Career: इमारत रचनेचे वेड आहे? मग हा कोर्स तुमच्यासाठीच
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 11:59 AM2022-08-28T11:59:44+5:302022-08-28T11:59:52+5:30
Career: केवळ इमारतींचे आराखडे तयार करणे म्हणजे वास्तुकला का? तर नक्कीच नाही. वास्तुकला ही एक कला आहे आणि त्याचबरोबरीने ते एक विज्ञानही आहे. या दोन्हींचा अवकाश व विस्तार अतिशय व्यापक आहे.
- आनंद मापुस्कर,
करिअर मार्गदर्शक
केवळ इमारतींचे आराखडे तयार करणे म्हणजे वास्तुकला का? तर नक्कीच नाही. वास्तुकला ही एक कला आहे आणि त्याचबरोबरीने ते एक विज्ञानही आहे. या दोन्हींचा अवकाश व विस्तार अतिशय व्यापक आहे.
एखाद्या लहानशा खोलीच्या रचनेपासून ते संपूर्ण शहराच्या नियोजनापर्यंत अनेक आराखडे वास्तुविशारद बनवत असतात. यासाठी अर्थातच भूमिती आणि अभियांत्रिकी तत्त्वांचा आधार घेतला जातो. तो वास्तुकलेचा पाया आहे. समकालीन समाजजीवन, संस्कृती, राजकारण, चाली-रूढी, वाणिज्य-व्यापार अशा कित्येक गोष्टींचे प्रतिबिंब वास्तुकलेत उमटत असते. उपयुक्तता, सौंदर्यशास्त्र आणि स्थैर्य हे वास्तुकलेचे तीन मूलभूत घटक आहेत.
वास्तुकला शिक्षण
भारतातील वास्तुकला शिक्षणाबाबतचे सर्व नियम, त्याबाबतचे वेगवेगळे निर्णय ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्टर’ या मान्यताप्राप्त संस्थेद्वारे घेतले जातात. बॅचलर ऑफ आर्किटेक्चर (बी. आर्च.) हा पाच वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे. त्याच्या प्रवेशासाठी ‘नॅशनल ॲप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर’ (नाटा) देणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता
विद्यार्थ्याने १२ वी विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित या विषयांमध्ये सरासरी किमान ५० टक्के गुण मिळविणे तसेच १२ वीमध्ये सर्व विषयांमध्ये एकत्रितपणे किमान ५० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.
‘नाटा’ वर्षातून दोनदा घेतली जाते. ‘नाटा’ परीक्षेच्या स्वरूपामध्ये दर काही वर्षांनी बदल करण्यात येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ‘नाटा’ची तयारी सुरू करण्यापूर्वी ‘नाटा’च्या वेबसाइटवरून परीक्षेची माहिती घेणे योग्य ठरेल. आर्किटेक्चरच्या पदवी प्रवेशासाठी नाटा व १२ वीच्या गुणांचे वेटेज ५० : ५० टक्के असते.
नाटाच्या माहितीसाठी https://www.nata.in ही वेबसाइट पाहावी.
वास्तुकला अभ्यासक्रम, महाविद्यालये तसेच अन्य माहितीसाठी ‘कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर’ची https://coa.gov.in/ ही वेबसाइट पाहावी.
अधिक माहितीसाठी https://cetcell.mahacet.org/ ही वेबसाइट पाहावी.