फक्त अकरा वर्षे वयाचे नवेकोरे शहर सोंगडो

By admin | Published: March 26, 2016 09:00 PM2016-03-26T21:00:32+5:302016-03-26T21:00:32+5:30

विमानतळावर उतरले की थेट उड्डाणपुलावरून निघायचे ते या शहरातच उतरायचे. शहर कोरे करकरीत. ना प्रदूषण, ना गोंगाट, ना गर्दी. कचराकुंडय़ासुद्धा नाहीत, कारण या शहरात कचराच नाही. ऑफिसातून चालत निघाले, की दहा-पंधरा मिनिटांत प्रत्येकाला आपापल्या घरी पोचता येते. शहराच्या मध्यभागी मोठ्ठी बाग आणि त्यातून वाहणारी नदी. .. आणखी काय हवे? - तरीही काही चुकले, बिघडले आहे. दक्षिण कोरियाने पिवळ्या समुद्रात उभ्या केलेल्या ‘स्मार्ट सिटी’ची कहाणी.

Only eleven years old new city Songdo | फक्त अकरा वर्षे वयाचे नवेकोरे शहर सोंगडो

फक्त अकरा वर्षे वयाचे नवेकोरे शहर सोंगडो

Next
- अपर्णा वेलणकर
 
जगभरात नावाजलेला गजबजता विमानतळ हेच मुळी तुमच्या शहराचे प्रवेशद्वार असेल.
त्या विमानतळावर तुम्ही उतराल. बाहेर पडलात की लगेच एकवीस किलोमीटर लांबीचा एक झगमगता उड्डाणपूल. त्या पुलावरून वेगात धावणारी गाडी अवघ्या अठरा मिनिटात तुम्हाला थेट शहरातच आणून सोडेल.
शहरही एकदम नवेकोरे. आधी नीट चित्र रेखून मग त्या चित्रप्रमाणोच प्रत्यक्षात उतरवलेले.
या शहराचा पसारा 1500 एकरांचा.
त्याच्या मध्यभागी 101 एकराची भलीमोठी बाग. त्या बागेतून वाहणारी नदी. व्हेनिसचे वाहते कालवेच जणू. नदीत कयाकिंगसाठी झुलत्या बोटी. नौकाविहार. नदीभोवती आखीवरेखीव रुजवून शिस्तीत वाढवलेला विस्तीर्ण बगीचा. त्यात दुडदुडत धावणारे ससे, बागडणारी हरणो आणि बागेच्या बाहेर पडलात की गगनचुंबी इमारती. तिथे सगळी ऑफिसे. दुपारी लंच अवरमध्ये जेवण आवरून फेरफटका मारायला खाली उतरायचे ते थेट बागेतच. 
ऑफिस संपले की चालत चालत पंधरा मिनिटात घरी. कारण शहराच्या मध्याभोवती असलेल्या बिङिानेस डिस्ट्रिक्टला लागूनच निवासी संकुले. कुठूनही कुठेही जा, वाटेत सेंट्रल पार्क लागणारच. चालत जा, नाहीतर सायकलवर टांग मारून जा. ऑक्सिजनचे शुद्ध झोतच्या झोत शहरामध्ये पसरवणारे असे हिरवे, जिवंत फुप्फुस शहराच्या मध्यभागी.. आणि त्याला वळसा घालून जाणा:या घराच्या वाटेवर देखणी दुकाने, रोडसाईड कॅफे, खेळायला-फिरायला मुद्दाम राखलेल्या जागा. शहरात सगळीकडे सेन्सर्सचे जाळे. आज शहरात तपमान किती आहे या साध्या माहितीपासून याक्षणी शहरात किती वीज वापरली जाते आहे, कुठल्या रस्त्यावर काही गडबड आहे का इथवरच्या गुंतागुंतीच्या माहितीचा ओघ हे सेन्सर्स सतत जमवत, पाठवत राहाणार. हरक्षणी अपडेट होणा:या त्या माहितीवर आधारून शहर-व्यवस्थापनाचे निर्णय घेणारी ‘वॉररुम’ हीच महानगरपालिका.
अख्ख्या शहरात कच:याचा कण नाही, पण कचराकुंडय़ाही नाहीत आणि कचरा वाहून नेणारी वाहनेही! का?
- कारण या शहरात कचराच नाही.
म्हणजे कचरा आहे, पण तो घरांच्या-दुकानांच्या अगर ऑफिसांच्या बाहेरच पडत नाही. कचरा जिथे निर्माण होईल तिथूनच तो गिळून जमिनीखाली वाहून नेणारे मोठेमोठे पाइप्स सगळीकडे बसवलेले आहेत. म्हणजे घरातले भाजीचे तुकडे-शिळे अन्न-खरकटे, ऑफिसातला कोरडा कचरा हे सगळे घरातल्या घरात- ऑफिसातल्या ऑफिसात गिळले जाऊन थेट भूमिगत वाहिन्यांमधून भूमिगत कचरा-व्यवस्थापन डेपोमध्ये जाते. तिथे ओला-सुका कचरा वेगळा होतो. शक्य तो कचरा रिसायकलिंगसाठी पाठवणो, ओला कचरा वीजनिर्मितीसाठी धाडणो आणि यातले काहीच शक्य नसलेल्या उरलेल्या कच:यावर प्रक्रिया करून पर्यावरणाला हानिकारक न ठरता त्याचे व्यवस्थापन हे सगळे स्वयंचलित पद्धतीने केले जाते.
 या रीतीने अख्ख्या शहराच्या कच:याचा प्रश्न हाताळण्यासाठी फक्त 25 लोकांची टीम काम करते आणि चार भिंतीतला कचरा असा आतच गिळला-रिचवला जातो. कचरा-व्यवस्थापनाची ही अशी व्यवस्था जगात बाकी कुठेही अजून प्रत्यक्षात आलेली नाही.
