निमित्त- स्टुटगार्डचे ख्रिसमस मार्केट ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 07:00 AM2018-12-23T07:00:00+5:302018-12-23T07:00:09+5:30

ख्रिसमस आला, की युरोपमध्ये ऐन थंडीत सजू लागतात ख्रिसमस मार्केट. जर्मनीतील स्टुटगार्डचे वाईनचे मार्केट ऊर्फ ख्रिसमस मार्केट युरोपातील सुंदर आणि मोठ्या मार्केटपैकी एक असे समजले जाते. सध्या तेथे सजलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मार्केटविषयी...

On the occasion - Christmas Market of Stuttgart .... | निमित्त- स्टुटगार्डचे ख्रिसमस मार्केट ....

निमित्त- स्टुटगार्डचे ख्रिसमस मार्केट ....

Next

- अनघा महाजन -
डिसेंबर महिना सुरू होतो. थंडीची चाहूल लागते. गरम जॅकेट, टोप्या, हातमोजे कपाटातून बाहेर येतात. दिवस छोटा होतो. अंधार लवकर पडतो अन् चाहूल लागते ख्रिसमसची... लुकलुकत्या दिव्यांनी सजलेल्या ख्रिसमस मार्केटची. एरवी दिवाळी, दसरा आणि मराठी सण मिस करणारी आम्ही मराठी माणसे आता ख्रिसमस मार्केटची वाट पाहू लागतो. युरोपची ख्रिसमस मार्केट प्रसिद्ध आहेत. जगभरातून लाखो पर्यटकही छोटी-छोटी पारंपरिक पद्धतीनं सजवलेली मार्केट बघायला येतात. मी गेली १७ वर्षे जर्मनीत वास्तव्य करते. स्टुटगार्ड या बाडेन वुर्टेम्बर्ग या राज्याच्या राजधानीच्या गावात. स्टुटगार्डचे वाईनचे मार्केट ऊर्फ ख्रिसमस मार्केट युरोपातील सुंदर आणि मोठ्या मार्केटपैकी एक असे समजले जाते. येथील सर्वच लहान-लहान गावात ख्रिसमस मार्केट भरतात. 
स्टुटगार्ड गावाच्या मध्यभागात मार्केटप्लेस या ठिकाणी दरवर्षी हे ख्रिसमस मार्केट डिसेंबर महिन्यात २५ दिवस भरते. ३०० वर्षांची परंपरा असलेल्या या मार्केटमध्ये सुमारे २९० झोपड्यांच्या आकाराचे अथवा पारंपरिक घरांच्या आकाराचे स्टॉल लागतात. प्रत्येक  स्टॉल सजवण्याची चढाओढ लागलेली असते. त्यामुळे अवघे मार्केट सजवल्यानं मनमोहक, सुंदर दिसते. कोणी या स्टॉलच्या छतावर बायबलमधील कथांची आरास केलेली असते किंवा कोणाच्या तरी छतावर सांताक्लॉज त्याच्या रेनडिअरच्या गाडीतून भेटवस्तू घेऊन आलेला असतो. लुकलुकत्या दिव्यांनी आणि पाईन वृक्षांच्या पानांनी सजवली जातात. प्रत्येक स्टॉलची मजाच न्यारी असते. दुकानदार मध्ययुगीन काळातील पारंपरिक कपडे घालून लाकडी खेळणी, कोरीव काम केलेल्या वस्तू, विविध आकारांच्या, रंगांच्या, सुगंधाच्या मेणबत्त्या थाटून बसतात. गिऱ्हाईकांना आग्रहानं बोलावून त्या वस्तूंची प्रात्यक्षिकं देत असतात. काही उत्साही दुकानदार लहान मुलांसाठी मेणबत्त्या तयार करणे, लाकडावरील कोरीव काम करतात. 


मार्केटची शोभा वाढविण्यात गायक-वादक मंडळीही हातभार लावतात. स्टेजवर दररोज ‘लाईव्ह कॉन्सर्ट’ सादर करतात. काही कलाकार जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून आपलं वाद्य तल्लीन होऊन वाजवत असतात. रसिक त्यांच्याभोवती गोळा होऊन त्यांना दिलदार दाद देतात. ख्रिसमस मार्केटचे मुख्य आकर्षण आहे, येथील फूड स्टॉल. जर्मन ‘ग्ल्हुवाईन’ म्हणजे लवंग, दालचिनी, वेलदोडे आणि अजून काही गरम मसाले घालून उकळलेली रेड वाईन. ही गरमागरम सर्व्ह करतात. अशी तयार केलेली वाईन इतकी चवीष्ट असते, ती प्यायल्याशिवाय तिची ही आगळीवेगळी सुंदर चव समजूच शकणार नाही. ती फक्त ख्रिसमसच्या काळातच मिळते. ती प्यायल्याशिवाय या मार्केटमध्ये जाणे सार्थकी लागत नाही. 
‘स्टोल्लन’ म्हणजे जर्मन केक हाही प्रकारचा ब्रेड, सुकामेवा आणि गरम मसाल्याचे पदार्थ घालून तयार केलेला असतो. ‘लेबकुचेन’ म्हणजे ‘जिंजर ब्रेड.’ ख्रिसमस मार्केटमध्ये हा हृदयाच्या आकाराचा केक मिळतो. त्यावर आयसिंग शुगरने नाव टाकून अथवा ग्राहकाला हवे ते लिहून विकले जाते. हौशी मंडळी आपल्या प्रियजनांची नावं टाकून हा हृदयाच्या आकाराचा जिंजर ब्रेड गळ्यात घालून फिरताना दिसतात. 
ग्रिल्ड सॉसेज, चॉकलेटने मढवलेली फ्रूट स्केवर्स, गार्लिक ब्रेड, प्रेट्झेल, वाईल्ड पोटॅटो विथ गार्लिक सॉस अशा अनेक पदार्थांचा आस्वाद घेत आणि ‘ग्ल्हुवाईन’चा मग हातात घेऊन फिरत या ख्रिसमस मार्केटची सहल पूर्ण होते अन् ख्रिसमस सणाचा आनंदही द्विगुणित होतो...
(लेखिका जर्मनीतील स्टुटगार्डच्या रहिवासी आहेत.)

Web Title: On the occasion - Christmas Market of Stuttgart ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.