Office: ऑफिस असावं तर असं...,

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 09:35 AM2022-04-10T09:35:52+5:302022-04-10T09:36:20+5:30

Office: ‘वर्क फ्रॉम होम’मुळे अनेकांना ऑफिसमध्ये काम करण्याचा कंटाळा येतोय. मात्र, ऑफिसात काम करण्याची मजा औरच!

Office: If there is an office ... | Office: ऑफिस असावं तर असं...,

Office: ऑफिस असावं तर असं...,

googlenewsNext

- विनय उपासनी
(मुख्य उपसंपादक) 

कल्पना करा की तुम्ही ऑफिसात आहात. दुपारची वेळ आहे. तुम्हाला कंटाळा आलाय. डुलकीही काढावीशी वाटतेय. परंतु समोर पीसीवर असलेला कामाचा ढिगारा आणि ते पूर्ण करण्यासाठी असलेली डेडलाइन हे सर्व आहे. तुम्ही काय कराल, अर्थातच डुलकीला गोळी मारून काम पूर्ण करण्यास प्राधान्य द्याल. परंतु तुम्हाला कामाच्या ठिकाणी पॉवर नॅप म्हणजेच एक छोटीशी डुलकी घेण्याची सोय केली तर? तुम्ही म्हणाल छ्या, काहीही काय सांगता राव... पण हे असं होतंय, होऊ लागलंय...

ऑफिस या संकल्पनेत अमूलाग्र बदल करण्याचं काम तिकडे युरोपात केव्हाच सुरू झालंय. तुम्हाला हव्या त्या ठिकाणी बसून तुम्ही काम करा. लक्ष केंद्रित होत नाहीए? नो प्रॉब्लेम, एक छान छोटी रूम आहे ज्यात तुम्ही एकटेच तुमचा लॅपटॉप घेऊन बसून लक्षपूर्वक काम करू शकता. तुम्हाला बसून काम करण्याचा कंटाळा आलाय. त्याचंही सोल्यूशन आहे. थोडे उंच टेबल आहेत जिथे खुर्च्या नाहीत. त्या टेबलावर जाऊन तुम्ही खुशाल तुमचा लॅपटॉप मांडून उभे राहून काम करू शकता. हलकीशी डुलकी घ्यावीशी वाटतेय. खुशाल घ्या. त्यासाठी एका कोझी सोफ्याची व्यवस्था आहे. छान कॉफी प्यायचा मूड आहे? मॅगी, पिझ्झा वा तत्सम काही तरी खायचंच? कम्युनिटी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तिथे जिन्नस आहेत. गॅस आहे. करून खा. तुम्हाला ऑफिसच्या चार भिंतींच्या आत काम करावंसं वाटत नाहीए? चला टेरेसवर. तिकडे खुल्या हवेत तुम्ही काम करू शकता. कामाचा ताण आलाय असं वाटत असेल तर व्यायाम करायला वा खेळ खेळायला एक स्वतंत्र कक्ष तुमच्या दिमतीला आहेच.

हे सगळं स्वप्नवत वाटतं ना?...
नक्कीच वाटत असणार. परंतु हीच ‘ओपन ऑफिस’ची संकल्पना युरोपातील अनेक देशांमध्ये रुजू आणि  वाढू लागली आहे. कोणत्याही कर्मचा-याला ऑफिसमध्ये एका निश्चित जागी बसून काम करण्याची मुभा मुद्दामच दिलेली नाही. ऑफिसमध्ये येणा-या कर्मचा-याला कुठेही बसून त्याचे काम करता यायला हवे, हा त्यामागचा उद्देश. या प्रकारामुळे उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढते, असा 
त्यामागचा उद्देश.  

को-वर्किंग स्पेस
ही एक नवीन संकल्पनाही आकाराला येऊ लागली आहे. एकाच छताखाली वेगेवेगळ्या कंपन्यांचे कर्मचारी काम करतात. जागेची अडचण वा खर्च वाचविण्यासाठी म्हणून ही संकल्पना अंमलात येऊ लागली आहे. एका मोकळ्या जागेत ऑफिससारख्या सर्व सुविधा पुरविल्या जातात. आणि तिथे वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांचे कर्मचारी येऊन त्यांना ऍलॉट केलेल्या जागेवर बसून काम करतात. 

भारतातील चित्र
 आपल्याकडेही आता ही ओपन ऑफिसची संकल्पना मूळ धरू लागली आहे. विशेषतः स्टार्ट-अप कंपन्यांमध्ये ही कार्यपद्धती मोठ्या प्रमाणात आहे. बहुराष्ट्रीय कंपन्याही या पर्यायाची चाचपणी करू लागल्या आहेत. गुगल, फेसबुक यांसारख्या कंपन्यांची कार्यालये ओपन ऑफिससारख्या काही सुविधा कर्मचा-यांना देऊ लागल्या आहेत. ओपन ऑफिससाठी जागा देऊ करणा-या कन्सल्टंट कंपन्याही या क्षेत्रात कार्यरत आहेत. तुमच्याकडे असलेल्या कर्मचा-यांच्या संख्येनुसार या कन्सल्टंट कंपन्या जागा उपलब्ध करून देतात. 
ऑफिसच्या व्याख्येला छेद देणारी कार्यस्थळे पहावयास मिळतील. वर्क फ्रॉम होम अंगवळणी पडू लागले असली तरी सर्वत्रच ते शक्य नाही. त्यामुळे ओपन ऑफिस संकल्पनेचं स्वागत अवश्य व्हायला हवे. हो ना?
 

Web Title: Office: If there is an office ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.