मुंबईच्या इमामवाड्यातील हमामखान्यातली एक मस्त दुपार.
By अोंकार करंबेळकर | Published: July 29, 2018 03:00 AM2018-07-29T03:00:00+5:302018-07-29T03:00:00+5:30
एक अर्ध्या लुंगीचा स्टार्च केल्यासारखा करकरीत तुकडा माझ्याकडे भिरकावून अतिक म्हणाला, ‘ये पहनकर अंदर आओ.’ त्या लुंगीवर मी त्याच्या मागे गेलो. आत गेल्यावर त्याने दोन लाकडी ब्रश फरशीवर टाकले आणि त्यावर डोकं ठेवायला सांगितलं. मग तेलाच्या बाटलीतून अंगभर तेल चोपडायला सुरुवात केली. तेल लावून झाल्यावर अचानक एवढं जड काय वाटतंय, म्हणून मान वर करून पाहायचा प्रयत्न केला, तर साहेब चक्क पाठीवर उभे राहिले होते. पाठीपासून पायापर्यंत त्यांनी कालियार्मदन स्टाइल थयथय नाच सुरू केलेला. ..वर बघायचीही सोय नव्हती!
-ओंकार करंबेळकर
टर्किश आणि इराणी ‘हमाम’बद्दल भरपूर ऐकलं होतं. नाटक-सिनेमा आणि प्रवासवर्णनाच्या पुस्तकांतही त्याची भरपूर वर्णनं वाचलेली होती. मध्य-पूर्वेतले देश, ग्रीस, इराण, मोरक्को इथल्या हमामांचे भरपूर फोटो इंटरनेटवर सापडतात. लख्ख चकचकीत संगमरवर, निळ्या-जांभळ्या काचांच्या खिडक्या, निळंशार पाणी वगैरे! घासूनपुसून अंघोळ झाल्यावर, अशा हमामच्या बाहेर गाद्यागिरद्या घातलेली जागा असते, तिथे तुम्हाला आराम करता येतो. आता इराणमधले हमामही बंद पडत आहेत म्हणे; पण मुंबईत एक इराणी हमामखाना आजही सुरू आहे म्हटल्यावर, तिकडे जायची उत्सुकता वाढली.
मुंबईतल्या इमामवाडा या इराणी लोकांच्या वस्तीमध्येच हा हमामखाना आहे इमामवाडा भेंडीबाजारचा परिसर महंमद अली रस्त्यालाच लागून आहेत. साधारणत: 1905च्या आसपास इराणमधील दुष्काळी परिस्थितीमुळे इराणी लोकांनी जगभरात स्थलांतर सुरू केलं. भारतात आलेल्या लोकांनी इमामवाड्यात इराणी (मुघल) मशिदीजवळ जागा घेऊन राहायला सुरुवात केली. मग हळूहळू त्यांची रेस्टॉरंट्स, बेक-या, स्वीट मार्ट्स शहरात सुरू झाली. भेंडीबाजार पोलीस स्टेशनपासूनच हमामचा पत्ता विचारायला सुरुवात केली. एका बुजुर्ग माणसानं सांगितलं, सरळ गेल्यावर मुघल मस्जीद विचारा, त्याच्या शेजारी नीम का पेड आहे, तोच इराणी हमाम!
काही पावलांवरच मुघल मशीद लागली. निळ्या-जांभळ्या फरशांचे तुकडे जोडून मोझेक केलेली! मशिदीला लागूनच ‘इराणी हमाम’ अशी अरबी आणि इंग्रजी अक्षरातली पाटी दिसली; पण खुद्द इराण आणि तुर्कस्थानातल्या हमामांच्या रूपाशी हे प्रकरण अजिबातच जुळत नव्हतं. जुनाटपणा आणि थोडीशी अस्वच्छता!
