एकतरी वारी आचरावी..
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 07:00 AM2019-06-23T07:00:00+5:302019-06-23T07:00:11+5:30
वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा हा महत्त्वाचा भक्तिसोहळा आहे.
- डॉ. अरविंद नेरकर
वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा हा महत्त्वाचा भक्तिसोहळा आहे. श्री ज्ञानदेवांची पालखी आळंदीहून, तर संत तुकाराममहाराजांची देहूहून निघते. या व इतर पालख्या वाखरी येथे एकत्र येतात. आषाढी एकादशीस लाखोंचा समुदाय पंढरपूर येथे जमतो. असा भव्य-दिव्य सोहळा टाळमृदंगाच्या गजरात, विठ्ठलनामाचा जयघोष करीत भक्तिमय वातावरणात होतो. लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करताना मार्गावरील गावांमध्ये विशेषत: मुक्कामाच्या ठिकाणी त्या त्या दिंड्यांची भोजन आणि निवासाची व्यवस्था केलेली असते. निवासाला धर्मशाळा, शाळा आणि मोकळ्या जागांमध्ये मोठ्या संख्येने असलेले वारकरी सोयी-गैरसोयी यांचा विचार न करता एकत्र राहतात. तसेच ज्या वारकºयांची भोजन-निवास व्यवस्था नसेल त्यांची सोय त्या त्या गावातील ग्रामस्थ आणि सामूहिक मंडळे करतात. वारकरी हा ज्या श्रद्धेने वारी करतो तितक्याच श्रद्धेने त्याची ठिकठिकाणी व्यवस्था होते.
वारीचं व्यवस्थापन अगदी पालखी सोहळा प्रस्थानापासून पंढरपूरला पालख्या पोहोचेपर्यंत निर्धारित असतं. वर्षानुवर्षे परंपरेनं चालत आलेलं वेळापत्रक तिथीनुसार अखंडपणे सुरू आहे.
मुळातच वारी शुद्धाचरण असलेला हा भक्तिसंप्रदाय ज्ञानोत्तर भक्तीशी जोडलेला आहे. भेदाभेद अमंगळ मानून वागणे हे एकसंध समाजाचे प्रतीक आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या किमान गरजांना तेवढेच महत्त्व देऊन सात्त्विक आहार, सात्त्विक विचारांचे पालन करणारा आहे. त्यामुळे येथे भांडण-तंटे, गुन्हे, वाद-प्रवाद नसून विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करीत ‘विठ्ठल विठ्ठल गजरी...’ असं म्हणत पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी आसुसलेला भोळ्या वारकºयांचा समुदाय आहे. वेळच्या वेळी ती ठरलेली कामे पूर्ण करून वारी करता करता वारकरी सुविहित, सुव्यवस्थित जीवनाचा अनुभव घेतो. प्राप्त परिस्थितीत समाधान मानण्याचा, क्रोधावर नियंत्रण करण्याचा आणि जीवन आनंद व्हावे, असा प्रयत्न करतो म्हणूनच वारी हा आनंदानुभव असे म्हणता येईल. वारकरी संप्रदायात आपल्या आचरणाने समाजाला जे निरोगी जीवनाचं योगदान दिलं आहे, ते महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राबाहेर कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वारकरी संप्रदायाचा चांगला प्रभाव आहे.
ज्ञानदेव कर्मयोगाचा पुरस्कार करतात. तरी त्यांच्या विचारांत कर्मवादाचे थोतांड नाही. स्वर्गसुखाच्या अपेक्षेने यज्ञयाग, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा करणाºया कर्मठांच्या आत्मज्ञानविरहित आंधळ्या कर्माचरणाचा काही उपयोग नसल्याचे ज्ञानदेव निक्षून सांगतात.भक्तियोगाचे श्रेष्ठत्व हे वारकºयांना ज्ञानदेव-नामदेवांसारख्या संतांनी कीर्तनातून जनमानसावर ठसविले. तत्कालीन समाजजीवनावर त्याचा निश्चित प्रभाव पडला असावा. कारण त्यानंतर वारकरी आचरण करण्याची परंपरा निर्माण झाली. वारकरी तत्त्वज्ञान अद्वैत अशा महत्त्वपूर्ण तत्त्वज्ञानाचा पाठपुरावा करणारे असून, भक्तीला केंद्रस्थानी ठेवून त्यात मोक्षमार्ग स्पष्टपणे सांगितला आहे. ज्ञानाला डावललेले नाही. ही ज्ञानोत्तर भक्ती असून त्यात क्लिष्टपणा नाही किंवा गुंतागुंत नाही.
