जुन्या पुण्यातील नवरात्रोत्सव..!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2018 05:29 PM2018-10-06T17:29:18+5:302018-10-06T17:40:02+5:30

पुणे शहरातील २५-३० वर्षांपूर्वींचा नवरात्र उत्सव कसा होता, हे अगदी पाहण्यासारखं आहे.....

Old Navratri festival in Pune! | जुन्या पुण्यातील नवरात्रोत्सव..!

जुन्या पुण्यातील नवरात्रोत्सव..!

Next
ठळक मुद्देसेनापती बापट रस्त्यावर असलेली चतु:शृंगी मातेचा उत्सव तर काही औरच!अनेक पेठांतून श्रीफळांची तोरणं देवीला वाहण्यासाठी तरुण मंडळी रात्री उशिरा किंवा पहाटे निघत.

- अंकुश काकडे -  

१० आॅक्टोबरपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय उत्साहाने हा साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये देवींची अनेक शक्ति पीठं आहेत. तेथील कार्यक्रम परंपरेप्रमाणे अनेक ठिकाणी वेगवेगळे होतात. पुणे शहरातील २५-३० वर्षांपूर्वींचा नवरात्र उत्सव कसा होता, हे अगदी पाहण्यासारखं आहे. तसं त्यावेळी शहर आजच्या इतकं विस्तारलं नव्हतं. अगदी मोजकी देवीची मंदिरं पुण्यात होती. त्यातही काहींना वर्षानुवर्षांची धार्मिक परंपरा, रूढी, वारसा अशी त्यामुळे तेथील कार्यक्रम काही औरच असत. 
पुण्यात तसं म्हटलं तर १०-१५ च देवीची महत्त्वाची मंदिरं. त्यात बुधवार पेठेतील तांबडी जोगेश्वरी, भवानी पेठेतील भवानीमाता, कसबा पेठेतील कालिकामाता, त्वष्टा कासार समाजाची देवी, बुधवार पेठेतील काळी जोगेश्वरी, गणेशखिंडीतील श्री चतु:शृंगीमाता याशिवाय अनेक लोकांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांच्या परंपरेनुसार देवीचा उत्सव साजरा केला जात असे. त्यात कैै. अप्पा हगवणे यांची सदाशिव पेठेतील कालिकामाता, नारायण पेठेतील हगवणे चाळीतील देवी, रास्ता पेठेतील बोलाईमाता अशा ठिकाणी देवींचे उत्सव धार्मिक पद्धतीने १० दिवस साजरे केले जात. पुढे ९० च्या दशकात आणखी काही देवींचं आगमन झालं, त्यात कैै. अप्पा थोरात यांनी तळजाई येथील पद्मावती, तळजाई भवानीमाता देवीचा उत्सव सुरू केला. साधारणत: १९७० च्या दरम्यान त्याचीदेखील एक अख्यायिका सांगितली जाते. जिजाऊ महाराज ज्यावेळी सिंहगडावर जात त्यावेळी त्यांचा एक थांबा तळजाईवर असे. आबा बागुल यांनी सहकारनगरमध्ये महालक्ष्मी मातेचा उत्सव सुरू केला. त्याच दरम्यान बन्सीलाल क्लॉथ मार्केटच्या राजकुमार आगरवाल यांनी सारसबागेसमोर उभारलेलं महालक्ष्मी मंदिर आणि त्यात स्थापन केलेली महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच्या सुरेख मूर्ती, आता केवळ पुणे शहरच नव्हे तर महाराष्ट्राचं आकर्षण ठरलं आहे.
पण जुन्या पुण्याचा नवरात्र उत्सव आपण पाहिला तर त्यावेळी धार्मिक कार्यक्रम, देवीचं पावित्र्य राखलं जाई. विशेषत: सध्या सेनापती बापट रस्त्यावर असलेली चतु:शृंगी मातेचा उत्सव तर काही औरच! अख्खं पुणे तेथे १० दिवस रात्री उशीरापर्यंत, तर भल्या पहाटे महिलांची दर्शनासाठी लागलेली रांग मंदिरापासून अगदी पुणे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत येत असे. त्याकाळी सध्याच्या सेनापती बापट रस्त्यावर सध्या जेथे मॅरिअट हॉटेल आहे. तेथपासून तर गणेशखिंड रस्त्यावर राजभवन तर खाली इकडे सध्याच्या कॉसमॉस बॅँक इमारतीपर्यंत दोन्ही बाजूला हॉटेलं, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकानं, धार्मिक साहित्याचे स्टॉल, त्या काळातील फोटो स्टुडिओ (त्यात मोटारकार, फटफटी, होडीत काढलेले फोटो आजही पाहिले की एक वेगळाच आनंद मिळतो) मोठमोठी खेळणी, रहाटगाडगे अशी अगदी मोठी जत्रा तेथे भरत असे. पीएमपी बसची सेवा मोठ्या प्रमाणावर केली जात असे. विद्यापीठ प्रवेशद्वारापासून ते राजभवनपर्यंत पीएमपी बसेसचा मोठा ताफा तेथे असे. 
चोख पोलीस बंदोबस्त, विशेषत: दर्शनासाठी महिलांचा मोठा भरणा त्यामुळे महिला पोलीस, होमगार्ड महिला आपले काम चोख करीत असे. चुकलेल्या लहान मुलांची घोषणा सातत्याने स्पीकरवरून ऐकायला मिळे. चतु:शृंगीमाता मंदिर तसं उंचावर बऱ्याच पायऱ्या चढून जावे लागते. मोठी रांग असे. त्याकाळी अनेक पेठांतून श्रीफळांची तोरणं देवीला वाहण्यासाठी तरुण मंडळी रात्री उशिरा किंवा पहाटे निघत. लाकडी बांबूवर नारळ लटकलेलं असत, काही सधन तरुण बर्फाच्या गाड्यावर असे तोरण बांधत ते फुलांनी किंवा दिव्यांनी सजवत, ढोल लेझीम, संभळ क्वचित बॅँड; पण आताच्यासारखा डीजे कधीच नसे. नाचत गात ही तरुण मंडळी तेथे आली की त्यांना दर्शनासाठी प्राधान्य असे, त्यामुळेही काही तरुण तोरण घेऊन येत असत. त्यांच्या घोषणाही ऐकण्यासारख्या असत. माता माता की जय। चतु:शृंगी माता हैै दूर, लेकिन जाना है  जरूर। अशा त्या घोषणा कुठेही आचकट विचकट नाच नसे.  

(क्रमश:)
(लेखक प्रसिद्ध राजकीय-सामाजिक कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Old Navratri festival in Pune!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.