणे बाजारात मिळत नव्हते त्यावेळची. मग मी संतूर तयार करण्याचा खटाटोप सुरू केला. तेव्हा शिवजींचीच मधुवंती रागाची रेकॉर्ड बाजारात आली होती आणि त्यावर त्यांच्या संतूरचा फोटो होता. तो बघून-बघून माझे सुतारकाम सुरू होते. काहीही झाले तरी मला ते वाद्य शिकायचे होते. माझ्याही वजनापेक्षा जड असे ते वाद्य घेऊन मी मग पुण्याहून मुंबईला शिवजींना भेटायला गेलो तेव्हा माझ्या हातातील वाद्य बघून ते चकित झाले. माझ्या ध्यासाची त्यांना खात्री देणारा जणू तो क्षण असावा. कारण लगेच मग त्यांनी मला त्यांच्या रतनलाल टिक्कू या शिष्याकडे सोपवले. प्रारंभिक शिक्षणासाठी. पण तेवढे करून ते हात झटकून मोकळे झाले नाहीत. त्यानंतर माझी वारंवार चौकशी करीत राहिले, माझी प्रगती जाणून घेत राहिले आणि एका टप्प्यावर माझा शिष्य म्हणून स्वीकारही केला. पुढे डॉक्टर म्हणून जगायचे की कलाकार म्हणून जगण्याचा सततचा जळता निखारा नशिबाच्या गाठीला बांधून घ्यायचा या लाख मोलाच्या प्रश्नाला सामोरे जाण्याची वेळ आली तेव्हा तो निर्णय घेण्यासाठी त्यांनीच मला मदत केली, माझ्यातील गुणवत्तेवर नेमके बोट ठेवून मला उमेद दिली. 
या तुलनेत स्वातीची वाट थोडी सोपी होती. 
कारण आपल्याला नृत्यच करायचे आहे हे मला फार-फार लवकर समजले होते. नृत्यावरील माझी निष्ठा कदाचित नालंदा नृत्यकला संस्थेतील गुरू पद्मश्री कनक रेळे आणि मैथिली राघवन या दोन अशा गुरूंपर्यंत पोहचली असणार. कारण त्यांनी या शिक्षणाला वैयक्तिक स्पर्श देत माझ्या शिक्षणाला आणि साधनेला डोळस अभ्यासाची एक शहाणी बैठक दिली. भारत सरकारची शिष्यवृत्ती, नृत्य अलंकार आणि पुढे नृत्यातील डॉक्टरेट मानली जाणारी ‘संगीताचार्य’ पदवी.. हा सगळा प्रवास नृत्यात शास्त्र म्हणून अधिक खोल उतरण्यासाठी, त्या शास्त्रात असलेले लालित्य जाणून घेण्यासाठी मला मदत करणारा ठरला. 
हा सहप्रवास गेली तीन दशके सुरू आहे. यात कितीतरी कृतार्थ क्षण जसे आले तसे कसोटीचेही आले. आता आमच्या पुढील पिढीबरोबर नव्याने रियाज सुरू झालाय.
‘नूपुरनाद’चा प्रयोग जन्माला आला तो अगदी अपघाताने. आमच्या एकत्रित अमेरिका दौऱ्याची आखणी सुरू असताना आम्ही एकत्र, एका रंगमंचावर कार्यक्र म करणार अशी संयोजकांची समजूत झाल्याचे जाणवले आणि मग असा प्रयोग करून बघूया असा साहसी विचार आमच्याही मनात येऊ लागला आणि आमचा एकत्र रियाज सुरू झाला. एका बाबतीत आमचे एकमत होते आणि ते म्हणजे हा कार्यक्र म संतूर-भरतनाट्यमची जुगलबंदी किंवा सवाल-जबाब नक्की नसणार, तर ते असेल सहसादरीकरण. दोन्ही शैलींचे हातात हात घालून एकत्र पुढे प्रवाहित होणे. विचार सुरू झाला, कार्यक्र माच्या फॉर्मचा. दोन्ही शैलींमध्ये बसतील अशा सहा रागांची निवड झाली आणि ते मांडण्यासाठी अष्टरस व्यक्त करतील अशा सहा कथांची, सूत्रांची निवड झाली. संतूर नृत्यात एकत्र नाते गुंफण्याचा हा सहा महिन्यांचा आमचा रियाज आमच्या आयुष्यातील एक अद्भुत काळ होता. 
 

Web Title: Nupuranad ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.