उच्च-नीच, भेद नसलेल्या या संप्रदायानं सामाजिक समतेवर आधारित सोहळ्याची परंपरा घालून दिली. शुद्ध अंत:करण, नीतिमत्तेची जपणूक हे परमार्थाचे सूत्र असल्याचे या संप्रदायाने सांगितले आहे. समता बंधुभावाची शिकवण या संप्रदायाने दिली. वारकरी आचार-विचाराने नीतीची पातळी उंचावली जाते. आजच्या व्यवहारात दैनंदिन जीवनात अडी-अडचणी आणि समस्या आहेत. हिंसा-अहिंसा, सत-असत्, प्रवृत्ती-निवृत्ती, समता-विषमता, द्वैत-अद्वैत यांमधून कसली निवड करावी, कोणता निर्णय घ्यावा या विषयी सतत चिंता वाटणारे वातावरण असतं. अशा वेळी दैवी गुणांची अंमलबजावणी करावी. दैवी गुण अंगीकारावेत म्हणून वारकरी संप्रदाय सांगतो. मानवी मूल्यांची जोपासनादेखील या संप्रदायाने अतिशय उत्तम रीतीने सांगितली आहे. संसार सोडायचा नाही, त्यात बुडायचे नाही. ईशस्मरण नित्याने करायचे आणि अनासक्तीने सर्व व्यवहार करायचे हे वारकरी संतांनी शिकवले. प्रपंचात राहून परमार्थ करता येतो. वारकरी आचरण करायचे. ईश्वरभक्ती करायची तर त्यासाठी संसारत्याग करावा, संन्यास घ्यावा, असं हा संप्रदाय सांगत नसल्याने वारकरी संप्रदायाचे आचरण सर्वांना सहजसुलभ वाटते. वारकरी संतांनी जो भक्तिसंप्रदाय निर्माण केला त्यात अभंग, ओवी या वाणीतून आध्यात्मिक समतेची भूमिका घेतली होती. त्यांच्या भक्तियोजनाप्रमाणे ईश्वराची अर्थात पांडुरंगाची भक्ती करण्याचा सर्वांना अधिकार आहे. कोणत्याही जातीतील स्त्रीपुरुषास ईश्वरभक्ती करता येते. समानतेचा विचार हा तत्कालीन पारंपरिक जीवन जगण्याच्या चौकटीत वेगळा आणि उठून दिसणारा म्हणता येईल. तत्कालीन समाजात लोक धर्माचरण करीत, मात्र तसे करताना लोक माणुसकी विसरले होते. कर्मकांड, सोवळे-ओवळे यांना अधिक महत्त्व देत. या परिस्थितीत वारकरी-संत जन्माला आले. त्यांनी लोकांमध्ये मानवतेची जाणीव निर्माण केली हाच भागवतधर्म होय.
नामस्मरणाने, भक्तिमार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचता येते. समाजप्रबोधन आणि मानव कल्याणासाठी संतांनी आपला देह झिजवला. आपल्या मृत्यूनंतर काय होईल, यापेक्षा याच जन्मी काय मिळाले, किंवा मिळवता येईल, याचा विचार करावा, असं संत निर्धाराने सांगतात. रामकृष्ण हरी या नामजपाचा विचार रुजवतात. ज्ञानदेवांनी भागवत धर्माच्या रूपाने आध्यात्मिक लोकशाही निर्माण केली. कर्मकांडाला वगळून ईश्वरप्राप्तीचा नवीन व सोपा मार्ग सामान्य जनांना दिला. सर्व जणांना सामावून घेणारा नवा श्रद्धाळू भाविकभक्तांचा समूह निर्माण केला.
वारी केल्याचं काय फळ? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर कहाणी ऐकल्याचे काय फळ? अमूक व्रत केल्याचं काय फळ? असं विचारल्यावर सांगताना अवघड आहे. रोजचं जीवन जगताना आपण अनेक चिंता, समस्या यांना सामोरे जाताना सुखदु:खाच्या प्रसंगातून जातो. सर्वच सुखाचे क्षण येतील असे नाही. दु:ख भोगताना रडत बसायचे, असे म्हणून दु:खाचा असा शोक करणे गैर आहे. संतांच्या शिकवणीचा परिणाम विलक्षण आहे. ही शिकवण अंगी बाणली तर दु:खाची धार बोथट होते. दु:ख पचविण्याचं सामर्थ्य अंगी निर्माण होते. भजन, कीर्तन, नामस्मरण याबरोबर आपण सारे एक आहोत, हा एकोप्याचा विचार वारीमध्ये अनुभवताना भेदाभेदांची आवरणे गळून पडतात. जीवन जगण्याचा मार्ग गवसतो. सदाचरण, नीतिमूल्यांवर आधारित वर्तनसंतुष्टता, सात्त्विक विचारांबरोबर सात्त्विक आहार यांसारख्या कृती कराव्यात, असं वाटणं म्हणजे वारीची फलश्रुती.
ज्ञानेश्वरीविषयी संत नामदेवांनी म्हटलं आहे, की एक तरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रतिवर्षी निघणाºया वारीविषयी मला म्हणावसं वाटतं....
एक तरी वारी आचरावी!(लेखक संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)