- हे कोण्या सायन्स फिक्शनमधले कल्पनाचित्र नव्हे. हे एका शहरातले वास्तव आहे आणि ते प्रत्यक्षात ‘चालते’ आहे.
-कुठे आहे हे स्वप्नवत शहर? त्याची टॅगलाईन सांगते त्याप्रमाणो  ‘जगातल्या एक-तृतीयांश लोकसंख्येपासून केवळ साडेतीन तासांच्या अंतरावर!’
दक्षिण कोरियातले सोंगडो!
सेऊल या द. कोरियाच्या राजधानीपासून  छपन्न किलोमीटर अंतरावर पिवळ्या समुद्रकाठच्या एका पट्टीत उभ्या राहिलेल्या या शहराचे वय आहे केवळ अकरा वर्षाचे.
हे नुसते शहर नव्हे, त्याच्या नावातच ‘सोंगडो इंटरनॅशनल बिङिानेस डिस्ट्रिक्ट’ असा संपूर्ण आणि स्वच्छ उल्लेख आहे.
द. कोरियाने तंत्रज्ञान-विकासात चालवलेल्या प्रगतीचा डंका जगात वाजवला जावा, प्रगत देशांमध्ये उभ्या राहाणा:या नव्या शहरांशी स्पर्धा करण्यासाठी आर्थिक शिवाय पायाभूत सुविधांच्या जाळ्याची ताकद कमवावी आणि त्या बळावर आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र बनून आशियातल्या अंतर्गत सत्ता-स्पर्धेत वरचष्मा ठेवता यावा यासाठी द. कोरियाने एक नवे शहरच उभे करायचा घाट घातला, तेच हे सोंगडो. सोंगडो बिङिानेस डिस्ट्रिक्ट!
आज सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणा:या या अत्याधुनिक, तरण्याताठय़ा शहराच्या जागी अवघ्या सोळा वर्षापूर्वी - म्हणजे 2क्क्क् साली फक्त समुद्राकाठचा वाळूभरल्या भरड मातीचा एक पट्टा होता. म्हणजे भरतीचे मैदान. तिथे परंपरेने वास्तव्याला असलेले कोळी लोक समुद्रातल्या मासेमारीवर गुजराण करत छोटीछोटी विरळ घरे बांधून राहात होते. शिवाय समुद्री पर्यावरणाचा भाग असलेल्या पक्ष्यांची, पाणथळ वनस्पतींची आणि अन्य जीवसृष्टीची वस्ती तर होतीच. सगळा विरोध मोडून काढून या सगळ्या जिवंत खुणा पुसून टाकणो द. कोरियात फारसे अवघड नव्हतेच. तेच केले गेले. 
हा दलदलीचा पट्टा आणि त्या शेजारच्या पिवळ्या समुद्रात द. कोरियाच्या सरकारने तब्बल पन्नास कोटी टन मातीचा भराव टाकून समतल जमीन तयार करून घेतली, ही 2000 सालातली घटना. त्यानंतर या ‘जमिनीवर’ नव्या शहराचे आरेखन करणो, ते प्रत्यक्ष बांधणो यासाठी जागतिक निविदा मागवल्या गेल्या. गेल इंटरनॅशनल या अमेरिकन कंपनीने ‘सौदा’ जिंकला, पुढे पॉस्को ही कोरियन बहुराष्ट्रीय कंपनी सहभागी झाली. तिसरा भागीदार होता इंचऑन महानगरपालिका क्षेत्र. पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपमधून नव्या शहराची  ‘मालकी’ अशी तिघात विभागली गेली. 2क्क्5 साली मास्टरप्लॅन पक्का करून शहराच्या बांधणीचा नारळ फुटला.. आणि सुरू झाला शून्यातून उभ्या राहू घातलेल्या एका नव्या शहराच्या जन्माचा प्रवास. म्हणजे सोंगडोचे आजचे वय आहे अवघे 11 वर्षाचे! अजून मिसरूडही फुटायचे आहे, पण त्यादरम्यान शक्यता आणि वास्तवातल्या अनपेक्षित फरकाशी झगडणा:या या  शहराच्या पौगंडावस्थेचा काळ अनेक अस्वस्थतांनी व्यापलेला आहे. त्याबद्दल पुढच्या रविवारी..
 
 
गेल्या 
13 वर्षात
2003 पिवळ्या समुद्रात भराव घालून नव्या शहराच्या विस्तारासाठी
जमिनीचे सपाटीकरण
 
2005 मास्टरप्लॅन तयार करून प्रत्यक्ष शहर-उभारणीला सुरुवात
 
2009 सेंट्रल पार्क तयार. इंचऑन ब्रीज आणि व्यापारी इमारती वापरासाठी खुल्या
 
2014 निवासी वापरासाठीच्या इमारती, सदनिकांची
विक्री सुरू. कुटुंबे वास्तव्याला आली.
 
2016 आत्ताची स्थिती
35 अब्ज अमेरिकन डॉलर्स आजवरची एकूण गुंतवणूक
 
60}
शहर 
उभारणी पूर्ण
 
70,000
निवासी 
लोकसंख्या
 
(लेखिका ‘लोकमत’च्या फीचर एडिटर आहेत.)
aparna.velankar@lokmat.com

 

Web Title: Only eleven years old new city Songdo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.