लहानशा बोळातून आत गेल्यावर थेट हमामखान्याचा हॉलच! इराणी हमामप्रमाणेच रचना; पण दोन्हींच्या रूपामध्ये जमीन-अस्मानाचा फरक. अंघोळीची जागा असली, तरी इथल्या अनेक जागांना दिवसेंदिवस पाणी लागलेलं नसावं. काळवंडलेल्या, रंग उडालेल्या भिंती आणि सगळीकडे असणारा थोडासा ओशटपणा. ते रंगीत प्रकाश पाडणारे दिवे, उन्हाची तिरीप पाडणारे झरोके, धुपदाण्या, कारंजे वगैरे इथे काही नव्हतं. मध्येच कापलेल्या अर्ध्या अंड्यासारख्या ओव-या आणि मधोमध एक हौद! त्या हौदात एका नळातून पाण्याची बारीक धार पडत होती, ओव-यावरती चार-पाच पोरं अंग पुसत, भांग पाडत बसली होती. हमामच्या या बाहेरच्या हॉलला ‘सर्बिनेह’ म्हणतात
कोणीतरी गि-हाईक आलंय म्हटल्यावर, एका ओवरीतला पन्नाशीचा माणूस सावरून बसला आणि मसाज-अंघोळीचे दर सांगू लागला. देढसो, ढाईसो और पाचसो! जरा माहिती मिळवावी, म्हणून थोडे प्रश्न विचारू म्हटलं, तर त्याच्या कपाळावर आठय़ा येऊ लागल्या. नाव काय, कोठून आलात, कधीपासून आहात, अशा सगळ्या प्रश्नांना फक्त ‘महंमद अतिक मेरा नाम’ एवढंच उत्तर! अतिकसाहेब चांगलेच मितभाषी निघाले. शेवटी जास्तीत जास्त तुच्छता चेह-यावर आणत म्हणाले, ‘कितनेका मसाज करने का है?’
- इथला पहिलाच अनुभव असल्यामुळे, मी दीडशेचा मसाज करायला तयारी दाखवली. लगेच अतिक कामाला भिडला. माझ्याशी बोलता-बोलता त्याने एक-दोन बाटल्यांमधील तेलं मिसळायला सुरू केली. मग कपडे बदलायला सांगितले. एक अर्ध्या लुंगीचा स्टार्च केल्यासारखा करकरीत तुकडा माझ्याकडे भिरकावला, ‘ये पहनकर अंदर आओ.’ त्यानं दिलेल्या लुंगीवर मी त्याच्या मागे गेलो.
लहानसा पॅसेज ओलांडून त्याच्याबरोबर आतल्या तशाच एका हॉलमध्ये गेलो. याला ‘खाझिनेह’ म्हणतात आणि गरम पाण्याच्या जागेला ‘गर्मखाना’. गर्मखान्यात मोठय़ा टाकीत कोमट पाणी साठवलेलं होतं. त्यात पोरं बादल्या बुचकळत आणि जरा बाजूला जाऊन अंघोळ करत होती. खसाखस अंग घासत आपल्याच नादामध्ये ती पोरं गुंग होती.
आतल्या हॉलमध्ये गेल्यावर अतिकसाहेबाच्या वागण्यात थोडा हुकूम आणि जरबही जाणवायला लागली. आत गेल्या-गेल्या फरशीवर दोन लाकडी ब्रश फरशीवर टाकले आणि त्यावर डोकं ठेवायला सांगितलं. मग तेलाच्या बाटलीतून डोक्यावर आणि नंतर अंगभर तेल चोपडायला सुरुवात केली. सुरुवातीला हा कृश अंगकाठीचा वाटलेला माणूस चांगलीच ताकद बाळगून आहे हे जाणवायला लागलं. हळूहळू तेल लावणारी बोटं जोर लावायला लागली. आता तर समोर पडलेली व्यक्ती जिवंत नसून, ती एक निर्जीव वस्तू आहे, असा समज त्याने करून घेतला असावा, इतका जोर लावून त्याचा मसाज सुरू झाला. मी कसाबसा एक प्रश्न विचारला, ‘ये कैसा तेल है?’ त्यावर ‘सरसों’ असं उत्तर मिळालं; त्याचा अर्थ ‘प्रश्न बंद कर, गप्प बस’ असा होता. मग त्याने पोटावर झोपायला सांगितलं. तेल लावून झाल्यावर अचानक एवढं जड काय वाटतंय, म्हणून मान वर करून पाहायचा प्रयत्न केला, तर साहेब चक्क पाठीवर उभे राहिले होते. काही कळेपर्यंत पाठीपासून पायापर्यंत त्यांनी कालियार्मदन स्टाइल थयथय नाच सुरू केलेला. मला वर बघायची सोय नव्हती; पण या डान्सच्या वेळेस तो खूश असावा. मन लावून त्याने पायांनी कणीक तिंबायला घेतली होती. मला तोंडातून आवाज काढायलाही संधी न देता, यथेच्छ नाचून झाल्यावर तो उतरला. मग जरा ‘हुश्श’ म्हणेपर्यंत, त्याने माझे दोन्ही पाय आणि दोन्ही हातांची भेट घालून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. धनुरासन, नौकासन आपल्या मनासारखं झाल्यावर त्याने आणखी हवे तसे व्यायामप्रकार करून घेतले. कधी माझा सुळावर चढवलेल्या आरोपीसारखा क्रॉस कर, मध्येच दोन्ही पोटरींवर पाय ठेव, तर कधी अचानक हाताने थाप मारून दचकव, असं करत शेवटी ब-याच वेळानंतर तांडव थांबवलं.
