ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक देणारी कमलप्रीत कौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 06:03 AM2021-08-01T06:03:00+5:302021-08-01T06:05:12+5:30
पंजाबमधल्या एका छोट्याशा खेड्यातील कमलप्रीत कौर. जिद्द आणि अथक मेहनतीनं ऑलिम्पिक थाळीफेक स्पर्धेत ती अंतिम फेरीत पोहोचली आहे. तिच्या ध्येयवादी प्रवासाची ही गोष्ट.
- माधुरी पेठकर
कोण ही कमलप्रीत कौर? आजपर्यंत आपण तिचं नाव फारसं ऐकलेलं नाही, पण या २५ वर्षीय खेळाडूनं भारताबरोबरच संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे.
कमलप्रीतनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये थाळीफेक स्पर्धेत अंतिम फेरी गाठली आहे. अंतिम फेरीत बारा स्पर्धक असले तरी आपल्याकडून ऑलिम्पिक पदकाच्या आशा तिनं कायम ठेवल्या आहेत. उद्या २ ऑगस्ट रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत भारतासाठी ॲथलेटिक्समधलं पहिलंवहिलं पदक ती आणेल का, याबाबतची उत्सुकता आता शिगेला पाेहोचली आहे.
एका छोट्याशा खेड्यात राहणारी मुलगी ते ऑलिम्पिकपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता.
पंजाबमधील श्री मुख्तार साहिब जिल्ह्यातील बादल या छोट्याशा गावातली ही मुलगी. वडील शेती करतात. तसंही गावातलं वातावरण मुलींसाठी प्रोत्साहनदायी नव्हतंच. कमी वयात लग्न करून देण्याची गावातली परंपरा. मुलींनी फक्त चूल आणि मूल यात रमून आपला संसार सांभाळावा अशी सगळ्यांचीच धारणा. त्यात कमलप्रीत अभ्यासातही जेमतेम. त्यामुळे आपल्याला निदान दहावीपर्यंत तरी शिक्षण घेता येईल की नाही, की त्याआधीच आपलं लग्न लावून देतील याची कमलप्रीतला धास्ती होती. ती कॉलेजची स्वप्नं पाहत होती, पण ते तिला अशक्यप्राय वाटत होतं. कारण कमी मार्क्स मिळाले आणि कॉलेजला नंबर नाही लागला तर घरचे आपलं लग्न नक्की लावून देणार याची कमलप्रीतला खात्री होती.
कमलप्रीत हुशार नव्हती असं नाही; पण तसं वातावरण तिला मिळालं नाही, पण सुरुवातीपासूनच तिची इच्छा होती, आपण मोठं खेळाडू व्हावं. खेळात आपलं करिअर नक्की होऊ शकतं आणि त्यात प्रगती केली तर आपलं लहान वयातच होणारं लग्नही आपण टाळू शकतो, यावर तिचा विश्वास होता.
कमलप्रीत सहा फूट एक इंच उंचीची. शारीरिक मजबुतीही तिच्यात चांगलीच होती. त्याचबरोबर मानसिक कणखरतेसाठीही तिनं जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केेली.
खरं तिला व्हायचं होतं, क्रिकेटपटू. क्रिकेट तिच्या डोक्यात भिनलेलं होतं; पण शाळेत असताना तिची अंगकाठी आणि इतरही खेळांमध्ये असलेली तिची गती पाहून तिच्या खेळाच्या शिक्षिकेनं तिला ॲथलिट बनायचा सल्ला दिली. शालेय स्पर्धेत नाव कमावून लवकरच ती राज्यस्तरीय स्पर्धेतही खेळायला लागली.
कमलप्रीतची ॲथलिट म्हणून सुरुवात गोळाफेकीनं झाली. मात्र नंतर ती थाळीफेक प्रकराकडे वळली. शिक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ती या खेळात प्रगती करू लागली. २०१४पासून त्यासाठी स्वत:ला तिनं झोकून दिलं. स्पोर्ट्स ॲथॉरिटी ऑफ इंडियामध्ये (साई) तिनं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. सीमा पुनिया ही तिचा आदर्श होती. तिच्यासारखं व्हायचं असं ठरवून तिनं संपूर्ण लक्ष थाळीफेककडे केंद्रित केलं. एक छंद म्हणून सुरू झालेला हा प्रवास नंतर सराव- स्पर्धा- बक्षिसं- रेकॉर्ड आणि टोकियो ऑलिम्पिकपर्यंत पोहोचला.
ऑलिम्पिकपर्यंत पोहोचोस्तवर कमलप्रीतनं आपल्या खेळातही प्रचंड प्रगती केली. २०१६मधे अठरा वर्षांखालील आणि २० वर्षांखालील स्पर्धेत कमलप्रीत नॅशनल चॅम्पियन झाली. २०१७ मध्ये वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये ती सहाव्या स्थानावर होती, तर २०१९ मधे दोहा येथील आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत ती पाचव्या स्थानावर होती.
मार्च २०२०मध्ये ॲथलेटिक्स फेडरेशन कप स्पर्धेत ६५.०५ मीटर लांब थाळीफेक करून टोकियो ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरली. ही पात्रता फेरी गाठताना तिनं राष्ट्रीय विक्रमही केला. थाळीफेक स्पर्धेत ६५ मीटर पार थाळी फेक करणारी कमलप्रीत ही पहिली भारतीय महिला बनली. हा विक्रम नोंदवताना तिचा आदर्श असलेल्या सीमा पुनियालाही तिनं मागे टाकलं. नंतर तीनच महिन्यांनी कमलप्रीतनं स्वत:चाच विक्रम मोडताना ६६.५ मीटर दूर थाळीफेक करून नवीन राष्ट्रीय विक्रम केला.
विक्रमांची ही शृंखला ती उद्या ऑलिम्पिकच्या पदकापर्यंत नेते का, ते आता बघायचं. कामगिरीनुसार अमेरिकेच्या वालारी ऑलमेननंतर कमलप्रीत सध्या दुसऱ्या स्थानावर आहे. पण उद्या प्रत्यक्ष काय होतं, ते महत्त्वाचं. कमलप्रीतला पदकाच्या शुभेच्छा!..
madhuripethkar29@gmail.com