वाटलं आता संपलं असेल, दीडशे रुपयात किती करणारे हा? पण त्याने तसंच झोपायला सांगितलं. बाहेरून साबण आणि खरखरीत स्क्रबर घेऊन आला. एवढा जोर लावून तैलर्मदन झाल्यावर, त्याने मला घासायला सुरुवात केली. हा स्क्रबर म्हणजे नारळाची शेंडी होती की नायलॉनची जाळी कोण जाणे!
जोरजोरात खराखरा घासून, त्याने सगळा तेलकटपणा काढून टाकला आणि मस्त वाटायला लागलं. पाठोपाठ अचानक कोमट पाण्याच्या हौदातून बादलीभर पाणी आणून अंगावर ओतलं. मग हौदाजवळच्या बुळबुळीत फरशीजवळ जाऊन उभं राहायला सांगितलं आणि सलग चार-पाच बादल्या भसाभस पाणी ओतून अंघोळ घातली. मग एक टॉवेल देऊ केला; पण मी माझा टॉवेल घरूनच नेला होता. बाहेर येऊन अंग पुसल्यावर खरंच हलकं वाटायला लागलं, पाठही मोकळी झाली होती. दीडशे रुपयात इतकी कुस्ती झाली म्हटल्यावर, पाचशेमध्ये काय केलं असतं, असा विचार मनात आला. पैसे देऊन झाल्यावर, अतिक थोडा-फार बोलायला लागला. मूळचा उत्तर प्रदेशातून आलेला. गेली काही वर्षे इकडेच राहात होता. आपण भरपूर मदत केली, असं वाटून तो खूश होऊन त्याच्या जागेवर जाऊन बसला. कपडे बदलून मीही निघालो, तोच बाहेर हमामच्या मालकीणबाई भेटल्या.
हिदायती कुटुंब गेली अनेक दशकं हा हमाम चालवतं आहे. त्यांच्या पुढच्या पिढीला या कामात अजिबात इंटरेस्ट नव्हता, बरेचसे लोक परदेशातच राहायला गेले होते. या आणि त्यांचे यजमान अजूनही हमाम चालवतात.
निरोप घेताना त्या म्हणाल्या, ‘आया करो बेटा, आपके लियेही है हमाम!’
- मुंबईतल्या तो हमाम आता किती काळ असेल आणि त्याही; कोण जाणे!!!
हे तर शहराचं वैशिष्ट्यच!
सध्या भारतात केवळ दोनच हमाम शिल्लक आहेत. एक भोपाळचा आणि दुसरा हा मुंबईतल्या इमामवाड्याचा. हा सगळा परिसरच इराणी लोकांचा आहे. मुघल मशिदीला इराणी मशीद असंही म्हणतात. या परिसरामध्ये इराणी लोकांची हॉटेल्स आणि दुकानंही आहेत. संपूर्ण इमामवाडाच नागरी इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. नागरी वारसास्थळांच्या दृष्टीने या हमामचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. माझ्या मते अशा हमामची डागडुजी आणि मूळ रचनेत बदल न करता, स्वच्छता आणि थोडं आधुनिकीकरण केल्यास, त्याच्याकडे लोकांची पावलं वळतील. यातला स्वच्छता हा मुद्दा अग्रक्रमाने विचारात घ्यायला हवा. तुर्कस्थान आणि इराणने आपल्या हमामांचा पर्यटनासाठीही चांगला उपयोग करून घेतला आहे. आपणही असं केलं नाही तर काही वर्षांनी अशी स्थळं केवळ ऐकायला आणि फोटोतच पाहायचा मिळतील. नव्या पिढय़ांसाठी एवढे केलंच पाहिजे आपण!
- भरत गोठोस्कर, नागरी वारसास्थळांचे अभ्यासक आणि खाकी टूर्स पदभ्रमंती उपक्रमाचे संचालक
(लेखक ‘लोकमत’च्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये उपसंपादक आहेत)
onkark2@gmail.com